चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ डिसेंबर २०२२

Date : 31 December, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘या’ क्लबशी केला फुटबॉल इतिहासातील विक्रमी करार; मेस्सीपेक्षा मिळाले पाचपट अधिक पैसे : 
  • पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड सोडून सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो या क्लबमध्ये सामील होणार असल्याची माहिती आधीच आली होती, पण आता क्लबने अधिकृत माहिती देऊन याची पुष्टी केली आहे. रोनाल्डोचा करार किती वर्षासाठी आहे आणि रोनाल्डोला एका वर्षासाठी भारतीय चलनात किती पैसे मिळतील जाणून घेऊया.

  • अल नासरने अधिकृत घोषणा करताना एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहले की, ”हा एक असा करार आहे, जो केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमच्या देशाला, येणाऱ्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रेरित करेल. नवीन घरात रोनाल्डोचे स्वागत आहे.”

  • कितीमध्ये झाला करार - रिपोर्टनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत २०२५ पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला २०० दशलक्ष युरोमध्ये करारबद्ध केले आहे. जर आपण भारतीय चलनात त्याचे मूल्य मोजले तर रोनाल्डोला एका वर्षात १७ अब्ज रुपये (१७७५०७१३२२४) पेक्षा जास्त मिळतील. म्हणजे १७०० कोटी (ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वार्षिक उत्पन्न) रुपये, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल.

  • अडीच वर्षांचा करार - पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासरसोबत २०२५ पर्यंत करार केला आहे. हा करार अडीच वर्षांसाठी आहे. त्याला क्लबकडून दरवर्षी सुमारे १७०० रुपये मिळतील. यात एंडोर्समेंट देखील समाविष्ट आहे. दुसरीकडे, लिओनेल मेस्सीला पॅरिस सेंट जर्मेनमधून दरवर्षी सुमारे ३५० कोटी रुपये मिळतात. म्हणजेच रोनाल्डोचा पगार मेस्सीपेक्षा जवळपास ५ पट जास्त आहे. या अगोदर ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि त्याचा माजी क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला होता. परंतु काही काळापूर्वी रोनाल्डोने वादानंतर हा क्लब सोडला.

  • ३७ वर्षीय रोनाल्डोने नवीन करारानंतर सांगितले की, तो वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्साहित आहे. स्पेनच्या मोठ्या फुटबॉल क्लब रिअल माद्रिदसोबतही तो बराच काळ खेळला असल्याची माहिती आहे.

आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासाभरातच पंतप्रधान मोदींची कामाला सुरुवात : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. आईच्या निधानानंतर मोदी आज सकाळीच गांधीनगर येथील त्यांच्या घरी पोहचले होते. यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आईच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि खांदा अंत्यसंस्कार पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदींनी या दु:खात स्वत:ला सावरत तासाभरातच पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली.

  • हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला. आईच्या निधनामुळे मोदींनी पश्चिम बंगालचा दौरा पुढे ढकलला, मात्र त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकातामधील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ती देशाला समर्पित केली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

  • पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडा दाखवत असताना आणि हावडा स्टेशनवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित असताना, जमलेल्या नागरिकांनी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्याचे दिसून आले.

एकमेवाद्वितीय! पेले: १९४० -२०२२ : 
  • पेले यांनी ९२ अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांत ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ७७ गोल नोंदवले. ब्राझीलकडून सर्वाधिक गोलचा विक्रम अनेक वर्षे पेले यांच्या नावेच होता. मात्र, नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान नेयमारने पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

  • पेले यांनी ब्राझीलमधील नामांकित क्लब सॅण्टोससाठी ६५९ सामन्यांत सर्वाधिक ६४३ गोल झळकावले.

  • पेले यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १३६३ सामने खेळताना तब्बल १२८३ गोल नोंदवले. यात ९२ हॅट्ट्रिकचाही समावेश होता.

  • ब्राझीलच्या तीन विश्वचषक विजेत्या (१९५८, १९६२, १९७०) संघांत पेले यांचा सहभाग होता. खेळाडू म्हणून सर्वाधिक विश्वचषक विजयांचा विक्रम पेले यांच्याच नावे आहे. 

  • सर्वात लहान वयात विश्वविजेतेपद (१७ वर्षे २४९ दिवस) मिळवण्याचा विक्रम पेले यांच्या नावे आहे.

  • विश्वचषक स्पर्धेत गोल करणारे पेले सर्वात युवा खेळाडू (१७ वर्षे २३९ दिवस, वि. वेल्स १९५८) आहेत.

  • १९९० मध्ये वयाच्या ५०व्या वर्षी एका मैत्रीपूर्ण सामन्यात पेले यांनी ब्राझीलचे कर्णधारपद भूषवले होते.

‘पंतप्रधान मोदी हे कर्मयोगी' : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईच्या निधनानंतरही आपल्या नियोजित कामांत खंड पडू दिला नाही. याबद्दल त्यांचे सहकारी मंत्री व भाजप नेत्यांनी पंतप्रधानांची कर्तव्यनिष्ठा व कटिबद्धतेची प्रशंसा केली. यानिमित्त त्यांनी मोदींना ‘कर्मयोगी’ संबोधले.

  • केरळमधील एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले, की, पंतप्रधानांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द न करता ते पूर्ण करून दिल्लीला परतण्याच्या सूचना दिल्या.

  • गृहमंत्री अमित शहा यांनीही कर्नाटकमधील आपला नियोजित कार्यक्रम रद्द केला नाही. पश्चिम बंगालमधील कार्यक्रमांना पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले होते. ही छायाचित्रे प्रसृत करत भाजप नेत्यांनी ‘देशाला प्रथम प्राधान्य’ देण्याच्या मोदींच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली.

  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नमूद केले, ‘शोकाकुल तरीही देश प्रथम! हे आपल्या पंतप्रधानांचे सर्वविदित वैशिष्टय़ आहे.’ आईच्या अंत्यसंस्कारांनंतर अवघ्या काही तासांतच ते आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी झाले. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते तुमच्या या कटिबद्धतेने प्रेरित झाले आहेत. या खऱ्या कर्मयोग्यास सलाम!

  • केंद्रीय मंत्री, ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोदींच्या कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि त्यागाची प्रशंसा केली. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णा मलाई, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आदींनीही मोदींविषयी गौरवोद्गार काढले.

रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विक्रमी गुंतवणूक - मोदी; पश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू : 
  • रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार विक्रमी गुंतवणूक करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदी म्हणाले की, न्यू जलपायगुडीसह विविध रेल्वेस्थानके, विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित केली जात आहेत.

  • पूर्वनियोजनानुसार मोदी येथे उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे त्यांना तातडीने अहमदाबादला जावे लागले. मात्र, आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मोदी गुजरातमधील राजभवनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमांत सहभागी झाले.

  • मोदी म्हणाले, की स्वातंत्र्य चळवळीत ‘वंदे मातरम्’चा जयघोष ज्या भूमीतून झाला होता, तेथून आजपासून ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्यात आली आहे. ३० डिसेंबर या तारखेलाही इतिहासात खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याचा बिगुल फुंकला होता. एकविसाव्या शतकात भारताच्या जलद विकासासाठी रेल्वेचा वेगवान विकास, भारतीय रेल्वेमध्ये जलद सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम विक्रमी वेगात सुरू आहे. रेल्वेचे पूर्व व पश्चिम विभाग देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडवतील. त्यामुळे केंद्र सरकार रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विक्रमी गुंतवणूक करत आहे. आज भारतीय रेल्वेच्या पुनरुत्थानासाठी देशभरात एक देशव्यापी मोहीम सुरू आहे.

  • मोदी म्हणाले, की, गेल्या आठ वर्षांत रेल्वेने पायाभूत काम केले असून आता येत्या आठ वर्षांत रेल्वे आधुनिकतेचा नवा प्रवास सुरू करताना दिसेल. भारतासारख्या तरुण देशासाठी भारतीय रेल्वेही तरुण अवतार घेणार आहे. यात ४७५ हून अधिक ‘वंदे भारत एक्सप्रेस’ निश्चितपणे यात मोठी भूमिका बजावतील.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ डिसेंबर २०२१

 

सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी स्मृतीला नामांकन :
  • ‘आयसीसी’च्या महिलांमधील २०२१ या वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताची सलामीवीर स्मृती मानधनासह चौघांना नामांकन देण्यात आले आहे. इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट आणि नॅट शिव्हर तसेच आर्यलडची गॅबी लेविस या अन्य क्रिकेटपटू स्पर्धेत आहेत.

  • २०२१ या वर्षांत स्मृतीने नऊ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३१.८७च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह एकूण २५५ धावा काढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या दोन विजयांत स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली.

  • इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० मालिकेत स्मृतीने सर्वाधिक एकूण ११९ धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तिने अर्धशतक साकारले. २०२१च्या सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूसाठी बांगलादेशचा शाकिब अल हसन, पाकिस्तानचा बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आणि आर्यलडचा पॉल स्टर्लिग हे स्पर्धेत आहेत.

चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर :
  • राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी अर्थात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच निर्बंध लागू केले आहेत. यामुळे कार्यक्रमांसाठी एकत्र जमणाऱ्या लोकांची मर्यादा ५० करण्यात आली आहे.

  • अंत्यविधीसाठी देखील २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले असले तरी या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली.

  • आजपासून काय असतील निर्बंध - राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल. तसेच, अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • पुन्हा लॉकडाऊन- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याविषयी अद्याप राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, करोनाची लाट रोखण्यासाठी अधिक कठोर निर्बंध किंवा प्रसंगी लॉकडाऊनचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊन करताना शहर किंवा जिल्हयातील उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची गरज याचा विचार करून निर्णय घेताल जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • उपहारगृहे, मॉल्सबाबत काय निर्णय - दरम्यान, यावेळी राज्यातील उपहारगृहे, मॉल्स, हॉटेल्स, शाळा याविषयी देखील बैठकीत खल झाला. उपाहारगृहांमध्ये सध्या ५० टक्क्यांच्या क्षमतेला परवानगी असली तरी बहुतांशी उपाहारगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. उपाहारगृहांची तपासणी करण्याची पुरेशी यंत्रणा देखील पोलिसांकडे नाही. त्यामुळे यावर निर्बंध आणण्याची भूमिका यावेळी पोलिसांकडून मांडण्यात आली. पण यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. मात्र, करोनाचा उद्रेक वाढल्यास चित्रपटगृहे, मॉल, नाट्यगृह यांच्यावरही निर्बंध लागू करावे लागतील, अशी चर्चा बैठकीत झाली.

  • शाळा पुन्हा बंद होणार - अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्यात जवळपास दीड वर्षानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मात्र, करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा बंद कराव्यात का? यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आत्ता लगेचच शाळा बंद करू नयेत असा बैठकीतला सूर होता. शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली आहे.

खो-खोचे पुढील लक्ष्य.. आशियाई क्रीडा स्पर्धा :
  • करोनाचे आव्हान पेलत राष्ट्रीय स्पर्धेचे केलेले यशस्वी आयोजन आणि विश्वचषक, अल्टिमेट लीग यांसारख्या स्पर्धाच्या घोषणेनंतर आता खो-खो खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी डोळय़ांसमोर ठेवले आहे.

  • राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी मित्तल उपस्थित होते. ‘‘सध्या ३६ देशांत खो-खो खेळ खेळला जातो. यामध्ये अर्जेटिना, फ्रान्स, इराण, कोरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. परंतु २०२२च्या अखेपर्यंत खो-खो ७६ देशांत पोहोचलेला असेल. आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका खंडात खो-खोच्या स्पर्धाच्या आयोजनाचे आमचे लक्ष्य आहे. याद्वारे २०२६च्या आशियाई स्पर्धेत खो-खोला नक्कीच स्थान मिळेल,’’ असे मित्तल म्हणाले.

  • ’ सध्या खो-खोमध्ये रेल्वे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण हे दोनच व्यावसायिक पातळीवरील संघ कार्यरत आहेत. परंतु येत्या काळात यामध्ये आणखी भर पडेल, असे मित्तल यांनी नमूद केले. ‘‘पोलिसांमध्ये खो-खोला आता सुरुवात झाली असून लष्कर, सेनादल, ओएनजीसी यांसारखे संघ लवकरच खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये दिसतील. यामुळे खेळाडूंना रोजगाराच्या संधी वाढतील. त्याशिवाय महिलांचा रेल्वे संघ सुरू करण्याबाबतही महासंघ विचार करत आहे,’’ असे मित्तल यांनी सांगितले.

  • विश्वचषक मार्चपर्यंत अशक्य! ’ देशातील करोनाची सद्यस्थिती पाहता पुढील वर्षी मार्चपर्यंत विश्वचषक खो-खोचे आयोजन करणे कठीण आहे, असे मित्तल यांनी स्पष्ट केले. ‘‘२४ वर्षांनी खो-खोची अर्जुन पुरस्कारासाठी गणना झाल्याने हा खेळ टाळेबंदीतील धक्क्यातून सावरत पुन्हा भरारी घेत आहे. परंतु मार्चपर्यंत खो-खोचा पहिला विश्वचषक आयोजित करणे अशक्य आहे. यापूर्वी सर्व सहभागी संघांतील खेळाडूंची चाचणी स्पर्धा घेण्यापासून असंख्य तांत्रिक बाबींवर कामे करावी लागतील,’’ असे मित्तल यांनी नमूद केले.

ओमायक्रॉन बाधिताच्या शरीरात प्रतिकारशक्तीची निर्मिती :
  • ओमायक्रॉनची लागण होऊन त्यातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते, ज्यामुळे ही व्यक्ती करोनाच्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूशी लढण्यास सक्षम असते, असे संशोधन दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी केले आहे. ओमायक्रॉनमुळे तयार झालेल्या प्रतिपिंडामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे या संशोधकांनी सांगितले.

  • जोहान्सबर्ग येथील संशोधक करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूचे संशोधन करत आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेले रुग्ण इतर संसर्गाचा सामना करण्यासाठी सक्षम असतात, असे या संशोधकांनी आपल्या अभ्यासात नमूद केले आहे. ओमायक्रॉनमधून बरे झालेल्या या बाधितांना डेल्टा किंवा इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका नसतो. ओमायक्रॉनची लागण झालेल्यांच्या शरीरात उच्च प्रतीच्या आणि जास्त सक्षम प्रतििपडे तयार होतात. ही प्रतििपडे धोकादायक वाटणाऱ्या विषाणूच्या संसर्गाविरोधात लढण्यास सक्षम आणि परिणामकारक असतात, असे या संशोधकांनी सांगितले.

  • पुढील काही दिवस ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, मात्र दीर्घकालिन विचार केल्यास ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात भरती पडण्याची जास्त गरज लागणार नाही. ओमायक्रॉनमुळे मृत्यूचे प्रमाणही कमी असण्याची शक्यता आहे, असे या संशोधकांनी सांगितले. ओमायक्रॉनमुळे डेल्टाचा प्रभाव कमी होऊन कालांतराने तो नष्ट होईल, असेही या संशोधकांनी नमूद केले.

सुदानमध्ये ६२ भारतीय अडकले ; ना पासपोर्ट, ना पैसे; देशाबाहेर पडणार कसे :
  • ‘पगार मिळत नाही, पासपोर्टही काढून घेतला, जवळ असेलेले पैसेही संपत आले आहे. आता आम्ही जगायचे कसे? आमचे खूप हाल होत असून या देशाबाहेर पडणार कसे,’’ असा सवाल सुदानमधील ६२ भारतीय नागरिकांनी विचारला आहे.  सिरामिक टाइल्स बनवणाऱ्या ‘नोब्लस ग्रूप’ या सुदानमधील बडय़ा कंपनीत हे ६२ जण कामगार असून येथे खूप हाल होत असून संकटमुक्त करण्याची याचना त्यांनी केली आहे.

  • खार्टुम शहराबाहेर अल्बागेर औद्योगिक क्षेत्रात या कंपनीचा सिरामिक टाइल्स बनवण्याचा कारखाना असून तिथे हे ६२ भारतीय नागरिक काम करत आहेत. सुरुवातीला चांगले वेतन मिळत होते. मात्र ऑक्टोबरमध्ये सुदानमध्ये लष्करी राजवट आल्याने आमच्या संकटात वाढ झाली. लष्करी राजवटीनंतर ‘नोब्लस ग्रूप’ या कंपनीचा मालक मुहम्मद अल-ममौन आखाती देशांमध्ये पळून गेला. त्यानंतर या कंपनीवर लष्कराने कब्जा केला. लष्करी सरकारने या कर्मचाऱ्यांचा पासपोर्ट काढून घेतला असून त्यांना वेतनही दिले जात नसल्याचे समोर आले आहे.

  • या कारखान्यात काम करणारा मारुती राम दंडपाणी यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून मला पगार मिळत नसून आम्हाला खाण्यासाठी चांगले अन्नही मिळत नाही. हीच व्यथा अन्य कर्मचाऱ्यांचीही आहे. आमचा पासपोर्ट काढून घेतल्याने आम्हाला देशाबाहेर पडता येत नसल्याचे दंडपाणी यांनी सांगितले.

३१ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.