चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 डिसेंबर 2023

Date : 30 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराट कोहलीने रचला इतिहास! १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
  • सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. त्यामुळे टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. दरम्यान विराट कोहलीने २०२३ साली एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने केला नाही. सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करणारा महान खेळाडू सचिन तेंडुलकरही आपल्या कारकिर्दीत असा विक्रम करू शकला नाही.

विराट कोहलीने रचला इतिहास -

  • खरंतर, विराट कोहलीने २०२३ सालची शेवटची इनिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात खेळली होती. या डावात कोहलीने ७६ धावा केल्या आणि या धावांसह विराट कोहली २०२३ मध्ये २००० हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यामध्ये तिन्ही फॉरमॅटच्या धावांचा समावेश आहे. विराट कोहलीने यावर्षी एकूण २०४८ धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये २००० हून अधिक धावा केल्यानंतर, विराट कोहली सात कॅलेंडर वर्षांत २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या अगोदर हा विक्रम सहावेळा २०००हून अधिक धावा करणाऱ्या कुमार संगकाराच्या नावावर आहे.

सातव्यांदा दोन हजारांपेक्षा जास्त धावा केल्या -

  • विराट कोहलीने २०१२ मध्ये पहिल्यांदा २००० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१६ ते २०१९ अशी सलग चार वर्षे विराट कोहलीने २००० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. मात्र, २०१९ नंतर विराट कोहलीची बॅट शांत झाली आणि त्यानंतर पुढील तीन वर्षे विराट कोहलीच्या बॅटने तशी कामगिरी केली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. या काळात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही, पण २०२२ मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवला आणि आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले.

कोहलीने कोणत्या वर्षात २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ते जाणून घेऊया.

  • १. २०१२ मध्ये २१८६ धावा केल्या
  • २. २०१४ मध्ये २२८६ धावा केल्या
  • ३. २०१६ मध्ये २५९५ धावा केल्या
  • ४. २०१७ मध्ये २८१८ धावा केल्या
  • ५. २०१८ मध्ये २७३५ धावा केल्या
  • ६. २०१९ मध्ये २४५५ धावा केल्या
  • ७. २०२३ मध्ये २०४८ धावा केल्या
देशातील प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांना परदेशांत मागणी
  • देशातून होणाऱ्या कृषी निर्यातीत प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा वाटा वाढला आहे. एकूण कृषी निर्यातीत २०१४-१५मध्ये प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा वाटा १३.७ टक्के होता, तो २०२२-२३मध्ये २५.६ टक्क्यांवर गेला आहे. देशात अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना दिल्याचा सकारात्मक परिणाम निर्यातीवर दिसून आला आहे.
  • केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासारख्या योजनांच्या माध्यमातून देशात खाद्यप्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली आहे. सन २०१४-१५मध्ये देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाचे एकूण मूल्य १.३४ लाख कोटी रुपये होते, ते २०२१-२२मध्ये २.०८ लाख कोटींवर गेले आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०२३ या काळात देशातील अन्नप्रक्रिया उद्योगात ६,१८५ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. खाद्यप्रक्रिया उद्योगात झालेल्या या उलाढालीमुळे देशातून होणाऱ्या कृषी निर्यातीत प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचा वाटा २५.६ टक्क्यांवर गेला आहे.
  • आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत स्थानिक शेतीमालावर प्रक्रिया उद्योग वाढीस लागावा, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. केंद्र सरकारच्या वतीने २०२० ते २०२५ या काळात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एक जिल्हा, एक उत्पादन या योजनेंतर्गत देशातील दोन लाख संस्था, प्रक्रियादारांना एकत्र बांधण्याचे धोरण आहे.
  • देशातील १.३५ लाख बचत गटांना थेट निधी
  • जानेवारी २०२३ पासून आजवर देशातील ५१,१३० प्रक्रियादारांना सवलतीत कर्ज, अनुदान, मूल्यवर्धन आणि निर्यात साखळीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. १.३५ लाख स्वयंसहायता बचत गटांना ४४०.४२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे, असेही केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने म्हटले आहे.
बेरोजगारी, महागाईच्या समस्येचं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…
  • पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय स्तरावर एकीकडे भाजपाप्रणीत एनडीए तर दुसरीकडे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. त्यातच विरोधकांनी आपल्या सभा व जाहीर भाषणांमधून मोदी सरकारवर सातत्याने टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परखड सवाल केले असून त्यासंदर्भात मोदींच्या उत्तराची अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होत. त्यावर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका मांडली आहे.
  • या मुलाखतीमध्ये मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात भारतातील वेगवेगळ्या समस्यांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. भाजपाकडून हे सारे आरोप वेळोवेळी फेटाळण्यात आले असले, तरी मोदींनी अद्याप यावर जाहीरपणे भाष्य केलेलं नव्हतं. आता या मुलाखतीच्या निमित्ताने मोदींनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

  • मोदींनी यावेळी महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “आपण थोडा वेळ यावर होणारे आरोप बाजूला ठेवुयात आणि तथ्यांवर बोलू. या काळात दोन वर्षं न भूतो न भविष्यती असं करोनाचं संकट उद्भवलं होतं. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली होती. अनेक देशांमध्ये मंदीसदृश्य परिस्थिती होती. मात्र तरीही भारतानं या संकटाशी उल्लेखनीय ठरावा असा सामना केला आणि आपली पत राखली”, असं मोदी यावेळी म्हणाले.
  • “जागतिक पातळीवरचं संकट, गंभीर आव्हानं, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, भौगोलिक व राजकीय स्तरावर निर्माण झालेले वाद यामुळे जगभरात मूलभूत गरजेच्या गोष्टींच्या किमतीही वाढल्या होत्या. २०१४-१५ ते २०२३-२४ या काळातली सरासरी महागाई ५.१ टक्के होती. २००४ ते २०१४ या काळात हीच महागाई ८.२ टक्क्यांवर होती. मग यापैकी कोणता महागाईचा दर जास्त आहे?” असा सवाल नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत केला.
पंतप्रधानांच्या भेटीसाठी अयोध्या नगरी सज्ज
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज, शनिवारच्या भेटीसाठी अयोध्या शहर सज्ज झाले आहे. फुले, म्युरल्स आणि सजावटीचे स्तंभ यांनी शहर नटले असून, शहरात सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
  • पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे आणि नव्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी या शहरात येत आहेत.
  • सकाळी पावणेअकराच्या सुमारास अयोध्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी थेट अयोध्या रेल्वे स्थानकावर जाऊन त्याचे उद्घाटन करतील. यानंतर ते विमानतळावर परत येतील व नवनिर्मित विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करतील. सुमारे तासभर चालणाऱ्या या सभेला दीड लाख लोक हजर राहण्याची अपेक्षा आहे, असे अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले.
  • अलीकडेच पुनर्विकसित करण्यात आलेल्या ‘राम पथाच्या’ आणि रेल्वे स्थानक ते विमानतळ या पंतप्रधानांच्या मार्गावरील इतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते लाकडी अडथळे उभारण्याचे काम प्रशासनाने गुरुवारी सुरू केले.
  • विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर मोदी ‘रोड शो’ करतील आणि अयोध्यावासीयांच्या स्वागताचा स्वीकार करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आणि ‘अयोध्येच्या पवित्र शहरात स्वागत’ असा संदेश असलेली भव्य पोस्टर्स या शहरातील निरनिराळया प्रमुख ठिकाणी उभारण्यात आली आहेत. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ‘प्रभू राम की नगरी में आपका स्वागत है’, असा संदेश असलेले प्रचंड पोस्टर लावण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे शरद पवार, आठवले, आंबेडकर यांना राम मंदिराचे निमंत्रण
  • आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपावरून इंडिया आघाडीमध्ये वाद-प्रतिवाद झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेना उबाठा गटाने २३ जागांवर दावा केला असून काँग्रेसने एवढ्या जागा शिवसेनेला सोडण्यास विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जागावाटपाची चर्चा माध्यमांसमोर न करता बंद खोलीत करण्याचे आवाहन केले.
  • दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देण्याचा मार्ग जाहीर केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काँग्रेसचा १३९ वा वर्धापन दिन नागपूर येथे (दि. २८ डिसेंबर) संपन्न झाल्यानंतर त्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.

 

देशात कुठूनही मतदानाची सुविधा; एका यंत्राला ७२ मतदारसंघ जोडण्याची चाचपणी; काँग्रेसचा विरोध :
  • देशांतर्गत स्थलांतरित नागरिकांना आपापल्या मतदारसंघात न जाता कुठूनही मतदान करता यावे, यासाठी खास सुविधा पुरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. दूरस्थ मतदानाच्या सुविधेसाठी मतदानयंत्राचे प्रारूप तयार करण्यात आले असून, १६ जानेवारी रोजी राजकीय पक्षांसमोर सादरीकरण होणार आहे. मात्र काँग्रेसने या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.

  • देशातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी बहुमतदारसंघीय दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. दूरस्थ मतदारकेंद्रातील एका मतदारयंत्राला एकाचवेळी ७२ मतदारसंघ जोडलेले असतील. या मतदारसंघांतील नोंदणीकृत मतदाराचे मत हे मतदानयंत्र स्वीकारेल.

  • केंद्रीय निवडणूक आयोगाला या सुविधेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कायदेशीर तसेच, तांत्रिक पूर्तता करावी लागेल. त्याआधी प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा राबवण्यापूर्वी मतदानयंत्राच्या प्रारूपावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांसमोर सादरीकरण केले जाणार आहे.

  • ३१ जानेवारीपर्यंत लेखी सूचना वा हरकती पाठवण्याचे आवाहन पक्षांना केल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. देशातील स्थलांतरितांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी, रोजगार, लग्न, शिक्षण अशा विविध कारणांमुळे प्रामुख्याने ग्रामीण भागांतील लोक देशांतर्गत स्थलांतर करतात. त्यापैकी ८५ टक्के देशांतर्गत स्थलांतर आपापल्या राज्यामध्येच होते. या स्थलांतरित मतदारांना त्यांच्या विद्यमान निवासाच्या ठिकाणाहून मतदानाच्या दिवशी आपल्या घरी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे दूरस्थ मतदानाची सुविधा पुरवण्याचा विचार गांभीर्याने केला गेला, असे आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे.

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरनच विक्रम लिमये, अजित रानडे, अंबानी-अदानी पुत्र सदस्यपदी :
  • राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलपर्यंत विकासित करण्यासाठी विविध क्षेत्रांच्या वाढीचे धोरण ठरविण्याकरिता राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानभेत केली. या परिषदेच्या अध्यक्षपदी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • परिषदेच्या सदस्यपदी विक्रम लिमये, डॉ. अजित रानडे, मिलिंद कांबळे, एस. एन. सुब्रमण्यम, अंबानी आणि अदानी यांच्या पुत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलपर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्याच्या पूर्ततेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरची (एक ट्रिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या समितीत राहतील. 

करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चीनसह सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता :
  • चीन आणि इतर देशांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. करोनाच्या BF.7 या व्हेरियंटचा धोका वाढू नये यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारकर करण्यात आली आहे.

  • या सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता प्रवास सुरु करण्याआधी एअर सुविधा पोर्टलवर टेस्टचा रिपोर्ट अपलोड करावा लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता १ जानेवारीपासून आरटी-पीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर हा खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे.

  • जानेवारी महिन्यात भारतात करोनाचा फैलाव जलदगतीने होऊ शकतो, अशी शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर मोघमपणे काही प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत होती. बुधवारी झालेल्या सहा हजार करोना चाचण्यांपैकी ३९ लोक करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

पेलेंनी खरोखरच युद्ध थांबवले होते का? जाणून घ्या काय घडलं होतं ५३ वर्षांपूर्वी :
  • महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. कोलन कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. या महान खेळाडूच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की १९६० मध्ये पेले यांच्यामुळे एक युद्ध थांबले होते. चला जाणून घेऊया या घटनेबद्दल.

  • गोष्ट १९६९ सालची - पेले यांनीन त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ सँटोस फुटबॉल क्लबमध्ये घालवला. पेले यांच्यामुळे १९६० च्या दशकात सॅंटोस फुटबॉल क्लब जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक होता. हा संघ जगभर ओळखला गेला आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये भाग घेतला. असाच एक सामना ४ फेब्रुवारी १९६९ रोजी नायजेरियातील युद्धग्रस्त भागात खेळला गेला होता. या सामन्यात सँटोसचा सामना बेनिन सिटीच्या क्लबशी झाला होता. सँटोसचा संघ २६ जानेवारी १९६९ रोजी नायजेरियाला पोहोचला. तेव्हा तेथील परिस्थिती गंभीर होती.

  • नायजेरियात सुरू होते गृहयुद्ध - तेव्हा नायजेरियात गृहयुद्ध सुरू होते. नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यात युद्ध झाले. या लढ्यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर लाखो लोक बेघर झाले होते. दरम्यान, पेले येथे येताच नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यातील युद्ध ४८ तासांपेक्षा जास्त काळ थांबले होते. इतिहासकार गुरमन गोर्चे यांनी सांगितले की, सामन्यापूर्वी ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी संघाच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत होते. अशा स्थितीत नायजेरियातील युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा सामना खेळवला जाऊ शकला. त्या सामन्यात सँटोसने बेनिन सिटीच्या क्लबचा २-१ असा पराभव केला. मात्र, या घटनेबाबत वेगवेगळ्या गोष्टीही सांगण्यात आल्या. १९७७ मध्ये पेले यांच्या पहिल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख नव्हता.

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी कॅन्सरने निधन :
  • फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.

  • पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

  • पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

  • पेले यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पेले यांचा फोटो शेअर करत दिली. प्रेम आणि प्रेरणा हीच पेले यांची खासियत होती,असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. महान फुटबॉलपटूच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० डिसेंबर २०२१

जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा - हम्पी सहाव्या स्थानी :
  • गतविजेत्या कोनेरू हम्पीला (७.५ गुण) ‘फिडे’ जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खुल्या गटात युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने (९ गुण) चांगली कामगिरी करताना नववे स्थान मिळवले.

  • खुल्या गटात उझबेकिस्तानच्या नोदिर्बेक अब्दुसात्तोरोव्हने ९.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. त्याच्यात आणि नवव्या स्थानावरील गुकेशमध्ये केवळ अध्र्या गुणाचा फरक होता. गुकेशने १०व्या फेरीत इस्रायलचा अनुभवी खेळाडू बोरिस गेकफंडवर विजयाची नोंद केली. पुढील फेरीत त्याने जॉर्जियाच्या जोबाव्हा बादुरला पराभूत केले. त्यानंतरच्या दोन फेऱ्यांत त्याने विजेत्या अब्दुसात्तोरोव्ह आणि अलेक्झांडर ग्रीशूकला बरोबरीत रोखले.

  • याच गटात मित्राभा गुहा (८.५), विदित गुजराथी (७.५) आणि हरिश भरतकोटी (७) यांनी अनुक्रमे १५, ४५ आणि ६०वे स्थान मिळवले. महिलांमध्ये हम्पीचे अखेरच्या दिवशी विजेती अलेक्झांड्रा कोस्तेनिउक, अ‍ॅन्टोआनेटा स्टेफानोव्हा आणि गुल्नार मामादोव्हा यांच्याविरुद्धचे सामने बरोबरीत सुटले. युवा आर. वैशालीने ७ गुणांसह १४वे स्थान मिळवले. वंतिका अग्रवाल (६) आणि पद्मिनी राऊत (५.५) यांना अनुक्रमे ३८ आणि ४९व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागतासाठी सरकारची नवीन नियमावली; मुंबईतील ‘या’ ठिकाणी जमण्यास असेल मनाई :
  • गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.

  • राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृह बूक करण्यात आले असतील तर तिथे आसनक्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी असेल. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जाईल, याकडे लक्ष देणं आवश्यक असेल. ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय.

  • ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करू नये. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी याठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये. नववर्षाच्या निमित्ताने कोणत्याही धार्मिक, सांस्कतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

देशाच्या नवनिर्मितीसाठी कामाला लागा ; आयआयटी पदवीधरांना पंतप्रधानांचे आवाहन :
  • सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांत आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयआयटीच्या पदवीधरांना केले. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरच्या ५४ व्या पदवीदान समारंभात मोदी बोलत होते. तरुणांनी देशाची धुरा आता आपल्या खांद्यावर घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

  • मोदी म्हणाले की, स्वातंर्त्यप्राप्तीनंतर भारतानेही आपला नवा प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर २५ वर्षांच्या काळात देश स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी मोठे काम व्हायला पाहिजे होते, पण बराचसा वेळ वाया घालविण्यात आला. देशाचा खूप वेळ वाया गेला. या दरम्यान दोन पिढय़ा गेल्या, पण आता आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. देशाच्या विकासाची आघाडी आता तरुणांना सांभाळावी आणि योग्य मार्गाने आपले काम सुरू करावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

  • यावेळी पंतप्रधानांनी ब्लॉकचेन आधारित पदवी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना बहाल केली. समारंभाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

रिलायन्समध्ये मोठा नेतृत्वबदल होणार? खुद्द मुकेश अंबानींनीच दिले संकेत; म्हणाले, “आता :
  • देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला.

  • यावेळी मुकेश अंबानी यांनी भविष्यात रिलायन्सची वाटचाल कशा पद्धतीने होईल, याविषयी भाष्य केलं. यावेळीच बोलताना मुकेश अंबानी यांनी रिलायन्समध्ये मोठे नेतृत्वबदल होणार असल्याचं भाष्य केलं आहे. त्यामुळे आता अंबानी कुटुंबाची तिसरी पिढी उद्योगविश्वात रिलायन्सचं नाव मोठं करण्यासाठी टेकओव्हर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • न्यूज १८नं दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स फॅमिली डेच्या दिवशी अर्थात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला आहे. रिलायन्स सध्या या प्रक्रियेमधून जात असून आकाश अंबानी, इशा अंबानी आणि अनंत अंबानी या उद्योगाला नव्या उंचीवर नेतील असं देखील विधान मुकेश अंबानी यांनी केलं आहे.

एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ ; मुंबईतील २५१० जणांसह राज्यात ३९०० नवे करोनाबाधित :
  • करोनाने पुन्हा डोके वर काढले असून, बुधवारी दिवसभरात राज्यात ३,९०० रुग्ण आढळल़े त्यात सर्वाधिक २५१० रुग्ण मुंबईत आढळले आहेत़ मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आह़े

  • गेल्या काही दिवसांपासून मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या मुंबईत बुधवारी अडीच हजाराहून अधिक रुग्ण आढळल़े  मंगळवारी मुंबईत १३७७ रुग्ण आढळले होत़े  म्हणजे एका दिवसात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या दुप्पट झाली़  ठाणे जिल्ह्यातही बुधवारी ४९३ रुग्ण आढळल़े  मंगळवारच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आह़े

  • गेल्या २४ तासांत राज्यात २० करोना रुग्णांचा मृत्यू झाला़  दिवसभरात १३०६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतल़े  राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजार ६५ इतकी झाली आहे.

  • ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण - राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण आढळल़े  त्यातील ३४ रुग्ण मुंबईतील असून, नागपूर आणि पिंपरी चिंचवडला प्रत्येकी तीन, नवी मुंबई, पुणे मनपा प्रत्येकी २ रुग्ण आहेत़ 

३० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.