चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 जून 2023

Date : 7 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना आजपासून; ‘आयसीसी’ जेतेपदाचे भारताचे लक्ष्य
  • आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या  (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात उतरेल, तेव्हा त्यांचे लक्ष्य गेल्या दहा वर्षांपासून दूर राहिलेले ‘आयसीसी’ जेतेपद मिळवण्याचे असेल.
  • ‘डब्ल्यूटीसी’च्या गेल्या दोन चक्रात भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. गेल्या दहा वर्षांत मर्यादित षटकांच्या सर्व मोठय़ा स्पर्धामध्ये बाद फेरीपर्यंत भारताने धडक मारली. मात्र, त्यांना जेतेपद मिळवता आले नाही. भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक पटकावला होता. त्यानंतर भारताला ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये तीन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर, चार वेळा त्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. संघ २०२१ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या फेरीतच बाहेर पडला. गेल्या ‘डब्ल्यूटीसी’ चक्रात भारताने सहापैकी केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली.
  • दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि रोहित शर्मावर संघाची जबाबदारी देण्यात आली. भारतीय संघ मायदेशात अपराजित राहिला. इंग्लंडमधील मालिका त्यांनी बरोबरीत राखली. बांगलादेशविरुद्ध कठीण परिस्थितीतून त्यांनी विजय साकारला. ओव्हल येथील या निर्णायक सामन्याचा निकाल काहीही लागला, तरीही संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघाबद्दलचा दृष्टिकोन बदलणार नाही. ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकणे, इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत राखणे, गेल्या पाच-सहा वर्षांत संघाने चांगले प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळले. तुम्ही ‘आयसीसी’ जेतेपद मिळवा किंवा नाही. मात्र, या गोष्टी कधीही बदलणार नाहीत,’’ असे द्रविडने  अंतिम सामन्यापूर्वी सांगितले.
जाणून घ्या तुमच्या विद्यापीठाचे रँकिंग; पहिल्या दहामध्ये राज्यातील एकही विद्यापीठ नाही
  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०२३ च्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) राज्यातील एकही विद्यापीठ देशातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकले नाही. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने देशातील १०० विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने १७ वा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १९ वा क्रमांक मिळवत पहिल्या २० मध्ये स्थान मिळवले.
  • दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देशातील प्रमुख विद्यापीठांसह १० वेगवेगळ्या प्रवर्गातील महाविद्यालयांची रँकिग जाहीर केली जाते. त्यानुसार अध्यापन, अध्ययन, संशोधन, आकलन, व्यावसायिक शिक्षण, अभ्यासक्रमांची परिणामकारकता, आदी निकषांनुसार महाविद्यालयांची क्रमवारी जाहीर केली जाते. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी यंदाच्या वर्षाची ‘एनआयआरएफ’ रँकिंग जाहीर केली.

पहिल्या शंभरमध्ये राज्यातील कोणती विद्यापीठे?

  • विद्यापीठ क्रमवारीत होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई- १७, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- १९, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई- २३, सिम्बयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे- ३२, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च वर्धा- ३९, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे- ४६, नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई- ४७, मुंबई विद्यापीठ- ५६, भारती विद्यापीठ पुणे- ९१, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई- ९८.
“भारत ही एक जिवंत लोकशाही, हवंतर नवी दिल्लीत जाऊन…”, मोदींच्या दौऱ्याआधी व्हाईट हाऊसमधून देशाचं कौतुक
  • अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसोबत मैत्री जपल्याने अनेक देशांसोबत भारताने विविध पातळ्यांवर भागीदारी केली आहे. दरम्यान, भारतातील लोकशाहीचंही जगभरात कौतुक केलं जातं. याचपार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समनव्यक जॉन किर्बी यांनी भारतातील लोकशाहीचं कौतुक केलं आहे. तसंच, भारतासोबत अमेरिक विविध पातळ्यांवर एकत्र असल्याचंही ते म्हणाले.
  • “भारत ही एक जिवंत लोकशाही आहे. तुम्ही नवी दिल्लीला गेलात तर, तुम्हाला त्याची अनुभूती येईल. लोकशाही संस्थांचे सामर्थ्य आणि आरोग्य या चर्चेचा भाग असेल अशी मी अपेक्षा करतो”, असं जॉन किर्बी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर जॉन किर्बी यांनी हे भाष्य केलं आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत जॉन किर्बी म्हणाले की, “ही भेट पुढे जाण्याबद्दल आहे. आम्हाला आशा आहे की पुढे जाऊन एक सखोल, मजबूत भागीदारी आणि मैत्री होऊ शकेल. तुम्ही पाहिले की शांग्री-ला येथे सचिव ऑस्टिन यांनी काही अतिरिक्त संरक्षण सहकार्याची घोषणा केली की आता आम्ही भारतासोबत पाठपुरावा करणार आहोत. अर्थातच, आमच्या दोन्ही देशांमधील आर्थिक व्यापार खूप मोठा आहे. भारत पॅसिफिक क्वाडचे सदस्य आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेच्या संदर्भात एक प्रमुख मित्र आणि भागीदार आहे”, असंही ते म्हणाले.
  • आपल्या दोन देशांमध्ये केवळ द्विपक्षीयच संबंध नाहीत तर अनेक पातळ्यांवर भारताला निश्चितच महत्त्व आहेत. यासाठी विविध कारणेही आहेत. या सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी आणि मैत्री वाढवण्याकरता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यास इच्छुक आहोत, असंही ते पुढे म्हणाले.
“ब्रिटनमध्ये आश्रयासाठी येता आणि वर तक्रारी करता?” पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्थलांतरितांना सुनावलं!
  • ब्रिटनमध्ये सध्या इतर देशांमधून आश्रयासाठी येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे स्थानिक हॉटेल्स आणि इतर सुविधांवर ताण निर्माण होत असल्याचं दिसू लागलं आहे. यासंदर्भात ब्रिटन सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे स्थानिक सुविधांवर निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. या उपाययोजना फलदायी ठरत असल्याचं सांगतानाच त्याबाबत तक्रार करणाऱ्या स्थलांतरीतांची ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे.

नेमका काय आहे प्रकार?

  • ब्रिटनं जगातील कठीण परिस्थिती असणाऱ्या देशातील नागरिकांसाठी राजाश्र्य धोरण जाहीर केलं होतं. त्यानुसार, या देशांमधून स्थलांतरितांना ब्रिटनमध्ये आश्रय देण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र, यात अनेक बेकायदेशीर स्थलांतरीतही ब्रिटनमध्ये येत असून त्यामुळे ब्रिटनमधील हॉटेल्स आणि इतर सोयी-सुविधांवर ताण निर्माण होऊ लागला. त्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजीही व्यक्त होताना पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक सरकारने काही उपाययोजना जाहीर केल्या. या उपाययोजना आता फलदायी ठरत असल्याचं सुनक यांनी म्हटलं आहे.

बेकायदेशीर स्थलांतरितांची बोटवर व्यवस्था!

  • केंटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऋषी सुनक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी तु्म्हाला वचन देतो, की आपण स्थानिक हॉटेल्समधून बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करू. स्थानिक सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी आपण या लोकांना थेट बोटीवरच हलवू. येत्या १५ दिवसांत त्यातलं पहिलं जहाज पोर्टलँडमध्ये दाखल होईल. अजून दोन जहाजांची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर १ हजार जणांची व्यवस्था होऊ शकेल”, असं सुनक म्हणाले आहेत.

स्थलांतरितांकडून निषेध!

  • दरम्यान, सुनक सरकारच्या या धोरणाचा स्थलांतरितांनी काही ठिकाणी निषेधही केल्याचं समोर आलं आहे. यावरून ऋषी सुनक यांनी स्थलांतरितांना सुनावलं आहे. “शक्य तिथे एका खोलीत अधिक स्थलांतरितांना सामावून घेण्यास सांगितल्यामुळे आपण अशा अतिरिक्त ११ हजार ५०० जागा तयार करू शकलो आहोत. ज्या स्थलांतरितांनी यावर आक्षेप घेतलाय, त्यांना मी सांगेन की ही पूर्णपणे न्याय्य प्रक्रिया आहे. तुम्ही मृत्यूच्या, छळाच्या आणि देहदंडाच्या भीतीने इथे येत असाल तर तुम्ही ब्रिटिश करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या लंडनमधील हॉटेल्समधल्या खोल्यांमध्ये तडजोड करण्याची तयारीही असायला हवी”, असं ते म्हणाले.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपास, रुडची आगेकूच; महिला गटात जाबेऊर, सबालेन्का,गॉफचे विजय
  • चौथ्या मानांकित नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि पाचवा मानांकित ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. महिला गटात सातव्या मानांकित टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर, दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का,अमेरिकेची कोको गॉफ, ब्राझीलची बीअट्रिज हद्दाद माइआ तसेच, युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
  • पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात रुडने चिलीच्या निकोलस जॅरीचा ७-६ (७-३), ७-५, ७-५ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. मात्र, रुडने अखेर बाजी मारली. तर, त्सित्सिपासने ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनेरला ७-५, ६-३, ६-० असे सरळ सेटमध्ये नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्सित्सिपाससमोर अग्रमानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझचे आव्हान असेल.
  • महिला गटात जाबेऊरने चौथ्या फेरीत अमेरिकेच्या बर्नार्डा पेरावर ६-३, ६-१ असा विजय नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर हद्दाद माइआचे आव्हान असेल. माइआने अन्य सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करताना स्पेनच्या सारा सोरिबेस टॉर्मोला ६-७ (३-७), ६-३, ७-५ असे पराभूत केले. सबालेन्काने अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सवर ७-६ (७-५), ६-४ असा विजय साकारला. उपांत्यपूर्व तिचा सामना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनाने दारिया कसात्किनाला ६-४, ७-६ (७-५) असे नमवले. तर, गॉफने स्लोव्हाकियाच्या कॅरोलिना श्मीडलोव्हाला ७-५, ६-२ असा पराभव केला.

 

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा - पूजा, विवानला सुवर्ण :
  • महाराष्ट्राने खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सायकिलग आणि योगासनात सुवर्णपदके पटकावली. याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राने २ सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्य अशी पदके पटकावली.

  • ट्रॅक सायकिलगमध्ये परसूट प्रकारात मुलींमध्ये पूजा दानोळेने (कोल्हापूर) सुवर्णपदक जिंकले. याच प्रकारात मुलांमध्ये विवान सप्रूने (मुंबई) कांस्य मिळवले. स्प्रिंटमध्ये संज्ञा कोकाटेने रौप्यपदक जिंकले.

  • योगासनातील सुवर्णपदक रुपेश सांगेने पटकावले. कलात्मक प्रकारात जय कालेकर, प्रीत बोरकर, रूपेश सांगे, सुमित बंडाळे, ओम राजभरने रौप्यपदक जिंकले. मुलींमध्ये या प्रकारात मृणाल बानाईत, रूद्राक्षी भावे, स्वरा गुजर, तन्वी रेडीज, गीता शिंदे यांनीही रौप्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये राणी रानमाळेने ५५ किलो वजनी गटात १५९ किलो वजन उचलून कांस्यपदक प्राप्त केले.

  • बॅडिमटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने अंतिम फेरीत धडक मारली. त्याने उपांत्य लढतीत हरयाणाच्या एम. चौधरीचा तीन गेममध्ये पराभव केला.

दोन नव्या ‘वंदे भारत’ १५ ऑगस्टनंतरच :
  • ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस येत्या १५ ऑगस्टला रेल्वेच्या चेन्नईमधील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’तून (आयसीएफ) बाहेर पडणार आहे. या कारखान्यातून सुरुवातीला दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे. आवश्यक त्या काही चाचण्या होऊनच त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळे येत्या १५ऑगस्टनंतरच ही गाडी धावू शकेल. या दोन प्रोटोटाईप गाडय़ा असतील. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही महिन्यात ‘वंदे भारत’ गाडय़ांच्या डब्यांची बांधणी लातूर येथील कारखान्यातही होणार आहे.

  •  ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे. जवळपास ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये १६ वातानुकूलित डबे असणार आहेत. तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ इतकी आहे. सध्या नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली – कटरा मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे. या गाडय़ा सुरू होऊन बरेच महिने झाले. त्यानंतरही नवीन ‘वंदे भारत’ गाडय़ा येऊ शकलेल्या नाहीत. आता मात्र त्यांच्या बांधणीच्या कामांना वेग देण्यात येत आहे.

  • आयसीएफ कारखान्यातून १५ ऑगस्ट रोजी दोन ‘वंदे भारत’ गाडय़ा बाहेर पडतील. त्यांची चाचण्या केल्यानंतरच  त्या सेवेत दाखल होतील. 

धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य :
  • धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तब्बल १६ वर्षांपासून प्रलंबित या विषयावर अखेर सोमवारी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात सुमारे १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले.

  • राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मंडळाचे सदस्य किशोर रिठे, कुंदन होते, यादव तरटे पाटील आदी उपस्थित होते. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीदरम्यान धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी हे प्रस्ताव मंडळाची उपसमिती तयार करून तिच्याकडे परीक्षणासाठी पाठवण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाच्या प्रस्तावाचे परीक्षण करण्यासाठी महसूल विभागनिहाय चार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

  • अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ नुसार, वनवासी अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वनहक्क कायद्याच्या कलम दोन(ब)नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित होते. या निर्णयामुळे वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.

बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कायम; स्वपक्षीय विरोध असतानाही जिंकला अविश्वास ठराव :
  • वाढती महागाई आणि ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना दिलासा मिळाला आहे. बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी बोरिस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवलं. एकूण ३५९ मतं नोंदवण्यात आली. यामधील २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास दाखवला.

  • बोरिस जॉन्सन यांना आपल्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने पंतप्रधान काळातील सर्वात कठीण परीक्षेला सोमवारी सामोरं जावं लागलं. लॉकडाउन काळात निर्बंध असतानाही बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत १० डाउनिंग स्ट्रिट येथे पार्टी केली होती. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांच्याच पक्षातील ४० खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

  • ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर प्रचंड दबाव होता. भारत दौऱ्यादरम्यानही हा दबाव कायम होता. पार्टीगेट घोटाळ्यावरून टीका होत असतानाच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या तब्बल ५४ खासदारांनी राजीनाम्याची मागणी केली. यामुळे विश्वासदर्शक ठरावाची १५ टक्के आवश्यकता पूर्ण झाली होती. यासोबत पंतप्रधान जॉन्सन यांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतपत्रिका घेण्यात आली.

  • बोरिस जॉन्सन यांना अविश्वास ठराव जिंकण्यासाठी १८० खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता. मतदानाआधी बोरिस जॉन्सन यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पुन्हा एकदा पक्षाला विजय मिळवून देऊ असा विश्वास दिला.

नोटेवर गांधींच्या जागी कलाम? आरबीआयनंच केला खुलासा :
  • RBI on currency and banknotes भारतीय नोटांमध्ये लवकरच मोठा बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांची छायाचित्रे छापण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता आरबीआयने याबाबत खुलासा केला आहे. आरबीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

  • भारतीय चलन नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून, महात्मा गांधींच्या ऐवजी कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. वित्त मंत्रालय आणि आरबीआय भारतीय नोटांवर टागोर आणि कलाम यांचे फोटो वापरणार असून त्यांच्य छायाचित्रांचे नमुन्याचे दोन संच आयआयटी दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना पाठवण्यात आले आहेत.

  • उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधींशिवाय इतर कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षणापासून ते शेतीपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (६ जून रोजी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकमीध्ये शिक्षण, शेती, पाणी पुरवठा या क्षेत्राशी निगडीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांसह जाणून घ्या आजच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले.

  • नाशिक जिल्ह्यातील मौजे काष्टी (ता. मालेगांव) येथे कृषि विज्ञान संकुलांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार. (कृषि विभाग)

  • मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय. (कृषि विभाग)

  • ख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

  •  ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

  • पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या, पाणी पुरवठा योजनांच्या निविदेत भावभिन्नता कलमाचा (Price Variation Clause) समावेश करणे व सध्याच्या अप्रत्याशीत / असाधारण भाववाढीसाठी विशेष सवलत (Special Relief) देण्याचा निर्णय. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

  • सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी या सहकारी सूतगिरणीची शासन अर्थसहाय्यासाठी निवड. (वस्त्रोद्योग विभाग)

०७ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.