चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 जून 2023

Date : 6 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
योगी आदित्यनाथ इतक्या कोटींचे आहेत मालक; संपत्ती वाचून व्हाल थक्क!
  • आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ५१ वा वाढदिवस आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे मातब्बर नेते मानले जातात. उत्तराखंडच्या पंचूर या गावी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अजय सिंह बिष्ट आहे. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि आपले नाव बदलले. संन्याशीपासून ते एका राजकारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरित करणारा आहे पण तुम्हाला माहिती आहे का योगी आदित्यनाथ यांच्याजवळ किती संपत्ती आहे ? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक-२०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवली. त्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी शिक्षणासह मालमत्ता नमूद केली होती.
  • ‘इंडिया टुडे’नी दिलेल्या वृत्तानुसार या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याजवळ १.५४ कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. ही रक्कम त्यांच्या एकूण सहा बँक अकाउंट आणि सेव्हिंगमधील आहे. याशिवाय त्यांच्याकडे १ लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजाराची रायफल आहे.
  • या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे, योगी आदित्यनाथ यांच्याजवळ १२,००० रुपयांचा सॅमसंगचा फोन आहे. २० ग्रॅमचे कानातले आहे, ज्याची किंमत ४९,००० रुपये आहे तर सोन्याच्या चेनसह रुद्राक्ष असा गळ्यात घालणारा १० ग्रॅमचा दागिना आहे, ज्याची किंमत २०,०००रुपये आहे.
  • या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये त्यांचे उत्पन्न १३,२०,६५३ रुपये होते तर २०१९-२० मध्ये १५,६८,७९९ रुपये, २०१८-१९ मध्ये १८,२७,६३९ रुपये आणि २०१७-१८ मध्ये १४,३८६७० रुपये होते. याशिवाय २०२२ च्या या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे कोणत्याही वाहनाची नोंदणी नाही.
  • २०२२च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. उत्तर प्रदेशसह देशभरात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ख्याती आहे.
जपानला मागे टाकत भारत बनला Automobile क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश; नितीन गडकरी म्हणाले, “२०२८ पर्यंत आपण..”
  • ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत सतत प्रगती करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आपल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी करताना भारताने जपानला मागे टाकले आहे. या यादीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने केलेल्या या कामगिरीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. PTI च्या माहितीनुसार, “भारत पुढील पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट बनेल”, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.
  • भारतातील ऑटोमोबाईल उद्योग आणि जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनण्याच्या संधीबाबत बोलताना त्यांनी आकडेवारींची माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या देशातील ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार हा ७.५ लाख कोटी रुपये इतका आहे. या क्षेत्रामुळे आतापर्यंत तब्बल ४.५ कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना सर्वात जास्त Goods and Services Tax (GST) देत आहेत.”
  • भविष्यात आपला देश सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट बनू शकतो असा आत्मविश्वास असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “२०२८ पर्यंत देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राचा आकार हा तब्बल १५ लाख कोटी रुपये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे आपण येत्या पाच वर्षांमध्ये ऑटो क्षेत्रामध्ये पहिल्या स्थानावर असू असा मला विश्वास आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीमुळे आपला देश महासत्ता बनेल. ऑटो उद्योग भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्ठा बनण्यास मदत करेल.”
  • तसेच नितीन गडकरी यांनी पेट्रोल, डिझेल अशा इंधनाच्या ऐवजी पर्यावरण पूरक इंधनांच्या पर्यायांचा वापर करण्यावर भर द्यायला हवे असेही सांगितले. सध्या आपला देश हा जीवाश्म इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. “भारत दरवर्षी सुमारे १६ लाख कोटी रुपये किंमत असलेले जीवाश्म इंधन (पेट्रोल, डिझेल) यांची आयात करतो. Green hydrogen आणि ammonia या पर्यायांचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. भारताला इंधनाची, ऊर्जेची निर्यात करणारा देश बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहेठ” असे विधान नितीन गडकरींनी केले.
अ‍ॅपलच्या ‘या’ नव्या प्रॉडक्ट्सची होणार घोषणा? कधी आणि कुठे पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या
  • Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लॉन्च करत असते. Apple या वर्षातील सर्वात मोठी वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) २०२३ ५ जून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. अ‍ॅपलचा WWDC 2023 इव्हेंट ५ जून ते ९ जून २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. Apple चे कीनोट भारतात ५ जून रोजी रात्री १०.३० pm IST वाजता सुरू होणार आहे.
  • WWDC २०२३ मध्ये अ‍ॅपल कंपनी iOS 17, macOS 14, watchOS 10, tvOS, त्याचे बहुप्रतिक्षित AR/VR हेडसेट, 15-इंच MacBook Air यांसारख्या प्रॉडक्ट्सच्या लॉंचिंगबद्दल घोषणा करू शकते. तसेच तुम्ही WWDC २०२३ इव्हेंट भारतात कुठे लाईव्ह पाहू शकता हे जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त thequint ने दिले आहे.

अ‍ॅपल WWDC २०२३ ची तारीख आणि वेळ

  • अ‍ॅपलचा इव्हेंट ५ जून ते ९ जून या दरम्यान होणार आहे. हा इव्हेंट भारतामध्ये रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचा शेवट ९ जून रोजी होणार आहे. अ‍ॅपलचा किनोट apple.com , Apple डेव्हलपर अ‍ॅप , अ‍ॅपल टीव्ही आणि YouTube वर पाहता येणार आहे.

अ‍ॅपल WWDC २०२३ कसा पाहायचा ?

  • १. WWDC २०२३ इव्हेंट तुम्ही अ‍ॅपलची वेबसाईट, अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅप, अ‍ॅपल डेव्हलपर आणि युट्युब वर पाहू शकणार आहात.
  • २. Apple India च्या http://www.apple.com वेबसाइटला भेट द्या आणि WWDC 2023 इव्हेंट पेज पाहावे.
  • ३. तुम्ही कोणत्याही Mac, iPhone, iPad किंवा iPod वर किंवा सफारी ब्राउझर किंवा Chrome सारख्या अन्य ब्राउझरवर WWDC कीनोट पाहू शकता.
भारतानेच विकसित देशांकडे ‘हवामान न्याया’चा प्रश्न मांडला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
  • काही विकसित देशांच्या चुकीच्या धोरणांची किंमत ही विकसनशील आणि गरीब देशांना मोजावी लागत आहे. अशा प्रत्येक विकसित देशाकडे भारताने हवामान न्यायाचा प्रश्न मांडला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. 
  • मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपला ध्वनिचित्रमुद्रित संदेश जारी केला. त्यात ते म्हणतात, की जागतिक हवामानाचा दर्जा राखण्यासाठी सर्वच देशांनी स्वार्थत्याग करून विचार केला पाहिजे. दीर्घकाळपासून बडय़ा-विकसित देशांमधील विकासाचे प्रारूप हे वादग्रस्त ठरले आहे. या प्रारूपात असा विचार होता की, आधी आपण देशाचा विकास साधावा आणि नंतर आपल्याला पर्यावरणाचा विचार करता येईल. या विचारातूनच त्यांनी आपले विकासाचे लक्ष्य पूर्ण केले. पण जगभरातील पर्यावरणाला त्यांच्या अशा विकासाची किंमत मोजावी लागली.
  • ते पुढे म्हणाले, की विकसित राष्ट्रांच्या अशा वृत्तीवर आक्षेप घेण्यासाठी अनेक दशके कोणताही देश पुढे आला नाही. पण अशा सर्व राष्ट्रांना भारताकडून हवामान न्यायाबाबत विचारणा करण्यात आली, याचा मला आनंद वाटतो.
  • भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीत निसर्ग आणि प्रगती यांचा संगम दिसून येतो. आपल्या देशाने पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या दोघांचेही भान राखल्याने हे शक्य झाले.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपास, रुडची आगेकूच; महिला गटात जाबेऊर, सबालेन्का,गॉफचे विजय
  • चौथ्या मानांकित नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि पाचवा मानांकित ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. महिला गटात सातव्या मानांकित टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर, दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का,अमेरिकेची कोको गॉफ, ब्राझीलची बीअट्रिज हद्दाद माइआ तसेच, युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
  • पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात रुडने चिलीच्या निकोलस जॅरीचा ७-६ (७-३), ७-५, ७-५ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. मात्र, रुडने अखेर बाजी मारली. तर, त्सित्सिपासने ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनेरला ७-५, ६-३, ६-० असे सरळ सेटमध्ये नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्सित्सिपाससमोर अग्रमानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझचे आव्हान असेल.
  • महिला गटात जाबेऊरने चौथ्या फेरीत अमेरिकेच्या बर्नार्डा पेरावर ६-३, ६-१ असा विजय नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर हद्दाद माइआचे आव्हान असेल. माइआने अन्य सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करताना स्पेनच्या सारा सोरिबेस टॉर्मोला ६-७ (३-७), ६-३, ७-५ असे पराभूत केले. सबालेन्काने अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सवर ७-६ (७-५), ६-४ असा विजय साकारला. उपांत्यपूर्व तिचा सामना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनाने दारिया कसात्किनाला ६-४, ७-६ (७-५) असे नमवले. तर, गॉफने स्लोव्हाकियाच्या कॅरोलिना श्मीडलोव्हाला ७—५, ६—२ असा पराभव केला.

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - स्वप्निल-आशीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक :
  • भारताच्या स्वप्निल कुसळे आणि आशी चौकसीने बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

  • स्वप्निल आणि आशी जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि दारिआ तिकोव्हा जोडीला सुवर्णपदकाच्या लढतीत १६-१२ अशा फरकाने नमवले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी इलाव्हेनिल व्हलारिव्हान, श्रेया अग्रवाल आणि रमिता यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले होते. महाराष्ट्राच्या स्वप्निलचे विश्वचषक स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले. त्याने पुरुषांच्या रायफल थ्री-पोझिशन वैयक्तिक आणि सांघिक गटात रौप्यपदक मिळवले होते.

  • ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकाराच्या मिश्र सांघिक गटाच्या पात्रता फेरीमध्ये स्वप्निल-आशी जोडीने ९०० पैकी ८८१ गुणांची कमाई करत चौथ्या स्थानासह मानांकन फेरीसाठी पात्रता मिळवली. मानांकन फेरीत भारतीय जोडीने ६०० पैकी ५८३ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. युक्रेनची गुणसंख्याही इतकीच होती, मात्र फेरचाचणीत भारतीय जोडीला अव्वल स्थान मिळाले.

  • त्यानंतर अंतिम लढतीत युक्रेनच्या जोडीने पहिल्या चार फेऱ्यांच्या मालिकेत ६-२ अशी आघाडी घेतली. मात्र, पुढील आठपैकी सहा फेऱ्यांच्या मालिका जिंकत भारताने १४-१० अशी आघाडी मिळवली. युक्रेनच्या नेमबाजांनी आघाडी १२-१४ अशी कमी केली; पण त्यांना विजय मिळवता आला नाही. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात १६-१२ अशी बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

शाळा नियोजित वेळेनुसारच ; शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचे स्पष्टीकरण :
  • नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून शाळा सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येतील. सल्लागार मंडळाशी चर्चा करून शाळांना कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • शाळा सुरू होण्याच्या तोंडावर गेली दोन वर्षे करोना रुग्ण वाढल्याने शाळा सुरू करण्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त सापडला. यंदाही विदर्भ वगळता राज्यातील इतर भागांतील राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनपासून, तर विदर्भातील शाळा २९ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, आता मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यात रोज हजार ते १४ रुग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदातरी प्रत्यक्ष शाळा सुरू होणार का असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, शाळा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

  • गेली दोन वर्षे प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आता शाळा बंद ठेवणे योग्य होणार नाही. शाळा सुरू करण्यापूर्वी कृती दलाशी (टास्क फोर्स) चर्चा करून नियमावली जाहीर करण्यात येईल. आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येतील. शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना मुखपट्टी बंधनकारक करावी का याबाबतही त्यावेळी निर्णय घेण्यात येईल, असे गायकवाड म्हणाल्या.

‘…तर कधीही हल्ला न केलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करू,’ व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर इशारा :
  • रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला प्रारंभ होऊन शंभर दिवस उलटले असले तरी हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशियन सैनिक अजूनही युक्रेनमधील काही भागात तळ ठोकून आहेत. असे असताना आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्त्य देशांना गंभीर इशारा दिला आहे. युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवले तर रशिया याआधी कधीही हल्ला न केलेल्या ठिकाणांना लक्ष्य करेल, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

  • “युक्रेनला लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला तर आम्ही काय निष्कर्ष काढायचा तो काढू. तसेच अगोदर कधीही हल्ला न केलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करू. त्यासाठी आमच्याकडील अस्त्रांचा आम्ही वापर करु,” असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. तसेच युक्रेनला अस्त्रे पुरवणे म्हणजे संघर्ष लाबवणे होय, असेदेखील पुतीन म्हणाले आहेत. रशियन वृत्तसंस्थांनी याबाबत अधिक वृत्त दिलेले आहे. मात्र पुतीन यांनी कोणत्या ठिकाणावर हल्ला केला जाईल तसेच कोणते क्षेपणास्त्र वापरले जाईल, याबाबत स्पष्टपणे भाष्य केलेले नाही.

  • दरम्यान, अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धावर काही दिवसांपूर्वी भाष्य केले. आम्ही युक्रेनला हिमर्स मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचा पुरवठा करु असं अमेरिकेने जाहीर केलं होतं. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी वरील निर्वाणीचा इशारा दिला आहे. हिमर्स ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर सहज हलवता येणारी रॉकेट लाँचर प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी ८० किलोमीटर लांब असलेल्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. युक्रेनने अमेरिकेकडे आतापर्यंत अनेकवेळा मोठ्या शस्त्रांत्रांची मागणी केली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला आतापर्यंततरी अशी लांब पल्ल्याची अस्त्रे दिलेली नाहीत.

जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये खासगी विमान शिरलं, बायडेन दांपत्य सेफ हाऊसमध्ये :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. जो बायडेन यांच्या रेहोबोथ बीचजवळील घरावरून शनिवारी एक छोटं विमान नो-फ्लाय झोनमध्ये घुसलं होतं. या धक्कादायक प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सेफ हाऊसमध्ये हलवलं आहे. याबाबतची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.

  • व्हाईट हाऊसनं सांगितलं की बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाला कोणताही धोका नाही. खबरदारीच्या उपाय म्हणून त्यांना सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आलं होतं. शनिवारी एका विमानानं नो फ्लाय झोनचं उल्लंघन करत जो बायडेन यांचं घर असलेल्या परिसरात घुसखोरी केली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

  • “राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित असून हा हल्ला नव्हता,” अशी माहिती व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना पुन्हा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाची अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने गंभीर दखल घेतली आहे.

  • संबंधित विमान चुकून संरक्षित हवाई हद्दीत घुसल्याची माहितीही देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित वैमानिक हा रेडिओ सिग्नलद्वारे वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचं पालन करत होता. त्यामुळे ही चूक झाली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

आक्षेपार्ह जाहिरात हटवण्याचे यूटय़ूब, ट्विटरला आदेश :
  • एका सुगंधी द्रव्य तयार करणाऱ्या कंपनीची जाहिरात महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रवृत्त करणारी आहे, असे कारण देत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी ट्विटर आणि यूटय़ूबला ही जाहिरात हटवण्याचे आदेश दिले.  सुगंधी द्रव्याची एक जाहिरात ही शालीनता आणि नैतीकतेच्या दृष्टीने अहितकारक आहे. ती महिलांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करते. तसेच माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ दिशा निर्देश आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियमांचे उल्लंघन आहे, असे पत्र मंत्रालयाने ट्विटर आणि यूटय़ूबला दिले आहे.

  • डिओड्रंटसंबंधी जाहिरात करणाऱ्या एका चित्रफितीला समाजमाध्यमांवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीमुळे महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला उत्तेजन मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे. समाजमाध्यमांवरील सुगंधी द्रव्याच्या कंपनीची एक जाहिरात अनुचित आणि महिलांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे ती  ट्विटर आणि यूटय़ूब  यांनी तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

  • या दोन्ही समाजमाध्यम कंपन्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय जाहिरात मानक परिषदेला (एएससीआई) ही जाहिरात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जाहिरात कंपनीला ती तत्काळ मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

०६ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.