चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० मार्च २०२०

Date : 30 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील विषाणूबळींची संख्या २७ वर :
  • करोनाच्या संसर्गामुळे रविवारी ६ राज्यांमध्ये नवे बळी गेल्यामुळे कोविड-१९च्या बळींची संख्या २७ वर पोहचली, तर करोनाबाधितांचा एकूण आकडा १०२४ झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या २४ तासांत करोनाबाधितांची संख्या १०६ ने, तर करोनाबळींची संख्या सहाने वाढली.

  • रविवारी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यांत प्रत्येकी एकजण करोनामुळे मरण पावल्याची माहिती मंत्रालयाने दिली.

  • देशातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ८६७ असून, ८६ लोक एकतर बरे झाले किंवा त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आणि एकाने स्थलांतर केले. देशातील एकूण १०२४  बाधितांमध्ये ४८ परदेशी नागरिक असल्याचे मंत्रालय म्हणाले.

  • देशात करोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून तेथील आकडा १८६ आहे, तर १८२ करोनाग्रस्तांसह केरळ त्याखालोखाल आहे. करोनामृत्यूंची (६) संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. याखालोखाल गुजरात (४), कर्नाटक (३), मध्यप्रदेश व दिल्ली (प्रत्येकी २) आणि केरळ, तेलंगण, तमिळनाडू, बिहार, पंजाब, पश्चिम बंगाल, जम्मू- काश्मीर व हिमाचल प्रदेश येथील प्रत्येकी एका बळीचा समावेश आहे.

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :
  • सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसने आता भारतात देखील आपले जाळे विस्तारण्यास झपाट्याने सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तरी देखील देशभरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची चिन्ह दिसत आहे.

  • केंद्र सरकारने अद्यापही सरकारीन सूचनांना गांभिर्याने न घेणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या आदेशाला झुगारून छुप्या पद्धतीने स्थलांतर करणाऱ्यांवर आता बारकाईने लक्ष असणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य व जिल्ह्यांच्या सीमा काटेकोरपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

  • याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्यांना हे देखील निर्देश देण्यात आले आहेत की, प्रवासी कामगारांना ते आहेत त्या ठिकाणीच सर्व सुविधा मिळतील याची खात्री करून घ्यावी. एवढच नाहीतर कामगारांना वेळच्यावेळी वेतन दिले जावे, यासाठी देखील सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कामगारांना जागा खाली करण्यास सांगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत.

जगभरातील बळींची संख्या ३१ हजारांपार :
  • जगभरात करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी ३१ हजार ४१२ झाल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांकडून गोळा केलेल्या माहितीवरून समोर आले. करोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांशहून अधिक युरोपमध्ये झाले आहेत.

  • गेल्या डिसेंबरमध्ये करोनाची साथ चीनमध्ये सर्वप्रथम आढळल्यानंतर करोनाची लागण झालेली ६,६७,०९० प्रकरणे १८३ देश आणि प्रदेशांमध्ये आढळली आहेत. यापैकी किमान १,३४,७०० प्रकरणांतील रुग्ण बरे झाल्याचे मानले जात आहे.

  • इटलीत फेब्रुवारी महिन्यात पहिला करोनाबळी गेला होता. आतापर्यंत तेथे १० हजार २३ लोक मृत्यूमुळी पडले असून, ९२४७२ लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर १२,३८४ लोक बरे झाले आहेत. इटलीप्रमाणेच स्पेनमध्येही चीनपेक्षा अधिक, म्हणजे ६५२८ लोक मरण पावले असून, ७८,७४७ लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

  • हाँगकाँग व मकाऊ वगळता चीनने आतापर्यंत आपल्या देशात ३२९५ मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. तेथे करोनाग्रस्तांची ८१३९४ प्रकरणे झाली असून ७४,९७१ लोक बरे झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले १५ महत्त्वाचे मुद्दे :
  • आज जवळपास ८ दिवस होत आले, संपूर्ण देश लॉकडाउन या परिस्थितीत आहे. पण या दिवसांमध्ये मी सर्वांना धन्यवाद देतोय कारण आपण आपल्या संयमाचे अतुलनीय असे दर्शन घडवलेले आहे.
  • जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा माझ्यासोबत आपण सगळे जण आहात. माझ्यासोबत आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील सगळे तिन्ही पक्ष आहेत, त्या पक्षांचे नेते आहेत.
  • विरोधी पक्षनेत्यांसोबत सुद्धा माझी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे सुद्धा फोन करून सूचना देत आहे.
  • हे संकट मोठे आहे आणि या संकटाशी लढण्यासाठी आपण एक अकाउंट उघडला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्येच एक वेगळा विभाग केला आहे.
  • आज सकाळीच मला उदय कोटक यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले “उद्धवजी, आप लढ़ रहे हो, हम आपके साथ है।” आणि त्यांनी १० कोटींची मदत जाहीर केली आहे.
  • आपण टीव्हीवर बघतो की, ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे, फार वाईट आणि भीषण परिस्थिती आहे. ती दृश्य बघितल्यानंतर आपण काळजी का घेण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात येईल.
  • संपूर्ण राज्यात नव्हे, संपूर्ण देशात इतर राज्यांतील कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की इतर राज्यातील कामगार जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा. आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे.
  • साखर कारखान्यांना मी विनंती करतो आहे, आपला जो कर्मचारी वर्ग आहे, कृपा करून आपण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या.
  • मी सर्वांना विनंती करतो की आपण संयमाचं अतुलनीय दर्शन घडवत आहेत पण अजूनही काही वस्त्यांमध्ये, विभागांमध्ये वर्दळ होत असेल तर ती वर्दळ ताबडतोब थांबवा. विनाकारण सरकारला कठोर पावले टाकायला लावू नका.
  • ही आणीबाणी आहे आणि आणीबाणी म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून वागलचं पाहिजे आणि ती वागण्याची विनंती मी तुम्हाला करतो.
  • केंद्र सरकार सुद्धा आपल्यासोबत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, प्रकाश जावडेकर माझ्याशी बोलत आहेत.
  • आपली जी आपण जेवणाची केंद्रे उघडली आहेत, ती ठिकठिकाणी उघडली आहेत तिथे आपण मोफत जेवणाची सोय केली आहे. शिवभोजन सुद्धा जे आपण १० रुपयाने देत होतो ते आपण पुढच्या ३ महिन्यासाठी ५ रुपयाने देत आहोत.
  • डॉक्टर लोकांचा मला अभिमान आहे. अभिमान एवढ्यासाठी की हे भयानक संकट असताना या डॉक्टरांचं मला खरंच कौतुक करावं वाटते. त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मानाचा मुजरा करतो.
  • आज रविवार आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे. पण ही मंडळी रविवार असो वा नसो, आपल्यासाठी अहोरात्र २४ तास जीवावर उदार होऊन मेहनत करत आहेत. खूप मोठं धोक्याच काम आहे.
  • आपण आता चाचणी केंद्र आणि टेस्ट करण्याच्या सुविधा वाढवलेल्या आहेत. एक गोष्ट अपेक्षित आहे की करोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे पण ती अपेक्षेप्रमाणे वाढली पाहिजे, त्याच्या पलीकडे वाढता कामा नये.

३० मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.