चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ मार्च २०२१

Date : 31 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘ओसीआय’ कार्डधारकांना भारतात जुन्या पारपत्राची गरज नाही :
  • भारतीय वंशाच्या व्यक्ती व भारतीय समुदायाच्या ज्या व्यक्तींकडे ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया म्हणजे ओसीआय कार्ड असेल त्यांना आता भारतात जुने पारपत्र (पासपोर्ट) दाखवावे लागणार नाही.

  • त्यांना मुदत संपलेल्या जुन्या पासपोर्टची गरज राहणार नाही, असे सांगण्यात आले असून या अधिसूचनेचे परदेशस्थ भारतीयांनी स्वागत केले आहे. ओसीआय कार्ड हे जगातील भारतीय वंशाच्या अशा प्रतिनिधींना दिले जाते, की जे भारताचेही नागरिक आहेत. सध्या तरी या लोकांना मतदानाचा अधिकार नाही पण तो दिला जावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. 

  • २६ मार्चच्या अधिसूचनेनुसार अमेरिकेतील भारतीय दूतावासांनी म्हटले आहे, की ओसीआय कार्डधारकांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी ओसीआय कार्ड पुन्हा जारी करण्यासाठी कालमर्यादा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.  तोपर्यंत नवीन कार्ड जारी केले जाईल. ओसीआय कार्ड बरोबर जुना पासपोर्ट बाळगण्याची अट रद्द करण्यात आली आहे. नवा पासपोर्ट जवळ ठेवणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे.

  • न्यूयॉर्क येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेम भंडारी यांनी म्हटले आहे, की अनेक वर्षांपासून ओसीआय कार्डधारकांची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्याबाबत भारताच्या गृह कामकाज खात्याला धन्यवाद देतो. ओसीआय कार्ड नूतनीकरणासाठी मुदतवाढ व जुन्या पासपोर्टची सक्ती रद्द करणे या दोन्ही निर्णयांचे स्वागतच आहे.

भारतात ९ कोटी रोजगार निर्मितीची क्षमता :
  • करोना काळात देशात हजारो लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला असताना दुसरीकडे एका अहवालानुसार Gig Economy अर्थात गिग अर्थव्यवस्थेमधून देशात तब्बल ९ कोटी रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपनं प्रसिद्ध केलेल्या अनलॉकिंग द पोटेन्शिअल ऑफ द गिग इकोनॉमी इन इंडिया या अहवालातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. ”गिग अर्थव्यवस्था देशातल्या कमी उत्पन्न मिळवणाऱ्या कामगार वर्गासाठी लक्षावधी नोकऱ्यांची निर्मिती करते. गिग अर्थव्यवस्था देशाच्या जीडीपीमध्ये १.२५ टक्के भर टाकत असून तब्बल ९ कोटी रोजगार निर्मिती करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे’, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

  • घरगुती स्वरुपाच्या १२ दशलक्ष नोकऱ्या - ओला, उबर, स्विगी, अर्बनकंपनी यांसारख्या तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्म्सच्या स्वरूपात गेल्या दशकभरात गिग अर्थव्यवस्थेची प्रचंड वाढ झाली असली, तरी या अर्थव्यवस्थेला अद्याप वाढीसाठी खूप वाव आहे. शेअर्स सर्व्हिसेसमधील सुमारे ५ दशलक्ष नोकऱ्या तसेच घरगुती स्वरूपाच्या १२ दशलक्ष नोकऱ्या नोकऱ्या गिग इकोनॉमीमार्फत निर्माण केल्या जाण्याची शक्यता आहे. यातील बहुतेक नोकऱ्या या MSME आणि घरगुती क्षेत्रांतील आहेत, असंही अहवालात नमूद केलं आहे.

  • लॉकडाऊन काळात स्थिर वाढ - “लॉकडाउनच्या काळात भारतभरात गिग कामगारांच्या संख्येत स्थिर वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले. ज्या लोकांनी नोकऱ्या गमावल्या होत्या, ते घराजवळ गिग कामाच्या संधी शोधत होते. असंघटित क्षेत्रातील लोकांना नवीन कौशल्ये शिकण्यात मदत करण्याची व त्यांना स्वत:साठी तसेच स्वत:च्या कुटुंबासाठी चांगल्या दर्जाचे आयुष्य प्राप्त करण्यात मदत करण्याची क्षमता गिग अर्थव्यवस्थेत आहे,” असे मायकेल अँड सुसान डेल फाउंडेशनचे इंडिया प्रोग्राम्स संचालक राहील रंगवाला यांनी सांगितले आहे.

‘सुएझ’ जलमार्ग मोकळा करण्यास झाली ‘पौर्णिमेच्या चंद्राची मदत’ :
  • सुएझ कालव्यात अडकून पडलेले ‘एव्हरग्रीन’ या तैवानी कंपनीचे ‘एव्हर गिव्हन’ हे जहाज सुमारे १८ हजार कंटेनर वाहून नेत होते. या अडकलेल्या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न आठवडाभर सुरू होते. अखेर या प्रयत्नांना सोमवारी यश आले. दोन लाख २० हजार टन वजनाचे हे जहाज आता ‘ग्रेट बिटर लेक’च्या दिशेने वळवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक पुन्हा सुरळीत होईल असा अंदाज आहे.

  • हे जहाज बाहेर काढण्यासाठी मदत लागली ती लहान टग बोटींची आणि पौर्णिमेच्या चंद्राची. हो याचा अर्थ सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांनी एकत्रितपणे या मोहिमेत मदत केली आहे.

  • बचाव कार्यसंघाने या आठवड्यात पौर्णिमेच्या दिवशी हे जहाज बाहेर निघेल अशी आशा व्यक्त केली होती, रविवारीपासून, कालव्यातील पाण्याची पातळी सामान्यत: असलेल्या पातळीपेक्ष एक ते दीड फुट वाढली होती. त्यामुळे कालव्याच्या एका बाजूने जहाजाला बाहेर खेचणे सोपे झाले होते कारण १३०० फूट लांब असलेल्या जहाजातून १८,००० कंटेनर उतरवणे फारच अवघड गेले असते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन :
  • मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव (वय ७४) यांचे  सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (मंगळवार) साताऱ्यातील पुसेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती.  मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. ते पुण्याचे माजी पोलीस आयुक्तही होते. याचबरोबर धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर त्यांना अनेक पक्षातून आँफर होती, पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता.

  • धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगाव (जि.सातारा) येथे झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी एम एस्सीची पदव्युत्तर पदवी घेतली. प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. १९७२ ला ते युपीएससीची परीक्षा पास झाले आणि पोलीस अधीक्षक म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं.

  • पुणे येथे  पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली होती.  काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनतर २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. ते या पदावर २००७ ते २००८ या काळात होते आणि निवृत्त झाले.

रेल्वे प्रवाशांना झटका, रात्रीच्या वेळी मोबाईल-लॅपटॉप नाही करता येणार चार्ज :
  • रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगसाठीचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती दिली.

  • या निर्णयानुसार, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे. रेल्वेच्या पश्चिम विभागाने या निर्णयाची 16 मार्चपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे.

  • रेल्वेचा हा निर्णय नवीन नाहीये, यापूर्वी 2014 मध्ये बंगळुरु-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये आगीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे मंडळाने सर्व झोनला रात्री ११ ते पहाटे पाच दरम्यान चार्जिंग्ज बंद करण्याची शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी आता होत असून रेल्वे बोर्डने आता सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. “नुकत्याच झालेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीही रेल्वे बोर्डाने असे आदेश जारी केले होते. मुख्य स्विचबोर्डवरुन रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत चार्जिंग पॉईंट्सची वीज बंद ठेवली जाईल”, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

३१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.