चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० सप्टेंबर २०२१

Date : 30 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा : भारताचा फ्रान्सवर दिमाखदार विजय :
  • चौथ्या फेरीत रशियाकडून पत्करलेल्या १-३ अशा पराभवातून सावरत भारताने ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेच्या पाचव्या आणि अखेरच्या फेरीत फ्रान्सवर ३-१ असा दिमाखदार विजय मिळवला. भारताची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानशी गाठ पडणार आहे.

  • भक्ती कुलकर्णी आणि मेरी अ‍ॅन गोम्स यांच्या विजयांनी पाचव्या फेरीत महत्त्वाची भूमिका बजावली, तर द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले. भक्तीने फ्रान्सच्या नताशा बेनमेशबाला, तर मेरीने सिल्व्हिया अ‍ॅलेक्शिवाला प्रत्येकी ५१ चालींमध्ये पराभूत केले. हरिकाने मारी सेबागशी ४५ चालींमध्ये, तर तानियाने आंद्रिया नॅव्हरोतेस्क्यूशी ३४ चालींमध्ये बरोबरी साधली.

  • सहा संघांचा समावेश असलेल्या अ-गटात भारताने तीन सामने जिंकले, एक सामना बरोबरीत सोडवला, तर रशियाकडून पराभव पत्करला.

  • त्याआधी, चौथ्या फेरीत रशियाविरुद्ध हरिकाने काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना अ‍ॅलेक्झांड्रा गोरीश्कीनाला बरोबरीत रोखले, तर मेरीने पोलिनो शुवालोव्हाशी बरोबरी साधली. परंतु तानिया आणि आर. वैशाली यांनी अनुक्रमे लॅग्नो कॅटेरिना आणि अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेनियुक यांच्याकडून पराभव पत्करल्यामुळे भारताची अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली.

माणदेशातील संशोधकाच्या नेतृत्वाखाली लघुग्रहाचा शोध :
  • अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने (नासा) सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये माळवाडी (ता. माण) येथील विद्यार्थी संशोधक विनायक दोलताडे यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी गटाने अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. दरम्यान या शोधावर नासाचे अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे.

  • नासा, पॅन स्टार्स, कॅटालीना स्काय सर्वे आणि टेक्सास येथील हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून १ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोधमोहीम घेण्यात आली होती. या अंतर्गत गटामध्ये दोलताडे यांच्या नेतृत्वाखाली आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनीष जाधव, गौरव डाहुले या विद्यार्थ्यांच्या गटाने संशोधन केले. या गटाने एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे.

  • तीन ते पाच वर्षे त्याच्या स्थितीचे व हालचालींचे निरीक्षण घेऊन नंतर याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे.    या गटाचा प्रमुख विनायक हा एका मेंढपाळाचा मुलगा असून त्याचे प्राथमिक शिक्षण रांजणी (ता.माण, जि. सातारा) येथे तर माध्यमिक शिक्षण जिल्ह्य़ातील म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले आहे.

  • यानंतर त्याने आणि त्याच्या गटातील गौरव आणि वैभव यांनी त्यांचे उच्चशिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातून केले. तर या गटातील मनीष, आनंद आणि संकेत यांनी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातून भूगोल विषयाची पदवी प्राप्त केली आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या गटाचे अभिनंदन होत आहे.

भारताचे तीन अधिकारी ‘त्या’ बैठकीसाठी पाकिस्तानला जाणार; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय :
  • भारत पुढील आठवड्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी तीन सदस्यांची टीम पाठवणार आहे. पाकिस्तानच्या नौशेरा जिल्ह्यामध्ये पब्बी येथे ३ ऑक्टोबर रोजी एससीओची स्थानिक दहशतवादविरोधी धोरणांसंदर्भातील बैठक पार पडणार आहे. याअंतर्गत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी युद्धसरावाचे आयोजन करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • एससीओचे सदस्य देश असणाऱ्या देशांमध्ये दहशतवादाविरोधात लढण्यासंदर्भातील सहकार्य वाढवावं या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीमध्ये सहभागी झाल्याने पाकिस्तानला जागतिक स्तरावर दहशतवादी समर्थक देश ठरवण्याच्या भारताच्या मोहिमेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही असं भारत सरकारचं मत आहे. या बैठकीमध्ये भारताच्या उपस्थितीमध्ये सुरक्षासंदर्भातील मुद्द्यांबरोबरच अफगाणिस्तान आणि मध्य आशियामधील क्षेत्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली जाणार असून भविष्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार आहे.

  • रशिया, भारत, चीन, पाकिस्तान आणि मध्य आशियामधील चार देश या संघटनेचे पूर्णवेळ सदस्य आहेत. तसेच इराण सुद्धा एससीओमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील राजकीय स्थिती आणि त्यावर शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आणि प्रदेशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोरण निश्चितीसाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.

जपानचे माजी राजनीतिज्ञ किशिदा आता नवे पंतप्रधान :
  • जपानचे माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वपदाची निवडणूक बुधवारी जिंकली असून ते आता पुढील पंतप्रधान असणार आहेत. त्यांच्यापुढे करोना साथीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था व अमेरिकेबरोबर ठोस आघाडी  याबरोबरच अनेक प्रादेशिक प्रश्नांची आव्हाने आहेत.

  • किशिदा यांनी आधीचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांची जागा घेतली. सुगा यांनी सप्टेंबरमध्ये कार्यभार घेतला होता त्याला वर्ष पूर्ण होत असतानाच पायउतार व्हावे लागत आहे.

  • लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक झाली असून त्यात त्यांची निवड झाल्याने संसदेत सोमवारी त्यांची पंतप्रधानपदी निवड होणार आहे, कारण संसदेत त्यांचा पक्ष व मित्र पक्षांचे प्राबल्य आहे. किशिदा  यांनी नेतृत्वपदाच्या लढतीत लसीकरण मंत्री टारो कोनो यांचा पराभव केला असून पहिल्या टप्प्यात ते एकाच मताने आघाडीवर होते. याशिवाय दोन महिलांसह चार उमेदवार होते, त्यांना बहुमत मिळाले नाही.

उत्तर कोरियाकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी :
  • उत्तर कोरियाने नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती बुधवारी हाती आली आहे. या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे असून उत्तर कोरिया त्याची लष्करी क्षमता वाढवत चालला आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आक्षेप घेऊनही क्षेपणास्त्र चाचण्या सुरूच आहेत.

  • उत्तर कोरियाने महिनाभरात तीन चाचण्या केल्या असून उत्तर कोरियाच्या संयुक्त राष्ट्र दूतांनी असा आरोप केला, की अमेरिकेची भूमिका शत्रुत्वाची असून बायडेन प्रशासनाने संयुक्त लष्करी कवायती कायमच्या संपवाव्यात. या भागात शस्त्रास्त्रे  तैनात करू नयेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्धीस दिलेल्या छायाचित्रात शंकूच्या आकाराचे क्षेपणास्त्र अवकाशात झेपावताना दिसत आहे. त्यातून नारिंगी रंगाच्या ज्वाळा प्रक्षेपणावेळी दिसत आहेत.

  • अधिकृत कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की या क्षेपणास्त्राची पहिलीच चाचणी यशस्वी झाली आहे. त्यात तांत्रिक गरजा पूर्ण झाल्या आहेत. प्रक्षेपण स्थिरता व प्रवास क्षमता, हायपरसॉनिक ग्लायडिंग अस्त्र वेगळे होणे हे सर्व यशस्वीपणे करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रमुखांनी म्हटले आहे, की या क्षेपणास्त्रावर तातडीने भाष्य करण्यात येणार नाही पण ते सुरुवातीच्या टप्प्यात आहे असे दिसते.

  • उत्तर कोरिया ते क्षेपणास्त्र कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही वेळ घेईल. जपान व दक्षिण कोरियाच्या लष्कराने असे म्हटले होते, की उत्तर कोरियाने पूर्व सागरात चाचणी केली आहे. दरम्यान उत्तर कोरियाच्या संसदेची बैठक होऊन त्यात आर्थिक धोरणे व युवक शिक्षण या योजनांवर चर्चा करण्यात आली. उत्तर कोरिया आण्विक राजनीतीवरही चर्चा करण्याची शक्यता आहे.

भारताच्या लस निर्यात निर्णयाचे अमेरिकी सेनेटरकडून स्वागत :
  • भारताने अलीकडेच लस मैत्री कार्यक्रमासाठी करोना प्रतिबंधक लशी निर्यात करण्याचा निर्णय जाहीर केला असून त्याचे वरिष्ठ रिपब्लिकन सेनेटर जिम रिच यांनी स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय गरजा पाहून लशीचे उत्पादन वाढवण्याचे आदेश कंपन्यांना देण्यात आल्याचे भारताने म्हटले होते व ऑक्टोबरपासून लस निर्यात सुरू करण्याचे स्पष्ट केले होते.

  • भारताने असे म्हटले होते की, लस मैत्री कार्यक्रमाअंतर्गत २०२१च्या चौथ्या तिमाहीत लस निर्यात सुरू करण्यात येईल व जगाच्या कोव्हॅक्स जागतिक साठय़ात त्यामुळे भर पडणार आहे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे की, भारताच्या नागरिकांची लसीकरणाची गरज अग्रक्रमावर राहील, नंतर उरलेल्या लशी निर्यात करण्यात येतील.

  • सेनेटर जिम रिच यांनी परराष्ट्र संबंध समितीला सांगितले की, भारताने लस निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. करोना प्रतिबंधक लशींची निर्यात त्यामुळे पुन्हा सुरू होणार आहे. हिंद प्रशांत क्षेत्र व उर्वरित जगासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. एप्रिलमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर भारताने करोना लशींची निर्यात बंद केली होती.

  • नागरिकांचे लसीकरण महत्त्वाचे असून भारत करोना लशींची निर्यात लस मैत्री कार्यक्रमांतर्गत सुरू करणार आहे. त्यातून कोव्हॅक्स कार्यक्रमाला मदत होणार असून यात ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा जगाच्या कल्याणाचा हेतू आहे, असे मंडाविया यांनी म्हटले होते. कोव्हॅक्स ही जागतिक लस योजना असून त्यामुळे करोना लस आघाडी भक्कम होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचाही यात पुढाकार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेला आरबीआयचा दिलासा; पीसीए नियमातून सूट :
  • आरबीआयने इंडियन ओव्हरसीज बँकेला ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (पीसीए)’ अर्थात तत्पर सुधारात्मक आकृतिबंधातून बाहेर करत दिलासा दिला आहे. पीसीएमुळे बँकांना कर्ज देणे, व्यवस्थापन भरपाई आणि संचालकांना पैसे देण्यावर बंधनं असतात. मात्र आता पीएसीतून दिलासा दिल्याने बँक आपला दैनंदिन व्यवहार करू शकणार आहे.

  • आरबीआयने ऑक्टोबर २०१५ मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेवर निर्बंध लादले होते. यापूर्वी यूको बँकेला पीसीएतून दिलासा दिला होता. हा निर्णय या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेतला होता.

  • “आर्थिक पर्यवेक्षण मंडळाने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ३१ मार्च २०२१ रोजी जाहीर केलेल्या निकालानुसार बँकेने पीसीए पॅरामीटरचं उल्लंघन केले नाही. त्यामुळे बँकेला पीसीए चौकटीतून बाहेर केलं आहे”, असं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

  • “इंडियन ओव्हरसीज बँकेनं लेखी म्हटलं आहे की, सर्व नियामांचं पालन केलं जाईल. रेग्युलेटरी कॅपिटल, नेट एनपीए आणि लेवरेज रेशियोवर लक्ष ठेवेल. इंडियन ओव्हरसीज बँकेने रिझर्व्ह बँकेला आश्वासन दिलं आहे की, हळूहळू संरचनात्मक आणि पद्धतशीर बदलांच्या दिशेन काम करेल”, असं आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

३० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.