पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून एकमेकांसमोर उभे ठाकले असून त्यामधून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसतानाच संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत कोणताही एकतर्फी बदल भारत स्वीकारणार नाही. लडाखमधील तिढा चर्चेद्वारेच सुटेल, अशी आशाही संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
भारत हा शांतताप्रिय देश आहे, मात्र देशाची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान याबाबत कदापि तडजोड केली जाणार नाही, चीनसमवेत लष्करी आणि राजनैतिक स्तरावर आणखी चर्चेच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे, असेही राजनाथसिंह म्हणाले. भारत एकतर्फी बदलाचा कधीही स्वीकार करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.
विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
जगावर सध्या नव्या करोनावताराचं सावट गडद होऊ लागलं असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे. यासोबतच ब्रिटन करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत. ब्रिटन सध्या करोनाशी लढा देत असतानाच लसीला मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अॅस्ट्राजेनेकाच्या करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”.
करोनामुळे जगभरात जवळपास १७ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधीन वुहान येथून सुरु झालेल्या करोना व्हायसमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. सध्या इतर देश करोना संकटामधून बाहेर पडत असताना ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत मात्र करोनाच्या नव्या विषाणूंनी थैमान घातला आहे. हा नवा प्रकार जास्त वेगाने परसत असल्याचं सरकार आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी ब्रिटनसोबतचा व्यापार आणि विमानसेवा बंद केली आहे.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.
वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.