चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० जानेवारी २०२०

Date : 30 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यशासाठीही काटेकोर नियोजन आवश्यक-चौगुले : 
  • सांगली : आई संसारात ज्याप्रमाणे नियोजनबध्द वागत असते आणि संसार अधिकाधिक चांगला होईल याची दक्षता घेते त्याचप्रमाणे आपण यशासाठीही काटेकोर नियोजन केले तर यश तर मिळतेच, पण त्याचबरोबर अवर्णनीय मानसिक आनंदही लाभतो, असे मत शरीरसौष्ठव स्पर्धेत विश्व चॅम्पियन किताब प्राप्त खेळाडू संग्राम चौगुले यांनी व्यक्त केले.

  • क्रीडा क्षेत्रामध्ये गेले एक शतक कार्यरत असलेल्या अंबाबाई तालीम संस्थेच्यावतीने चौगुले यांना संस्थेचे अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संजय भोकरे यांच्या हस्ते चांदीची गदा, रोख पुरस्कार आणि आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  • या वेळी बोलताना चौगुले म्हणाले, नियोजन करून जर प्रयत्न केले तर यश मिळतेच पण हल्लीच्या तरुणाईकडे नियोजन असले तरी सातत्याचा अभाव दिसतो. याचा परिणाम सफलतेवर होतो. मात्र या अपयशालाच एक अभ्यास म्हणून पाहिले तर कोणतीही स्पर्धा कठीण वाटत नाही. आई ज्याप्रमाणे संसार नेटका करण्यासाठी प्रयत्नशील असते, त्याच पध्दतीने आपणही एखाद्या स्पर्धेकडे पाहिले पाहिजे. घरातील सर्व लोकांचा स्वभाव पाहून आई सर्वाना रूचेल, पटेल अशा पध्दतीने निर्णय घेत असताना स्वमताचाही आदर करीत असते. हाच आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे.

अंतराळात दोन निकामी उपग्रह धडकण्याची शक्यता : 
  • वॉशिंग्टन : अवकाशात दोन उपग्रहांची टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांची नावे आयआरएएश व जीजीएसइ ४ अशी आहेत. ते एकमेकावर आदळण्याची शक्यता ही शंभरात १ इतकी आहे.

  • या उपग्रहांची टक्कर रोखण्यासाठी कोणताही उपाय नाही, कारण ते निकामी उपग्रह असून त्यांच्याशी संपर्क साधणारी कुठलीही यंत्रणा चालू नाही. प्रत्यक्ष टकरीपेक्षा यातून निर्माण होणारा अवकाश कचरा ही मोठी डोकेदुखी आहे.

  • दी इन्फ्रारेड अस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाइट व ग्रॅव्हिटी ग्रॅडिअंट स्टॅबिलायझेशन एक्सपिरिमेंट (जीजीएसइ ४) हे दोन उपग्रह ताशी १४ किमी वेगाने प्रवास करीत असून लिओलॅबच्या माहितीनुसार ते एकमेकांवर आदळण्याची शक्यता शंभरात एक आहे. कदाचित ते एकमेकांजवळून जातील व टक्कर १५ ते ३० मीटरच्या अंतर फरकाने टळू शकते. हे उपग्रह निकामी असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण आहे. यापूर्वी काही उपग्रह साठ किलोमीटर जवळ आले होते, आताच्या उपग्रहांमध्ये तर हे अंतर कमी आहे.

  • आयआरएएस उपग्रह १०८३ किलोचा असून जीजीएसइ उपग्रह ४.५ किलो वजनाचा आहे. उपग्रह एकमेकांवर आदळले तर अवकाश कचरा निर्माण होतो. भारताने मिशन शक्तीमध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने एक उपग्रह फोडला होता त्यामुळे अवकाश कचरा निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. अवकाश कचरा पृथ्वीवर पडण्याची स्थिती आली तरी तो तेथून खाली येताना आकाशातच जळून जातो. पृथ्वीच्या कक्षेत एलन मस्क यांच्या स्टारलिंकचे १२ हजार उपग्रह सोडले जाणार आहेत. एकूण ३० हजार उपग्रह सोडण्याची त्यांची योजना आहे. सध्या पृथ्वीच्या कक्षेत चालू अवस्थेतील दोन हजार उपग्रह असून निकामी उपग्रहांसह एकूण नऊ  हजार उपग्रह फिरत आहेत.

६ हायस्पीड, सेमी-हायस्पीड कॉरिडॉरसाठी ६ रेल्वेमार्ग : 
  • नवी दिल्ली : अति वेगवान (हायस्पीड) आणि सेमी-हायस्पीड कॉरिडॉरसाठी रेल्वेने देशातील ६ मार्ग निश्चित केले असून, त्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या दोन मार्गाचा समावेश आहे.

  • हे नवे ६ मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती देतानाच, या मार्गाबाबतचा एक विस्तृत अहवाल एका वर्षांच्या आत तयार केला जाईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वाय.के. यादव यांनी बुधवारी सांगितले. हे नवे मार्ग सध्या बांधकाम सुरू असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड मार्गाला जोडले जाणार आहेत.

  • हायस्पीड कॉरिडॉरवर गाडय़ा ताशी कमाल ३०० किलोमीटरहून अधिक वेगाने धावू शकतात; तर सेमी- हायस्पीड कॉरिडॉरवर त्यांचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटरहून अधिक असू शकतो.

  • या ६ कॉरिडॉरमध्ये दिल्ली- नॉयडा- आग्रा- लखनऊ- वाराणसी (८६५ किमी) आणि दिल्ली- जयपूर- उदयपूर- अहमदाबाद (८८६ किमी) यांचा समावेश असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या पत्रकार परिषदेत यादव यांनी सांगितले.

युरोपीय संसदेतील ‘सीएए’विरोधी ठरावावरील मतदान लांबणीवर : 
  • लंडन : भारताच्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) युरोपीय संसदेच्या सदस्यांनी मांडलेले ५ ठराव एकत्र करून एक संयुक्त प्रस्ताव बुधवारी ब्रसेल्समध्ये युरोपीय संसदेच्या सत्रात चर्चेसाठी मांडण्यात आला. मात्र, या ठरावावरील मतदान मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले. 

  • ‘सीएए’ हा मूलभूत भेदभाव करणारा असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्तांनी (यूएनएचसीआर) आपल्या निवेदनात नमूद केले होते. या निवेदनाची, तसेच मानवाधिकारांबाबत युरोपीय संघाच्या (ईयू) मार्गदर्शक तत्त्वांची या प्रस्तावात दखल घेण्यात आली असून, ‘या पक्षपाती सुधारणा रद्द कराव्यात’, असे आवाहन भारत सरकारला करण्यात आले आहे. या ठरावावर गुरुवारी मतदान होणे अपेक्षित होते. मात्र, ते मार्चपर्यंत लांबणीवर गेले आहे.

तीन महिन्यांत लसनिर्मितीची अमेरिकेची योजना :
  • वॉशिंग्टन : चीनमध्ये पसरलेल्या घातक करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस तयार करीत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांना चीनने सहकार्य करावे अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेने दोन चमू तयार केले असून ते या विषाणूची माहिती घेत आहेत.

  • या विषाणूने चीनमध्ये १३२ बळी घेतले असून अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थेने या विषाणू प्रतिबंधासाठी लस तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. लस तयार करून पहिली चाचणी घेण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले आहे. एनआयएच या संस्थेचे अधिकारी अँथनी फॉसी यांनी म्हटले आहे की, चीनमधील परिस्थिती भयानक असून तेथे तातडीने लस उपलब्ध होण्याची गरज आहे.

  • २००२-२००३ मध्ये चीन व हाँगकाँगमध्ये सार्स म्हणजे सीव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोमची साथ होती त्याच वेळी अमेरिकेने लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते पण ती नंतर तयारच झाली नाही. चीनने या नवीन विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्यास मदत करावी. आमच्या पथकांना तेथे येऊ द्यावे असे अमेरिकेचे आरोग्य मंत्री अ‍ॅलेक्झ अझार यांनी म्हटले आहे.

चीनमधील Google ची सर्व कार्यालये बंद : 
  • अग्रगण्य टेक कंपनी गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलची हाँगकाँग, तैवान आणि मेनलँड चाइनामधील सर्व कार्यालये बंद असणार आहेत.

  • कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील सरकारने नागरीकांना प्रवास टाळण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

  • सरकारच्या सूचनेनुसार कंपनीने सर्व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं गुगलच्या प्रवक्त्याने The Verge सोबत बोलताना सांगितले. याशिवाय कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरुन काम करण्याची मूभाही देण्यात आली आहे.

३० जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.