चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 ऑक्टोबर 2023

Date : 4 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
12 वर्षांनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा उचलणार वर्ल्डकप ट्रॉफी, ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी क्रिकेटचा देव आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची अहमदाबाद येथे ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी म्हणून नियुक्ती केली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकात सहा वेळा सहभाग घेतला आहे. सचिन पहिल्यांदा १९९२ मध्ये विश्वचषक खेळला होता. तो शेवटचा २०११च्या विश्वचषकात दिसला होता, जेव्हा भारतीय संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते.

सचिन विश्वचषक सुरू झाल्याची घोषणा करेल

  • गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करेल. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “१९८७ मध्ये बॉल बॉय बनण्यापासून ते सहा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. २०११ मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण होता.

युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल- सचिन तेंडुलकर

  • सचिन तेंडुलकर म्हणतो की विश्वचषकासारख्या स्पर्धा युवा खेळाडूंना खूप प्रेरणा देतील. तो म्हणाला, “भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत अनेक मातब्बर संघ आणि खेळाडू जोरदार मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. मी या अप्रतिम स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा युवा खेळाडूंना प्रेरणा देतात. मला आशा आहे की, यावेळी ही स्पर्धा तरुण मुला-मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना भारताचे मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित करेल.”
तिरंदाजीमध्ये ओजस-ज्योती जोडीने सुवर्णपदक जिंकताच भारताने रचला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
  • १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे खेळली जात आहे. या स्पर्धेच्या ११व्या दिवशीही (बुधवार) भारताच्या सुवर्ण कामगिरीची घोडदौड सुरुच आहे. आज तिरंदाजीमध्ये ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी दक्षिण कोरियाचा १५९-१५८ असा पराभव केला. या स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. ओजस आणि ज्योती यांनी इतिहास रचला आहे. भारतीय तिरंदाज ज्योती आणि ओजस यांनी सेमीफानलमध्ये कझाक तिरंदाजांचा १५९-१५४ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.

अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळाले आजचे पहिले पदक -

  • अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने मिश्र ३५ किमी शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. चीनला सुवर्ण तर जपानला रौप्य पदक मिळाले. पीव्ही सिंधूने कुसुमा वरदानीविरुद्ध चमकदार कामगिरी केली. तिने हा सामना २१-१६, २१-१६ अशा फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र, पदक जिंकण्यासाठी तिला आपली जुनी लय पुन्हा मिळवावी लागणार आहे.
  • २०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे.
  • २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ११ व्या दिवशी दोन पदके जिंकून, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवीन विक्रम केला आहे. सध्या भारताच्या खात्यात आता ७१ पदके आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. जकार्ता येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने हा विक्रम केला होता. तेव्हा भारताने १६ सुवर्ण, १३ रौप्य आणि ३१ कांस्यपदके जिंकली होती.

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत जिंकलेली पदके -

  • सुवर्ण: १६
  • रौप्य: २६
  • कांस्य: २९
  • एकूण: ७१
राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली
  • राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आल्यानंतर लगेच ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या दोन्ही नियुक्त्यांवरून राज्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली होत असल्याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुखपदी असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचीही बदली होण्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. आयोगाचे नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनेनुसार शासनाने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रमुखपद रिक्त होताच नवे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य पोलीस दलाचा कारभार हाती घेताच रश्मी शुक्ला या आगामी निवडणुकांचे वारे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

नागपूरचे नवे पोलीस आयुक्त कोण?

  • अमितेश कुमार यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी नागपुरात झाल्यामुळे त्यांची बदली होण्याचे निश्चित समजले जात आहे. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यांच्या जागेवर नागपूरचे नवे आयुक्त म्हणून पहिल्या क्रमांकावर गृहविभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार सिंह यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्य राखीव दलाचे प्रमुख चिरंजिवी प्रसाद आणि राज्य वाहतूक विभागाचे अपर महासंचालक रवींद्र सिंघल यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे.
  • एसीबीचे महासंचालक पद रिक्त का?
  • राज्य पोलीस दलात ९ पोलीस महासंचालकांची पदे मंजूर आहेत. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) या महत्वाच्या पदासह लीगल टेक्निकल आणि सिव्हिल डिफेन्स पदे रिक्त आहेत. राजकीय दबावापोटी एसीबीचे महासंचालक पद रिक्त ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ठाण्यात आयुक्त म्हणून वर्णी लागल्यास जयदीप सिंह यांची एसीबीच्या प्रमुख पदावर बदली होण्याची शक्यता आहे.
भारतात लवकरच येणार शिवरायांची वाघनखे, सामंजस्य करारावर स्वाक्षरी; लंडनच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मध्ये आहेत. ही वाघनखं भारतात आणण्याकरता करार संपन्न झाला आहे. या करारादरम्यान, लंडनच्या रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरांत जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंत्री उदय सामंतही उपस्थित होते.
  • छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. मात्र ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच आणली जात आहेत अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार, ते १ ऑक्टोबर रोजी ब्रिटनला रवाना झाले. ३ ऑक्टोबर सायंकाळी त्यांनी ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासह बैठक घेऊन त्यांनी ही वाघनखे भारतात आणण्याकरता सामंजस्य करार केला आहे. १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे भारतात दाखल होणार आहेत. या सामंजस्य करारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला.
  • वाघनखं भारतात आणण्यासाठी स्वाक्षरी होत असताना लंडनमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात हा आनंदाचा क्षण साजरा केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात वाघनखे दाखल होण्यासाठी शिवभक्त आतुर झाले आहेत.
‘या’ तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्रातलं नोबेल जाहीर, ब्रह्मांडाच्या वयापासून ते वैद्यकीय तपासण्यांपर्यंत उपयोगी संशोधन केल्याबद्दल सन्मान
  • यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या अ‍ॅनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या तीन शास्त्रज्ञांनी अशी उपकरणं विकसित केली आहेत, ज्याद्वारे अ‍ॅटोसेकंदात इलेक्ट्रॉनचं जग पाहता येईल. अ‍ॅटोसेकंद म्हणजे १/१,000,000,000,000,000 वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचं वय शोधून काढलं. ब्रह्मांडाचं वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यांपर्यंत अनेक गोष्टींसाठी अगोस्तिनी, क्रॉज आणि हुईलर यांचं संशोधन कामी आलं आहे.
  • अ‍ॅनी एल. हुईलर यांनी १९८७ मध्ये एक निरीक्षण नोंदवलं की, जेव्हा नोबल गॅसमधून इन्फ्रारेड लेजर लाईट टाकली जाते, तेव्हा प्रकाशाचे अनेक ओव्हरटोन दिसतात. प्रत्येक ओव्हरटोनची वेगळी सायकल आहे. जेव्हा एखाद्या वायूच्या अणूंवर प्रकाश पडतो तेव्हा असं घडतं. त्यामुळे अणूंच्या इलेक्ट्रॉन्सना ऊर्जा मिळते. त्यामुळे ते अणू प्रकाशित होतात.
  • तर पियरे अगोस्तिनी यांनी २००१ मध्ये प्रकाशाशी संबंधित एक प्रयोग केला. या प्रयोगाद्वारे त्यांना इलेक्ट्रॉन्सचं जग समजून घेता आलं. इलेक्ट्रॉन्सवर अशा प्रकारचा प्रयोग याआधी कोणीच केला नव्हता. हा प्रयोग करताना त्यांनी अ‍ॅनी एल. हुईलर यांच्या प्रयोगांचाही आधार घेतला.
  • इलेक्ट्रॉन्सचं जग समजून घेणं, त्यांच्या हालचाली पाहणं, त्यांची चमक आणि ऊर्जा समजून घेणं अवघड काम आहे. आपण जसजसं यावर संशोधन करत जाऊ तसतशी भविष्यात अत्याधुनिक इलेक्ट्रॉन उत्पादनं विकसित करता येतील. इलेक्ट्रॉन नियंत्रित कसे करायचे, अ‍ॅटोसेकंद तंत्रज्ञानाच्या मदतीने रेणू ओळखणं हे खूप मोठं संशोधन आहे. वैद्यकीय निदान करण्यात याची मदत होणार आहे.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - मयूरी लुटेची पदकांची हॅट्ट्रिक :
  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने सांघिक, वेटलिफ्टिंगमध्ये कोमल वाळके, ट्रॅम्पोलिनमध्ये आदर्श भोईर, डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामने सुवर्णपदकाची कमाई केली. खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. 

  • सायकलिंगमध्ये मयूरी लुटेचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील हे मयूरीचे तिसरे पदक ठरले. मयूरीने यापूर्वी वैयक्तिक कांस्य आणि सुवर्णपदक पटकावले होते. मयूरीने सांघिक स्प्रिंट प्रकारात शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरेच्या साथीने तीन फेऱ्यांची शर्यत ५२.७२३ सेकंदांत पूर्ण केली. वेटलिफ्टिंगमध्ये कोमल वाकळेने ८७ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. कोमलने स्नॅचमध्ये ९४ किलो, तर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले.

  • संजीवनीबाबत आज निर्णय - संजीवनी जाधवने दहा हजार मीटर शर्यतीत ३० मिनिटे ४०.५१ सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक कमावले. मात्र धावताना संजीवनीचा पाय एकदा ट्रॅकला भेदून दुसऱ्या रेषेमध्ये गेला. अन्य संघांनी यावर आक्षेप घेतल्याने संजीवनीला अपात्र ठरविण्यात आले. मात्र महाराष्ट्र संघाने या निर्णयाविरुद्ध दाद मागितली आहे. या संदर्भात तक्रार निवारण समितीची मंगळवारी दुपारी बैठक होणार आहे.

मानवी उत्क्रांतीतील शोधाचा सन्मान ;  स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातले नोबेल :
  • आधुनिक मनुष्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीचे अत्यंत महत्त्वाचे अंतरंग समजून घेण्याबरोबरच त्याला त्याच्या नामशेष झालेल्या पूर्वजाच्या तुलनेत विलक्षण बनवणाऱ्या मानवी उत्क्रांतीतील शोधाबद्दल स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

  • पाबो यांनी विकसित केलेल्या तंत्रांमुळे संशोधकांना आधुनिक मानव आणि ‘निअँडरथल्स’ व ‘डेनिसोव्हन्स’ या दोन नष्ट झालेल्या मानवी प्रजातींच्या जनुकाचा तुलनात्मक अभ्यास करता आला, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

  • ‘निअँडरथल्स’ ही मानवाची एक स्वतंत्र प्रजाती होती. ४० हजार वर्षांपूर्वी नामशेष होईपर्यंत ती हजारो वर्षांपासून युरोपमध्ये अस्तित्वात होती. ‘‘नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी एकाचा म्हणजे ‘निअँडरथल्स’चा आनुवंशिक ‘कोडं’ उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले. त्यांच्या कार्याने मानवी उत्क्रांतीचा इतिहास आणि मानव पृथ्वीतलावर कसा भ्रमण करीत गेला, हे शोधण्यातही मदत झाली, अशा शब्दांत नोबेल समितीने पाबो यांचा गौरव केला. पाबो आणि त्यांच्या संशोधकांच्या पथकाला हेही आढळले की, जनुकांचा प्रवास निअँडरथल्सपासून होमो सेपियन्सपर्यंत झाला होता. तसेच या दोन्ही प्रजातींच्या सहअस्तित्वाच्या काळात त्यांना एकमेकांपासून मुलेही झाली होती, असे पाबो यांच्या संशोधनातील निष्कर्ष असल्याचे नोबेल समितीच्या अध्यक्ष अ‍ॅना वेडेल यांनी सांगितले.

  • होमिनिन प्रजातींमधील जनुकांचे हे हस्तांतरण करोना विषाणूसारख्या संसर्गानंतर आधुनिक मानवाची प्रतिकार प्रणाली कशी काम करते, हेही दाखवता येते, असेही नोबेल समितीने म्हटले आहे.

  • नामशेष झालेल्या मानवसदृश (होमिनिन्स) प्रजाती आजचा मनुष्य यांच्यातील आनुवंशिक फरक पाबो यांनी शोधला. त्यांच्या शोधांमुळे आपण आधुनिक मानव म्हणून कसे अनन्यसाधारण ठरतो, याचा शोध घेता येतो. तसेच आपला अज्ञात नातेवाईक ‘डेनिसोव्हन्स’ शोधण्याचा अद्वितीय पराक्रमही पाबो यांनी केला, असेही नोबेल समितीने म्हटले आहे. प्रा. स्वान्ते पाबो यांना जाहीर झालेल्या नोबेल पारितोषिकाचे स्वरूप आठ लाख युरो असे आहे.

चीनमधल्या कंपन्या भारतात आणण्यासाठी मोदी सरकारची १.२ लाख कोटी डॉलर्सची योजना :
  • केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. भारतात अधिकाधिक कंपन्यांनी उद्योग सुरू करावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, भारतातील अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रांवरही होतो आहे.

  • तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर या प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पंतप्रधान गती शक्ती’ या १.२ ट्रिलीयन लागत असलेल्या मोठ्या प्रकल्पावर केंद्र सरकारकडून काम करण्यात येत आहे.

  • ‘पंतप्रधान गती शक्ती’ प्रकल्प काय आहे - केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान गती शक्ती’ या १.२ ट्रिलीयन लागत असलेल्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे. या अंतर्गत केंद्रसरकारच्या १६ मंत्रालयांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याची सरकारची योजना आहे. पंतप्रधान गती शक्ती प्रकल्पांतर्गत एखाद्या प्रकल्पांची जागा, डिझाईन, मंजुरी आणि प्रकल्पांची किंमत आदी संदर्भातील अडचणी एकाच ठिकाणी सोडवता येणार आहे. वेळ आणि खर्च वाचवणे, तसेच जागतिक कंपन्यांना आपल्या देशात उद्योग सुरू करण्यास आकर्षित करणे हा या मागचा उद्देश आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील लॉजिस्टिक्सचे विशेष सचिव अम्रित मीना यांनी दिली आहे. तसेच उद्योगांसाठी नव्या जागा शोधणे आणि त्यांनी देशातील रेल्वे, बंदरे आणि विमानतळांशी जोडणे, आदी कामे गती शक्ती अंतर्गत करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

  • चीन प्लस वन धोरणाचा मिळेल फायदा : चीनमधील अनेक क्षेत्रे अशी आहेत, जी जागतिक कंपन्यांसाठी उघडी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्या चीन प्लस वन धोरण स्वीकारत आहेत. अशा परिस्थितीत चीनशी स्पर्धा करायची असेल तर यां कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गती शक्ती अंतर्गत पायाभूत प्रकल्प पूर्ण झालेत, तर या कंपन्या भारतात आपले उत्पादन युनिट सुरू करू शकतात. करोनानंतर जगातील कंपन्यांनी चीनवर अवलंबून न राहता, इतर देशांमध्येही उत्पादन सुरू करण्याचे धोरण अवलंबले आहे, त्यालाच चीन प्लस वन धोरण म्हटले जाते.

स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर; कोण आहेत स्वांते पाबो? जाणून घ्या :
  • स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील ( discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution ) अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.

  • कोण आहेत स्वांते पाबो - स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत

  • गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.

ब्रिटनचे वादग्रस्त प्राप्तिकर धोरण मागे :
  • पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी बाजारातील गोंधळानंतर, श्रीमंतांवरील प्राप्तिकरदरात कपात करण्याचे वादग्रस्त धोरण मागे घेतले. आपल्या सत्ताधारी हुजूर पक्षातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी लिझ यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. सरकारने जाहीर केलेल्या या योजनेवर पक्षाच्या अनेक खासदारांनी टीका केल्यामुळे ट्रस यांना हा निर्णय घ्यावा लागला.

  • अर्थमंत्री क्वासी क्वार्टेग म्हणाले की, श्रीमंतांच्या करकपातीसाठी सार्वजनिक आणि कल्याणकारी खर्चात कपात केली जाऊ शकते, या सूचनेवर काही खासदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर  हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • वर्षभरात १५०००० पौंड (१६७००० अमेरिकी डॉलर) पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठीचा ४५ टक्के करदर रद्द करण्याची योजना २३ सप्टेंबर रोजी करकपातीच्या पॅकेजचा भाग म्हणून जाहीर करण्यात आली होती. ती अवघ्या एका महिन्यात मागे घेण्याची वेळ नव्या ट्रस सरकारवर आली आहे.

04 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.