चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 जानेवारी 2024

Date : 30 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मोदी सरां’च्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मिळाला ‘गुरुमंत्र’, पंतप्रधानांनी दिल्या ‘या’ टिप्स
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं आहे. परीक्षा देण्याचा क्षण हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच कुठल्याही प्रकारचं आव्हान स्वीकारण्यासाठी तयार व्हा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदी सरांना आज विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या.

परीक्षेबाबत विचार करु नका

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हळूहळू अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. तुम्ही त्याचा ताण घेऊन नको. अनेकदा मुलं परीक्षेचा ताण घेतात. त्याचं महत्त्वाचं कारण असतं की पालक दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना करतात. त्याला इतके चांगले मार्क मिळाले, तुला नाही असं म्हणतात. हे असं करणं पालकांनी टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे मुलांवरचा अभ्यासाचा ताण वाढतो. मुलांनी ज्या अडचणी येतात त्या आई-वडील आणि शिक्षकांशी बोललं पाहिजे. परीक्षेचा फार विचार न करता योग्य पद्धतीने तयारी केली पाहिजे.”

अनेकदा कुटुंबातले लोकही तणावासाठी जबाबदार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आई वडील बऱ्याचदा मुलांवर दडपण निर्माण करतात. दुसऱ्या घरातल्या मुलांची तुलना आणि आपल्या मुलाशी करतात. तसंच अनेकदा शिक्षकही ताण देतात. मी पालकांना आणि शिक्षकांना हे सांगू इच्छितो की तुम्ही तुलना करु नका. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष भावना किंवा तिरस्कार निर्माण होऊ शकतो.

कुणाचाही द्वेष किंवा तिरस्कार करु नका

  • यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्हाला जर कुणाशी तुलना करायची आहे तर ती तुलना इतर कुणाशी न करता स्वतःशी करा. एखाद्याला १०० पैकी ९० गुण मिळत असतील तर हे लक्षात घ्या की आपण मेहनत जास्त केली पाहिजे किंवा आपण गुण वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. स्पर्धा स्वतःशी करा.”
जिल्ह्यांची प्रगती मोजणाऱ्या निर्देशांकाचे दुसरे पर्व
  • महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ढोबळमानाने नव्हे तर जिल्ह्याजिल्ह्याच्या प्रगतीच्या आधारे वेध घेणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ या उपक्रमास सुरुवात झाली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांचे आर्थिक, पायाभूत, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध निकषांच्या आधारे मोजमाप करणाऱ्या या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष असून यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा एका विशेष सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’चे मुख्य प्रायोजक असून ‘नॉलेज पार्टनर’ गोखले इन्स्टिट्यूट, पुणे हे आहेत.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाचा शास्त्रोक्त पद्धतीने आढावा घेऊन त्याआधारे जिल्ह्यांच्या कामगिरीची क्रमवारी मांडणाऱ्या ‘जिल्हा निर्देशांक’ची ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षी सुरुवात केली होती. त्याअंतर्गत जिल्ह्यांच्या आर्थिक, पायाभूत आणि सामाजिक विकासाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले होते. हे करताना कमी विकसित जिल्हे आणि अतिविकसित जिल्हे यांना एकाच पारड्यात न तोलता त्यांची वर्गवारी करून निर्देशांक ठरवण्यात आला. ही मांडणी असलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’च्या अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. त्यात मुंबई, नागपूर, नांदेड, लातूर, अमरावती, परभणी, सोलापूर, सातारा हे आठ जिल्हे आणि आश्वासक प्रगतीबद्दल नंदुरबार जिल्ह्याचा गौरव करण्यात आला होता. या उपक्रमाचे प्रशासकीय आणि राजकीय प्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेतूनही स्वागत करण्यात आले होते. याच उपक्रमाचे दुसरे पर्व आता सुरू होत आहे.
  • यंदाही विविध मानकांमध्ये प्रगती करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यांची निवड करण्याकरिता सांख्यिकी विश्लेषणाची जबाबदारी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती करणार आहे. निर्देशांक ठरवणाऱ्या निकषांमध्येही यंदा वाढ करण्यात आली आहे. राज्याची अर्थव्यवस्था २०२७-२८ पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची योजना आहे. यासाठी सरकारने विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्याकरिता राज्य सरकारने नेमलेल्या आर्थिक विकास परिषदेने विकास दर १४ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे. या दृष्टीने विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या प्रगतीचा आढावा या उप्रकमातून घेण्यात येईल.
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य घेण्यास नकार, शिक्षणसंस्था चालकांची टोकाची भूमिका
  • राज्य शिक्षणसंस्था संचालक महामंडळाने विविध मागण्यांसाठी दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. शाळा इमारती या परीक्षांसाठी दिल्या जाणार नाहीत. मात्र आता शासनाने दखल घ्यावी यासाठी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षाच होवू न देण्यासाठी या परीक्षेचे साहित्य धुडकावून लावण्याची भूमिका जाहीर केली. संघटनेचे नेते मेघश्याम करडे यांनी स्पष्ट केले की आम्ही परीक्षा बहिष्काराची हाक दिली आहे. पण त्यापूर्वी आता एकही शाळा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मंडळास सहकार्य करणार नसल्याचे ठरले आहे. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असल्याचे ते म्हणाले.
  • संघटनेने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनाच खुले पत्र देत भूमिका मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रास हे उत्तर होते. या संघटनेने मुख्यमंत्री शिंदे यांना काही प्रश्न केलेत. राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. विषयनिहाय पारंगत शिक्षक नाहीच. रोबोटिक प्रयोगशाळेत पदवीधर किंवा अभियंता शिक्षक नेमण्याचे आदेश काढले, पण एकही नियुक्ती नाही. विषय शिक्षक नाही अन् विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न कसे ? मराठी शाळांची स्थिती विदारक झाली असून शिक्षक, शिपाई, परिचर, लिपिक नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे. बहुजन वर्गास मिळणारे मोफत शिक्षण बंद करण्याचे हे षडयंत्र असून शिक्षणक्षेत्र कॉर्पोरेटकडे देण्याचा डाव आहे. परिपत्रकांचा भडिमार करून आलबेल असल्याचे चित्र निर्माण करणार का ? असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे. भौतिक सुविधा नाहीत. इमारती मोडकळीस आल्यात. २००४ पासून भाडे मिळाले नाही. पिण्याचे पाण्याचे बिल देत नाही. मग आठ दिवसांत शाळा सुंदर कशी करणार. जेव्हा सर्व मराठी शाळा बंद पडतील तेव्हाच डोळे उघडतील. मात्र तोवर वेळ निघून गेली असेल. प्रचंड पैसे मोजून शिक्षण घ्यावे लागेल आणि पैसे नसल्याने हा समाज आदिम संस्कृतीकडे वाटचाल करणार, असा गर्भित धोका मुख्यमंत्री शिंदे यांना सूचित करण्यात आला आहे.
  • शिक्षण घेण्याची क्षमता संपलेली असेल. पोटचे गोळे गुरे ढोरे राखतील. मुख्यमंत्री शिंदे सांगा, अशी व्यवस्था व्हावी का. हे असे घडू नये म्हणून आंदोलन करणार. शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारे धोरण राबविणाऱ्या शासन व प्रशासन विरोधात संघर्ष करणार. संघर्षासाठी तयार व्हा, असे आवाहन याच पत्रातून पालकांना पण करण्यात आले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्राकडून मराठ्यांच्या या १२ किल्यांना मिळाले नामांकन; जाणून घ्या कोणते किल्ले
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
  • प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
भारतीय लष्करात अधिकाऱ्यांचा फिटनेस दर्जा घसरला, शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी आता नवी नियमावली
  • भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना अनेकदा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काही अधिकारी लठ्ठपणा तसेच इतर आजारांनी त्रस्त होतात. ही समस्या लक्षात घेऊन भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. लष्करी अधिकारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (फिट) असावेत, या उद्देशाने लष्कराच्या सर्व कमांड्सना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली आहे. अनेकदा देशाअंतर्गत तसेच देशाबाहेरील मोहिमेवर असलेल्या अधिकाऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावतात.
  • नव्या बदलानुसार ब्रिगेडियर रँकवरील अधिकाऱ्याकडून अधिकारी तसेच जवानांची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. या आधी कमांडिंग ऑफिसरकडून जवानांची दर तीन महिन्यांच्या अंतराने फिटनेस टेस्ट घेतली जात होती. सध्या प्रत्येक जवान व अधिकाऱ्याच्या शारीरिक तंदुरुस्तीची नोंद APAC card (Army Physical Fitness Assessment card) वर केली जाते. भारतीय लष्कराकडून अधिकारी व जवानांची शारीरिक कार्यक्षमता तपासण्यासाठी दर तीन महिन्यांच्या अंतराने दोन चाचण्या घेतल्या जातात. युद्ध शारीरिक कार्यक्षमता चाचणी (BPPT-Battle Physical Efficiency Test) व शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PPT-Physical Proficiency Test) अशी या चाचण्यांची नावे आहेत. प्रत्येक जवानाच्या शारीरिक चाचणीच्या निकालाची नोंद एसीआर (Annual Confidential Report) मध्ये नोंदवून घेतली जाते.
  • या दोन चाचण्यांसमवेत आता आणखी एक चाचणी लष्करी अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. त्यानुसार दर सहा महिन्यांनी १० किमी स्पीड मार्च, ३२ किमी रुट मार्च व वर्षातून एकदा ५० मीटर जलतरण चाचणी अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. नव्या धोरणानुसार या चाचण्यांमध्ये लठ्ठपणामुळे अपयशी होणाऱ्या अधिकाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी त्यांना लेखी माहिती पुरवली जाणार आहे. गरज पडल्यास त्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात देखील होऊ शकते. याबाबत लष्करातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की लष्करातील अधिकाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती खालावत असल्याने नव्या नियमावलीची गरज होती. त्यादृष्टीने कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे.

 

हॉकीसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतून ऑलिम्पिक पात्रता
  • या वर्षी होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा हॉकीसाठी ऑलिम्पिक पात्रता फेरी असेल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्ष इक्रम तय्यब यांनी रविवारी केली.
  • आशियाई क्रीडा स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसार गेल्या वर्षी चीनमध्ये हँगझू येथे होणार होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता या स्पर्धेचे आयोजन यंदा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत केले जाणार आहे. तय्यब ‘एफआयएच’चे अध्यक्ष असून हँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वय समितीचे सदस्यही आहेत. आशियाई ऑलिम्पिक समितीचे प्रमुख भारताचे रणधीर सिंग या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.
  • ‘‘मी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समन्वय समितीचा सदस्य आहे. आशियाई स्पर्धा होणार यात शंका नाही,’’ असे तय्यब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘मार्चमध्ये समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पूर्ण आढावा घेतला जाईल. सर्व केंद्र तयार असल्यामुळे नव्या तारखेनुसार स्पर्धा होण्यात काहीच अडथळे येणार नाहीत,’’ अशी माहितीही तय्यब यांनी दिली.
  • ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेतून नेहमीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळते. मात्र, या स्पर्धा एकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. चीनमधील करोनाच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या आयोजनाविषयी संदिग्धताच होती. परंतु, यातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे आता पात्रता फेरीसाठी वेगळय़ा कुठल्या स्पर्धेची गरज नाही,’’ असेही तय्यब यांनी सांगितले.
नोव्हाक जोकोविच १०व्यांदा बनला ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन, विजेतेपदाबरोबर केले नवीन विक्रम
  • गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. सर्बियाच्या टेनिस स्टारने वर्षभरानंतर शानदार पुनरागमन करत विक्रमी १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. रविवारी खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने ग्रीक खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
  • जोकोविचने त्सित्सिपासला संधी दिली नाही - जोकोविचने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ असा घेतला. यानंतर त्सित्सिपासने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले पण जोकोविचने दुसरा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ अशा फरकाने जिंकला. तिसर्‍या सेटमध्येही दोन्ही खेळाडू ६-६ ने बरोबरीत होते, त्यानंतर जोकोविचने टायब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि दहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
  • राफेल नदालशी बरोबरी केली - या विजेतेपदासह ३५ वर्षीय जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. दोघांच्या खात्यात आता २२-२२ जेतेपदे आहेत. निवृत्त रॉजर फेडरर २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जोकोविचच्या २२ विजेतेपदांमध्ये १० ऑस्ट्रेलियन ओपन, २ फ्रेंच ओपन, ७ विम्बल्डन आणि ३ यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.

जोकोविचनने अनेक विक्रम केले
पुरुष एकेरीची सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू

  • २२- नोव्हाक जोकोविच
  • २२- राफेल नदाल
  • २०- रॉजर फेडरर
  • १४- पीट सॅंम्प्रास
विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार! भारताच्या लेकींच्या गौरवाचा नरेंद्र मोदी स्टेडियम होणार साक्षीदार
  • दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर १९ टी२० विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. यासोबतच या पहिल्या विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.
  • भारतीय महिलांनी अंडर-१९ विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह यांनी संघाचे ट्विट करून अभिनंदन केले. त्यात ते म्हणतात, “अंडर-१९ विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. आमच्या युवा क्रिकेटपटूंनी देशाला अभिमान वाटावा अशी एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या मोठ्या आणि आनंदाच्या प्रसंगामुळे तरुण महिला खेळाडू केवळ भारावून गेले नाहीत हे त्यांच्या जमिनीवर पाय घट्ट रोवून उभ्या असण्याचा स्वभाव दाखवून देतो.”
  • महिला विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार - भारतीय महिलाच्या अंडर-१९ विश्वचषकातील विजयी कामगिरी नंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. न्यूझीलंड सोबत सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी२० आधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात ते म्हणतात,”मी शफाली वर्मा आणि तिच्या विजयी संघाला आमंत्रित करतो. ती आणि तिचा विजयी संघ आमच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सहभागी होईल आणि १ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० चे साक्षीदार होईल. ही अतुलनीय कामगिरी साजरी करण्यासाठी निश्चितच उत्सवाची गरज आहे.”
एमपीएससी’ भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! विभागनिहाय गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पदभरतीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, ‘एमपीएससी’ने पूर्व परीक्षेसाठी प्रत्येक विभागानुसार गुणवत्ता यादी (कट-ऑफ) जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने एकच विद्यार्थी सर्व विभागांच्या यादीमध्ये पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे.
  • ‘एमपीएससी’ने संयुक्त गट-ब आणि गट-क संवर्गातील ८,१६९ विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. लिपिक -टंकलेखक पदासाठी विभाग/प्राधिकारीनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या जाहिरातीत नमूद आहे. जाहिरातीत एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून २८० पोट विभाग/प्राधिकरण आहेत. यात अन्न व पुरवठा विभागात सर्वाधिक म्हणजे ११५३ जागा आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून निवड करू शकतात. 
  • त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक विभागांसाठी अर्ज करणार हे निश्चित आहे. आयोगाकडून सर्व विभागातील लिपिक-टंकलेखक पदसाठी समान पूर्व परीक्षा घेणार आहे. मात्र, त्यांची गुणवत्ता यादी राज्यनिहाय जाहीर न करता ती विभागनिहाय जाहीर होणार आहे. परिणामी, गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी हे त्यांनी अर्ज केलेल्या सर्वच विभागामध्ये पात्र ठरतील. यामुळे त्यांच्या खालोखाल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतूनच बाद केले जाणार असल्याने त्यांना मुख्य परीक्षेची संधीच मिळणार नाही. याउलट राज्यनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केल्यास अन्य विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊन त्यांनाही मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने जाचक अटीमध्ये बदल करावा अशा मागणीचे निवेदन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आयोगाला दिले आहे.
  • यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन आणि संदेशालाही उत्तर दिले नाही.
भारताच्या नसानसांमध्ये लोकशाही; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन
  • लोकशाही ही भारताच्या नसानसांमध्ये वाहत असून ती आपली संस्कृती आहे. गेल्या अनेक शतकांपासून लोकशाही आपल्या कार्यशैलीचे अविभाज्य अंग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
  • केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया - द मदर ऑफ डेमोक्रसी’ या पुस्तकाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, की नैसर्गिकरीत्याच आपला समाज लोकशाहीवादी आहे. लोकशाहीची मातृभूमी या नात्याने आपण तिच्या मूल्यांबाबत नेहमी चर्चा केली पाहिजे आणि जगालाही ज्ञान दिले पाहिजे. यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल. 
  • इंडियन काऊंसिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्चने हे पुस्तक संपादित केले असून त्यात जुन्या काळापासून देशात असलेल्या लोकशाही मूल्यांबाबत लेखांचा त्यात समावेश आहे.

30 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.