चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 मे 2023

Date : 30 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत
  • गतविजेत्या भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने कमालीचे सातत्य दाखवत थायलंडचा १७-० असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह भारतीय कनिष्ठ संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि याच वर्षी डिसेंबरमध्ये मलेशियात होणाऱ्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्रताही सिद्ध केली.
  • भारताचा ‘अ’ गटातील हा अखेरचा सामना होता. भारतीय संघ गटात १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गटातील पाकिस्तान दुसरा अपराजित संघ असून, त्यांचा अखेरचा सामना जपानशी होणार आहे. या सामन्यानंतर गटातील क्रमवारी निश्चित होईल.
  • थायलंडवरील विजयात भारताकडून अंगद बीस सिंगने (१३ व्या मिनिटाला, ३३ व्या मि., ४७ व्या मि., ५५ व्या मि.) सर्वाधिक चार गोल केले. त्याला उत्तम सिंग (२४ व्या मि., ३१ व्या मि.), अमनदीप लाक्रा (२६ व्या मि., २९ व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर योगेम्बर रावत (१७ व्या मि.), अराइजित सिंग हुंडल (३६ व्या मि.), विष्णुकांत सिंग (३८ व्या मि.), बॉबी सिंग धामी (४५ व्या मि.), शारदानंद तिवारी (४६ व्या मि.), अमनदीप (४७ व्या मि.), रोहित (४९ व्या मि.), सुनीत लाक्रा (५४ व्या मि.) आणि राजिंदर सिंग (५६ व्या मि.) यांनी प्रत्येकी गोल करून सुरेख साथ केली.
गुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू
  • आसाममधील गुवाहाटीला पश्चिम बंगालमधील न्यू जलपैगुडीशी जोडणाऱ्या ईशान्य भारतासाठीच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दूरसंवाद कार्यक्रमाद्वारे हिरवा झेंडा दाखवला.गुवाहाटी स्थानकावरून या गाडीला रवाना करण्यासाठी पंतप्रधानांनी पडद्यावर प्रतीकात्मक हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया व मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा या वेळी उपस्थित होते. गुवाहाटी व न्यू जलपैगुडीदरम्यानच्या या अर्ध अतिजलद (सेमी हायस्पीड) गाडीमुळे आसाम व पश्चिम बंगालमधील संपर्क आणखी वेगवान होणार आहे.
  • या वंदे भारत एक्सप्रेसमुळे ईशान्य भारतातील पर्यटन, शिक्षण, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, असे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.
  • गेल्या नऊ वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेच्या जाळय़ाने जोडली गेल्यामुळे, या भागात पायाभूत सोयींचा विकास झाल्याचे मोदी यांनी सांगितले. हा विकास कुठल्याही भेदभावाशिवाय सर्वासाठी असून, त्यातून खरा सामाजिक न्याय व सर्वधर्मसमभाव प्रतिबिंबित झाला असल्याचेही ते म्हणाले.
  • गुवाहाटी- न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस हा प्रवास ५ तास ३० मिनिटांत पूर्ण करणार आहे. सध्या या मार्गावरील सर्वात जलद गाडीला हेच अंतर कापण्यास साडेसहा तास लागतात. या अत्याधुनिक रेल्वेगाडीमुळे या भागातील लोकांना वेगवान व सुखकारक प्रवासचे साधन उपलब्ध होणार असून, या भागातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
  • पंतप्रधानांनी याप्रसंगी नव्याने विद्युतीकरण झालेल्या १८२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले, तसेच आसाममधील लुमिडग स्थानकावरील डेमू- मेमो शेडचे उद्घाटनही केले.
जीएसएलव्ही-एफ१२ चे प्रक्षेपण; इस्रोचे आणखी एक यश
  • सतीश धवन अवकाश केंद्रातून सोमवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जीएसएलव्ही-एफ१२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या अग्निबाणाच्या सहाय्याने एनव्हीएस-०१ हा दिशादर्शक उपग्रहाच्या दुसऱ्या पिढीतील (२जी) उपग्रह नियोजित कक्षेत सोडण्यात यश आले. यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला. या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या संशोधक आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.
  • सकाळी १० वाजून ४२ मिनिटे या निर्धारित वेळेला २७.५ तासांच्या उलटगणतीनंतर ५१.७ मीटर उंचीच्या आणि तीन टप्प्यांच्या जीएसएलव्ही-एफ१२ या अग्निबाणाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे जीएसएलव्हीचे १५ वे उड्डाण होते. त्याच्या सहाय्याने सोडण्यात आलेला एनव्हीएस-०१ हा दिशादर्शक उपग्रह भारताच्या प्रादेशिक दिशादर्शन प्रणालीमध्ये अधिक सुधारणा करेल. त्याद्वारे अधिक अचूक आणि वास्तव वेळेचे दिशादर्शन समजण्यात मदत होईल.
  • दुसऱ्या पिढीतील दिशादर्शक उपग्रह मालिका महत्त्वाची समजली जाते. ही जीपीएसप्रमाणे काम करणारी भारतीय प्रादेशिक उपग्रह दिशादर्शक प्रणाली आहे. ही प्रणाली २० मीटर अंतराइतके अचूक अंतर कळवते तसेच ५० नॅनोसेकंदाइतकी अचूक वेळ कळवते
Chandrayaan-3 : इस्रोची पुन्हा चंद्रावर स्वारी, चांद्रयान-३ मोहिमेचा अखेर महिना ठरला आणि तारीख आहे…
  • ISRO – इस्रोची महत्त्वकांक्षी मोहिम म्हणून चांद्रयान ३ कडे बघितले जात आहे. चंद्रावर अलगद यान उतरवणे आणि त्यामधून रोव्हरने बाहेर येत चांद्र भूमीवर संचार करणे अशी ही मोहिम असणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर चंद्रावर रोव्हर धावणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने ही तंत्रज्ञानाची कमाल केली आहे.
  • २०१९ च्या जुलैमध्ये चांद्रयान २ मेहिमेत इस्रोने असाच प्रयत्न केला होता. एक उपग्रह चंद्राभोवती प्रक्षेपित केला होता, जो अजुनही चंद्राभोवती फिरत असून चंद्राचा नकाशा तयार करण्याचे तसंच चंद्रावरील खनिज-मुलद्रव्य, चंद्राभोवती असलेल्या अवकाशातील घडामोडींबद्दलची माहिती गोळा करत आहे. या मोहिमेत चंद्रावर ‘विक्रम’ नावाचा लँडर – यान उतरवण्याचा प्रयत्न केला. याच लँडरमधून ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर बाहेर पडणार होता. मात्र विक्रम यान अलगद न उतरता चंद्रावर आदळले होते आणि त्याचे तुकडे झाले होते.

चांद्रयान ३ मोहिम कशी आहे?

  • आता चांद्रयान ३ मोहिमेच्या माध्यमातून हाच प्रयत्न इस्रो करणार आहे. यावेळी सुमारे १७५२ किलो वजनाा लँडर हा चांद्र भूमीवर उतवण्याचा प्रयत्न इस्रो करणार आहे. यामध्ये २६ किलो वजनाचा रोव्हर नंतर चांद्रभूमीवर संचार करणार असं नियोजन आहे. इस्रोचा शक्तीशाली प्रक्षेपक, ज्याला बाहुबली यानावानेही ओळखले जाते अशा LVM3 मधून हे चांद्रयान ३ चंद्राकडे धाडले जाणार आहे. चंद्रावर लँडर-यान आणि रोव्हर उतरवत चांद्र भूमीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यााचा इस्रोचा प्रयत्न असणार आहे. एकुण १४ दिवस रोव्हर चंद्राच्या भूमीवरचा संचार करेल असेही नियोजन आहे.
नवीन संसदेत सर्वसामान्यांना प्रवेश मिळेल का? कामकाज पाहण्यासाठी एंट्री पास कसा मिळतो, जाणून घ्या
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी नवीन संसदेचं उद्घाटन केलं. या उद्घाटनाचे व नवीन संसद भवनाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. या नवीन भव्यदिव्य संसदेबद्दलची चर्चा ऐकल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही इथे भेट द्यावीशी वाटते. तुम्हालाही संसद आतून पाहायची असेल, संसदेचे कामकाज पाहायचे असेल, तर त्यासाठी प्रक्रिया काय असते आणि एंट्री पास कसा बनवला जातो, ते जाणून घेऊयात.

संसदेत कुणीही जाऊ शकतं का?

  • ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्ही हवं तेव्हा संसदेत जाऊ शकत नाही. संसदेत जाण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया असते, ज्याद्वारे तुम्हाला प्रवेश दिला जातो. नवीन संसदेत सामान्य लोकांच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिसूचना आलेली नाही, परंतु संसदेच्या कामकाजादरम्यान लोक संसदेत जाऊ शकतात. संसदेत सामान्य लोकांना संसदेचे कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जातो, ज्यासाठी सभागृहात एक प्रेक्षक गॅलरी आहे, तिथून लोक सभागृहाचे कामकाज पाहू शकतात. अशाच व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना नवीन संसदेचं कामकाजही पाहता येईल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे याबद्दल माहिती येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

संसदेत प्रवेश कसा मिळतो?

  • सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी संसदेत प्रवेश करण्यासाठी पास काढावा लागतो. तो एकट्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठीही बनवता येतो. काही वेळा शाळकरी मुलांनाही संसदेत नेलं जातं, त्यांच्यासाठी वेगळा पास बनवला जातो. हे पास संसद सचिवालयातून बनवले जातात. तसेच, तुम्ही कोणत्याही खासदारामार्फतही संसदेत जाऊ शकता. त्यासाठी त्या भागातील खासदाराशी बोलू शकता. खासदाराने शिफारस केल्यास तुम्हाला संसदेत जाण्यासाठी पास मिळू शकतो.

संसद संग्रहालयासाठी पासची गरज नाही

  • तुम्हाला संसद संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर तुम्ही यासाठी थेट प्रवेश घेऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगळ्या पासची गरज नाही आणि सुट्टीचे दिवस वगळता तुम्हाला हे संग्रहालय पाहता येऊ शकतं. इथे तुम्हाला संसद आणि पंतप्रधानांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या वस्तू पाहायला मिळतात. दुसरीकडे सध्या नवीन संसदेत सामान्य लोकांना जाता येईल की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
इस्रोचे आणखी एक यशस्वी प्रक्षेपण, अत्याधुनिक NVS-01 उपग्रह नियोजित कक्षेत
  • आज भारताने आणखी एका कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. ISRO – इस्रोच्या GSLV F12 या प्रक्षेपकाने-रॉकेटने NVS-01 हा दिशादर्शक उपग्रह २५२ किलोमीटर या नियोजित उंचीवर अपेक्षित वेगासह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. NVS-01 हा उपग्रह IRNSS-1G या उपग्रहाची जागा घेणार आहे. भारतीय उपखंडात संरक्षण क्षेत्र आणि नागरी वापराकरता दिशादर्शक म्हणून या उपग्रहाचा वापर होणार आहे. स्वदेशी बनावटीची ही दिशादर्शक प्रणाली अमेरिकेच्या जीपीएस प्रमाणे काम करत आहे. NVS-01 प्रमाणे याआधीच सहा उपग्रह हे कार्यरत आहेत.
  • दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २१ ऑगस्ट २०२१ ला GSLV या रॉकेटच्या शेवटच्या टप्प्यात बिघाड झाला होता, शेवटचा क्रोजेनिक इंजिनाचा टप्पा हा सुरु झाला नव्हता, त्यामुळे ते प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. त्यामुळे अशाच GSLV चे प्रक्षेपण आज होणार असल्यानं इस्रोमध्ये आज काहीसे तणावाचे वातावरण होते. त्यातच आज सकाळी १०.१२ मिनिटांनी होणारे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे अर्धा तास उशीरा करण्याचे निश्चित झाले.
  • मात्र GSLV F12 चे प्रक्षेपकाने अचुक काम केले आणि उपग्रह अचुकरित्या नियोजित ठिकाणी प्रक्षेपित केला गेला. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी याबद्द्ल सर्वांचे अभिनंदन केले. दर महिन्याला एक याप्रमाणे इस्रोचे सध्याचे उपग्रह प्रक्षेपण सुरु असून यापुढील काळात आणखी मोहिमा पार पाडणार असल्याचं इस्रोच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये महत्त्वाकांक्षी भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणारी ‘गगनयान’ चाचणी मोहिमही लवरकरच पार पाडणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

 

इस्लामपूरचा अजिंक्य बाबुराव माने देशातील गुणवत्ता यादीत :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इस्लामपूरचा अजिंक्य बाबुराव माने याने देशातील गुणवत्ता यादीत ४२४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या घवघवीत यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. अजिंक्यचे माध्यमिक शिक्षण आदर्श हायस्कूल, इस्लामपूर, अभियांत्रिकी पदवी राजारामबापू इन्स्टिटय़ूट येथे तर पदव्युत्तर पदवी एनआयटी सूरत येथे मिळवली. एम टेक पदवीनंतर काही वर्षे नोकरीही केली होती. गेली तीन वर्षे तो यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. आपल्या यशात आई-वडील यांचे प्रोत्साहन, मोठे दोन भाऊ यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले असे मत अजिंक्य याने व्यक्त केले.

  • सातत्यपूर्ण अभ्यास, अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नाची जाण, विशेष करून समाजशास्त्र विषयाचा अधिक गंभीरपणे केलेला अभ्यास यामुळे यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. अजिंक्य याचे आई-वडील शिक्षक आहेत, एक भाऊ यूपीएससीच्या घेण्यात आलेल्या इंडियन डिफेन्स इस्टेट सव्‍‌र्हिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत, दुसरे बंधू जर्मनीत मोठय़ा कंपनीत अधिकारी आहेत. अजिंक्य माने यांचे मूळ गाव नेर्ले (ता. वाळवा) हे आहे.

  • कोल्हापुरातील अभियंत्यांचे यश - कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अभियंत्यांनी केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. स्वप्निल तुकाराम माने याने फळविक्रेता ते सनदी अधिकारी अशी झेप घेतली आहे. तर आशिष अशोक पाटील या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने नेत्रदीपक झेप घेतली आहे.  केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये साळशी (ता. शाहुवाडी) येथील आशिष अशोक पाटील यांनी ५६३ तर सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील स्वप्निल तुकाराम माने याने ५७८ वी रँक मिळविली.

  • सोलापूरचा अनय नावंदर देशात ३२ वा - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरचा अनय नितीन नावंदर देशात ३२ वा आला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता स्वत: जिद्द बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून देशात सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. अनय याचे वडील नितीन श्रीनिवास नावंदर हे व्यवसायाने सनदी लेखापाल (सीए) आहेत. तर मातोश्री अपर्णा नावंदर अलिबाग येथे न्यायाधीश आहेत. त्याचे आजोबा श्रीनिवास नावंदर हेदेखील न्यायाधीश होते. त्यामुळे घरात सुरूवातीपासून शैक्षणिक वातावरण आहे. त्याची बहीण निधी ही अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर; जेएनयूची माजी विद्यार्थिनी श्रुती शर्मा देशात अव्वल : 
  • यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

  • UPSC CSE २०२१ अंतिम निकालामध्ये एकूण ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय एका उमेदवाराचा निकाल आता रोखण्यात आला आहे. आणि तात्पुरत्या निवडीसाठी ८० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय एका उमेदवाराचा निकाल आता रोखण्यात आला आहे.

  • परीक्षार्थींचे गुण निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी जाहीर केले जातील. यापूर्वी आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. यूपीएसी नागरी सेवा परीक्षा २०२१च्या भरतीद्वारे, आयएएस, एएफएस, आयपीएस आणि गट अ आणि गट ब ची ७४९ पदे भरली जातील.

  • दरम्यान, दिल्लीच्या श्रुती शर्माने अखिल भारतीय रँक (AIR १) मिळवला आहे. त्यानंतर यशाने आनंदित झालेल्या श्रुती शर्मा म्हणाल्या की, “यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विश्वास होता, परंतु गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळणे आश्चर्यकारक आहे.” श्रुती शर्मा यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे.

  • शर्मा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेश घेतला होता. श्रुती शर्मा यांनी जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शिअल कोचिंग अकादमी येथे नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. शर्मा यांच्यासह एकूण २३ उमेदवार जामिया आरसीए मधून नागरी सेवा परीक्षेत पात्र झाले आहेत.

पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धा - भारताच्या प्राचीला ऐतिहासिक कांस्य :
  • भारताच्या प्राची यादवने पोलंडमधील पोन्झनान येथे झालेल्या पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या व्हीएल २ प्रकारातील २०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली पॅरा-नौकानयनपटू ठरली.

  • प्राचीने व्हीएल २ प्रकारातील २०० मीटर शर्यतीत १ मिनिट आणि ०४.७१ सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. ऑस्ट्रेलियाची सुझान सिपेल (१ मिनिट ०१.५४ सेकंद) आणि कॅनडाची ब्रियाना हेनेसी (१ मिनिट ०१.५८ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक आपल्या नावे केले.

एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ १ जूनपासून धावणार - अनिल परब :
  • वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने वाहन क्षेत्रातील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे.

  • महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी ‘लालपरी’ अर्थात एसटी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

  • पुणे येथे बुधवारी (१ जून रोजी) होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दिली. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही ॲड. परब यांनी केले आहे.

  • १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन : १ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, हा एक दुग्धशर्करेचा योग आहे, अशा शब्दात परब यांनी आनंद व्यक्त केला.

मोदींनी आठ वर्षात ‘इतक्या’ देशांना दिली भेट; जाणून घ्या खर्चाचा आकडा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे चर्चेचा विषय असतात. करोनापूर्वी तर पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशातच जास्त असतात, अशी टीकाही विरोधकांकडून केली जात होती. परंतु करोनाची साथ आल्यापासून मोदींचे विदेश दौरे कमी झाले होते. मात्र, अलिकडेच ते युरोप आणि जपान दौऱ्यावर गेले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेल्या ८ वर्षात अनेक देशांच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. मोदींनी या आठ वर्षात किती देशांचे दौरे केलेत हे जाणून घेऊयात.

  • मे २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११८ परदेश दौरे केले आहेत, ज्यात त्यांनी तब्बल ६३ देशांना भेटी दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सर्वाधिक ३० परदेश दौरे २०१५ साली केले आहेत. तर सर्वात कमी ७ दौरे त्यांनी २०२१ या वर्षात केले. २०२२ मध्ये मोदींनी पाच देशांना भेटी दिल्या आहेत. तर २०२२ याच वर्षात मोदी ब्रिक्स, जी-७, जी-२० आणि २० व्या सार्क परिषदेसाठी परदेश दौरे करणात आहेत. याशिवाय इतर काही देशांना ते या वर्षात भेटी देतील.

  • मोदींच्या विदेश दौऱ्यासाठी किती खर्च आला - पंतप्रधान मोदी २०१४मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीच्या ४ वर्ष आणि सात महिन्यात त्यांनी ९२ परदेश दौरे केले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या ९२ परदेश दौऱ्यांच्या देखभालीवर तब्बल २ हजार २१ कोटी रुपयांचा खर्च आला होता, असं तत्कालीन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के सिंग यांनी सांगितलं होतं.

  • सरकार पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान विमान, चार्टर्ड फ्लाईट्स आणि हॉटलाइन सुविधा यावर खर्च करते. यामध्ये हॉटेल आणि इतर ओव्हरहेड्सच्या खर्चाचा समावेश नसतो. तर पंतप्रधान मोदी यांच्या २०१९ ते २०२२ या कार्यकाळातील परदेश दौऱ्यांवरील खर्चाची माहिती मिळू शकलेली नाही.

 

३१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.