चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 मार्च 2023

Date : 31 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणजे काय? कोणत्या नियमांमुळे यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा ठरणार वेगळी?
  • यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. ‘आयपीएल’ने भारतीय क्रिकेटचे रुपडे तर पालटलेच, शिवाय जगभरातील ट्वेन्टी-२० लीगना वेगळे महत्त्व मिळवून दिले. त्यामुळे या स्पर्धेकडे जगभरातील क्रिकेटरसिकांची नजर असते. आता यंदाच्या हंगामात काही नवे नियम या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. हे नियम कोणते आणि त्यांचा सामन्यांच्या निकालांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा.

‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणजे काय?

  • यंदाच्या हंगामातील सर्वांत मोठा नियमबदल म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणजेच प्रभावी खेळाडूचा नियम सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकेल. या नियमानुसार, संघांना सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार एक खेळाडू बदलण्याची परवानगी असेल. या नियमाचा गेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत सर्व प्रथम प्रयोग करण्यात आला होता.

‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम कसा वापरला जाणार?

  • ‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते. परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. अन्यथा संघांना केवळ भारतीय खेळाडूची ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून निवड करता येईल. कर्णधाराला प्रभावी खेळाडूचे नाव सांगावे लागेल. डावाच्या सुरुवातीला, षटकाच्या समाप्तीनंतर, फलंदाज बाद झाल्यास किंवा फलंदाजाला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्यास प्रभावी खेळाडूला मैदानावर येता येईल. प्रभावी खेळाडू उर्वरित सामना खेळेल आणि तो ज्या खेळाडूची जागा घेईल, त्या खेळाडूला पुन्हा सामन्यात भाग घेता येणार नाही. तसेच प्रभावी खेळाडू कर्णधारपदही भूषवू शकणार नाही.
आम आदमी पक्षातर्फे ‘मोदी हटवा, देश वाचवा’ मोहीम
  • मोदी सरकारकडून विरोधी पक्षांवर केली जाणारी कारवाई, वाढता भ्रष्टाचार, घटनाविरोधी कामकाज या विरोधात आम आदमी पक्षातर्फे अकरा भाषांमध्ये मोदी हटवा देश वाचवा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यातही जनजागृही अभियान राबवले जाणार आहे.
  • पक्षाचे पुणे जिल्हा संघटक मंत्री डॉ. अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत या वेळी उपस्थित होते.
  • मोदी सरकार भांडवलदारांना मोठे करू पाहात आहे. पेट्रोल आणि सीएनजीचे दर आता एकच झाले आहेत. विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाई हे सूडबुद्धीचे राजकारण आहे.
  • मात्र अदानीं या प्रिय मित्राबाबत पंतप्रधान मोदी गप्प आहेत. त्यामुळे हुकुमशाही सरकारविरोधात देशभरात मोदी हटवा देश वाचवा मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी ‘आप’कडून आश्वासनांची खैरात
  • आम आदमी पक्षाने (AAP) कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ‘आप’ने बुधवारी (दि. २९ मार्च) राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात विविध क्षेत्रांसाठी ६१ आश्वासने दिली आहेत. जर आप सत्तेत आली तर या आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल, असे वचनही दिले आहे.
  • दिल्लीमध्ये ‘आप’ने जी आश्वासने दिली होती. त्याचप्रकारची आश्वासने कर्नाटकातही देण्यात आली आहेत. प्रत्येक नागरिकाला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर, विद्यार्थ्यांसाठी शहरातील बसप्रवास मोफत, मोहल्ला क्लिनिक, प्रत्येक वर्षी दोन लाख नव्या रोजगारांची निर्मिती, रोजगार मिळेपर्यंत प्रत्येक बेरोजगाराला रुपये तीन हजारांचा भत्ता आणि महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षण… अशी काही प्रमुख आश्वासने ‘आप’ने दिली आहेत.
  • जाहीरनाम्याचे प्रकाशन करत असताना खासदार संजय सिंह म्हणाले, “कर्नाटकातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याचे आश्वासन ‘आप’ने दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ४० टक्के कट कमिशन घेणारे राज्य म्हणून कर्नाटकची ओळख झाली आहे, ही ओळख पुसण्याचे काम आम्ही करू. तसेच लोकायुक्तला सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल आणि भ्रष्टाचाराविरोधातील चळवळ आणखी बळकट केली जाईल.”
  • शिक्षणाची हमी, या नावाखाली ‘आप’ने शैक्षणिक क्षेत्रात काय करणार? याची जंत्री दिली आहे. उच्चशिक्षण घेण्यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन, खासगी शाळांतील शैक्षणिक शुल्काचे नियमन करण्यासाठी समितीची स्थापना आणि कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी अशी काही आश्वासने शिक्षण क्षेत्रासाठी देण्यात आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी दिल्लीच्या धर्तीवर १० पॉलिक्लिनिकची स्थापना आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
  • दिग्गज टेक कंपनी असलेले Google सध्या चॅटजीपीटीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे गुगलने देखील Bard लॉन्च केले आहे. मात्र असे असतानाच NCLAT म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनलने गुगलला जोरदार धक्का दिला आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने गुगलला Play Storeच्या धोरणांचा गैरवापर केल्याबद्दल १,३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा निर्णय NCLAT ने CCI चा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच NCLAT ने गुगलला १,३३८ कोटी रुपयांचा हा दंड ३० दिवसांच्या आत भरण्यास सांगितले आहे.

नक्की काय आहे प्रकरण ?

  • कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने गुगलला Play Storeच्या धोरणांचा गैरवापर केल्याबद्दल १,३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याबद्दल गुगलने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे Google ने NCLAT कडे दाद मागितली होती परंतु NCLAT ने देखील गुगलला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये गुगलला अनुचित व्यापार पद्धत थांबवून त्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची सूचना केली होती. यानंतर Google ने या दंडाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या १,३३७ कोटींच्या दंडावर अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली होती.
  • NCLT ने गुगलला १,३३८ कोटी रुपयांचा दंड ३० दिवसांच्या आतमध्ये भरण्यास सांगितला आहे. तसेच गुगलच्या विरोधात निकाल देत असताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात केल्याचे तथ्य नाकारले आहे. त्यामुळे गुगलला ३० दिवसांच्या आतमध्ये हा दंड भरावा लागणार आहे. मात्र गुगल हा निर्णय अयोग्य वाटत असल्यास गुगल NCLT च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकते.
रशियाकडून तेल आयातीत मोठी वाढ, ‘रॉसनेफ्ट’ कंपनीशी इंडियन ऑईलचा करार
  • भारतातील सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) रशियातील बडी तेलउत्पादक कंपनी ‘रॉसनेफ्ट’सोबत करार केला असून याअंतर्गत रशियातून कच्च्या तेलाची आयात मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात येणार आहे.
  • ‘रॉसनेफ्ट’ने जारी केलेल्या निवेदनानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इगोर सेचिन यांनी अलिकडेच भारताला भेट दिली. यावेळी सेचिन आणि आयओसीचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप पुरी उपस्थित होते. ‘रॉसनेफ्ट’ आणि भारतीय तेल कंपन्यांसोबत आगामी काळात अधिकाधिक व्यापार वाढविण्याबरोबरच डॉलरऐवजी स्थानिक चलनांमध्ये व्यवहार करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
  • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपातील देशांनी रशियाकडून आयात घटविली आहे. त्यानंतर भारतासह काही देशांना रशियाकडून स्वस्तात तेलाची निर्यात केली जात आहे.गेल्या वर्षभरात रशियाकडून भारतातील तेल आयातीत २० पट वाढ झाली असून मार्चमध्ये रशियाच्या ‘उरल्स ग्रेड क्रूड’चा भारत हा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे.
‘आयपीएल’चा थरार आजपासून!
  • Indian Premier League Start today इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १६व्या अध्यायाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सपुढे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान असेल. हा सामना अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
  • ‘आयपीएल’ म्हणजे दर्जेदार क्रिकेटसह मनोरंजनाची पर्वणी असे समीकरण झाले आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीचा हा अखेरचा ‘आयपीएल’ हंगाम असणार का? विराट कोहली आणि तारांकित खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार पुनरागमन करणार का? अशा विविध प्रश्नांमुळे यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धाही रंगतदार ठरणार आणि जवळपास दोन महिने क्रिकेटरसिकांचे भरपूर मनोरंजन होणार हे जवळपास निश्चितच आहे.
  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन वर्षांत संघांना आपापल्या घरच्या मैदानांवर सामने खेळता आले नव्हते. यंदा मात्र सर्व संघांना आपल्या चाहत्यांसमोर खेळण्याची संधी लाभणार आहे. त्यामुळे पाहुण्या संघांना सामने जिंकणे अधिक आव्हानात्मक ठरू शकेल. हे आव्हान जे संघ यशस्वीरीत्या पार करतील, त्यांना यशाची अधिक संधी असेल.  सलामीला हार्दिक पंडय़ाचा गुजरात टायटन्स आणि धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने येतील. गतहंगामात या दोन संघांची कामगिरी पूर्णपणे भिन्न होती.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 मार्च 2022

 

विश्वचषक फुटबॉलच्या कार्यक्रमपत्रिकेची घोषणा उद्या :
  • ‘फिफा’ आणि यजमान कतार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जाहीर होणाऱ्या आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमपत्रिकेकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • तीन वर्षे चालणाऱ्या विश्वचषक  पात्रता प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे  आणि ती अजूनही सुरू असल्यामुळे स्पर्धेतील ३२ देशांपैकी तीन संघ अजूनही निश्चित झालेले नाहीत. करोना प्रादुर्भाव आणि रशिया-युक्रेन युद्ध ही यामागची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात ३७ देशांचा सहभाग असेल. यापैकी पाच संघ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. कतारमध्ये आंतरखंडीय पात्रता फेरी झाल्यानंतर १४ जूनला उर्वरित संघांबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

  • यजमान कतार संघाला ‘अ’ गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे. त्यांचे ‘अ-१’ असे स्थान असेल. कतार सध्या ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत ५२व्या स्थानी आहे. याआधी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत हा संघ खेळलेला नाही. त्यांचा पहिला सामना २१ नोव्हेंबरला अल बैत स्टेडियम येथे होईल. 

  • * ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल या जागतिक क्रमवारीतील पहिल्या सात क्रमांकांच्या संघांना विभाग-१मध्ये स्थान देण्यात आले असून त्यांची विभागणी ‘ब’ ते ‘ह’ या गटात होईल. मानांकनांचे विभाग हे ’फिफा’च्या क्रमवारीनुसार ठरतील. ही यादी गुरुवारी जाहीर होईल.

PAN Aadhaar Link करण्याची आजची शेवटची तारीख, लिंक न केल्यास…; प्राप्तिकर विभागाचा इशारा :
  • करदात्याला आधार आणि प्राप्तिकराचा कायम खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’ यांच्या संलग्नतेसाठी (PAN Aadhaar Link), गुरुवार ३१ मार्च हा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर मात्र पॅन आणि आधार संलग्न न करणाऱ्या करदात्यांना ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागेल, असे प्राप्तिकर विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.

  • प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेकवार दिल्या गेलेल्या मुदतवाढीनंतर, आधारशी पॅन क्रमांक संलग्न करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित केली गेली आहे. तिला आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अंतिम मुदतीचे पालन न केल्यास पॅन निष्क्रिय केले जाईल. करदात्यांने ३१ मार्च २०२२ नंतर तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ३० जून २०२२ पर्यंत आधार-पॅन जोडणी केल्यास त्यावर ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. ही मुदतही उलटून गेल्यास, अशा चुकार करदात्यांवर १,००० रुपये दंड आकारला जाईल.

  • दंडाची रक्कम भरल्यानंतर संबंधित करदात्याचा ‘पॅन’ कार्यान्वित करण्यात येईल, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. विविध आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी आधार आणि पॅनची संलग्नता अनिवार्य आहे.

  • बँक खाते उघडणे, स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा ओळखीचा पुरावा यासारख्या विविध व्यवहारांसाठी पॅनचा वापर केला जातो. पॅन निष्क्रिय झाल्यास करदात्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय :
  • केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात बुधवारी तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली़.  यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के झाला असून, तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुलै २०२१ पासून भत्तावाढ लागू होणार असून, चालू मार्च महिन्याच्या वेतनात थकबाकीसह ही वाढ देण्यात येईल.

  • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला़  केंद्राच्या या निर्णयाचा सुमारे ४७.६८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८.६२ लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार असून, सरकारी तिजोरीवर ९ हजार ५४४.५० कोटींचा भार पडणार आहे.

  • गेल्या वर्षी सुरुवातीला महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये तो ३१ टक्के करण्यात आला. आता तो ३४ टक्के झाला आह़े. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला़  त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता २८ वरून ३१ टक्के झाला. त्यानुसार तीन टक्के भत्तावाढ पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुलै २०२१ पासून लागू होईल़.

४० लाखांहून अधिक लोकांचे युक्रेनमधून स्थलांतर :
  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून ४० लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनबाहेर पलायन केले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक यंत्रणेने बुधवारी सांगितले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोपमधील निर्वासितांबाबतचे हे सगळय़ात मोठे संकट असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

  • हा नवा आकडा संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांच्या (यूएनएचसीआर) संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. २३ लाखांहून अधिक लोक पोलंडमध्ये आले आहेत, मात्र अनेक लोक तेथून इतर देशांमध्ये गेले आहेत, किंवा युक्रेनमध्ये परत गेले आहेत. अनेक लोकांचे युद्धासंबंधीच्या घडामोडींची प्रतीक्षा करत असल्यामुळे स्थलांतरितांची संख्या रोडावली असल्याचे मदत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. युक्रेनमध्ये अंदाजे ६५ लाख लोक त्यांच्या घरांतून विस्थापित झाले आहेत.

  • २४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून ६ लाख ८ हजारांहून अधिक लोक रुमानियात प्रवेशले आहेत, ३ लाख ८७ हजारांहून अधिक लोक मोल्दोवाला गेले आहेत, तर सुमारे ३ लाख ६४ हजार लोक हंगेरीत शिरले आहेत, असे या यंत्रणेने विविध सरकारांनी पुरवलेल्या आकडय़ांच्या आधारे सांगितले आहे. ४० लाख लोक युक्रेनमधून पळून जाऊ शकतात, असा अंदाज यूएनएचसीआरने युद्ध सुरू होताच व्यक्त केला होता. ‘रशियन आक्रमणाच्या पाच आठवडय़ांनंतर युक्रेनमधील निर्वासितांची संख्या आता ४० लाख आहे’, असे संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आले.

माजी क्रिकेटपटू राहुल मंकड यांचे निधन :
  • मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे बुधवारी बुधवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निशिता, दोन मुली असा परिवार आहे.माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या तीन मुलांपैकी राहुल हे सर्वात लहान होते. हे तिघेही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.

  • सलामीवीर राहुल यांनी १९७२-७३ ते १९८४-८५ या कालावधीतील ४७ सामन्यांत ३५.७७च्या सरासरीने एकूण २१११ धावा केल्या. यात पाच शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता.

  • रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते. याशिवाय १९७८-७९च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

३१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.