चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० सप्टेंबर २०२०

Date : 30 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्रम्प, बिडेन यांच्यात पार पडली पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’; रंगल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी :
  • अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. तसंत निवडणुकांचा प्रचारही आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बुधवारी निवडणुकीपूर्वी पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ पार पडली. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळालं.

  • यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूलरून चीनवर निशाणा साधला. “चीनमुळे करोना विषाणू आला. जर चीननं सर्वांना योग्यवेळी योग्य माहिती दिली असती तर करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला नसता,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले.

  • तसंच त्यांनी बिडेन यांनी चीनमधील खरी आकडेवारी माहित नसल्याचंही म्हणत त्यांनी बिडेन यांना भारत आणि रशियाची आकडेवारी पाहण्याचाही सल्ला दिला. यापूर्वी अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची तुलना भारतातील करोना चाचण्यांच्या संख्येशी केली आहे.

बाबरी मशीदप्रकरणी आज अंतिम फैसला, तब्बल २८ वर्षांनी येणार निकाल :
  • १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.

  • या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले आहेत. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

  • दरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांच्यापैकी कोणीही उपस्थित नसणार आहे. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत.

काळ्या पैशांचा स्रोत बंद :
  • शेतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य काही लोकांना (अडते-दलाल) बघवत नाही. त्यांचा काळा पैसा जमा करण्याचा आणखी एक मार्ग बंद झाला आहे. म्हणून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.

  • वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन कायम आहे. दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ पंजाब युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर जाळून निषेध केला. या घटनेच्या संदर्भात मोदी म्हणाले की, शेती कायद्यांना विरोध करणारे यंत्रांना आग लावून निषेध करत असून ते शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कामगार, आरोग्यसेवक अशा विविध समाजघटकांच्या हितांचे कायदे केले गेले असून त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे. पण निव्वळ विरोध करायचा असे ठरवून काही लोक या कायद्यांना विरोध कसा करतात हे देशाने पाहिले असल्याची टिप्पणी मोदी यांनी केली.

  • इंडिया गेटनजीक ट्रॅक्टर जाळण्याची जबाबदारी घेणारे पंजाब युवा काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिंदर धिल्लाँ याना चौकशीसाठी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मोदींनी पुन्हा एकदा हमीभावाची हमी दिली. शेतीमालाला हमीभाव दिला जाईल. शिवाय, शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचेही स्वातंत्र्य असेल. हे स्वातंत्र्य काही लोकांच्या हितसंबंधांच्या आड येत असल्याचे मोदी म्हणाले.

‘एकतर्फी ठरवलेली १९५९ सालची LAC अजिबात मान्य नाही’, भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं :
  • लडाखच्या पूर्वभागात वास्तविक नियंत्रण रेषेवरुन भारत-चीनमध्ये वाद कायम आहे. चीनने पुन्हा एकदा LAC च्या विषयावर नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही पलटवार करत अत्यंत कठोर शब्दात चीनचा LAC संबंधीचा दावा फेटाळून लावला आहे. भारतीय भूभागात अतिक्रमण करणाऱ्या चीनने १९५९ साली एकतर्फी नियंत्रण रेषा ठरवली होती. चीन त्याचा दाखला देत आहे. पण भारताने चीनचा हा एकतर्फी दावा मान्य करण्यास नकार दिला आहे.

  • “१९५९ साली चीनने एकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा भारताने कधीही मान्य केलेली नाही. आमची भूमिका कायम आहे. चीनसह सर्वांनाच ती माहित आहे” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

  • चीनचे तत्कालिन पंतप्रधान झोउ एनलाई यांनी सात नोव्हेंबर १९५९ रोजी  भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना एक पत्र पाठवले होते. त्यात प्रस्तावित केलेल्या नियंत्रण रेषेचे चीन पालन करेल असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. त्यावर भारताने चीनची १९५९ सालची LAC बद्दलची व्याख्या अजिबात मान्य करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

३० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.