चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ जुलै २०२०

Date : 31 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगभरात करोनारुग्णांची संख्या १ कोटी ७० लाखांवर :
  • जगभरातील करोना रुग्णांच्या संख्येने १ कोटी ७० लाखांचा टप्पा ओलांडला असून सुमारे ९९ लाख लोक बरे झाले आहेत. सध्या जगभरात ३० लाखांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. जॉन हाफकिन विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गुरुवापर्यंत करोना रुग्णांची संख्या १ कोटी ७० लाख २९ हजार १५५ इतकी झाली आहे. तर ९९ लाख १६ हजार २३० जण करोनामुक्त झाले आहेत.

  • आतापर्यंत जगभरात ६ लाख ६७ हजार ११ जणांचा या साथरोगामुळे मृत्यू झाला आहे. २१०हून अधिक देशांत करोनाने थैमान घातले असून अमेरिका, ब्राझिल, भारत आणि रशिया या देशांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे.

  • ब्रिटनमध्ये विलगीकरणाच्या दिवसांमध्ये वाढ - करोनाबाधित असणारे किंवा करोनाची लक्षणे असणाऱ्यांच्या विलगीकरण व स्वविलगीकरणाच्या कालावधीमध्ये ब्रिटनने वाढ केली आहे. यापूर्वी सात दिवसांचे विलगीकरण केले जायचे. मात्र आता १० दिवस विलगीकरण करण्याचा निर्णय आणि त्या संदर्भातली नियमावली मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केली.

  • ब्राझिलमध्ये पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू - ब्राझिलने जगभरातील पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बुधवारी पुन्हा सुरू केली आहे. मार्च महिन्यापासून तेथील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती. अमेरिकेनंतर करोना रुग्णांची संख्या ब्राझिलमध्ये सर्वाधिक आहे. पर्यटन कालावधीला आरोग्य विमा घेऊन जगभरातील सर्वच पर्यटक ब्राझिलमध्ये येऊ शकतात, असे ब्राझिलच्या सरकारने म्हटले आहे.

टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे.

  • राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. असं असतानाच या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. सर्व राम भक्तांना ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण यज्ञा’मध्ये सहभागी होण्याची संधी योग्यवेळी दिली जाईल असंही ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. अयोध्या रिचर्स इन्स्टीट्यूटचे निर्देशक व्हाय. पी. सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पोस्टाचे विशेष तिकीट प्रकाशित केलं जाणार आहे.

  • “सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालं तर पाच ऑगस्ट रोजीच पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं जाईल. यापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक प्रतिकृती असणारं असेल तर दुसऱ्यावर इतर देशांमध्ये रामाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी असतील,” असं सिंग यांनी सांगितलं आहे. अयोध्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून रामलीलेसंदर्भातील काही विशेष पोस्टर आणि कटआऊट्स बनवले जात आहेत.

गलवान खोऱ्यातील २० शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर :
  • पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

  • भारत व चीन यांच्या फौजांमध्ये १५ जूनच्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनतर्फे गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर, चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केले होते. यात शहीद झालेल्या लष्करी जवानांमध्ये १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संतोष बाबू यांचा समावेश होता.

  • या घटनेमुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला. भारताने याचे वर्णन ‘चीनची पूर्वनियोजित कृती’ असे केले होते.

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १७ जुलैला पूर्व लडाखमधील लुकुंग सीमा चौकीला दिलेल्या भेटीत, बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी चिनी फौजांशी लढताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे कौतुक केले होते.

“देशातल्या १६ राज्यांचा रिकव्हरी रेट सरासरीपेक्षाही चांगला” :
  • करोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • दिल्लीतला रिकव्हरी रेट ८८ टक्के, हरयाणातला ७८ टक्के, आसामचा ७६ टक्के, तेलंगणचा ७४ टक्के, तामिळनाडू आणि गुजरात या दोन राज्यांचा ७३ टक्के, राजस्थान ७० टक्के, मध्य प्रदेश ६९ टक्के आणि गोवा ६८ टक्के असे रिकव्हरी रेट आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव आर भूषण यांनी दिली आहे.

  • भारतातले १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनातून बरे झाले आहेत. आपले करोनायोद्धे अर्थात आपले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांनी घेतलेल्या या कष्टाचं हे फळ आहे असंही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं. देशातला मृत्यूदर २.२१ टक्के झाला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. जगातला हा अत्यल्प दर आहे असंही आरोग्यमंत्रालयाने सांगितलं. तसंच देशातल्या २४ राज्यांमधला मृत्यूदर देशातल्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे असंही भूषण यांनी सांगितलं.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर :
  • करोनाच्या साथीमुळे यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा एक किंवा दोन महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून निर्देश मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

  • महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. परंतु या वर्षी करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुरस्कारांच्या वितरणास विलंब होणार आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

  • ‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही निर्देशांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु राष्ट्रपती भवनाकडून आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. करोनाच्या साथीमुळे सध्या देशात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणे कठीण आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

आठव्या पराभवासह आनंदचे आव्हान संपुष्टात :
  • भारताचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अखेरच्या फेरीत व्हॅसिल इव्हानचुककडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पाच वेळा जगज्जेत्या आनंदचे स्पर्धेतील आव्हान आठव्या पराभवासह संपुष्टात आले.

  • ५० वर्षीय आनंदची १० खेळाडूंच्या या स्पर्धेत सात गुणांसह नवव्या स्थानी घसरण झाली. आनंद आणि इव्हानचुक यांच्यातील चारही डाव बरोबरीत सुटले. त्यामुळे टायब्रेकरमध्ये काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना इव्हानचुकने बाजी मारली.

  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनने २५ गुणांसह अग्रस्थान पटकावले. इयान नेपोमनियाची २० गुणांसह दुसऱ्या तर अनिश गिरी १८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. पीटर स्विडलरने १४ गुणांसह चौथे स्थान प्राप्त केले.

३१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.