अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा वाशीत, ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजन
अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा नवी मुंबईतील वाशी उपनगरात आयोजित करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, वाशी या दोन संस्थांच्या पुढाकाराने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत वाशी येथील साहित्य मंदिर येथे पार पडणार आहे. पुण्याच्या प्राज उद्योगाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत.
मराठी विज्ञान परिषदेच्या महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर ६५ संलग्न विभाग आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन होत असते. यंदा या अधिवेशनाचे ५८ वे वर्षे आहे. मागील वर्षी गोवा राज्यात या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. हे अधिवेशन मुंबईत पहिल्यांदाच होत आहे. यानिमीत्ताने नवी मुंबईकरांचे काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती विभाग कार्यवाह अजय दिवेकर यांनी दिली. शनिवार, ९ डिसेंबर रोजी ९.३० वाजता नवी मुंबईचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पुण्याच्या प्राज उद्योगाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे अधिवेशनाध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषदेचे मध्यवर्ती अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत.
जीवन गौरव, व्याख्यानाची मेजवानी
या उद्घाटना दिवशी मराठी विज्ञान परिषद जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण, सन्मानकऱ्यांचा गौरव, स्मरणिका प्रकाशन, ई – पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. दुपारच्या सत्रात प्रसिद्धी खगोल शास्त्रज्ञ डाॅ. सोमक रॉयचौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळच्या सत्रात उद्योग आणि पर्यावरण या विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. या परिसंवादात ठाणे-बेलापूर इंडस्ट्री असोसिएशनचे महाव्यवस्थापक एम.एम.ब्रह्मे, तुर्भे येथील कॉमन एफ्लुयंट ट्रिटमेंट प्लॅंटचे संचालक डॉ. एम.पी.देशपांडे, नवी मुंबई येथील रिलायन्स उद्योगचे डॉ. विजय हब्बू आणि एमएमआरडीएचे माजी प्रमुख केदारनाथ घोरपडे हे सहभागी असणार आहे. तर, कांदळवन जैवविविधता आणि जैवविविधता केंद्र या विषयावर मॅनग्रोव्ह फाऊंडेशनचे उपसंचालक डॉ. मानस मांजरेकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर, प्रा. सुधीर पानसे यांचे विज्ञान कविता सादरीकरण होणार आहे.
जीवनगौरव पुरस्कार
डॉ. राजेंद्र बडवे हे मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक आहेत. त्यांना शल्यक्रियातज्ञ आणि कर्करोगतज्ञ म्हणून २८ वर्षांचा अनुभव आहे. टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोगासाठी उत्तम काम करणारी संस्था म्हणून जगात असलेले नाव मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्तनांचा कर्करोग, कर्करोगातील नाविण्यपूर्ण संशोधन, कर्करोग निदानाचा आणि रुग्ण व्यवस्थापनाचा दर्जा, कर्मचाऱ्यांच्या कामाची वाढती क्षमता या क्षेत्रात राजेंद्र बडवे यांनी प्राविण्य मिळविले आहे. तर, खगोलशास्त्रज्ञ डाॅ. सोमक रॉयचौधरी यांनी खगोल भौतिकशास्त्रज्ञाचा अभ्यास युके येथील चर्चिल कॉलेज ऑफ कॅब्रिज येथून पूर्ण केले. त्यांनी खगोलशास्त्रात आकाशगंगा आणि वैश्विक साखळीत ब्लॅक होल्सवरती काम केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये (एआय) त्यांनी अल्गोरीदममध्ये काम केले आहे. या अधिवेशनात डॉ. राजेंद्र बडवे आणि खगोलशास्त्रज्ञ डाॅ. सोमक रॉयचौधरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ते दोघेही आपापल्या क्षेत्राबद्दल उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
नौदलातील विविध हुद्यांचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण करण्याची घोषणा करण्याबरोबरच सशस्त्र दलांमध्ये महिला ‘शक्ती’ वाढवण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या सोहळय़ात दिली.
पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- तारकर्ली किनाऱ्यावर आयोजित केलेल्या नौदल दिनाच्या सोहळय़ात सहभागी झाले होते. एक महिला अधिकारी या वेळी नौदलाच्या जहाजाचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मोदींनी नौदलाचे कौतुक केले. भारतीय नौदलातील विविध हुद्यांचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण केले जाईल, असे मोदी म्हणाले.
नौदल दिन सोहळय़ापूर्वी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फुटी पूर्णाकृती पुतळय़ाचे मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या युद्धनीतीची प्रशंसाही केली. ‘‘मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नौदलशक्तीचे महत्त्व जाणून होते. त्यांनी एक मजबूत आरमार स्थापन केले होते. देशातील पहिले आधुनिक नौदल उभारण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. म्हणूनच नौदल अधिकाऱ्यांच्या स्कंदभूषणावर (एपलेटस) छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब कोरण्यात येईल,’’ असे मोदी यांनी जाहीर केले.
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेला भारत गुलामीच्या मानसिकतेला मागे सारून आज सर्व आघाडय़ांवर मोठी घोडदौड करीत आहे. महासागरीय क्षमतांचा वापर करण्याच्या दिशेनेही देशाची वाटचाल चालू आहे. जग भारताकडे ‘विश्वमित्र’ म्हणून पाहत आहे,’’ असे मोदी यांनी नमूद केले.
सशस्त्र दलांतील महिलांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, ‘‘विविध सशस्त्र दलांतील महिलांची संख्या वाढवण्यावर सरकार भर देत आहे. भारताने अनेक मोठी लक्ष्ये समोर ठेवली असून ती साध्य करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करण्यात येत आहे.’’
नौदलाची वाटचाल स्वदेशीकरणाकडे : राजनाथ
भारतीय नौदल स्वदेशीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. नौदलात पूर्वी आयात केलेल्या उपकरणांचा वापर करण्यात येत होता, आता मात्र नौदलाचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल दिनाच्या कार्यक्रमात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या गरजांना अधिक महत्त्व दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी, जुलै ते सप्टेंबर राज्यनिहाय मनुष्यबळ सर्वेक्षणातील वास्तव
देशात हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या मनुष्यबळ सर्वेक्षणातून सोमवारी समोर आले. या काळात हिमाचल प्रदेशात बेरोजगारीचा दर ३३.९ टक्के होता, तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये ३०.२ टक्के दर सर्वेक्षणाने नोंदवला होता. हा बेरोजगारीचा दर १५ ते २९ वयोगटातील तरुण-तरुणींतील आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, हिमाचलमध्ये चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारीचा दर शहरी भागात महिलांमध्ये तब्बल ४९.२ टक्के नोंदविण्यात आला असून, पुरुषांचा बेरोजगारीचा दर २५.३ टक्के आहे. राजस्थानमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर महिलांमध्ये ३९.४ टक्के आणि पुरुषांमध्ये २७.२ टक्के आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर २९.८ टक्के आहे. तेथे बेरोजगारीचा दर महिलांमध्ये ५१.८ टक्के आणि पुरुषांमध्ये १९.८ टक्के आहे.
देशात १७.३ टक्के तरुण रोजगारहीन
सर्वेक्षणाच्या आधीच्या आठवड्यातील परिस्थिती पाहता देशातील एकूण बेरोजगारीचे प्रमाण १७.३ टक्के नोंदविण्यात आले आहे. शहरी भागात ते २२.९ टक्के आहे. महिलांमध्ये तो १५.५ टक्के आहे. बेरोजगारीचा दर एकूण कामकरी वयातील लोकसंख्येपैकी बेरोजगार व्यक्तींच्या प्रमाणात ठरतो. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने एप्रिल २०१७ पासून तिमाही मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यास सुरुवात केली. आता जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील हा २०वा अहवाल आहे.
गुजरातमध्ये सर्वांत कमी
देशभरात एकूण २२ राज्यांत सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत गुजरात राज्यात बेरोजगारीचा दर सर्वाधिक कमी आहे. गुजरातमध्ये तो ७.१ टक्के आहे. त्यानंतर दिल्लीत तो ८.४ टक्के असा सर्वात कमी दर नोंदविण्यात आला आहे.
नीरज चोप्राने बुमराहला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, ‘वेग वाढवण्यासाठी त्याला फक्त…’
सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने त्याचा आवडता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अधिक वेग कसा वाढवता येईल याचा सल्ला दिला आहे. एकदिवसीय विश्वचषक फायनल पाहण्यासाठी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होता. नीरजने बुमराहला त्याचा आवडता वेगवान गोलंदाज म्हणून वर्णन केले आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीचे कौतुक केले आहे. विशेश म्हणजे चेक प्रजासत्ताकचा विश्वविक्रम धारक जॉन झेलेझनी आणि नॉर्वेचा आंद्रियास थॉर्किलडसेन यांच्यानंतर ऑलिम्पिक आणि जागतिक विजेतेपद दोन्ही जिंकणारा नीरज चोप्रा इतिहासातील फक्त तिसरा भालाफेकपटू आहे.
जसप्रीत बुमराहने विश्वचषकात चमकदार कामगिरी करत २० विकेट घेतल्या होत्या. तथापि, चोप्राला वाटते की एक छोटासा बदल त्याचा आवडता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वेग वाढवण्यास मदत करेल. तो इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात म्हणाला, “जसप्रीत बुमराहची गोलंदाजी करण्याची शैली आवडते. मला वाटतं त्याचा वेग आणखी वाढवण्यासाठी त्याने रनअप वाढवले पाहिजे. भालाफेकपटू या नात्याने आम्ही अनेकदा चर्चा करतो की, गोलंदाजाने थोडेसे मागून रन-अप सुरू केल्यास त्याचा वेग वाढेल.”
जसप्रीत बुमराह ताशी १४० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो -
जसप्रीत बुमराहची गणना जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्याकडे ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याची ॲक्शन अगदी वेगळी आहे. वेग निर्माण करण्यासाठी तो त्याच्या कंबरेवर खूप जोर देतो. त्याची ही ॲक्शन धोकादायक आहेच, पण त्यामुळे त्याला दुखापत होण्याचाही धोका आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो जवळपास वर्षभर मैदानापासून दूर राहीला होता.
बुमराह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फक्त कसोटी मालिका खेळणार -
त्याने ऑगस्टमध्ये आयर्लंड मालिकेदरम्यान पुनरागमन केले आणि तो त्याच्या जुन्या रंगात परतला. दुखापतीनंतरही त्याने आपल्या ॲक्शनमध्ये बदल केला नाही. त्याचा वेगही कमी झाला नाही. पुनरागमनानंतर तो अधिक धारदार दिसत आहे. २०२३ च्या विश्वचषकातील त्याची कामगिरी हे त्याचे उदाहरण आहे. बुमराहची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत तो संघाचा भाग असणार नाही.
गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान :
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात भाजप, काँग्रेस, ‘आप’ आदी पक्षांसह अन्य पक्ष आणि अपक्ष मिळून ८३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गेल्या निवडणुकीत या टप्प्यातील ९३ पैकी भाजपने ५१, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ६३.३१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा घसरलेला टक्का दुसऱ्या टप्प्यात वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गुजरातसह हिमाचल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आई हिराबा यांची गांधीनगरमधील निवासस्थानी भेट घेतली.
चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार :
चीन सरकारचे वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरण’ आणि सरकार लागू करत असलेल्या लॉकडाऊनविरोधात देशभरात उसळलेला जनउद्रेक कायम असून हे आंदोलन थोपावण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असताना, आता हे शून्य कोविड धोरण शिथिल करण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आणि त्यासोबतच काहीशी वाढती धाकधूक अशी संमिश्र अवस्था असलेच्या चीनच्या नागरिकांचे आता या निर्णयाचे आरोग्यावर काय परिणाम होणार आणि वैद्यकीय व्यवस्थेवर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर संशोधकांनी विश्लेषण केले आहे की, जर हे पूर्णपणे उघडले तर देशात किती मृत्यू होऊ शकतात. कारण, देशातील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणासा लसीकरण दर आणि लोकांमधील प्रतिकारशक्तीचा अभाव हे सर्वात हे दोन अतिशय गंभीर मुद्दे आहेत. शुक्रवारपर्यंत चीनमध्ये ५ हजार २३३ कोविड संबंधित मृत्यू आणि लक्षणांसह ३३१,९५२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
दक्षिण-पश्चिम गुआंग्शी प्रदेशातील रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख झोउ जियाटोंग यांनी मागील महिन्या शांघाय जर्नल ऑफ प्रव्हेंटेव्ह मेडिसनने प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये म्हटले होते की, मुख्य भूभाग असणाऱ्या चीनने जर हाँगकाँगप्रमाणेच कोविड प्रतिबंध कमी केले तर दोन दशलक्षाहून अधिक मृत्यूंना सामोर जावे लागू शकते. याशिवाय संक्रमण २३३ दशलक्षांपेक्षा जास्त प्रमाणात वाढू शकते, असाही अंदाज दर्शवला गेला आहे.
तर कमी लसीकरण आणि बूस्टर दर दर तसेच प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे चीनने शून्य कोविड धोरण मागे घेतल्यास १.३ दशलक्ष ते २.१ दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटिश वैज्ञानिक माहिती आणि विश्लेषण कंपनी एअरफिनिटीने सांगितले आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो”, अशी प्रतिक्रिया यावेळी पिचाई यांनी दिली.
यावर्षीच्या सुरवातीला ‘पद्म भूषण’ पुरस्कारासाठी १७ दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती. “मी या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक आणि सरकारचा अत्यंत आभारी आहे. ज्या देशाने मला घडवलं, त्या देशाकडून हा सन्मान मिळणं माझ्यासाठी मोठी बाब आहे”, असं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ५० वर्षीय पिचाई म्हणाले. “शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो, हे माझं भाग्य आहे. माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडता यावं, यासाठी आई-वडिलांनी मोठा त्याग केला”, अशी भावना पिचाई यांनी यावेळी व्यक्त केली.
“गुगल आणि भारत यांच्यातील महान भागीदारी सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं यावेळी पिचाई यांनी सांगितलं. सॅन फ्रान्सिस्कोतील या पुरस्कार सोहळ्यात भारताचे वाणिज्यदूत टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्यासह पिचाई यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पिचाई यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून अमर्यादीत शक्यता निर्माण केल्याचं सांगत संधू यांनी त्यांचा गौरव केला. “जगाच्या विविध भागांमध्ये डिजिटल साधने आणि कौशल्ये समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ते प्रयत्न करत आहेत”, असं यावेळी संधू म्हणाले. गुगलने यावर्षी मशीन लर्निंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाषांतर सेवेमध्ये आणखी २४ भाषांचा समावेश केला आहे. यामध्ये भारतातील आठ भाषांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाला नमवत अर्जेटिना उपांत्यपूर्व फेरीत :
लियोनेल मेसीच्या गोलमुळे अर्जेटिनाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशा फरकाने विजय मिळवत ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मेसीने आपल्या कारकीर्दीतील १०००वा सामना खेळताना विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला पहिला गोल झळकावला.ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्जेटिनाचा विजय सोपा नव्हता. अर्जेटिनाच्या विजयात गोलरक्षक एमी मार्टिनेजची भूमिका महत्त्वाची राहिली. त्याने सामन्याच्या अखेरच्या सेकंदांमध्ये शानदार बचाव करत सामना अतिरिक्त वेळेपर्यंत नेण्यापासून रोखला.
मेसीने सामन्याच्या ३५व्या मिनिटाला अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली. यानंतर ज्यूलियन अल्वारेझने (५७वे मि.) गोल करत अर्जेटिनाची आघाडी २-० अशी केली. सामन्याच्या ७७व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या, जेव्हा एंजो फर्नाडेझने स्वयंगोल करत आघाडी कमी केली. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाचा सामना नेदरलँड्सशी होईल.
सामन्यात ०-२ अशा पिछाडीनंतर अखेरच्या २० मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. ७७व्या मिनिटाला क्रेग गुडविनचा फटका अर्जेटिनाच्या फर्नाडेझला लागून गोल झाला. ऑस्ट्रेलियाने यानंतर आपले आक्रमण अधिक तीव्र केले. संघाला अखेरच्या काही मिनिटांमध्ये बरोबरी साधण्याची संधी होती. त्यांच्या गेरेंग कुओलचा फटका अर्जेटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने रोखला. अर्जेटिनाला विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि संघाने सलग तीन सामने जिंकले.
आपला पाचवा आणि संभवत: अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या मेसीच्या नावे ७८९ गोल आहेत. सात वेळा वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या मेसीच्या नजरा १८ डिसेंबरच्या अंतिम सामन्याकडे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये हजारो चाहत्यांची गर्दी होती आणि ते संघाला पाठिंबा देत होते.