चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 ऑक्टोबर 2023

Date : 6 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल
  • नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली. फोस यांची ‘नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यलेखन’ यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे पुरस्कार समितीने सांगितले.
  • युआन फोस यांच्या कादंबऱ्या आणि लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकेही मोठय़ा प्रमाणात वाखाणली गेली आहेत. त्यांच्या कथानक आणि भाषेमध्ये नॉर्वेच्या पार्श्वभूमीची पाळेमुळे दिसून येतात असे पुरस्कार समितीचे अँड्रेस ओस्लोन म्हणाले. फोस यांनी ४० नाटके व कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची पुस्तके, कविता आणि ललित निबंध लिहिले आहेत. ‘नोबेल समितीचा आपल्याला फोन आल्यानंतर फार आनंद झाला’, अशी प्रतिक्रिया फोस यांनी नॉर्वेची वृत्तसेवा एनआरकेशी बोलताना व्यक्त केली.
  • फोस यांच्या लिखाणातून अव्यक्त भावनांना शब्दरूप मिळते असा गौरव अकादमीने केला. अकादमीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माल्म यांनी फोस यांच्या नावाची घोषणा केली. नोबेल पुरस्काराची रक्कम ११० लाख स्विडिश क्रोनर (१० लाख डॉलर) इतकी आहे. त्याशिवाय पुरस्कारप्राप्त विजेत्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळय़ात १८ कॅरेटचे सुवर्णपदक आणि डिप्लोमाही प्रदान केला जाईल.
एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार
  • राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी एसटीमधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप तब्बल ५४ दिवस सुरू होता. त्यामुळे एसटी ठप्प झाली आणि राज्यातील दळण-वळण पुरते ठप्प झाले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनी करावे, घरभाडे, वार्षिक वेतनवाढ करावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
  • राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता देण्यात यावा, ही मागणीही करण्यात आली होती. त्यावेळी ४२ टक्के महागाई भत्ता देम्याचे आश्वासन देण्यात आले होते. अखेर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून आता एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुधारीत वेतनश्रेणीसाठी गुरुवारी महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्याचे परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले. असुधारित वेतनश्रेणीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२३ पासून महागाई भत्ताचा दर २१२ टक्क्यावरून २२१ टक्के लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ च्या वेतनात एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
१९ वर्षीय कुस्तीपटू पंघालने जिंकले कांस्यपदक, महिला कुस्तीत खाते उघडले; पूजा-मानसी आणि चीमा पराभूत
  • महिला कुस्तीमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकले. भारतीय कुस्तीपटूने पदकाच्या लढतीत मंगोलियाच्या बॅट ओचिर बोलोर्तुयाचा ३-१ असा पराभव केला. बॅट ओचिर हा टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता आहे. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी सुनीलने ग्रीको-रोमनमध्ये पदक जिंकले होते. त्याचबरोबर या खेळांमधील महिला कुस्तीत भारताचे हे पहिले पदक आहे. विनेश फोगाटने दुखापतीमुळे माघार घेतल्यावर आशियाई खेळांच्या संघात नंतरचा समावेश करण्यात आला.
  • तत्पूर्वी, अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या जस्मिनाचा ११-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत दोन वेळचा विश्वविजेता जपानच्या अकारी फुजिनामीकडून १९ वर्षीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला होता पण त्यानंतर भारतीय कुस्तीपटूने रेपेचेज फेरीत पुनरागमन केले आणि १२व्या दिवशी कुस्तीच्या पदकाने भारताला रिकाम्या हाताने परतण्यापासून वाचवले.
  • शेवटचा पदक सोडले तर बाकीच्या कुस्तीपटूंनी निराशा केली. ग्रीको-रोमन शैलीत, नरिंदर चीमा (९७ वजन श्रेणी), नवीन (१३०) आणि पूजा गेहलोत (५० वजन श्रेणी) त्यांचे सामने गमावल्यानंतर बाहेर पडले. उपांत्यपूर्व फेरीत चीमाचा कोरियाच्या लीकडून ३-१ असा पराभव झाला. नवीनचा चीनच्या कुस्तीपटूकडून ३-० असा पराभव झाला. कांस्यपदकाच्या लढतीत एकटेंगेने पूजा गेहलोतचा ९-२ असा पराभव केला. मानसी (५७ वजन गट) हिला उझबेकिस्तानच्या लेलोखानने ७० सेकंदात पराभूत केले.
  • भारतीय संघाने आशियाई खेळ २०२३ची सुरुवात हांगझाऊ येथे मोठ्या थाटात केली आहे. भारताने २४ सप्टेंबर रोजी पहिले पदक जिंकले आणि तेव्हापासून विजयाचा सिलसिला कायम आहे. २०१८च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने ५७० सदस्यांच्या मजबूत तुकडीतून ७० पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा विक्रम केला होता. आता या आवृत्तीत भारतीय संघाने मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे. आता भारतासमोर १०० हून अधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे. महिला नेमबाजी संघाने २४ सप्टेंबर रोजी हांगझाऊ येथे भारतासाठी पदकाचे खाते उघडले होते.
तैवानबरोबर तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • मुंबई ही आर्थिक, वाणिज्यिक आणि मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आणि तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
  • गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी तैवान एक्स्टर्नल डेव्हलपमेंट कौन्सिल (ताईत्रा) चे अध्यक्ष जेम्स हुआंग, राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तैपाई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर, मुंबईचे महासंचालक होमर च्यांग आदी उपस्थित होते.
  • फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअपचेही प्रमुख केंद्र असून राज्यात १७ हजार नोंदणीकृत स्टार्टअप, तर देशातील १०० पैकी २५ युनिकॉर्न आहेत. परकीय थेट गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून २०२८ पर्यंत राज्याचे एक लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट  असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपिका-हिरदर जोडीला सुवर्ण; सौरव घोषालचे रौप्यपदकावर समाधान
  • भारताच्या दीपिका पल्लिकल आणि हिरदर पाल सिंग संधू या अनुभवी जोडीने गुरुवारी स्क्वॉशच्या मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुष एकेरीत सौरव घोषालला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्क्वॉशमध्ये भारताने एकूण चार पदके मिळवली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
  • दीपिका व हिरदर जोडीने अंतिम फेरीत आयफा बिंटी अजमन आणि मोहम्मद सयाफिक बिन मोहम्मद कमल जोडीचा ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात ११-१०, ११-१० असा पराभव केला. सौरव घोषालला एकेरीत मलेशियाच्या इयेन यो एंगकडून ११-९, ९-११, ५-११, ७-११ असे पराभूत व्हावे लागले. भारताने २०१४च्या पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तर, गेल्या स्पर्धेत दोन रौप्य व एक कांस्य अशी कामगिरी भारताने केली होती. यंदा मात्र भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.
  • मिश्र दुहेरीची अंतिम लढत भारतीय जोडी सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीने भारतासमोर आव्हान उपस्थित केले. मलेशियाच्या जोडीने ३-९ अशा पिछाडीनंतर गेम ९-१० अशा स्थितीत आणला. मात्र, दीपिका व हिरदर यांनी संयमाने खेळ करत दोन गुणांची कमाई केली व सामना जिंकला. दीपिका यापूर्वी कांस्यपदक जिंकणाऱ्या महिला संघाचा भाग होती. दुसरीकडे, एकेरीच्या सामन्यात अंतिम फेरीपर्यंत एकही गेम न गमावणारा घोषाल सुरुवाताला ८-६ असा पिछाडीवर होता. यानंतर त्याने खेळ उंचावत पहिला गेम जिंकला. दुसरा गेम मलेशियाच्या खेळाडूने ११-९ असा जिंकत पुनरागमन केले. तिसऱ्या व चौथ्या गेममध्ये घोषालचा त्याच्यासमोर निभाव लागला नाही. अखेर भारताच्या अनुभवी खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • कोर्टवर काय झाले हे माझ्या फारसे लक्षात राहत नाही. मला केवळ अखेरचे गुण आठवतात. मी खूप आनंदी आहे. सुवर्णपदक जिंकल्याने हा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे.

 

श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक - ‘एफआयएच’कडून सलग दुसऱ्या वर्षी सन्मान :
  • भारतीय हॉकी संघांचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि सविता पुनियाची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. ‘एफआयएच’ने बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.

  • श्रीजेशने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी मधील सर्व १६ सामने खेळताना आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भारताने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली आणि या स्पर्धेतही श्रीजेश सहाही सामने खेळला होता. 

  • ‘एफआयएच’ने घेतलेल्या मतदानात श्रीजेशला सर्वाधिक ३९.९ टक्के मते मिळाली. त्याने बेल्जियमचा लॉईक व्हॅन डोरेन (२६.३ गुण), नेदरलँड्सचा प्रिमिन ब्लाक (२३.२ गुणे) यांना मागे टाकले. 

  • महिला विभागात सविताला सर्वाधिक ३७.६ गुण मिळाले. या पुरस्काराला २०१४ पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर हा सन्मान मिळविणारी सविता तिसरी भारतीय खेळाडू ठरली. ‘एफआयएच’ प्रो लीगमध्ये भारताला विजयमंचावर नेण्यात सविताचा वाटा मोलाचा होता. चाहत्यांच्या मतांमुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. चाहत्यांचा इतका पाठिंबा मिळणे हाच माझ्यासाठी खरा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे आणखी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी मला प्रेरणा मिळेल.

भारताचा आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज :
  • शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे गुरुवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामीचे लक्ष्य आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचे प्रमुख खेळाडू गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याने आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यांचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.

  • रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत धवन, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंवर भारतीय संघाची भिस्त आहे.

  • ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असणारे श्रेयस, चहर, रवी बिश्नोई यांचा आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरीचा मानस असेल. फलंदाजांमध्ये राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकेल.

भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर :
  • सोमवापासून २०२२ या वर्षातील नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. सोमवारी स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर आज भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना एकमेकांमध्ये अडकलेल्या फोटॉन (Entangled Photons) संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

  • अलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे मधील स्वेले विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत. तर जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकेतील शास्रज्ञ आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

  • गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सौकुरो मानाबे (जपान), क्लोस हेसलमन (जर्मनी) आणि जॉर्जिओ पॅरिसी (इटली) यांना देण्यात आला होता.

दोन भारतीय नावं चर्चेत; दोघेही आहेत ‘फॅक्ट चेकर’, जाणून घ्या सविस्तर :
  • २०२२ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत दोन भारतीय फॅक्ट चेकर्स असल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑल्ट न्यूज’चे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे, याबाबतचं वृत्त ‘टाइम’ने दिलं आहे. नॉर्वेचे खासदार आणि ओस्लो येथील ‘पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (पीआरआयओ) प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांना नामांकित केलं आहे.

  • विशेष म्हणजे नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत असणाऱ्या मोहम्मद झुबेर यांना अलीकडेच अटक करण्यात आली होती. २०१८ साली केलेल्या एका ट्वीटप्रकरणी झुबेर यांना यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या दाखल केलेल्या एफआयआरनुसार, “हे ट्वीट अत्यंत प्रक्षोभक आणि दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारे होते.” परंतु झुबेर यांना अटक केल्यानंतर जगभरातील अनेक लोकांनी निषेध व्यक्त केला होता. त्याचबरोबर भारतातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. झुबेर यांना एक महिना तिहार कारागृहात ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

  • २०२२ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत एकूण ३४३ उमेदवार आहेत. यामध्ये २५१ व्यक्ती आणि ९२ संस्था आहेत. खरं तर, नोबेल पुरस्कार समितीकडून नामांकित व्यक्तींची नावे जाहीर केली जात नाहीत. तसेच प्रसारमाध्यमांना किंवा उमेदवारांनाही याबाबतची कल्पना दिली जात नाही. परंतु ‘रॉयटर्स’कडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, बेलारूसचे विरोधी पक्षनेते स्वितलाना, ब्रॉडकास्टर डेव्हिड अॅटेनबर्ग, हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे आणि म्यानमारमधील नॅशनल यूनिटी सरकरला नॉर्वेच्या खासदारांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - ऋतिका श्रीरामला दुसरे सुवर्ण :
  • विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने डायव्हिंग प्रकारात सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर अर्जुन कढे-ऋतुजा भोसले जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सोनेरी यश मिळविले. डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामने स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळविले. हायबोर्ड प्रकारात ऋतिकाने ही सोनेरी कामगिरी केली.

  • यापूर्वी तीन मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारातही ऋतिका सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.  टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत अर्जुन कढे-ऋतुजा भोसले या महाराष्ट्राच्या जोडीला सुवर्णपदक मिळाले. प्रतिस्पर्धी शर्मदा बालू-प्रज्ज्वल देव जोडीने पहिल्या सेटमध्ये १-१ अशा बरोबरी असताना माघार घेतली.

  • शर्मदा पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकत नव्हती. पुरुष एकेरीच्या लढतीत अर्जुन कढेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत मनिष कुमारने पहिला सेट गमाविल्यावरही अर्जुनचा १-६, ६-१, ६-३ असा पराभव केला.

दुबईतील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले :
  • दुबईच्या जेबेल अली गावात बांधण्यात आलेले हिंदू मंदिर बुधवारी, दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांसाठी खुले करण्यात आले. भारतीय आणि अरेबिक स्थापत्यकलेचे मिश्रण असलेल्या या मंदिराची रचना २०१९ मध्ये करण्यात आली होती. दोन वर्षांत ते बांधून पूर्ण करण्यात आले.

  • सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि भारताचे यूएईतील राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हे मंदिर सहिष्णुता, शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक असेल, असे यावेळी नाहयान आणि सुधीर यांनी सांगितले.

  • यूएईमध्ये ३५ लाख भारतीय असून या देशांत हिंदू मंदिर बांधण्याची त्यांची इच्छा होती. ही इच्छ यूएई सरकारने पूर्ण केल्याबद्दल सुधीर यांनी आभार मानले.

  • ७० हजार चौरस फुटांत हे मंदिर विस्तारले असून हे मंदिर खुले केल्यानंतर पुजाऱ्यांनी ‘ओम् शांती ओम्’चा जयघोष करत भाविकांचे स्वागत केले. यावेळी तबला आणि ढोल वाजवण्यात आले.

  • या मंदिरात १६ देवी-देवतांच्या मूर्ती असून एकाच वेळी हजारो भाविक या मंदिराला भेट देऊ शकतात. जेबेल अली हे गाव सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात सात चर्च, एक गुरुद्वार आणि आता नवे हिंदू मंदिर आहे.

०६ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.