चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 सप्टेंबर 2023

Date : 30 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव
  • चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र अंतिम फेरीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतासाठी नेमबाजीतील हे आठवे रौप्य पदक आहे. एकूणच भारतासाठी नेमबाजीतील हे १९ वे पदक ठरले. नेमबाजीत भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.
  • १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत यजमान चीन पहिल्या क्रमांकावर राहिला आणि सुवर्णपदक जिंकले. भारताने १४ तर चीनने १६ गुण मिळवले. सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक ठरले. आतापर्यंत भारताच्या खात्यात ३४ पदके जमा झाली आहेत. भारताच्या खात्यातील हे एकूण १३ वे रौप्य पदक ठरले. याशिवाय भारतीय संघाने ८ सुवर्ण आणि १३ कांस्यपदकेही जिंकली आहेत.

नेमबाजीतील भारताची आतापर्यंतची कामगिरी -

  • भारताला पहिले सुवर्णपदक नेमबाजीत मिळाले होते. आतापर्यंत भारताने नेमबाजीत १९ पदके जिंकली असून त्यात ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय नेमबाज सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

लांब उडीतही भारताकडून पदकाची अपेक्षा -

  • त्याचबरोबर लांब उडीतही भारताकडून पदकाची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू मुरली श्रीशंकरने लांब उडीच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी मुरलीला ७.९० मीटर लांब उडी आवश्यक होती, परंतु त्याने ७.९७ मीटरच्या लांब उडीसह अंतिम फेरीत आपले नाव नोंदवले. हा आकडा त्याने पहिल्याच प्रयत्नात गाठला होता.
नवव्या वर्षी उचलली बंदूक, १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन, Asian Games मध्ये ४ पदकं जिंकून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं
  • टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी जेमतेम होती. त्या अपयशातून सावरलेल्या भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची रांग लावली आहे. प्रामुख्याने भारतीय नेमबाजांनी त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत दररोज किमान पाच ते सहा पदकं पटकावत आहेत. यावर्षीच्या स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या यादीत अनेक नवीन नावं पाहायला मिळत आहेत. यामध्ये एक खेळाडू अशी आहे जी अवघी १८ वर्षांची आहे. परंतु, तिच्याकडे पाहिलं तर ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हा वाक्प्रचार आठवतो. कारण ईशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिने एकटीने चार पदकांवर आपलं नाव कोरलं आहे.
  • ईशाने १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक, १० मीटर एअर पिस्तूल महिला वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. तत्पूर्वी तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह तिने एकटीने चार पदकं पटकावली आहेत.
  • वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिल्यांदा रायफल उचणाऱ्या ईशाचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. ईशा ही नवव्या वर्षी तिचे वडील सचिन यांच्याबरोबर पहिल्यांदा शूटिंग (नेमबाजी) रेंजवर गेली होती. तिथेच तिने पहिल्यांदा बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला होता. त्यानंतर तिलाही बंदुकीने नेमबाजी कराविशी वाटली. त्यामुळे ती रायफल उचलायला गेली आणि जमिनीवर पडली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला शॉटगन भेट दिली.

वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन बनली

  • ईशाचा नेमबाजीतला रस पाहून तिच्या पालकांनी तिला त्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू ईशा नेमबाजी शिकू लागली. तसेच ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेमबाजी करू लागली. त्यानंतर ती राज्य स्तरावरील स्पर्धा जिंकू लागली. ईशा ही २०१८ साली झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या वेळी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. त्यावेळी तिने हीना सिद्धू आणि मनू भाकर या दोन नावाजलेल्या नेमबाजांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावलं होतं. तेव्हा ईशा केवळ १३ वर्षांची होती. तसेच त्या स्पर्धेतील सर्वात लहान सुवर्णपदक विजेती खेळाडू ठरली होती.
नऊ महिन्यांतच कर्जभार ६७ हजार कोटींवर; गतवर्षांच्या तुलनेत राज्याची जास्त कर्जउभारणी
  • चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) रोखे बाजारातून २२ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांतील कर्जाची रक्कम ६७ हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत राज्यावरील कर्जभार यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  • चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत राज्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाची आकडेवारी रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केली आहे. या तिमाहीत विविध राज्यांकडून एकूण २ लाख ३७ हजार कोटींचे कर्ज रोखे बाजारातून उभे करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक कर्ज उत्तर प्रदेश (३१ हजार ५०० कोटी) घेणार असून त्याखालोखाल कर्नाटकचा (३० हजार कोटी) क्रमांक आहे. महाराष्ट्र सरकारने २२ हजार कोटी कर्ज घेण्याची मागणी रिझव्‍‌र्ह बँकेकडे नोंदविली होती. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी हे कर्ज वापरण्यात येते. अर्थसंकल्प तयार करतानाच या कर्जाचा विचार करूनच नियोजन केले जाते.
  • राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये मिळून एकूण ४५ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यात तिसऱ्या तिमाहीतील २२ हजार कोटींची भर पडून कर्जभार ६७ हजार कोटींवर पोहोचला आहे. गत आर्थिक वर्षांत राज्य सरकारने एकूण ७२ हजार कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्या तुलनेत यंदा तिसऱ्या तिमाहीतच ९० टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज राज्य सरकार उभारणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीस एकूण कर्जात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
  • चालू आर्थिक वर्षांअखेर राज्यावरील कर्जाचा बोजा सात लाख कोटींच्या वर जाण्याचा अंदाज आहे. कर्जाचा बोजा वाढला असला तरी स्थूल राज्य उत्पन्नाच्या हे प्रमाण १८.२३ टक्के आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने २५ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत कर्ज घेण्यास मुभा दिल्याने राज्याचे कर्जाचे प्रमाण आटोक्यात असल्याचे उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकने गेल्या आर्थिक वर्षांत ३६ हजार कोटींचे कर्ज उभे केले होते. यंदा तिसऱ्या तिमहीअखेर ४९ हजार कोटींचे कर्ज होणार आहे. राजस्थानमधील कर्जाचे प्रमाण वाढले आहे.
दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी विशेष रेल्वे गाडय़ांच्या कालावधीत वाढ
  • मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विशेष  गाडय़ांच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे २५ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी १६ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७६३७ तिरुपती- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी आता १५ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात येईल. 
  • गाडी क्रमांक ०७१९६ दादर – काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे २८ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.  गाडी क्रमांक ०७१९५ काझीपेठ- दादर साप्ताहिक विशेष २७ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. ही रेल्वेगाडी ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येईल. गाडी क्रमांक ०७१९८ दादर- काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे १ ऑक्टोबरपर्यंत चालवण्यात येईल. तसेच ही रेल्वेगाडी ८ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७१९७ काझीपेठ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे ३० सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येईल.
भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल; सामान्य विद्यार्थ्यांच्या लुटीचा आरोप
  • राज्यात टीसीएस आणि आयबीपीएस या दोन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सरळसेवा भरती सुरू आहे. यासाठी आकारण्यात येणाऱ्या अवाजवी शुल्काला सर्वच स्तरांतून विरोध होत असतानाही आतापर्यंत शासनाने घेतलेल्या तीन विभागांच्या भरतीमधून सुमारे २६५ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. यामुळे सामान्य विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचा आरोप होत आहे.    
  •  राज्य सरकारने ७५ हजार पदांच्या महाभरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार वन विभाग, तलाठी (महसूल), जिल्हा परिषद व आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विभागात रिक्त जागांच्या तुलनेत अर्जाची संख्या किमान पाच ते सहापट आहे. प्रत्येक भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला एक हजार तर मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपयांचे शुल्क भरावे लागते. त्यानुसार,  तीन विभागांच्या भरतीतून सरकारच्या तिजोरीत अंदाजे २६५ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. दरम्यान, उर्वरित शासकीय विभागांमध्ये ४० ते ६० हजार पदांची आणखी भरती होणार आहे.
  • राज्य सरकारकडे वारंवार विनंतीअर्ज करूनही सरळसेवा भरतीसाठीचे शुल्क कमी केले जात नाही. खासगी कंपन्यांचे भले करण्याचा हा प्रकार आहे. कंत्राटी भरतीचा निर्णयही विद्यार्थीविरोधी आहे.
एम एस स्वामिनाथन यांना आज अखेरचा निरोप
  • भारतातील ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. स्वामिनाथन यांचे गुरुवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुली आहेत. त्यांची कन्या डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
  • स्वामिनाथन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नई येथील एम एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) या संस्थेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व थरांतील लोकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर आज, ३० सप्टेंबरला संपूर्ण पोलीस इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
  • भारतात १९६० च्या दशकात भुकेची समस्या आ वासून उभी असताना आधुनिक पद्धतीच्या शेतीचा प्रसार करून स्वामिनाथन यांनी देशात हरित क्रांती घडवून आणली. त्यानंतर एकेकाळी अन्नधान्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून राहणारा देश ही अशी ओळख पुसून ‘जगाचे धान्याचे कोठार’ अशी नवी ओळख भारताने मिळवली. स्वामिनाथन यांच्या निधनामुळे कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार यांचे युग संपुष्टात आले असल्याची प्रतिक्रिया भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक ए के सिंह यांनी व्यक्त केली.
  • देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात स्वामिनाथन यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशासनात असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. त्यांनी २००४ साली राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

 

राष्ट्रीय  क्रीडा  स्पर्धा - पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेसारख्या युवा क्रीडा उत्सवांमधून भावी ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास या उद्घाटन सोहळय़ादरम्यान पंतप्रधानांनी व्यक्त केला.

  • मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळय़ात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांचीही या सोहळय़ाला उपस्थिती होती. या सोहळय़ात गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन करण्यात येणार आहे.

  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला असला, तरी काही क्रीडाप्रकारांना यापूर्वीच सुरुवात झाली आहे.

  • महाराष्ट्राची विजयी घोडदौड - महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी, रग्बी, टेनिस या खेळांमध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी रग्बी सेव्हन्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी विजयी सुरुवात केली. नेमबाजीमध्ये रुद्रांक्ष पाटील आणि आर्या बोरसे यांनी सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

‘बीएसएनएल’ देशभरात सुरू करणार ‘४जी’ सेवा :
  • भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही केंद्र सरकारची दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या किंवा खासगीकरण करण्याच्या चर्चेला जोर चढला असताच केंद्र सरकार ‘बीएसएनएल’ला २८ हजार कोटींची मदत करणार असून देशभरात लवकरच ‘४जी’ सेवा सुरू होणार असल्याची माहिती महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.‘बीएसएनएल’ १ ऑक्टोबरला आपला २३ वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. संस्थेचा गौरवशाली इतिहास असला तरी घटती ग्राहकसंख्या, वाढता खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा ताळमेळ राखता न आल्याने ‘बीएसएनएल’ आपल्या अखेरच्या घटका मोजते आहे. त्यामुळे ती बंद होण्याच्या चर्चाही होत्या.

  • मात्र, केंद्र सरकारने नुकतीच १.६४ कोटींची मदत ‘बीएसएनएल’ला केल्याचे पान्हेकर यांनी सांगितले. तर भविष्यात २८ हजार कोटींची मदत केली जाणार आहे. यानुसार देशभरात ‘४जी’ सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारे उपकरण हे भारतात तयार केले जावेत, अशी अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे ‘४जी’ सेवेसाठी आवश्यक असणारे उपकरण तयार करण्याचे काम हे ‘टीसीएस’ला देण्यात आले आहे.

  • ही संस्था लवकरच आवश्यक असे ‘स्पेक्ट्रम’ तयार करून देणार आहे. प्रथम मोठ्या शहरांमध्ये आणि नंतर ग्रामीण भागातही ‘४जी’ सेवा सुरू होणार असल्याचे पान्हेकर यांनी सांगितले. याच उपकरणांच्या आधारे ‘५जी’ सेवाही सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. देशातील २६ हजार गावे ही सध्याही भ्रमणध्वनी सेवेपासून वंचित आहेत. तेथे कुठल्याही प्रकारची सेवा नाही. त्यामुळे अशा २६ हजार गावांना जोडण्याचा मानस ‘बीएसएनएल’ने ठेवला आहे. यासाठी ‘बीएसएनएल’सोबत ‘बीबीएनएल’(भारत नेट) मदत करणार आहे. याशिवाय ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांमध्ये वाढ होत असल्याचेही पान्हेकर यांनी सांगितले.

आज देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा :
  • भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे. पंतप्रधान मोदी आज(शुक्रवार) या नवीन सुधारित ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यामुळे आता देशाला तिसरी वंदे भारत ट्रेन आज प्राप्त होणार आहे.

  • यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत.

  • वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण १ हजार १२८ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली. आज तिसरी वंदे भारत ट्रेन गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

  • तिसरी वंदे भारत ट्रेन आधीच्या वंदे भारत ट्रेनपेक्षा वेगळी असणार आहे. या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन ट्रेनमध्ये कोविडबाबत विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.

संस्कृतच्या प्रमाणित भाषांतरासाठी एक लाख वाक्यसमूह; ‘गूगल ट्रान्सलेट’ सुविधेसाठी ‘आयसीसीआर’चा पुढाकार :
  • गूगलच्या विविध भाषा अनुवादित करण्याच्या सुविधेमध्ये (गूगल ट्रान्सलेट) आता संस्कृतचे प्रमाणित भाषांतर होऊ शकेल. ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’च्या (आयसीसीआर) पुढाकाराने प्रायोगिक तत्त्वावर संस्कृत भाषांतराचा प्रयोग सुरू असून आतापर्यंत ‘गूगल ट्रान्सलेट’साठी संस्कृतची एक लाख वाक्यसमूह तयार केली आहेत. त्यामध्ये दैनंदिन वापरातील शब्द व वाक्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संस्कृतचा अन्य भाषांमध्ये व अन्य भाषांचा संस्कृतमध्ये उत्तम अनुवाद केला जाऊ शकतो.

  • संस्कृत भाषांतरासाठी ‘गूगल ट्रान्सलेट’ सुविधेचा सर्वाधिक वापर केला असला तरी, प्रमाणित व रोजच्या वापरातील शब्दांचा वापर अधिक महत्त्वाचा आहे. संस्कृत भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी अनुवादाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे उपप्रमुख व पॅरिस येथील ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ संस्कृत स्टडीज’च्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. अमरजीव लोचन यांचा पाच सदस्यांचा चमू तीन महिने संस्कृत वाक्ये तयार करत होता. त्यांना दोन-तीन संस्कृतमधील तज्ज्ञ प्राध्यापक व ४८ विद्यार्थ्यांनी साह्य केले. प्रमाणित संस्कृत भाषांतरामुळे जागतिक स्तरावर संस्कृतमधील संशोधनाला वेग येईल. विविध भाषांमध्ये पूल बांधण्याचा प्रयत्न भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे.

  • संस्कृतप्रमाणे अन्य भारतीय भाषांसाठी संस्थेच्या वतीने काम केले जाणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष व खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. या वेळी  ‘गूगल इंडिया’च्या संशोधन विभागाचे प्रमुख मनीष गुप्ता, परिषदेचे महासंचालक कुमार तुहीन, परिषदेचे उपमहासंचालक राजीव कुमार, प्रा. अमरजीव लोचन आदी उपस्थित होते.

३० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.