चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० ऑक्टोबर २०२०

Updated On : Oct 30, 2020 | Category : Current Affairsअमेरिकेत टपाली मतपत्रिकांची अद्यापही प्रतीक्षा :
 • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला काही दिवस राहिलेले असतानाही टपालाने पाठविण्यात आलेल्या मतपत्रिका अद्यापही काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये पोहोचलेल्या नाहीत, मतदानाच्या दिवशी ज्या मतदारांची मतदान केंद्रात जाण्याची इच्छा नाही त्यांच्याकडे फार कमी वेळ असल्याचा इशारा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

 • बुधवापर्यंत टपालाने आलेल्या साडेतीन कोटी मतपत्रिका स्वीकारण्यात आल्या, असे वृत्तसंस्थेकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे, २०१६च्या निवडणुकीत ही संख्या ३ कोटी ३३ लाख इतकी होती, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

 • अद्याप अंदाजित मतपत्रिका पोहोचलेल्या नाहीत, मतदानाच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू नये, अशी विनंती पेनसिल्व्हानियाचे गव्हर्नर टॉम वूल्फ यांनी मतदारांना केली आहे.

११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक :
 • मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, तसंच न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे ११ वीची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. मात्र आता ही प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातले संकेत दिले आहेत.  याबाबत मुख्यमंत्री महाधिवक्त्यांसोबत चर्चा करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना ११ वीचे प्रवेश कसे करता येतील यावर ही चर्चा सुरु आहे.

 • मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्यापासून हे प्रवेश थांबले आहेत. मात्र आता  ११ वीचे प्रवेश सुरु करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ११ वीच्या प्रवेशांबाबत कॅबिनेटच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली असंही भुजबळ यांनी सांगितलं.

 • मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात अंतरिम स्थगिती मिळाली तेव्हापासूनच ११ वीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात आता या सगळ्यावर सकारात्मक तोडगा काढून ११ वीची प्रवेश प्रक्रिया कशी सुरु करता येईल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाधिवक्त्यांशी चर्चा सुरु आहे.

 • ११ वीचे प्रवेश राज्यात कसे सुरु करता येतील त्यासाठी काय काय कायदेशीर उपाय असतील? विद्यार्थ्यांचं हित कसं जपता येईल या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महाधिवक्त्यांशी चर्चा सुरु आहे.

लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार; माजी पंतप्रधानांचं धक्कादायक वक्तव्य :
 • लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे असं धक्कादायक वक्तव्य मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी केलं आहे. आजच फ्रान्समध्ये एका हल्लेखोराने अल्ला हू अकबरचे नारे देत एका चर्चमध्ये हल्ला केला. तीन नागरिकांना ठार केलं. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. या महिलेचा गळा चिरुन त्याने तिची हत्या केली.

 • या घटनेबाबत ट्विट करताना आत्तापर्यंत झालेला रक्तपात पाहता लाखो फ्रेंच नागरिकांना ठार करण्याचा आणि आपला राग व्यक्त करण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे असं मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं आहे.

 • फ्रान्सचा इतिहास पाहिला तर आजवर त्या देशानेही लाखो माणसं मारली त्यामध्ये अनेक मुस्लिम होते. फ्रान्सने घडवलेला रक्तपात पाहता मुस्लिम लोकांनी जर राग व्यक्त केला आणि माणसं मारली तर त्यांना त्याचा पूर्ण हक्क आहे असंही महाथिर यांनी म्हटलं आहे.

 • काही दिवसांपूर्वी फ्रेंच शिक्षकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर आजच फ्रान्समधल्या चर्चमध्ये हल्ला झाला. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. दरम्यान मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मुस्लिमांना लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार आहे असं धक्कादायक ट्विट या घटनेबाबत केलं आहे.

या लढ्यामध्ये भारत फ्रान्ससोबत; पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध :
 • मोहम्मद पैगंबराच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादानं पुन्हा एकदा फ्रान्समध्ये रक्त सांडलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर गुरुवारी फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचे प्राण घेतले. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

 • मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्समधील एका चर्चमध्ये हल्लेखोरानं चाकू हल्ला केला. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्ला हू अकबरचे नारे दिल्याचं फ्रान्समधील काही माध्यमांनी म्हटलं आहे. फ्रान्समधील नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली. नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केलेला आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. “आज नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम ‘एल अ‍ॅण्ड टी’ला :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला मिळालं आहे. महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांना हा प्रकल्प जोडणार असून, गुजरातमधील कामाची ऑर्डर एल अ‍ॅण्ड टी या कंपनीला मिळाली आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.

 • देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट मिळवण्यात लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो ही कंपनी यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्यात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एनएचएसआरसीएल) १.०८ लाख कोटी कामाची निविदा खुली केली. ५०८ किमी लांबीच्या या कामासाठी आठ कंपन्या बोली लावण्यासाठी पात्र ठरल्या होत्या.

 • या आगामी बुलेट ट्रेनमुळे दोन शहरांतील अंतर दोन तासात गाठता येणार आहे. या निविदेमध्ये गुजरातमधील वापी ते वडोदरा या दरम्यानच्या एकूण आखणीच्या ४७ टक्के कामाचा समावेश आहे. यात चार रेल्वे स्थानके असणार आहेत. वापी, सुरत, भरूच आणि बिल्लीमोरा अशी त्यांची नावं आहेत. त्याचबरोबर २४ नद्या, ३० महामार्ग क्रॉसिंग असणार आहे.

३० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)