चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ मे २०२१

Updated On : May 31, 2021 | Category : Current Affairs


देशात प्राणवायूची आता दहापट निर्मिती  :
 • देश करोना विषाणू साथीशी सर्वशक्तीनिशी लढत असल्याचे नमूद करीत, प्राणवायूचे उत्पादन दहा पटीने वाढवण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.

 • करोनासाथीच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांपुढे प्राणवायूच्या तुटवडय़ाचे संकट उभे राहिले. प्राणवायूअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्या अनुषंगाने पंतप्रधान म्हणाले की आता प्राणवायूचे उत्पादन आधीपेक्षा दहा पटींहून अधिक वाढवण्यात आले आहे. पूर्वी ते प्रतिदिन ९०० मेट्रिक टन एवढे होते, आता ते ९५०० मेट्रिक टन करण्यात आले आहे.

 • ‘मन की बात’च्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, ‘‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे होते, पण भारतीय हवाई दल, रेल्वे, टँकरचालक यांनी अहोरात्र काम करून प्राणवायू वेळेत पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडले.’’

 • पंतप्रधानांनी प्राणवायूची वाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांशी संवाद साधला. प्राणवायू टँकरचे चालक दिनेश उपाध्याय, आक्सिजन एक्स्प्रेसच्या चालक शिरीषा गजनी आणि हवाई दलातील कॅप्टन पटनायक यांनी बजावलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले.  त्याबद्दल मोदी म्हणाले, ‘‘करोना संकट काळात आम्ही सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा सार्थ केली.

राज्यांचे १.५८ लाख कोटी केंद्राकडे थकीत :
 • केंद्र सरकारने राज्यांना जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कराचे १.५८लाख कोटी रुपये दिलेले नाहीत, त्यामुळे जीएसटी मंडळाची बैठक या मोठय़ा थकबाकीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या तीन राज्यांनी रविवारी केली आहे.

 • केरळ, पंजाब, छत्तीसगड या राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे,की २०२१-२२ या काळातील थकबाकी बाबत जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात यावी. महसूल वाढ व जून २०२२ नंतरची भरपाई यावर त्यात चर्चा करण्यात यावी.

 • पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीत सिंग  बादल यांनी सांगितले, की सर्वच राज्यांना जीएसटी रक्कम २०-५० टक्के कमी येत आहेत. जीएसटी मंडळाने राज्यांच्या महसुली स्थितीचा विचार करून  निर्णय घ्यावा. पंजाबला एप्रिलपर्यंतची जीएसटी भरपाई पाच हजार कोटी मिळायला हवी होती पण ती कमी मिळाली आहे. सर्व विरोधी राज्यांनी एकमुखाने केंद्राकडे जास्त भरपाई रकमेची मागणी केली आहे. नुकसानभरपाई निश्चितीसाठी एक पद्धत ठरवण्याची गरज आहे, ती जूनपासून लागू करावी. राज्यांना महसुली तुटीचा सामना जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजवाणीमुळे करावा लागत आहे.

मोदी सरकारने पूर्ण केले सात वर्ष; अमित शाहांचं ट्विट, म्हणतात :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रात सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

 • केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 • केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांना उजाळा दिला असून, सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल मत व्यक्त केलं आहे.

 • “मागील सात वर्षात देशातील जनतेनं पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासियांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” असं शाह यांनी म्हटलं आहे.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा - पूजाला सलग दुसरे सुवर्णपदक : 
 • आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी चार सुवर्णपदक पटकावण्याची संधी असलेल्या भारतीय महिलांना फक्त एकाच सुवर्णपदकाची कमाई करता आली. पूजा राणीने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र जगज्जेती एमसी मेरी कोम, लालबुतसाही आणि अनुपमा यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 • महिलांच्या ७५ किलो वजनी गटात पूजाने उझबेकिस्तानच्या मावलुडा मोलोनोव्हाचा ५-० असा पराभव केला. २०१९मध्ये झालेल्या स्पर्धेतही पूजाने या वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. यंदा भारतासाठी सुवर्ण जिंकणारी पूजा एकमेव महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे.

 • सहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरीकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र ५१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या नाजिम काजैबेने मेरीवर ३-२ अशी सरशी साधली. त्यामुळे सहावे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे मेरीचे स्वप्न भंगले. तिचे हे कारकीर्दीतील दुसरे आशियाई रौप्यपदक आहे. मेरीने २००३, २००५,२०१०, २०१२ आणि २०१७मध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

राज्यात नवे नियम जाहीर; नेमके निर्बंध काय : 

राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर धोका टळलेला नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता यासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा असणार आहे. या भागातील नियमावली त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार कार्यरत असणार आहे. तर २९ मे पर्यंतचा करोनाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे.

पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता पाहून पुढच्या १५ जूनपर्यंतची नियमावली आखली जाईल.

 • अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी
 • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
 • अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
 • दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

३१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)