चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 ऑगस्ट 2023

Date : 30 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कॅलिफोर्नियात जातिभेदविरोधी विधेयकाला मंजुरी; अमेरिकेतील पहिलेच राज्य
  • अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने जातिभेदविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. जातिभेदाचे निर्मूलन करून राज्यातील वंचित समाजांचे रक्षण करण्याच्या हेतूने हे विधेयक तयार करण्यात आले आहे. या विधेयकाला सोमवारी मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आता गव्हर्नर गॅव्हिन न्यूसोम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. भेदभावविरोधी कायद्यांत जातीचा समावेश संरक्षित श्रेणीत करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. हे विधेयक प्रथम स्टेट सिनेटर आयशा वहाब यांनी सादर केले होते.
  • त्याला देशभरातील जातिसमानता मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. विधेयकाला (एसबी ४०३) पाठिंबा दिलेल्या सर्व सिनेटरचे वहाब यांनी आभार मानले असून जातिभेदाचा सामना करणाऱ्या लोकांचे आम्ही रक्षण करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.   
  • हिंदू संघटनेकडून निषेध अ कोअ‍ॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (कोहना) या हिंदू संघटनेने हे विधेयक मंजूर झाल्याचा निषेध केला असून हा कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे. हे विधेयक अमेरिकेतील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी आहे, असा आरोप कोहनाने केला आहे.
साथरोगांच्या नियंत्रणासाठी जागतिक निधी; जी-२० च्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
  • करोनासारख्या संभाव्य साथरोगांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक निधी उभारण्याचा निर्णय ‘जी-२०’च्या देशांतील आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक बँकेने पहिल्या टप्प्यामध्ये ३० कोटी डॉलरची तरतूद केली असून, या निधीचा विस्तार करण्यावर ‘जी-२०’ देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहमती झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
  • जगभरात करोनाच्या साथरोगाचा सर्वाधिक फटका निम्न व मध्यम आर्थिक उत्पन्न गटांतील देशांना बसला होता. करोनाच्या काळात अनेक विकसनशील देशांना भारताने प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला होता. करोना काळातील संभाव्य गंभीर परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्याच्या क्षेत्रातील विविध स्वरूपाची तयारी करण्याची गरज असल्याने जागतिक फंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • जागतिक बँकेचा ३० कोटी डॉलरचा निधी प्रामुख्याने ‘जी-२०’ देशच नव्हे, तर अन्य विकसनशील देशांतील साथरोगाच्या नमुना चाचण्या, सर्वेक्षण-देखरेख व आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ विकासासाठी खर्च केले जाणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासह लसी व औषधांच्या पुरवठय़ावरही भर देण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेसंदर्भात ‘जी-२०’ देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत भारताने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
  • या बैठकीमध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित योजनांवरही चर्चा करण्यात आली. करोनाच्या लसीकरणाची सर्व प्रक्रिया ‘को-विन’ या मोबाइल अ‍ॅपवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी करण्यात आली होती. आरोग्यविषयक तंत्रज्ञानावर आधारित योजनांचा वापर विकसित देशांमध्ये केला जाणार आहे.
चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश, चंद्रावर आढळलं ऑक्सिजन, सल्फर अन् लोखंड; तर…
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’नं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हरने बाहेर येत संशोधनाला सुरूवात केली आहे. आता चांद्रयान-३ बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
  • चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश हाती आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळून आली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी ( एलआयबीएस ) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे.
  • ‘प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर ( एस ) असल्याचं आढळून आलं. तर, हायड्रोजनचा ( एच ) शोध घेतला जात असल्याचं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.
  • ‘इस्रो’नं ट्वीट करत सांगितलं की, “रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सल्फर ( एस ) आढळून आलं. अल्युमिनियम ( एआय ), सल्फर ( एस ), कॅल्शियम ( सीए ), लोखंड ( एफई ), क्रोमियम ( सीआर ), टायटॅनियम ( टीआय ), मँगनीज ( एमएन ), सिलिकॉन आणि ऑक्सिजन ( ओ ) आढळलं आहे. हायड्रोजनचा ( एच ) शोध सुरू आहे.”
शनिवारी सूर्याकडे प्रयाण! ‘आदित्य- एल१’चे २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपण; सौरअभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम
  • ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ची (इस्रो) पहिली सौरमोहीम सुरू होणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१’ या यानाचे प्रक्षेपण शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता होणार असल्याचे ‘इस्रो’ने सोमवारी जाहीर केले.
  • सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘एल-१’ या बिंदूभोवती परिभ्रमण करून हे यान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा म्हणजे कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी यानामध्ये सात विविध उपकरणे बसविण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम या मोहिमेतून केले जाणार आहे. सूर्याचा पृष्ठभाग ६००० अंश सेंटीग्रेडवर असताना कोरोनाचे तापमान सुमारे एक दशलक्ष अंशापर्यंत कसे पोहोचते, याबाबतची माहिती मिळविण्याचे कामही होणार आहे.

‘एल-१’ म्हणजे काय?

  • अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. सूर्य आणि पृथ्वीशी संबंधित असलेला एल-१ हा बिंदू आहे.

पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग

  • ‘आदित्य एल-१’ ही मोहीम संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. देशभरातील विविध संस्थांनी तयार केलेली उपकरणे यानावर बसविण्यात आली आहेत. पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेने तयार केलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (एसयूआयटी) पेलोड विकसित केला आहे. याखेरीज बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयआयए) संस्थेने विकसित केलेला ‘व्हिजिबल एमिशन लाइन करोनाग्राफ’ (व्हीईएलसी) हे उपकरणही यानावर असेल.

मोहिमेची चार प्रमुख उद्दिष्टे

  • * सूर्याच्या बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिती अभ्यासणे
  • * सूर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास
  • * सौरवाऱ्यांची दिशा, तापमानातील फरक अभ्यासणे.
  • * सौरवादळांचा पृथ्वीवर होणारा परिणाम

‘प्रज्ञान’ने खड्डा चुकवला.. 

  • ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हरच्या मार्गात मोठा खड्डा (पहिले छायाचित्र) आला. त्यानंतर त्याला मार्ग बदलण्याची सूचना करण्यात आली व रोव्हर दुसऱ्या मार्गावरून (दुसरे छायाचित्र) मार्गस्थ झाला.
चाहत्यांसाठी खूशखबर आशिया कपचे सर्व सामने तुम्ही पाहू शकता विनामूल्य; कधी, कुठे? जाणून घ्या
  • बुधवारी (३० ऑगस्ट) पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभही आयोजित केला जाणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेतील १३ पैकी चार सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने श्रीलंकेसोबत सह-यजमानपदाचा निर्णय घेतला. स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल.
  • भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याच मैदानावर त्याचा दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळशी होणार आहे. आशिया चषकाचे सामने पाकिस्तानातील मुलतान येथील मुल्तान क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. याशिवाय, कॅंडी, श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवरही सामने होणार आहेत.

या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत

  • यावेळी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ खेळणार आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर-४ मध्ये जातील. तेथून दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

कुठे होणार आशिया कपचा उद्घाटन सोहळा?

  • आशिया कपचा उद्घाटन सोहळा पाकिस्तानातील मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

आशिया कपचा उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होईल?

  • पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्याआधी उद्घाटन सोहळा होणार आहे.

आशिया चषक उद्घाटन समारंभ आणि सामने यांचे थेट प्रक्षेपण भारतात कोठे असेल?

  • आशिया चषक उद्घाटन सोहळा स्टार स्पोर्ट्सद्वारे भारतात थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतातील आशिया कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण देखील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर टीव्हीवर पाहता येणार आहे. त्याच वेळी, विनामूल्य डीटीएच वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने पाहू शकतील. या वाहिनीवर अंतिम सामनाही प्रसारित केला जाणार आहे.
लोकांमध्ये नाराजी असल्याचे सर्वेक्षणामधून कळताच भाजपाकडून एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात
  • काही महिन्यांमध्ये पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांसाठी सदासर्वकाळ तयार राहणाऱ्या भाजपाने या निवडणुकांची संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केलेली आहेच. त्यात आता जनमताचा अंदाज घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो, असे ग्राऊंड सर्व्हेमधून दिसताच मंगळवारी (२९ ऑगस्ट) एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करण्यात आली. भाजपाच्या अंतर्गत माहितीनुसार आणि खासगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, महागाईमुळे महिला मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मतदानाच्या दृष्टिकोनातून महिलावर्ग भाजपासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोठ्या घटकाकडे भाजपाचे लक्ष आहे. त्यासाठीच पक्षाच्या रणनीतीकारांनी केंद्र सरकारला महागाईवर तोडगा काढण्याची शिफारस केली.
  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, रक्षाबंधन आणि ओनम सणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला भेट दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजीचे दर सर्व ग्राहकांसाठी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार ७५ लाख नव्या एलपीजी जोडणी मोफत करून देणार आहे”, असेही ठाकूर यांनी जाहीर केले.
  • सरकारच्या निवदेनानुसार, पीएम उज्ज्वला योजनेमधील (PMUY) ग्राहकांना प्रतिसिलिंडर जी २०० रुपयांची कपात मिळते, त्याच्याव्यतिरिक्त आणखी २०० रुपयांचे अनुदान या निर्णयामुळे मिळणार आहे. या निर्णयानंतर PMUY योजनेच्या दिल्लीतील लाभार्थींसाठी दरकपात केल्यानंतर प्रतिसिलिंडर ७०३ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना नागरिकांना जे आश्वासन दिले होते, त्याचाच एक भाग म्हणून या दरकपातीकडे पाहिले जात आहे. करोना महामारी आणि त्यानंतर सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जग महागाईशी झगडत असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. “भारताने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील काळापेक्षा काही प्रमाणात आपल्याला यश मिळाले आहे; परंतु त्यावर आपण समाधानी राहू शकत नाही. आपल्याकडे जगापेक्षा चांगली परिस्थिती आहे, यावर आपण आत्मसंतुष्ट होता कामा नये. माझ्या देशातील नागरिकांवरील महागाईचा भार कमी करण्यासाठी मला आणखी प्रयत्न करावे लागतील आणि त्या दिशेने आम्ही पावले टाकत राहणार आहोत. माझे प्रयत्न सुरूच राहतील”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आश्वासित केले होते.

 

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : सक्कारीची विजयी सलामी; गार्सिया, रिस्के-अमृतराज, कुदेरमेतोव्हाही दुसऱ्या फेरीत :
  • ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित मारिया सक्कारी आणि फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने सोमवारपासून सुरू झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीच्या सामन्यात सक्कारीने जर्मनीच्या तात्जना मारियावर ६-४, ३-६, ६-० असा विजय मिळवला. या सामन्यातील पहिला सेट जिंकत सक्कारीने चांगली सुरुवात केली, पण तात्जनाने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये सक्कारीने तात्जनाला पुनरागमनाची कोणतीच संधी न देता दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत, गार्सियाने कामिलिया राखिमोव्हाला ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.

  • तसेच अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्के-अमृतराजने एलेना यू हिला ६-२, ६-४ असे पराभूत केले. १८व्या मानांकित व्हेरॉनिका कुदेरमेतोव्हाने क्रोएशियाच्या डॉना व्हेकिचला ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवले, तर स्वीडनच्या रेबेका पीटरसनने अ‍ॅना कलिन्स्कायाकडून ४-६, ३-६ अशी हार पत्करली. त्याचप्रमाणे कोलंबियाचीखेळाडू कॅमिला ओसोरियोने  अमेरिकेच्या अ‍ॅन ली हिच्यावर १-६, ६-३, ६-१ असा विजय साकारला.

  • अगुटला पराभवाचा धक्का : स्पेनच्या १६व्या मानांकित रोबेटरे बटिस्टा अगुटचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या बिगरमानांकित जेजे वोल्फने अगुटवर ६-४, ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली.

गौतम अदानी जगातले तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत; हा मान मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती, पाहा किती आहे संपत्ती :
  • अब्जाधीश गौतम अदानी यांनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप ३ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत. विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.

  • प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क (२५१ अब्ज डॉलर्स) आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१५३ अब्ज डॉलर्स) यांच्यापाठोपाठ १३७.४ अब्ज डॉलर्ससह अदानी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. अदानी यांच्या संपत्तीत +१. १२ अब्ज डॉलरची शेवटची वाढ दिसली होती, तर या संपूर्ण वर्षात तब्बल ६०.९ अब्ज डॉलरचा व्यवहार झाला आहे.

  • बिल गेट्सना टाकले मागे : जुलै २०२२ मध्ये, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून अदानी ११३ अब्ज डॉलर्ससह जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. यानंतर सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतल्याने गेट्स यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलरवर घसरली परिणामी अदानी यांना गेट्सना मागे टाकून चौथ्या श्रीमंत व्यक्तीची जागा मिळवता आली.

  • अदानी यांच्यासाठी २०२२ ठरलं खास : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी यांनी २०२२ मध्ये त्यांची संपत्ती ६० अब्ज डॉलर्सने वाढवली आहे, जी इतर कोणाहीपेक्षा पाचपट जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये अंबानींना आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून मागे टाकत आणि दोन महिन्यांनंतर एप्रिलमध्ये सेंटिबिलियनर (ज्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक आहे) अशा यादीत अदानी यांचे नाव नोंदवले गेले.

अमेरिकेत भारतीय कुटुंबाने उभारला अमिताभ यांचा पुतळा :
  • प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा पूर्णाकृती पुतळा अमेरिकेतील एडिसन शहरातील एका भारतीय वंशाच्या अमेरिकन कुटुंबाने आपल्या घराबाहेर उभारला आहे. अमिताभ यांच्यावरील अतीव प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. रिंकू व गापी सेठ यांच्या एडिसन शहरातील घराबाहेर या पुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ासाठी सुमारे ६०० भारतीय जमले होते.

  • ‘छोटा भारत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात बहुसंख्य भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राहतात. एका काचेच्या मोठय़ा पेटीत हा पूर्णाकृती पुतळा बंदिस्त आहे. त्याचे अनावरण भारतीय समुदायाचे प्रसिद्ध नेते अल्बर्ट जासानी यांनी केले. अनावरणानंतर उत्स्फूर्त नृत्य करण्यात आले. तसेच फटाके फोडण्यात आले. अमिताभ यांचा ‘कौन बनेगा करोडपती’मधील वेशभूषेतील हा पुतळा आहे. तो राजस्थानमध्ये तयार करून अमेरिकेला जहाजातून आणण्यात आला. यासाठी सेठ यांनी ७५ हजार डॉलर (६० लाख रुपये) खर्च केले.

  • ‘परमेश्वरासमान : अंतर्गत सुरक्षा अभियंता असलेल्या गोपी सेठ यांनी सांगितले, की अमिताभ माझ्यासाठी परमेश्वरासमानच आहेत. पडद्यावरील त्यांच्या कामगिरीप्रमाणेच मला पडद्यामागचे त्यांचे वास्तव जीवनही माझ्यासाठी स्फूर्तिदायक आहे. ते निगर्वी आणि वास्तववादी आहेत. सेठ हे गुजरातहून १९९० मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले. तेथे गेल्या तीस वर्षांपासून ते ‘बिग बी’ यांच्यासंबंधी त्यांच्या चाहत्यांसाठी एक संकेतस्थळही नियमित चालवत आहेत. सेठ म्हणाले, की पुतळा करण्याइतपत माझी योग्यता नसल्याचे अमिताभ यांनी नम्रपणे सांगितले, परंतु मला परवानगी दिली.

नासाची आर्टेमिस- १ मोहीम पुढे ढकलली; यानाच्या ४ इंजिनपैकी एकात बिघाड :
  • अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-१ चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. यानाचे प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०३ वाजता होणार होते. मात्र, यानाच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही मिनिटापूर्वीच उड्डाण थांबवण्यात आले. २ सप्टेंबर रोजी रात्री १०.१८ वाजता यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

  • नासाची मानवी चंद्र मोहीम अनेक काळापासून रखडत आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात २०१० मध्ये स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) यान तयार करण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘नक्षत्र कार्यक्रमा’द्वारे अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे होते, परंतु मोहिमेत अडचणी निर्माण झाल्यामुळे सरकारने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला.

  • मोहिमेत विलंबामुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान : नासाच्या नव्या नियोजनांतर्गत हे यान २०१६ मध्ये प्रक्षेपित केले जाणार होते. यानंतर, डोनाल्ड ट्रम्प सरकारने २०१७ मध्ये या मोहिमेला ‘आर्टेमिस मिशन’ असे अधिकृत नावही दिले. मात्र, २०१९ मध्ये, तत्कालीन नासा प्रशासक जिम ब्रिडेनस्टीन यांनी या मोहिम रद्द करत पुढे ढकलली. एका सरकारी अहवालानुसार नासाच्या मोहिमेत विलंब झाल्यामुळे सरकारचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत असल्याचे समोर आले. तथापि, ट्रंपपासून जो बायडेनपर्यंत, देशाच्या अध्यक्षांनी आर्टेमिस मिशन यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.

मुकेश अंबानीची मोठी घोषणा; रिटेल व्यवसाय प्रमुखपदी ईशा अंबानीची नियुक्ती :
  • देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानी हिचा समूहाच्या रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणून ओळख करुन दिली. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश याला समूहाची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते.

  • मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये व्यवसायाची वाटणी : ६५ वर्षीय मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. ईशा आणि आकाश हे जुळी भावंडे आहेत, तर अनंत सर्वात लहान आहे. ईशाने पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे. रिलायन्स समूहाचे तीन मुख्य व्यवसाय आहेत, यामध्ये तेल शुद्धीकरण आणि पेट्रो-केमिकल्स, रिटेल व्यवसाय आणि डिजिटल व्यवसाय (टेलिकॉमचा) समावेश आहे. यापैकी किरकोळ आणि डिजिटल व्यवसाय पूर्ण मालकीच्या संस्थांखाली आहेत. तर तेल ते केमिकल व्यवसाय रिलायन्स अंतर्गत येतो. नवीन ऊर्जा व्यवसाय देखील मूळ कंपनीचा भाग आहे. मुकेश अंबानी तेल आणि ऊर्जा व्यवसाय त्यांचा धाकटा मुलगा अनंत याच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.

  • मुकेश अंबानी निवृत्त होणार : मुकेश अंबानी यांनी रिटेलची कमान ईशाकडे दिली आहे आणि एनर्जी बिझनेसची कमान धाकटा मुलगा अनंतकडे दिली आहे. मोठा मुलगा आकाश याला आधीच समूहाच्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, या नियुक्तीनंतर मुकेश अंबानी यांनी आपण अद्याप निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते पूर्वीप्रमाणेच ग्रुपमध्ये सक्रिय राहणार आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी याबाबतचे संकेत दिले होते. तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, तिन्ही मुले आधीच समूहाच्या सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. जूनमध्ये अंबानी यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

30 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.