चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० ऑगस्ट २०२१

Date : 30 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“नितीश कुमार पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून सर्वगुण संपन्न”; भाजपा-जदयूसंदर्भातील चर्चांना उधाण :
  • जनता दल युनायडेट म्हणजेच जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसले तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचं म्हटलं आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा युतीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.

  • ललन सिंह यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना याचसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. याबैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पत्रकारांशी बोलत असताना समर्थकांकडून, ‘देश का पीएम कैसा हो नीतीश कुमार जैसा हो’ अशी घोषणाबाजीही झाली. दरम्यान नितशी हे सर्वगुण संपन्न असे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याच्या या चर्चांमुळे भाजपा-जदयू युतीसंदर्भात चर्चांना उधाण आलाय.

  • नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि पंतप्रधान पदासाठी दावा करणे या दोघांमध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल त्यांना मी हे सांगू इच्छितो की आमच्या नेत्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, असं ललन सिंह म्हणाले. त्याचप्रमाणे एनडीएच्या विस्तारासंदर्भातही ललन सिंह यांनी भाजपाला इशारा दिलाय.

  • भाजपा उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये जदयूला एनडीएमध्ये सहभागी करुन घेत नसेल तर आम्ही तिथे स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवू. आम्ही यासाठी तयार करत असल्याचंही ललन सिंह म्हणाले आहेत.

कोल्हापूरमधील रिक्षाचलकाच्या मुलीला वयाच्या २१ व्या वर्षीच अमेरिकन कंपनीकडून ४१ लाखांचे पॅकेज :
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये बेरोजगारी आणि पगारकपातीसंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच कोल्हापूरमधील अमृता कारंडे या तरुणीला ४१ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. २१ वर्षीय अमृता ही अजूनही कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच केआयटीमध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. अमृताला अमेरिकेतील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अॅडॉब या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर लेटर दिलं आहे. अमृता ही कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयामध्ये रुजू होणार आहे.

  • अमृता ही मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगी असून तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहे तर आई गृहिणी आहे. “मला शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले आहेत. मला त्यांच्या या कष्टानंतर त्यांना थोडा आनंद देता आला याचं समाधान आहे. मला भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे,” असं अमृताने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

  • केआयटीचे अध्यत्र सुनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृताने अॅडॉबने आयोजित केलेल्या सी कोडींगच्या स्पर्धेमध्ये पाहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर अमृताला कंपनीकडून अडीच महिन्यांच्या इंटर्नशीपची संधी देण्यात आली. यासाठी तिला कंपनीने स्कॉलरशीप स्वरुपात महिन्याला एक लाख रुपये दिले. या कालावधीमध्ये तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या ज्यात तिने अगदी उत्तम कामगिरी केल्याचं कुलकर्णी सांगतात. त्यानंतर तिला कंपनीने थेट ४१ लाखांची नोकरीची ऑफर दिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचं कुलकर्णी म्हणाले.

‘स्टार्ट अप’ संस्कृती उज्ज्वल भवितव्याचे लक्षण :
  • स्टार्ट अप संस्कृती भारतातील तरुणांमध्ये रुजली असून लहान  शहरेही आता स्टार्ट अप सुरू करू लागली आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भवितव्याचे लक्षण आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

  • त्यांनी सांगितले की, देशात अवकाश क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्याने आता लोकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत आहे. यापुढील काळात विद्यापीठे, प्रयोगशाळा व इतर क्षेत्रांतील तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेले उपग्रह सोडले जातील यात शंका नाही.

  • भारताची समृद्ध आध्यात्मिक परंपरा मोठी असल्याचे सांगून त्यांनी सांगितले की, भारताची टोक्यो ऑलिंपिकमध्ये कामगिरी चांगली झाली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

  • भारताने चार दशकानंतर पुरुषांच्या हॉकीत पदक मिळवल्याचे सांगून ते म्हणाले की, युवक आता क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. पालकही त्यांच्या पाठीशी आहेत. ध्यानचंद यांना हीच खरी श्रद्धांजली आहे. तरुण लोकांची मनोवृत्ती आता बदलली असून त्यांनी नवे मार्ग, नव्या आशाआकांक्षा, यांचा अंगीकार केला आहे. त्यांची उद्दिष्टेही वेगळी आहेत. क्रीडा संस्कृतीला गती मिळत असून ग्रामपातळीवरही आता क्रीडा स्पर्धा होत आहेत. लोकांनी क्रीडा संस्कृती अशीच पुढे न्यावी. जे काही आपण करू शकतो ते करावे. ‘सबका प्रयास’ हा मंत्र त्यांनी प्रत्यक्षात उतरवावा.

अवनी लेखराची कमाल, नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक :
  • टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. भारताच्या आणखी एका खेळाडूने भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

  • याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले.

  • अवनीला अंतिम फेरीमध्ये चीनची नेमबाजाने कडवी लढत दिली होती. पण नंतर अवनीने अचूक लक्ष साधत तिचा पराभव केला. चीनची महिला नेमबाज झांगने २४८.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि रौप्य पदक पटकावले.

  • अवनी लेखरा ११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाली. जयपूर, राजस्थानची येथे राहणारी, अवनीची महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच१ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर आहे. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले.

आता ‘BH’ सीरिजमध्येही नोंद होणार वाहनं; नव्या योजनेमुळे ‘या’ वाहनधारकांना होणार मोठा फायदा :
  • दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे. यामार्फत वाहनधारक आता बीएच अर्थात भारत सीरिजमध्ये (BH) आपल्या नवीन वाहनांची नोंदणी करू शकणार आहेत. खरंतर, एका राज्यातील दुसऱ्या राज्यात जायचं म्हटलं तर नियमानुसार वाहनधारकानं वर्षभराच्या आपल्या वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागते. मात्र, या भारत सिरीजमुळे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनधारकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. ते दुसऱ्या राज्यात जुन्या नोंदणी क्रमांकावरून आपली वाहनं चालवू शकतात.

  • कोणाला सर्वाधिक फायदा -रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या नव्या भारत सिरीजचा सर्वाधिक फायदा नोकरीच्या किंवा कामाच्यानिमित्ताने वारंवार इतर राज्यात जावं लागणाऱ्या, त्याचप्रमाणे सततच्या बदल्या होणाऱ्या व्यक्तींना होणार आहे. कारण, या लोकांची सततच्या नोंदणीच्या त्रासातून मोठी सुटका होणार आहे. एखादी व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर १२ महिन्यांनंतर नव्या राज्यात आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागते. यासाठी सर्व कागदपत्रं सादर करून विविध प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे हे काम अत्यंत किचकट आणि त्रासदायक ठरत. मात्र, बीएच सीरिज या योजनेमुळे वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं लागणाऱ्या खासगी वाहनधारकांना निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे.

  • कसा मिळणार दिलासा - सद्यस्थितीत कोणत्याही खाजगी वाहनधारकाला आपल्या वाहनाची नोंदणी करताना आपल्या मूळ राज्यात १५ वर्षांसाठी तर दुसऱ्या राज्यात गेल्यास पुन्हा १० ते १२ वर्षांसाठी (त्या त्या राज्याच्या कराच्या प्रमाणानुसार) रस्ते आणि वाहतूक कर भरावा लागतो. मात्र, बीएच सीरिज योजनेमध्ये हा कर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच १० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी ८ टक्के तर १० ते २० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी १२ टक्के इतका कर असणार आहे. दुसरीकडे डिझेल वाहनासाठी २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल, तर इलेक्ट्रिक वाहनासाठी २ टक्के सवलत दिली. त्याचप्रमाणे, १४ वर्षांनंतर वाहनावर आधीच्या कराच्या तुलनेत निम्मा वार्षिक कर आकारला जाणार आहे.

प्रभू श्रीराम यांच्याशिवाय अयोध्या काहीच नाही: राष्ट्रपती कोविंद :
  • अयोध्या प्रभू श्रीरामांशिवाय काहीच नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी म्हणाले. कोविंद यांनी राम मंदिराचं निर्माण सुरू असलेल्या अयोध्या शहराला भेट दिली. “श्रीरामांशिवाय अयोध्या अयोध्या नाही. राम आहे त्यामुळे अयोध्या अस्तित्वात आहे. प्रभू राम या शहरात कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही जागा अयोध्या आहे,” असं वक्तव्य रामायण संमेलनाचे उद्घाटन करताना राष्ट्रपतींनी केलं.

  • स्वतःच्या नावाचा उल्लेख करताना कोविंद म्हणाले, “मला वाटते की जेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझे नाव ठेवले, तेव्हा सर्वसामान्य लोकांप्रमाणेच त्यांच्याही मनात राम कथा आणि भगवान राम यांच्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना होती.” अयोध्याबद्दल अधिक बोलताना राष्ट्रपती म्हणाले, “की अयोध्या शब्दाचा अर्थ ज्याच्याशी युद्ध करणे अशक्य आहे, असा होतो. रघुवंशीय राजे रघु, दिलीप, अज, दशरथ आणि राम यांच्या धैर्यामुळे आणि सामर्थ्यामुळे त्यांची राजधानी अजिंक्य मानली गेली. त्यामुळे या शहराचे ‘अयोध्या’ हे नाव नेहमी आदराने घेतले जाईल.”

  • भगवान राम यांच्या आदिवासींवरील प्रेमाबद्दल सांगताना ते म्हणाले, “वनवासात असताना, रामाने अयोध्या आणि मिथिलाच्या सैन्याला युद्ध लढण्यासाठी बोलावले नाही. त्याने कोल, भील, वानर यांना एकत्र आणले आणि आपले सैन्य तयार केले. त्याच्या मोहिमेत त्यांनी जटायूंचा (गिधाड) समावेश केला. त्यांनी आदिवासींसोबत प्रेम आणि मैत्री दृढ केली.”

अमरुल्ला सालेह यांना रोखण्यासाठी तालिबानचा मोठा निर्णय :
  • तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेऊन दोन आठवडे झाले आहेत, पण आतापर्यंत तालिबानला पंजशीर काबीज करता आलेले नाही. दरम्यान, रविवारी तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांना ट्विटरवर ट्विट करता येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

  • पंजशीर हा एकमेव अफगाणिस्तान प्रांत आहे जो अद्याप तालिबानच्या हाती आलेला नाही. अनेक तालिबानी विरोधक पंजशीरमध्ये जमले आहेत. प्रख्यात अफगाण बंडखोर कमांडर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद सध्या माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेहसह पंजशीर खोऱ्यात आहे.

  • इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तालिबानने पंजशीरमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे जेणेकरून अमरुल्ला सालेह काहीही ट्विट करू शकणार नाही. अमरुल्ला सालेह ट्विटरवर सतत सक्रिय आहेत आणि तालिबानच्या विरोधात ट्विट करत आहेत. त्यांनी शनिवारीच RESISTANCE, म्हणजेच प्रतिकार असे ट्विट केले होते.

३० ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.