चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 ऑक्टोबर 2023

Date : 30 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेयाल माद्रिदच्या विजयात बेलिंगहॅमची चमक
  • ज्युड बेलिंगहॅमने झळकावलेल्या निर्णायक दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉलच्या सामन्यात बार्सिलोनावर २-१ असा विजय मिळवला.माद्रिदची सामन्यामध्ये चांगली सुरुवात झाली नाही.
  • बार्सिलोनाच्या इकाय गुंडोगनने (सहाव्या मिनिटाला) माद्रिदच्या बचावाला भेदत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर माद्रिदकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, बार्सिलोनाच्या भक्कम बचावासमोर त्यांचा निभाव लागला नाही व मध्यांतरापर्यंत बार्सिलोनाकडे ही आघाडी कायम होती.
  • दुसऱ्या सत्रात, माद्रिदने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या ६८व्या मिनिटाला इंग्लंडचा युवा आघाडीपटू बेलिंगहॅमला गोल करण्याची संधी मिळाली. त्याने गोल झळकावत संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांकडून आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर सामन्याच्या भरपाई वेळेत बेलिंगहॅमने बार्सिलोनाच्या बचावाला चकवीत निर्णायक गोल केला व संघाला २-१ असे आघाडीवर नेले.
टीम इंडियाचा विजयी षटकार अन् गतविजेते बाहेर! भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड चारीमुंड्या चीत, १०० धावांनी शानदार विजय
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत २० वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. याविजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते हे बाहेर पडले आहेत. भारताने तब्बल १०० धावांनी इंग्लिश संघाचा पराभव केला. मुस्कारो आप लखनऊ मे हो! असे म्हणत भारतीय संघाने पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी झाली. रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ विकेट्स गमावून २२९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारतीय संघाची विजयी घौडदौड पुढे सुरूच आहे. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि ८७ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. 

बुमराहने इंग्लंडचा डाव गुंडाळला

  • जसप्रीत बुमराहने ३५व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्क वुडला क्लीन बॉलिंग देऊन इंग्लंडचा डाव संपवला. वुडने केवळ एका चेंडूचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. डेव्हिड विली १६ धावा केल्यानंतर दुसऱ्या टोकाला नाबाद राहिला. वुड आऊट होताच टीम इंडियाने मॅच जिंकली. त्यांनी इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचे सहा सामन्यांतून १२ गुण झाले असून ते उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. दुसरीकडे इंग्लंडला सहा सामन्यांत पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांचे अवघे दोन गुण आहेत. २० वर्षांतील विश्वचषकात भारताचा इंग्लंडवर पहिला विजय असून टीम इंडियाने एकप्रकारे लगान वसूल केला आहे. त्यांचा शेवटचा विजय २००३ मध्ये होता. त्यानंतर २०११ मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याचवेळी २०१९ मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
आरोग्य विभागातील ३५ हजार कंत्राटी डॉक्टर-कर्मचाऱ्यांचा आता आझाद मैदानावर लढा!
  • आरोग्य विभागात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानां’तर्गत काम करणारे सुमारे ३५ हजार कंत्राटी डॉक्टर, क्षयरोग कर्मचारी, तंत्रज्ञ, परिचारिकांनी आरोग्य सेवेत सामावून घेण्यासाठी सलग चौथ्या दिवशी कामबंद आंदोलन केले असून या आंदोलनामुळे माता-बालकांच्या लसीकरणाचे काम ठप्प झाले आहे तसेच डायलिसिस सेवा तसेच क्षयरुग्णांच्या नोंदणीपासून औषधोपचारापर्यंत विपरित परिणाम होत आहे.आंदोलनकर्ते येत्या ३० व ३१ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करणार असून या आंदोलनाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ याची केवळ जाहिरातच उदंड असून आमच्या मागण्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते, यातच सारे काही आले असे या आंदोलनकर्त्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान चे कंत्राटी कर्मचारी २५ ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. मात्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे या कर्मचाऱ्यांशी बोलण्यास तयार नाहीत. मागील दहा महिन्यापासून आमच्या मागण्यांबाबत आरोग्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितला मात्र त्यांना वेळ नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. ‘शासन आपल्या दारी’च्या मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या जातात परंतु आमच्या आंदोलनाकडे पाहण्यास या सरकारना वेळ नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • आंदोलनात आयुषअंतर्गत काम करणारे ६५० डॉक्टर्स तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत २५०० डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील २५७३ कर्मचारी व तंत्रज्ञ, २००० प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सुमारे ४००० अर्धपरिचारिका, ८५०० समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी अशा सुमारे ३५ हजार कंत्राटी कर्मचारी असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱऱ्या वेगवेगळ्या डॉक्टर, तंत्रज्ञ, क्षयरोग कर्मचारी आदी ११ संघटनांनी एकत्र येऊन हे कामबंद व लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या बुधवारी या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी ओरिसा, मणिपूर, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, तलंगणा तसेच मध्यप्रदेशमध्ये तेथील सरकारने आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आम्हाला आरोग्य सेवेत कायम करा अशी मागणी करण्यात आली.
  • संघटनांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार ओरिसामध्ये ५५ हजार लोकांना सेवेत कायम करण्यात आले तर मध्य प्रदेशात एक लाख २० हजार, राजस्थानमध्ये एक लाख १० हजार, पंजाबमध्ये ५५ हजार तर आंध्र प्रदेशमध्ये ५५ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाडे नऊ हजार पदे रिक्त असून ही पदे का भरण्यात आली नाही, असा सवालही आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ‘मेरा युवा भारत’ संस्थेची स्थापना  ; ‘मन की बात’मध्ये मोदींची घोषणा
  • लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी ‘मेरा युवा भारत’ या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. राष्ट्रउभारणीसंबंधित  उपक्रमांत  तरुणांना सक्रियपणे सहभागी होण्याची संधी या संस्थेद्वारे दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
  • आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या मासिक संवाद सत्राच्या १०६ व्या भागात मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना मोदींनी गेल्या काही वर्षांत खादीशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत झालेल्या उल्लेखनीय वाढीचा उल्लेख केला. त्यांनी या वेळी पुन्हा देशवासीयांना अधिकाधिक स्थानिक स्तरावर उत्पादित केलेली उत्पादने खरेदी करण्याचे आणि ‘स्वावलंबी भारत’चा संकल्प सिद्धीस नेण्याचे आवाहन केले.
  •  मोदी म्हणाले की, ‘मन की बात’द्वारे  देशवासीयांसाठी काही तरी करण्याची तळमळ असलेल्या युवकांसाठी एक आनंदाचे वृत्त सांगणार आहोत. माझ्या तरुण मित्रांनो, ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी एका खूप मोठय़ा देशव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार आहे.
ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धा  : वैशालीकडून मुजिचुकचा पराभव
  • भारताच्या आर. वैशालीने ‘फिडे’ महिला ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत युक्रेनची माजी जागतिक विजेता मारिया मुजिचुकला नमवत ३.५ गुणांसह संयुक्तपणे शीर्ष स्थानी पोहोचली आहे. स्पर्धेच्या अजूनही सात फेऱ्या शिल्लक आहेत. वैशालीशिवाय चीनची टेन झोंगयी, युक्रेनची अ‍ॅना मुजिचुक आणि कझाखस्तानची असोबायेवा बिबिसारा संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहेत.
  • ग्रँडमास्टर प्रज्ञानंदची बहीण असलेल्या वैशालीने नुकत्याच झालेल्या कतार मास्टर्समध्ये आपला तिसरा व अखेरचा ग्रँडमास्टर ‘नॉर्म’ मिळवला. चेन्नईच्या या खेळाडूने आपल्या आक्रमक शैलीने मुजिचुकला २३ चालींमध्ये नमवले. युक्रेनची खेळाडू वैशालीसमोर पुनरागमन करण्यात अपयशी ठरली. चार फेऱ्यांमध्ये वैशालीचा हा तिसरा विजय आहे. खुल्या गटात ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने सर्बियाच्या अ‍ॅलेक्झांडर प्रेडकेविरुद्ध बरोबरीची नोंद केली. डी हरिका व तानिया सचदेव यांना पराभूत व्हावे लागले. दिव्या देशमुखने बरोबरीची नोंद केली तर, वंतिका अग्रवालने चिलीच्या जेविएरा बेलेन गोमेज बारेराचा पराभव केला.
  • ग्रँडमास्टर विदित गुजराथीने आपली विजयी लय कायम राखताना स्पेनच्या अ‍ॅलेक्सी शिरोवला नमवले. विदितचा हाल्लग तिसरा विजय आहे. ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेन्को खुल्या गटात शीर्ष स्थानी आहे. एसिपेन्कोने फ्रान्सच्या मार्क आंद्रिया मोरिजीला नमवले. डी गुकेश मात्र, पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. सर्बियाच्या इवान सारिचविरुद्ध त्याने सलग चौथ्या बरोबरीची नोंद केली. पी हरिकृष्णाने ब्रिटनच्या श्रेयस रॉयलला पराभूत केले. निहाल सरीनने अर्मेनियाच्या सेमवेल टेर-सहाकयानला नमवले तर, प्रज्ञानंदने तुर्कीच्या मुस्तफा यिलमाजविरुद्ध बरोबरीची नोंद केली.

30 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.