चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० मे २०२२

Date : 30 May, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय, पदार्पणाच्या हंगामात पटकावले विजेतेपद :
  • इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला आपल्या विजेता मिळाला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे.

  • आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत झाली. गुजरातने क्वॉलिफायर १ सामन्यात राजस्थानचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर, क्लॉलिफायर २ दोन लढतीमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ तुल्यबळ समजले जात होते. मात्र, राजस्थानच्या संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणे शक्य झाले नाही.

  • राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेल्या १३१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातचीही सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर वृद्धीमान साहा आणि त्यापाठोपाठ आलेला मॅथ्यू वेड झटपट बाद झाल्याने प्रतिस्पर्धी राजस्थानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

  • मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. ही जोडी विजेतेपदापर्यंत पोहचेल असे वाटत असताना हार्दिक पंड्या ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने शुभमनच्या साथीने संघाला आयपीएल विजेतपदावर कब्जा करण्यास मदत केली.

  • आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.

महासाथीतही नवउद्योगांची कामगिरी अभिमानास्पद ; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार :
  • ‘‘भारतातील किमान साडेसात हजार कोटींची उलाढाल असलेल्या नव उद्योगांची (युनिकॉर्न) संख्या या महिन्यात शंभर झाली आहे. ऐन करोना महासाथीच्या काळातही छोटी शहरे व गावांतून उदयाला येत असलेल्या नवउद्योगांनी (स्टार्टअप) व्यावसायिक मूल्याधिष्ठित संपत्तीची निर्मिती केली. या ‘युनिकॉर्न’चे एकूण मूल्यांकन ३३० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे २५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधताना काढले.

  • मोदी म्हणाले, की यापैकी ४४ ‘युनिकॉर्न’ गेल्या वर्षीच अस्तित्वात आले, हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे यंदा तीन-चार महिन्यांपूर्वी १४ नवीन ‘युनिकॉर्न’ने इतक्या कमी कालावधीत एवढय़ा मोठय़ा उलाढालीची भरारी मारली आहे. याचाच अर्थ या जागतिक साथीच्या काळातही आपले नवउद्योग (स्टार्टअप) संपत्ती आणि मूल्यनिर्मिती करत आहेत. भारतीय ‘युनिकॉर्न’चा वृद्धिदर हा अमेरिका, इंग्लंड आणि इतर अनेक देशांपेक्षा अधिक आहे. विश्लेषकांच्या मतानुसार येत्या काही वर्षांत यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

  • हे ‘युनिकॉर्न’ विविध क्षेत्रांत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की ई वाणिज्य, अर्थविषयक तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आदींचा त्यात समावेश आहे. या ‘स्टार्टअप’च्या जगात नव भारताचे चैतन्य प्रतििबबित होत आहे. आता हे नवउद्योगाचे जग मोठय़ा शहरांपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. छोटी शहरे, गावा-गावांतून उद्योजक उदयाला येत आहेत. भारतात ज्याच्याकडे नवनवीन कल्पना आहेत, त्याला संपत्ती उभी करण्याची संधी आहे. या नवउद्योगांना व नवउद्यमींना चांगल्या योग्य मार्गदर्शकाचीही गरज आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन करून हे मार्गदर्शक या नवउद्योगांना नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. भारतात नव्या उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी असे अनेक समर्पित मार्गदर्शक असल्याचा मला अभिमान आहे, असेही मोदींनी नमूद केले.

विवेकपूर्ण वापर करा; ‘आधार’चा विवेकपूर्ण वापर करा; केंद्राचे आवाहन :
  • आधार कार्डधारकांनी त्यांचा आधार क्रमांकाचा तपशील कुणालाही देताना सर्वसाधारण विवेक वापरावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

  • आधार कार्डाच्या तपशिलाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी त्यांच्या आधार कार्डाच्या छायाप्रती कुठल्याही संस्थेला देऊ नयेत, असा सल्ला देणारे निवेदन यूएडीएआयने २७ मे रोजी जारी केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना केंद्र सरकारने वरील सूचना केली आहे.

  • ‘यूएडीएआयच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २७ मे रोजी जारी केलेल्या निवेदनाच्या संदर्भात हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. फोटोशॉप केलेल्या आधार कार्डाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याच्या संदर्भात त्यांनी ते जारी केले होते, असे कळले आहे. लोकांनी त्यांच्या आधार कार्डाची छायाप्रत कुठल्याही संस्थेला देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो असा सल्ला या निवेदनात देण्यात आला होता. पर्याय म्हणून, आधार क्रमांकाचे केवळ अखेरचे चार आकडे दर्शवणारे झाकलेले आधार कार्ड वापरले जाऊ शकते’, असे सरकारने सांगितले.

  •  ‘तथापि, या निवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता लक्षात घेता, ते तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत आहे. आधार यंत्रणेत आधारधारकाची ओळख व गोपनीयता यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी उपाययोजना करण्यात आली आहे. कार्डधारकांनी त्यांचा १२ आकडी ओळख क्रमांक कुणालाही देताना सामान्य विवेक वापरावी’, असेही सरकारने स्पष्टीकरणात म्हटले आहे.

‘ऑल दॅट ब्रिद्स’ कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट! :
  • दिग्दर्शक शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रिद्स’ या माहितीपटाने ‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘ग्रॅन्ड ज्युरी’ पुरस्कार पटकावला होता. आता या कलाकृतीने ७५ व्या कान चित्रपट महोत्सवात शनिवारी सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्कारावर नाव कोरून सर्वाचे लक्ष वेधले आहे.

  • या पुरस्काराच्या निवड मंडळावरील सदस्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या विनाशकारी जगात प्रत्येक जीव आणि प्रत्येक लहान कृती महत्त्वाची आहे, याचे स्मरण करून देणारा हा माहितीपट आहे. 

  • ‘ऑल दॅट ब्रिद्स’ या ९० मिनिटांच्या माहितीपटात दिल्लीतील वायुप्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. महम्मद सौद आणि नदीम शेहजाद या भावंडांभोवती कथा फिरते. ते दोघे जण प्रदूषित हवामानात पक्ष्यांना, विशेषत: घारींना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करताना दिसतात.

‘पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ :
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

  • शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार लाभार्थ्यांना एकूण १८ हजार १५१ कोटी ७० लाख रुपये लाभ अदा करण्यात आलेला आहे.

  • लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

  • पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम १५ रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येईल.

पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धा - भारताच्या प्राचीला ऐतिहासिक कांस्य :
  • भारताच्या प्राची यादवने पोलंडमधील पोन्झनान येथे झालेल्या पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या व्हीएल २ प्रकारातील २०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली पॅरा-नौकानयनपटू ठरली.

  • प्राचीने व्हीएल २ प्रकारातील २०० मीटर शर्यतीत १ मिनिट आणि ०४.७१ सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. ऑस्ट्रेलियाची सुझान सिपेल (१ मिनिट ०१.५४ सेकंद) आणि कॅनडाची ब्रियाना हेनेसी (१ मिनिट ०१.५८ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक आपल्या नावे केले.

‘तोपर्यंत भारतात ‘टेस्ला’ कार येणार नाही, जोपर्यंत’….. इलॉन मस्क यांचे ट्विट :
  • भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी टेस्लाकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, आता भारतीय बाजारपेठेत टेस्ला कार आणण्याचा निर्णयाला इलॉन मस्क यांनी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत भारत टेस्लाने बनवलेल्या कार विकण्याची भारतात परवानगी देत नाही तोपर्यंत टेस्ला नव्या कार बनवणार नसल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. मस्क यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

  • परवानगी देण्याआधी भारत सरकारने टेस्लासमोर अट ठेवली आहे. केवळ भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक कार टेस्ला भारतात विकू शकते अशी अट भारत सरकारने टेस्ला कंपनीसमोर ठेवली आहे. तसेच आधी चीनमध्ये तयार केलेल्या कार भारतात विकून टेस्लाला भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा होता. या गोष्टीवरुन हा प्रस्ताव बराच काळापासून रखडला आहे.

  • टेस्लाला भारतात कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करात सूट हवी होती. जेणेकरुन टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या कारची मागणी तपासता येईल. मात्र टेस्लाला भारतात कार विकण्याअगोदर भारतात कारखाना सुरु करावा लागेल आणि भारतातच तयार केलेल्या कार विकता येईल अशी अट भारत सरकारने टेस्लासमोर ठेवली आहे. त्यामुळे चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात विकता येणार नाही, असे भारतानं स्पष्ट केले आहे.

३० मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.