चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ जानेवारी २०२०

Date : 31 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तब्बल ९ लाख पीएफ खाती ब्लॉक; यात तुमचं खातं तर नाही ना : 
  • नोकरी करणाऱ्या प्रत्येकांचं आजकाल पीएफ खातं आसतेच. ज्यांचं पीएफ खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत.

  • केद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे ८० हजार कंपन्यांची यादी सरकारने केली आहे. या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने तब्बल 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे. प्रधानमंत्री रोजगार योजनेचा अवैध लाभ जवळपास नऊ लाख जण घेत आहेत. पीएफ आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेचा एकत्र लाभ घेणाऱ्या नऊ लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहे.

  • बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या नऊ लाख लाभार्थांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे नऊ लाख जण या योजनेचा यापुढं लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना लागू होण्याआधी ९ लाख जण फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते. बिझनेस स्टँडर्ड वृत्तानुसार, दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या नऊ लाख कर्मचाऱ्यांवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खाती ब्लॉक करत कारवाई केली आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांकडून २२२ कोटी रूपयांची वसूलीही करण्यात आली आहे.

युरोपीय संसदेत मतदान लांबणीवर : 
  • लंडन : भारताच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात सादर करण्यात आलेल्या पाच विविध ठरावांचे एकत्रीकरण करून, ब्रसेल्समधील समारोप सत्रात चर्चेला आलेल्या संयुक्त प्रस्तावावरील मतदान युरोपीय संसदेने मार्चपर्यंत लांबणीवर टाकले आहे. हा भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा विजय मानला जात आहे.

  • युरोपीय आयोगाच्या उपाध्यक्ष आणि युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहारविषयक प्रतिनिधी हेलेना डल्ली यांनी बुधवारी या चर्चेला सुरुवात करताना युरोपीय महासंघाच्या भारतासोबत असलेल्या घनिष्ठा संबंधांची जोरदार भलामण केली.

  • ‘या कायद्याच्या घटनेनुसार अनुपालनाचे मूल्यमापन करणे हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे, असे आम्ही मानतो. सध्या सुरू असलेल्या न्यायिक प्रक्रियेमुळे, भारतात गेले काही आठवडे सुरू असलेला तणाव व हिंसाचार कमी होण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे’, असेही त्या म्हणाल्या.

  • भारत- युरोपीय महासंघाच्या पंधराव्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्चमधील ब्रसेल्स दौऱ्याची आम्ही वाट पाहात आहोत, असे डल्ली यांनी सांगितले.

हिंसाचारामुळे ‘गूगल’चा ‘इंटरनेट साथी’ कार्यक्रम स्थगित : 
  • बिरभूम : एनपीआर-एनआरसीबाबतच्या भीतीचा पहिला विपरीत परिणाम पश्चिम बंगालमध्ये दिसून आला असून, गूगलने राज्यातील त्यांचा ‘इंटरनेट साथी’ कार्यक्रम थांबवला आहे.

  • काही महिला राष्ट्रीय नागरिक नोंदणीसाठी (एनआरसी) माहिती गोळा करत असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून गावकऱ्यांनी १० जानेवारीपासून तरुण महिलांच्या कुटुंबीयांची घरे उद्ध्वस्त करण्याच्या आणि जाळण्याच्याही अनेक घटना घडल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • या तरुण महिला मासिक सुमारे १२०० ते १५०० रुपये मिळवणाऱ्या ‘इंटरनेट साथी’ होत्या आणि गूगलने टाटा ट्रस्टच्या भागीदारीत जून २०१५ मध्ये सुरू केलेल्या देशव्यापी मोहिमेचा भाग होत्या. ग्रामीण भागातील महिलांना दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर कसा करावा हे शिकवून त्यांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा ३ कोटींहून अधिक महिलांना फायदा झाल्याचा गूगलचा दावा आहे.

येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेशबंदी : 
  • येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गुरुवारी पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. कॅसिनो उद्योगाचे नियमन करण्यासाठी राज्याच्या सेल्स टॅक्स आयुक्तांना गेमिंग कमिशन म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • “सेल्स टॅक्स कमिशनची गेमिंग कमिशन म्हणून नियुक्ती करण्यात येईल. एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेश मिळणार नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी यासंबंधी अधिसूचना जारी होईल” असे सावंत यांनी सांगितले.

  • गेमिंग कमिशन अस्तित्वात आल्यानंतर कॅसिनो उद्योगाचे नियमन करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील. मांडवी नदीमध्ये उभ्या असलेल्या बोटींवर सध्या सहा कॅसिनो सुरु आहेत.

राणी रामपालला ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार : 
  • नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल ही पहिली हॉकी खेळाडू ठरली आहे.

  • चाहत्यांकडून गेली २० दिवस मते मागवण्यात आल्यानंतर वर्ल्ड गेम्सने गुरुवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. ‘‘राणीला वर्ल्ड गेम्सचा सर्वोत्तम अ‍ॅथलीटचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. राणीने तब्बल १ लाख, ९९ हजार, ४७७ मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले. जगभरातील ७ लाख, ५ हजार, ६१० चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना मते दिली होती,’’ असे ‘वर्ल्ड गेम्स’च्या पत्रकात म्हटले आहे.

  • ‘‘संपूर्ण हॉकीक्षेत्राला, भारताला तसेच माझ्या संघसहकाऱ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते. चाहते, प्रशिक्षक, भारत सरकार यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवू शकले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या पुरस्कारासाठी माझी शिफारस केल्याने त्यांचेही खूप खूप आभार,’’ असे राणीने सांगितले.

३१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.