चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 ऑगस्ट 2023

Date : 31 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेल्वे स्थानकांवरही ‘एटीएम’! होय; महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसाठी ‘एटीएम’ची सुविधा
  • सध्याचे युग मोबाईलचे आहे. मोबाईलद्वारेच बहुतांश आर्थिक व्‍यवहार होत असल्‍याने जादा रोख रक्कम सहसा कोणी जवळ बाळगत नाही. रेल्वेत प्रवास करताना मात्र रोख रक्कमेची गरज भासते. अनेक रेल्वे प्रवाशांकडे रोख रक्कम नसल्याने त्यांची गैरसोय होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने बडनेरा, अकोला, शेगावसह मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातील १३ रेल्वे स्थानकांवर ‘एटीएम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हिताची सर्व्हिसेस लि. या कंपनीसोबत रेल्‍वेने या सेवेसाठी ५ वर्षांचा करार केला आहे.
  • शेगाव, अकोला, मलकापूर, पाचोरा, बडनेरा, नाशिक, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, निफाड, देवळाली, लासलगाव आणि खंडवा या स्‍थानकांवर ‘एटीएम’ची सुविधा उपलब्‍ध होणार आहे. यातून रेल्वेला ११.४१ लाख रुपयांचा महसूलही मिळणार आहे. प्रवाशांना अचानक रोख रकमेची गरज भासल्यास गैरसोय होते.
  • रेल्वे प्रवासात अनेकवेळा ऑनलाइन पैसे देताना अडचणी येतात. त्यामुळे रोख रकमेची गरज पडते. यासाठी प्रवाशांकडून एटीएमचा शोध घेतला जातो. प्रामुख्याने तिकीट खिडकीचा परिसर, प्रवेशद्वार, जनरल वेटिंग हॉल या भागात एटीएम लावण्यावर भर असणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरही एटीएममधून पैसे काढून गरज भागविता येणार आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या बिकट वाटेची माध्यमांत चर्चा
  • ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल असलेल्या उत्सुकतेचे प्रतिबिंब देशभरातील माध्यमांत उमटले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे आव्हान उभ्या केलेल्या विरोधकांच्या या आघाडीचा चेहरा कोण असेल इथपासून तर प्रत्यक्षात ही आघाडी कितपत व्यवहार्य ठरेल, अशा प्रश्नांचा उहापोह प्रमुख प्रादेशिक, राष्ट्रीय वर्तमानपत्रे करीत आहेत.
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेली पहिली बैठक आणि नंतर काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकच्या राजधानी बंगळुरूमधील बैठकीनंतर इंडिया आघाडीचे पंख विस्तारत चालले आहेत. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय करिश्म्यावर भिस्त ठेवत विरोधकांची ही आघाडी मुंबईत आपली रणनिती धारदार करण्याचा प्रयत्न करील, असे मानले जाते. आज, जागरण डॉट कॉमने उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील संपादकीयाचे वृत्त दिले आहे. भाजपने चंद्रयान वापरून प्रचार केला तरी, तो कमी पडेल, आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा उपयोग होणार नाही, भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपने तर हेलिकॉप्टर आणि इव्हीएम बुक करून मुदतपूर्व निवडणुकीची तयारी चालविली आहे, असा या लेखाचा गोषवारा जागरणच्या बातमीत दिला आहे.
  • दैनिक भास्करने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॉनर्जी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गॉस सिलिंडरच्या दरकपातीवरून केंद्रावर केलेल्या टीकात्मक विधानाचे शिर्षक करून बातमी दिली आहे. विरोधकांच्या आघाडीच्या दबावामुळे केंद्राने गॉस दरात कपात केली, आता आमच्या बैठका जसजशा होतील, तसे तसे आणखी कोणत्या वस्तूंचे भाव कमी होतील, ते पाहाच, असे या नेत्यांनी म्हटले आहे.
  • प्रभात खबर या दैनिकाने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव मुंबईत पोहोचल्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे. शरद पवार बैठकीच्या तयारीत गुंतले असल्याचेही त्यात ठळकपणे नमूद केले आहे. मुंबईतील बैठकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरणार काय, याचा उहापोहही अन्य एका बातमीत करण्यात आला आहे. लालूप्रसाद यांनी म्हटले आहे की, या वेळी पुन्हा मोदी येणार नाहीत. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही जात आहोत. पण, विरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा नितीशकुमार यांचा मार्ग सोपा नाही, असेही त्यांनी मान्य केल्याचे, या वर्तमानपत्राने म्हटले आहे. तर, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीत, नितीशकुमार हे स्वत:च ‘इंडिया’चे समन्वयक बनण्यास तयार नसून अन्य कोणावर ही जबाबदारी सोपवू इच्छितात, असे त्यांचे वक्तव्य छापून आले आहे.
कर्नाटकमध्ये महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपयांची मदत; ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू
  • निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू केली. यानुसार राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
  • काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत महाराजा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘गृहलक्ष्मी’ची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच प्रमुख हमी योजनांपैकी ही एक आहे. काँग्रेसने मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन केली. सिद्धरामय्या यांनी सांगिले की, काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांपैकी शक्ती, गृहज्योती आणि अन्न भाग्य या तीन योजना याआधीच सुरू केल्या आहेत. ‘गृहलक्ष्मी’ ही चौथी योजना आहे.
  • ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी सरकारने चालू अर्थसंकल्पात १७५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पाचवी हमी योजना ही युवा निधी आहे. ती डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

कर्नाटकमधील कामाची देशभरात पुनरावृत्ती- राहुल गांधी

  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रमुख आश्वासनांची काँग्रेसने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने केलेल्या कामांची आता देशात पुनरावृत्ती करण्यात येईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटे आश्वासन देत नाही, असेही ते म्हणाले.
80 टक्के भारतीयांची मोदींना पसंती; ‘प्यू रीसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
  • सुमारे ८० टक्के भारतीयांचा दृष्टिकोन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सकारात्मक असून अलीकडच्या काळात देश अधिक शक्तिशाली झाल्याचे १०पैकी सात भारतीयांना वाटत असल्याचे समोर आले आहे. ही माहिती ‘प्यू रिसर्च सेंटर’ या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
  • दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जी-२० शिखर परिषदेपूर्वी जगभरात केलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरात भारताबाबत सकारात्मक मानसिकता असल्याचे समोर आले आहे. जगभरात सरासरी ४६ टक्के नागरिकांचे मत भारतासाठी अनुकूल असून त्या तुलनेत ३४ टक्के जग प्रतिकूल आहे. १६ टक्के लोकांनी कोणतेही मत नोंदविलेले नाही. यामध्ये इस्रायलमध्ये भारताबाबत सर्वात चांगले मत असून तेथील तब्बल ७१ टक्के नागरिक हे भारताची भूमिका अधिक व्यापक झाल्याचे मानतात.
  • ‘प्यू रिसर्च सेंटर’ने फेब्रुवारी २०२० ते मे २०२२ या काळात २४ देशांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये ३० हजार ८६१ जणांनी सहभाग नोंदविला. भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार १०पैकी आठ नागरिकांच्या भूमिका मोदींबाबत सकारात्मक असून यातील ५५ टक्के लोकांनी ‘अतिशय सकारात्मक’ असल्याचे मत नोंदविले आहे. मोदींबाबत नकारात्मक मते असलेल्यांचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षीही देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम आयोजित केला जाणार असून त्याचा वापर भाजपच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणूक आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय करण्यासाठी केला जाणार आहे.
  • ‘सेवा पंधरवडय़ा’च्या आखणीसाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महासचिवांची महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर नड्डा यांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील भाजपच्या खासदारांशीही संवाद साधल्याचे समजते. दरवर्षी मोदींच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) गांधी जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या वर्षी ‘सेवा ही संघटना’ या उपक्रमामध्ये गावागावांमधील भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या दृष्टीने अधिक सक्रिय केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

काय करणार?

  • * आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांना गावा-गावांमध्ये जाऊन लोकसंपर्काचे काम देण्यात आले आहे.
  • * भाजपने ३० जुलैपासून सुरू केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाचा आढावा नड्डांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्वातंत्र्यलढय़ात वीरमरण प्रत्करणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘सेवा पंधरवडय़ा’त या मोहिमेवरही चर्चा केली जाणार आहे.
  • * भाजपच्या भविष्यकालीन योजनांची माहितीही लोकांपर्यत पोहोचवली जाणार आहे.
  • * देशभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेशही स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशभर स्वच्छता मोहिमेला पुन्हा गती दिली जाईल.
  • * जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये विविध प्रकारची प्रदर्शने भरवली जातील. 

 

सोव्हिएत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन :
  • सोव्हिएत युनियनचे माजी नेते आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. शीतयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र, सोव्हिएत युनियनचे विघटन रोखण्यात त्यांना अपयश आले होते.

  • मिखाईल गोर्बाचेव्ह हे किडनीच्या विकाराने दीर्घकाळापासून आजारी होते. गेल्या काही दिवसांत त्यांची तब्येत चांगलीच खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • मिखाईल यांच्या निधनानंतर जगभरातून प्रतिक्रिया - मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिाया येत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आँटोन गट्रेस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या रुपाने जगाने एक मोठा नेता गमावला आहे. मिखाईल हे शांततेचे पुरस्कर्ते होते, शितयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अंत्यत महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.

  • राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून शोक व्यक्त - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते लवकरच मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील, अशी माहिती त्यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली आहे.

किश्तवाड अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा :
  • जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चुरू येथे कार दरीत कोसळल्याने मंगळवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांना मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना चटरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळात जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतकांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली आहे.

  • पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा - किश्तवाडमध्ये झालेल्या अपघाताची बातमी ऐकून दुख झाले. भारत सरकार मृतांच्या कुटुंबियांबरोबर आहे. सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत करण्यात येईल. तसेच जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

  • गुलाब नबी आझादांनीही व्यक्त केले दु:ख - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनीही या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले. “जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चटरू येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात आठ जणांना मृत्यू झाल्याची बातमी कळताच मला खूप दुःख झाले. मी पीडितांसाठी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत.

भारताकडून पाकिस्तानला आर्थिक मदतीची शक्यता; पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करत व्यक्त केली चिंता :

  • पाकिस्तानात नुकत्याच आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थिती भारताकडून पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याची शक्यता आहे.

  • सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संकटाच्या काळात मानवतावदी दृष्टीकोन ठेवत भारत पाकिस्तानला मदत करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला कशाप्रकारे मदत करता येईल, यासाठी उपाय शोधण्यात येत असून यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जर भारताकडून अशा प्रकारे मदत करण्यात आली तर २०१४ नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पाकिस्तानला मदत करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी २००५ आणि २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात, भारताने पाकिस्तानला मदत केली होती.

  • दरम्यान, पाकिस्तानमधील पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. “पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • ताज्या आकडेवारीनुसार, या पुरामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ११०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकार भारतातून भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

अफगाणिस्तान सुपर ४ मध्ये जाणारा पहिला संघ; तर गुणतालिकेत भारत : 
  • आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेत ग्रुप ब मध्ये अफगाणिस्तान ४ गुण आणि +२.४६७ नेट रनरेटसह ते पहिल्या क्रमांवर पोहोचला आहे. तसेच सुपर -४ मध्ये प्रवेश करणारा अफगाणिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.

  • गुणतालिका अफगाणिस्तान अव्वल - ग्रुप ब मध्ये अफगाणिस्ताने आपले दोन्ही सामने जिंकले असून ४ गुण आणि +२.४६७ नेट रनरेटसह ते पहिल्या क्रमांवर आहे. तर बांगलादेश आणि श्रीलंका शून्य गुणांसह अनुक्रमे -०.७३१ आणि -५.१७६ नेट रनरेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकवर आहे.

  • तर ग्रुप ए मध्ये भारत एक सामना जिंकत २ गुण आणि +०.१७५ नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर हॉंगकॉंग आणि पाकिस्तान शून्य गुणांसह अनुक्रमे ०.००० आणि -०.१७५ नेट रनरेटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकवर आहे. हॉंगकॉंग पहिला सामना आज (३१ ऑगस्ट ) भारताबरोबर आहे.

  • अफगाणिस्तानचा बांगलादेशवर विजय - बांगलादेशने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सुरुवातीला काहीसा चांगला ठरला नाही. अफगाणिस्तानच्या नजीब उर रहमान याने बांगलादेशच्या पहिल्या फळीतील तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. फलंदाज मोहम्मद नईम (६), अनामुल हक (५) स्वस्तात बाद झाले. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या शकीब अल हसनने ११ धावा केल्या.

  • दरम्यान, बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १२८ धावांचे लक्ष्य गाठताना अफगाणिस्तानचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. हजरतुल्ला झाझाई (२३, पायचित), रहमानउल्ला गुरबाज (११, यष्टिचित) हे दोन्ही सलामीवीर खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर इब्राहीम झदरान-नजीबुल्ला झदरान या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं. दोघांनीही मोठे फटके मारत बांगलादेशच्या हातातून विजय खेचून आणला. नाबाद खेळी करत इब्राहीम, नजीबुल्ला यांनी अनुक्रमे ४२ आणि ४३ धावा केल्या. ज्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची गोडी चाखता आली.

31 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.