चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० ऑक्टोबर २०२१

Date : 30 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश :
  • भारताच्या दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. युवा खेळाडू लक्ष्य सेन, तसेच पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे या स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले.

  • महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने आठव्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानवर २१-१४, २१-१४ अशी सरळ गेममध्ये मात केली. बुसाननविरुद्ध सिंधूचा हा १५ सामन्यांत १४वा विजय ठरला. त्याआधी गुरुवारी रात्री उशिराने झालेल्या सामन्यात तिने डेन्मार्कच्या लिन ख्रिस्तोफरसनला २१-१९, २१-९ असे पराभूत केले होते.

  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असणाऱ्या सिंधूचा उपांत्य फेरीत जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्ध सामना होईल. पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्यला दक्षिण कोरियाच्या हिओ वांगहिकडून १७-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.

  • पहिल्या गेममध्ये लक्ष्यने चांगली झुंज दिली, पण दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ खालावला. पुरुष दुहेरीत, मलेशियन जोडी आरोन चाय आणि सोह वूइ यिकने पाचव्या मानांकित सात्विक आणि चिराग जोडीला १८-२१, २१-१८, २१-१७ असे पराभूत केले.

‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा - भारतीय खेळाडूंचे संमिश्र यश :
  • भारतीय खेळाडूंना ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत संमिश्र यश मिळाले. पुरुष गटात दोघांनी आणि महिलांमध्ये पद्मिनी राऊतने विजयाची नोंद केली. पहिल्या फेरीत विजय मिळवणाऱ्या द्रोणावल्ली हरिकाला दुसऱ्या फेरीत भारताच्याच दिव्या देशमुखने बरोबरीत रोखले.

  • पुरुष गटात अनुभवी ग्रँडमास्टर के. शशिकिरणने उझबेकिस्तानच्या शमसुद्दीन वाखिदोव्हचा पराभव केला. तर युवा आर. प्रज्ञानंदने बी. अधिबनला ५५ चालींमध्ये पराभूत केले. त्यामुळे दोन फेरींनंतर शशिकिरण आणि प्रज्ञानंद या दोघांच्याही खात्यात १.५ गुण आहेत. फ्रान्सच्या अलीरेझा फिरौझासह तीन खेळाडू प्रत्येकी दोन गुणांसह अव्वल स्थानी आहेत.

  • या स्पर्धेत १० भारतीय खेळाडू सहभागी झाले असून ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णा हा त्यांच्यातील सर्वात अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. मात्र, त्याला दुसऱ्या फेरीत रशियाच्या अलेक्सी ड्रीव्हकडून पराभव पत्करावा लागला.

  • पहिल्या फेरीतही त्याला व्लाडिस्लाव्ह कोव्हालेव्हने पराभूत केले होते. १७ वर्षीय निहाल सरिनने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या फॅबिआनो कॅरुआनाला बरोबरीत रोखले. डी. गुकेशचा सामनाही बरोबरीत सुटला. महिलांमध्ये, हरिका आणि दिव्या यांच्यातील दुसऱ्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला. पद्मिनीने स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगवर मात केली. आर. वैशालीचा जॉर्जियाच्या निनो निनो बात्सिएव्हिलीने पराभव केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन :
  • एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याच्या आणि आर्थिक समस्येमुळे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या मागणीसाठी राज्यातील काही एसटी आगारांत कामगारांनी शुक्रवारीही काम बंद आंदोलन केले. त्यामुळे ३४ आगारांतील बस सेवा ठप्प झाली.

  • भत्ते वाढवल्याने कामगार संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतल्याचे गुरुवारी रात्री जाहीर केल्यानंतरही शेवगाव, अहमदनगर आगारामध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी काही आगारातील काम बंद केले. आगारे  बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.

  • महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ यांसह काही मागण्यांसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह एसटीतील बहुतांश संघटनांनी कृती समिती स्थापन करून बेमुदत उपोषण केले. त्यामुळे एसटीच्या २५० पैकी १९० आगारांतील काम बंद पडले होते. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कृती समितीशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभत्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने आंदोलन मागे घेतले होते.

महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; देगलूर, दादरा-नगर हवेलीत चुरशीची लढत :
  • देशात आज (३० ऑक्टोबर) एकूण ३ लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) होत आहे. या ३० विधानसभा जागांमध्ये १४ राज्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

  • यात सर्वाधिक ५ जागा आसामच्या, ४ पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा हरियाणा, मिझोराम, नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान चालेल. याची मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.

  • देशातील ३ लोकसभेच्या जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. यात दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशमधील मंडी आणि मध्य प्रदेशमधील खंडवा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

युरोपीय नेत्यांशी पंतप्रधानांची चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीत आगमन झाले असून जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने त्यांनी  युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांच्याशी संयुक्त चर्चा केली.

  • लोक पातळीवरील संपर्क वाढवणे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारणे, त्याचबरोबर पृथ्वीवरील पर्यावरण व्यवस्थित ठेवण्याबाबत त्यांनी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांची जी २० बैठकीच्या निमित्ताने ही पहिलीच चर्चा होती.

  • जी २०  देशांच्या बैठकीत शाश्वत विकास, हवामान बदल, शाश्वत बदल, कोविड १९ साथीमुळे झालेल्या नुकसानातून पुन्हा आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे वाटचाल करणे या मुद्दय़ांवर  चर्चा होणार आहे.

  • पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट  संदेशात म्हटले आहे, की रोम येथे पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत गाठीभेटी सुरू झाल्या असून त्यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा व युरोपियन मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. २०२० मध्ये भारत हा युरोपीय समुदायाचा दहावा मोठा व्यापारी  भागीदार होता.  युरोपीय समुदायाशी एकूण व्यापारापैकी १.८ टक्के व्यापार भारताचा आहे. भारत व युरोपीय समुदाय यांच्यातील २०२० मधला व्यापार ६५.३० अब्ज युरोचा होता.

पृथ्वीवर उद्या धडकणार सौर ज्वालांचे वादळ, उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता :
  • सूर्यावर सातत्याने स्फोट होत असतात, या स्फोटांमुळे विविध माध्यमातून ऊर्जा ही सर्व बाजुंना सतत फेकली जात असते. प्रकाश हा त्यापैकीच एक. हे स्फोट सूर्याच्या आतमध्ये आणि भुपृष्ठावर होत असतात. तर कधी कधी याची तीव्रता एवढी प्रचंड असते की स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वालांची तीव्रता ही कित्येक कोटी किलोमीटर अंतरापर्यंत प्रभावी ठरते.

  • असाच एक मोठा स्फोट २८ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ११ वाजून ३५ मिनीटानी नोंदवण्यात आला. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या ‘सोलर डायनामिक्स ऑब्झर्वेटरी’ ( Solar Dynamics Observatory ) या कृत्रिम उपग्रहाने त्या स्फोटाची नोंद केली. या उपग्रहाने पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण केले असता गेल्या काही महिन्यातील सूर्यावर नोंद झालेल्या सर्वात मोठ्या स्फोटापैकी हा एक स्फोट असल्याचं लक्षात आलं आहे.

  • या स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वाला या अत्यंत प्रभावी असल्याचंही लक्षात आलं आहे. या सौर ज्वाला या चुंबकीय कणांच्या स्वरुपात पृथ्वीवर आदळणार आहेत. अर्थात याचा पृथ्वीला किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीला कोणताही धोका नाही. कारण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामध्ये ही धडक पचवण्याची क्षमता आहे. पण यामुळे चुंबकीय वादळ पृथ्वीभोवती तयार होऊ शकतं. याचाही पृथ्वीवर परिणाम होणार नसला तरी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहापासून येणाऱ्या सिग्नलवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.