चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2023

Date : 7 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल
  • नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली. फोस यांची ‘नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यलेखन’ यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे पुरस्कार समितीने सांगितले.
  • युआन फोस यांच्या कादंबऱ्या आणि लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकेही मोठय़ा प्रमाणात वाखाणली गेली आहेत. त्यांच्या कथानक आणि भाषेमध्ये नॉर्वेच्या पार्श्वभूमीची पाळेमुळे दिसून येतात असे पुरस्कार समितीचे अँड्रेस ओस्लोन म्हणाले. फोस यांनी ४० नाटके व कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची पुस्तके, कविता आणि ललित निबंध लिहिले आहेत. ‘नोबेल समितीचा आपल्याला फोन आल्यानंतर फार आनंद झाला’, अशी प्रतिक्रिया फोस यांनी नॉर्वेची वृत्तसेवा एनआरकेशी बोलताना व्यक्त केली.
  • फोस यांच्या लिखाणातून अव्यक्त भावनांना शब्दरूप मिळते असा गौरव अकादमीने केला. अकादमीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माल्म यांनी फोस यांच्या नावाची घोषणा केली. नोबेल पुरस्काराची रक्कम ११० लाख स्विडिश क्रोनर (१० लाख डॉलर) इतकी आहे. त्याशिवाय पुरस्कारप्राप्त विजेत्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळय़ात १८ कॅरेटचे सुवर्णपदक आणि डिप्लोमाही प्रदान केला जाईल.
शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!
  • आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियन गेम्समध्ये याआधी भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही ७० पदकांची होती. यंदा मात्र भारतानं तो आकडा केव्हाच पार केला आहे. एवढंच नाही, तर एक नवा इतिहास रचत भारतानं आता पदकांची शंभरी पार केली आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मोठ्या सन्मानानं रोवला गेला आहे. गेल्या ६० वर्षांतली ही भारताची एशियन गेम्समधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
  • शुक्रवारी भारताच्या भात्यात ८६ पदकं होती. काल दिवसभरात हॉकी (सुवर्णपदक), तिरंदादी (रौप्य व कांस्य पदक), ब्रिज (रौप्य), बॅडमिंटन (रौप्य) व रेसलिंग (३ रौप्य) अशा पदकांची लयलूट केली. आज सकाळी भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी करताना तिरंदाजीत तीन, कबड्डीत दोन व बॅडमिंटन आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक अशा पदकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे आता भारताची पदकसंख्या शंभरीपार गेली आहे!

“आमचं स्वप्न सत्यात उतरेल याचा विचारही केला नव्हता”

  • “आम्ही चीनमध्ये आशियाई स्पर्धांसाठी येताना १०० पदकांचं लक्ष्य ठेवलं होतं हे खरं आहे. पण आम्ही असा विचार केला नव्हता की आमचं स्वप्न अशा प्रकारे सत्यातही उतरेल. आता आम्ही ते अगदी सहज साध्य करत आहोत. मी देशाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. शिवाय, सपोर्ट स्टाफ, खेळाडूंचे प्रशिक्षक या सगळ्यांच्या मदतीनेच हे लक्ष्य साध्य करणं शक्य झालं आहे”, अशी प्रतिक्रिया भारताचे आशियाई स्पर्धेतील प्रमुख भूपिंदर सिंग बाजवा यांनी दिली.

याआधीची सर्वोत्तम कामगिरी..७० पदकं!

  • दरम्यान, याआधी पाच वर्षांपूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं ७० पदकं जिंकत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदनली होती. त्या वर्षी पदकांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी होता. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत चौथ्या किंवा पाचव्या स्थानी राहिला. या वर्षी १०० पदकांसह भारत चीन, जपान व दक्षिण कोरियापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे.
कॅनडाचे भारतातील कर्मचारी मलेशिया, सिंगापूरमध्ये
  • खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत वाद उद्भवल्यानंतर, भारत व कॅनडा यांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत समानता आणण्यासाठी कॅनडाने त्याच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता भारताने त्या देशाला १० ऑक्टोबरची मुदत दिली होती. यानंतर, कॅनडाने भारतात नवी दिल्लीबाहेर काम करणाऱ्या त्याच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांना एक तर मलेशिया अथवा सिंगापूरमध्ये हलवले असल्याचे वृत्त एका माध्यमाने शुक्रवारी दिले.
  • हरदीपसिंग निज्जर याच्या जूनमधील हत्येशी भारतीय हस्तकांचा संबंध असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर राजनैतिक वाद उद्भवला होता. त्यातून, कॅनडाने त्याच्या राजदूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी, असे भारताने या आठवडय़ाच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यानंतर कॅनडातील ‘सीटीव्ही न्यूज’ या खासगी दूरचित्रवाहिनीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारताने ट्रुडो यांचे आरोप ‘हास्यास्पद’ व ‘प्रेरित’ असल्याचे सांगून फेटाळले होते.
  • कॅनडात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या जितकी आहे, तितकीच कॅनडाने त्याच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करावी यासाठी भारत सरकारने कॅनडाला १० ऑक्टोबर ही मुदत दिली असल्याचे वृत्त सीटीव्ही न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिले.
  •  भारताच्या अटीनुसार कॅनडाच्या ४१ राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागेल, असे पूर्वीच्या वृत्तात म्हटले होते, मात्र भारताने ही संख्या केवळ बरोबरीत आणण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी या वाहिनीला दिली. ‘भारतात नवी दिल्लीबाहेर काम करणाऱ्या बहुतांश कॅनडियन राजनैतिक कर्मचाऱ्यांना एक तर क्वालालंपूर किंवा सिंगापूरला हलवण्यात आले आहे,’ असे या वृत्तात म्हटले आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ शहरात WhatsApp च्या मदतीने खरेदी करता येणार तिकीट
  • सध्या भारतातील रेल्वेचे जाळे अधिक मजबूत होताना दिसत आहे. तसेच शहरी भागांमध्ये मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे. तसेच नवीन मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे काम सुरु आहे. आता मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो कार्पोरेशन (DMRC) ने व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित तिकीट सर्व्हिसचा अधिक विस्तार केला आहे. ही तिकीट सिस्टीम जून महिन्यामध्ये एअरपोर्ट एक्सप्रेस लाइनवर लॉन्च करण्यात आली होती. या सर्व्हिसला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे डीएमआरसीने आता गुरुग्राम रॅपिड मेट्रोसह दिल्ली- एनसीआरमधील सर्व लाइन्सवर या तिकीट सर्व्हिस सिस्टीमची सुरुवात केली आहे. ही सर्व्हिस मेटा आणि त्याची अधिकृत भागीदार असलेल्या Pelocal Fintech Pvt. Ltd च्या मदतीने सुरु केली गेली आहे.
  • ”व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात जास्त लोकप्रिय असलेले मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतीयांच्या अधिक आवडीचे प्लॅटफॉर्म आहे. आता मेट्रोचे तिकीट खरेदी करणे एखाद्या मीटरला किंवा कुटुंबातील सदस्याला मेसेज करण्याइतके सोपे झाले आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही सिस्टीम प्रवासासाठी दिल्ली मेट्रोचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करतील.” असे डीएमआरसीचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास कुमार म्हणाले.
  • जूनमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सिस्टीमचा फायदा परिसरातील हजारी प्रवाशांना होत आहे. मेट्रो तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना +९१ ९६५०८५५८०० या नंबरवर ‘hi’ असा एक मेसेज पाठवावा लागेल. तसेच तिकीट खरेदी करण्यासाठी सोप्या पद्धतीने QR कोड देखील स्कॅन करू शकतात. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. ही सिस्टीम आता १२ मेट्रो लाइन्सपर्यंत पसरली आहे. ज्यामध्ये २८८ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. तसेच प्रवासी आता घरी बसल्या बसल्या देखील तिकीट खरेदी करू शकतात.

१. या सिस्टीमचा वापर करणारा वापरकर्ता एका वेळी ६ QR तिकीट जनरेट करू शकतो.
२. सर्व मेट्रो लाइन्ससाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६६ या वेळेत तिकीट खरेदी
३. एअरपोर्ट लाइनसाठी सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत तिकीट बुक केले जाऊ शकते.
४. एकदा बुक केलेलं तिकीर रद्द करता येणार नाही.
५. डेबिट किंवा क्रेडिट कार्डावरून व्यवहार केल्यास सुविधा शुल्क आकारले जाईल.
६. युपीआय आधारित व्यवहारांवर सुविधा शुल्क लागणार नाही.

लँडर, रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता मावळली; ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांचे मत
  • भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे चांद्रभूमीवर निद्रावस्थेत गेल्यानंतर आता ते पुन्हा जागृती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही, असे एका ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञाने शुक्रवारी सांगितले. त्यामुळे ही मोहीम आता जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत.
  • अंतराळ आयोगाचे सदस्य आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, हे लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता दिसत नाही. तसे जर व्हायचे असते तर, आतापर्यंत झाले असते. आता ते घडण्याची कोणतीही शक्यता नाही.किरणकुमार हे चंद्रयान-३ मोहिमेत सक्रिय सहभागी होते.चंद्रावर नवा दिवस सुरू झाल्यानंतर इस्रोने २२ सप्टेंबर रोजी म्हटले होते की, सौर ऊर्जेवर चालणारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना पुन्हा कार्यान्वत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून अद्याप तरी कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ चे विक्रम लँडर यशस्वीरीत्या उतरले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. त्याचप्रमाणे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग साध्य करणारा भारत हा अमेरिका, सोव्हिएत रशिया महासंघ (तत्कालीन) आणि चीननंतर चौथा देश ठरला आहे.
Nobel Peace Prize : 13 वेळा अटक, चाबकाचे 154 फटके अन् 31 वर्ष तुरुंगवास, नर्गिस मोहम्मदींना यंदाचं शांततेचं नोबेल
  • यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. वैद्यक, भौतिक आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर आज शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. इराणमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि तिथल्या महिलांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनल लढत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी या गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये मानवी हक्क आणि स्त्रियांवरील अत्याच्यारांविरोधात लढत आहेत. त्यांच्या लढ्याला सलाम करण्यासाठी त्यांना २०२३ चं शांततेचं नोबेल जाहीर करण्यात आलं आहे.
  • नर्गिस मोहम्मदी यांना इराण सरकारने आतापर्यंत १३ वेळा अटक केली आहे. तरी बलाढ्य इराण सरकार त्यांना रोखू शकलं नाही. उलट प्रत्येक कारवाईनंतर त्या अधिक आक्रमकपणे लढा देऊ लागल्या. त्यांना १५४ चाबकाचे फटके मारण्याची शिक्षादेखील झाली. या शिक्षेलादेखील त्यांनी हसत हसत तोंड दिलं. तसेच त्यांना ३१ वर्षांच्या तुरंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नर्गिस मोहम्मदी यांना जगातला सर्वोच्च मानला जाणारा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु, हा पुरस्कार स्वीकारायला त्या ओस्लोला (नॉर्वेची राजधानी) जाऊ शकणार नाहीत. कारण सध्या त्या तुरुंगात आहेत.
  • यंदाचं शांततेचं नोबेल जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं आहे की, नर्गिस मोहम्मदी यांचा संघर्ष खूप मोठा आहे. आपल्या लढाईच्या बदल्यात त्यांनी खूप मोठी किंमत मोजली आहे. फ्रंट लाइन डिफेंडर्स राइट्स ऑर्गनायजेशन या संघटनेसाठी त्या काम करत आहेत. या संघटनेनं म्हटलं आहे की, इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी सध्या तेहरानच्या एव्हिन तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. इराणी सरकारविरोधात खोटा प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
  • इराणमधल्या महिलांना सन्मानाने जगता यावं, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नर्गिस मोहम्मदी यांचा इराणी राजवटीविरोधात लढा सुरू आहे. मोहम्मदी या इराणी महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावणाऱ्या नियमांना आव्हान देतात. त्याविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलनं केली, आवाज उठवला. महिलांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी अधिकारांसाठी त्या तिथल्या राजवटीविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी नोबेल समितीने त्यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - मालविका बनसोडला रौप्यपदक :
  • महाराष्ट्राच्या अग्रमानांकित मालविका बनसोडला गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडिमटन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच तिरंदाज गौरव लांबेने सहा तासांच्या अंतराने रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. बॅडिमटनमधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित मालविकाने दुसऱ्या मानांकित छत्तीसगडच्या आकर्शी कश्यपकडून ८-२१, २०-२२ अशी हार पत्करली.

  • तिरंदाजीत गौरव लांबेने दोन पदके मिळविली. गौरवने चारुलतासोबत रिकव्‍‌र्हच्या मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या जोडीला हरयाणाविरुद्ध टायब्रेकरमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचे हे तिरंदाजीतील सहावे पदक ठरले.

  • गौरवने सकाळच्या सत्रात सांघिक रिकव्‍‌र्ह गटात कांस्यपदक मिळविले होते. महाराष्ट्राच्या अनुज शहाने पुरुषांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात कांस्यपदक पटकावले. निखिल दुबेने बॉक्सिंगमध्ये विजयी सलामी देताना राजस्थानच्या प्रितेश बिश्नोईला ४-१ असे नमवले. रेनॉल्ड जोसेफने आसामच्या रोशन सोनारविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळविला.

फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल :
  • फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी अर्नो यांना गौरवण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले.

  • अर्नो (८२) यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली. मात्र कालांतराने त्यांनी स्मरणशक्तीपर लेखन सुरू केले. त्यांची २०पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत.

  • लैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, आईवडिलांचा मृत्यू अशा घटनांचे चित्र त्यातून उभे राहते. त्यांच्या २००८ साली प्रसिद्ध झालेल्या आणि सर्वाधिक गाजलेल्या ‘द इयर्स’ या आत्मकथनपर लेखनात दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समधील समाजाची स्थित्यंतरे त्या विशद करतात. या पुस्तकाची खासियत अशी की यामध्ये प्रथमच त्यांनी नायिकेचा उल्लेख तृतीयपुरुषी केला. आतापर्यंतच्या कादंबऱ्यांमध्ये त्या ‘मी’ असे लिहीत असत. ‘द इयर्स’मध्ये त्यांनी ‘ती’ची कहाणी सांगितली. या आठवडय़ात नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून शुक्रवारी ‘शांतता पुरस्कार’ जाहीर होणार आहे.

  • पूर्वाश्रमीच्या अ‍ॅनी डचेन्स यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी फ्रान्समधील लिलिबोन इथे झाला. त्यांचे बालपण नर्ॉमडी येथील येटोट इथे गेले. शिक्षक होण्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी साहित्यामध्ये उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी विद्यापीठात साहित्यामध्ये अध्यापनाचे काम केले. ‘द इयर्स’ या पुस्तकासाठी २०१९ साली अ‍ॅनी अर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन होते.

भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर २०२२ साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी ३ खेळाडूंची निवड केली आहे. दोन्ही श्रेणीतील एकूण ६ खेळाडूंपैकी ३ भारतीय आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे. प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.

  • आयसीसी पुरुषांच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सप्टेंबर २०२२ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवडण्यात आले आहे. रिझवानने गेल्या महिन्यात १० सामने खेळले. यातील त्याने २०१४ मध्ये अर्धशतक झळकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनचेही नाव आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना ९ बळी मिळवले होते. ग्रीन याने देखील याच मालिकेत दोन आक्रमक अर्धशतके झळकावली होती. तर रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसेच आशिया चषकात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती.

  • हरमनप्रीत कौरसाठी सप्टेंबर २०२२ हा केवळ एक फलंदाज म्हणून नव्हे तर भारतीय संघाची कर्णधार म्हणूनही संस्मरणीय महिना होता. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. १९९९ नंतर भारताचा इंग्लंडमध्ये हा पहिलाच मालिका विजय होता. हरमनप्रीतने या मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पहिल्या दोन सामन्यात तिने फिनिशरची भूमिका बजावली होती.

‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया गांधी यांचा सहभाग :
  • काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधत असलेले राहुल गांधी यांचे ‘भारत जोडो’ यात्रेतील छायाचित्र शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर, सोनिया व राहुल गांधी यांच्या एकत्रित सहभागाचा कर्नाटकसह अन्य राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती लाभ होऊ शकेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

  • या चर्चेकडे भाजपलाही लक्ष द्यावे लागले असून ‘यात्रेमध्ये सोनिया फक्त अर्धा तास सहभागी झाल्या होत्या, या यात्रेमुळे निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच, केंद्रातील भाजपचे नेतेही करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यात्रा काढून काँग्रेस घाम गाळत असल्याचे दिसत असले तरी, त्याचा काँग्रेसला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाही,’ असा दावा भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी केला.

  • काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकमध्ये असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी मंडय़ा जिल्ह्यातून यात्रा पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेआठ वाजता सोनिया गांधी यात्रेमध्ये सहभागी झाल्या, सुमारे एक किमी अंतर चालल्यानंतर, राहुल गांधी यांनी सोनियांना सकाळच्या टप्प्यातील उर्वरित यात्रा कारमधून पूर्ण करण्याची विनंती केली. काही वेळानंतर, सोनियांनी पुन्हा दोन किमीची पदयात्रा केली. यात्रेमध्ये सोनिया गांधी जेमतेम अर्धा तास सहभागी होणार होत्या; पण त्यांनी दोन तास पदयात्रा केली, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताकडून निषेध, जपानची सुरक्षितता धोक्यात आल्याचे केलं नमूद :
  • उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताने निषेध नोंदवला आहे. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांती आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही निषेध नोंदवला आहे. पाच वर्षांत उत्तर कोरियाने जपानवर डागलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र मंगळवारी जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी पडले होते.

  • या वर्षांत उत्तर कोरियाने २४ वेळा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. “उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राची आम्ही दखल घेतली आहे” असे संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेत म्हटले आहे. या घटनेवर संयुक्त राष्ट्रामधील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी ब्राझिल, भारत, आर्यलँड, जपान, नॉर्वे, दक्षिण कोरिया, इंग्लंड, सौदी अरेबियासह ११ देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी केले आहे. या प्रक्षेपणाने सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे. यामुळे केवळ जपानमधील प्रदेशालाच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजाला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

  • संयुक्त राष्ट्रामधील उत्तर कोरियाशी संबंधित ठरावांची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी रुचिरा कंबोज यांनी केली आहे. कोरियन द्वीपकल्पात शांती आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे सामूहिक हिताचे आहे. या द्वीपकल्पातील समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आम्ही समर्थन करतो, असे कंबोज यांनी म्हटले आहे. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त व्हावा, यासाठीही पाठिंबा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

०७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.