चालू घडामोडी आणि दिनविशेष - 03 सप्टेंबर 2023

Date : 3 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम सिंगापूरचे नवे अध्यक्ष
  • सिंगापूर मूळ भारतीय वंशाचे व सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांनी सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत शुक्रवारी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. २०११ सालानंतर प्रथमच झालेल्या या निवडणुकीत त्यांनी एकूण मतदानापैकी ७० टक्के मते मिळवली.
  • माजी वरिष्ठ मंत्री असलेले षण्मुगरत्नम यांनी २० लाख ४८ हजार मतदानापैकी ७०.४ टक्के इतकी भरघोस मते मिळवली. त्यांचे चिनी वंशाचे प्रतिस्पर्धी नस कोक साँग आणि तान किन लिआन यांना अनुक्रमे १५.७२ टक्के व १३.८८ टक्के मते मिळाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. निवडणूक अधिकारी तांग मेंग दुई यांनी मध्यरात्रीनंतर या निकालाची घोषणा केल्यानंतर, थर्मन हे सिंगापूरचे तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष बनले.
  •  २०११ ते २०१९ या काळात देशाचे उपपंतप्रधान राहिलेले थर्मन यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान ली सेन लूंग यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांच्या पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीने (पीएपी) या निवडणुकीत थर्मन यांना पाठिंबा दिला होता. ‘सिंगापूरवासीयांनी मला जे भरघोस समर्थन दिले आहे, त्यामुळे मी खरोखर विनम्र झालो आहे’, असे थर्मन म्हणाले.

मोदींकडून अभिनंदन

  •  षण्मुगरत्नम यांच्या सिंगापूरच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचे अभिनंदन केले. ‘भारत- सिंगापूर सामरिक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याची मी वाट पाहात आहे’, असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.
रशियाकडून महासंहारक ‘सॅटन २’ अण्वस्त्र सज्ज
  • जगातील अत्यंत संहारक अण्वस्त्रांपैकी एक मानले जाणारे सॅरमॅट आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युरोपची चिंता वाढली आहे. स्पूटनिक न्यूजने याबाबत बातमी दिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईनंतर आता रशियाची बाजू काहीशी बचावात्मक झाल्याचे दिसत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दूरचित्रवाणीवरून देशवासियांना आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
  • रशियाचे आर-एस २८ सॅरमॅट हे एसआय १० आधारित क्षेपणास्त्र आहे. ते १५ आण्विक स्फोटके  वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे. नाटोकडून त्याचा उल्लेख सॅटन २ असा केला जातो. या क्षेपणास्त्रामुळे शत्रुला रशियाविरोधात पाऊल उचलण्याआधी दोन वेळा विचार करावा लागेल, असे पुतिन यांनी म्हटले होते.

‘क्रिमिया पुलावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला’

  • कीव्ह : रशियाने शनिवारी दावा केला की, त्यांच्या सैनिकांनी युक्रेनच्या नौदलाचे तीन ड्रोन नष्ट करून क्रिमिया पुलावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. हा पूल रशियाला क्रिमिया द्वीपकल्पाशी जोडतो. या मुळे वर्षभरातच हा पूल तिसऱ्या वेळी बंद करावा लागला आहे.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : जलद विभागात दिव्या देशमुखला जेतेपद
  • Tata Steel Chess Tournament भारताच्या दिव्या देशमुखने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटातील जलद विभागाचे शनिवारी जेतेपद पटकावले. तिने नऊ फेऱ्यांमध्ये सात गुण कमावले. चीनच्या जगज्जेत्या जु वेन्जूनला ६.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या दिव्याला या स्पर्धेत सुरुवातीला स्थानही मिळाले नव्हते. मात्र, आर. वैशालीने माघार घेतल्यानंतर १७ वर्षीय राष्ट्रीय विजेत्या दिव्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. पहिल्या दोन दिवशी चमकदार कामगिरी करताना सहा फेऱ्यांअंती दिव्याने ५.५ गुणांसह अग्रस्थान भक्कम केले होते.
  • शनिवारी, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या सातव्या फेरीच्या लढतीत दिव्याला युक्रेनची ग्रँडमास्टर अ‍ॅना युशेनिनाने बरोबरीत रोखले. तर आठव्या फेरीत तिला पोलिना शुवालोवाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अखेरच्या फेरीपूर्वी वेन्जून आणि दिव्याचे समान सहा गुण झाले होते.
  • मात्र, वेन्जून अव्वल स्थानावर होती. त्यामुळे दिव्याला अखेरच्या फेरीत विजय अनिवार्य होता. या फेरीत तिने काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू असलेल्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला नमवण्याची किमया साधली. दुसरीकडे वेन्जूनला युशेनिनाने बरोबरीत रोखल्याने दिव्याच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. शुवालोवा ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
आनंदवार्ता! शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, परीक्षेची तारीखही जाहीर
  • राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाते. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेतल्या जाणार असून १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे.आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना साडे सात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार.
  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून शिक्षण विभागाने अर्ज लवकर भरून घेण्यास सुरुवात केल्याचे म्हटल्या जाते. १ ते १५ डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज घेणार.
  • तसेच २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अती विशेष विलंब शुल्कसह विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.ही शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू,हिंदी, गुजराती,इंग्रजी, तेलगू, कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.परीक्षेसाठी शिक्षण विभागाने वयोमर्यादा निश्चित केली आहे.
‘परीक्षांचे निकाल लावा, नाहीतर…’; विद्यार्थ्यांचा एमपीएससीला निर्वाणीचा इशारा
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याचे सत्र सुरूच आहे.उमेदवारांकडून सातत्याने या परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे. आता मात्र उमेदवारांमध्ये नाराजी वाढू लागली असून पुढील तीन-चार दिवसांत निकाल जाहीर न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा स्टूडंट्स राईट्स असोसिएशनने आयोगाला दिला आहे.
  • असोसिएशनचे महेश बडे व किरण निंभोरे यांनी आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवून निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२२, संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब आणि क – २०२३ व राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ यांचे निकाल मागील काही महिन्यांपासून रखडलेले आहेत. निकाल कधी घोषित केले जाणार आहेत, या प्रतिक्षेत हजारो युवक आहेत.
  • उमेदवारांना पुढील परीक्षांचे नियोजन देखील करायचे आहे. तसेच उमेदवारांचा आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर तीनही निकाल घोषित करावेत, अशी विनंती असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. निकाल प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याने उमेदवारांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण पुण्यात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
MSEB चे कर्मचारी ते आंतरराष्ट्रीय अम्पायर; पिलू रिपोर्टर यांचं ८४ व्या वर्षी निधन
  • माजी आंतरराष्ट्रीय अम्पायर पिलू रिपोर्टर यांचं रविवारी निधन झालं. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पिलू रिपोर्टर यांनी आपल्या दीर्घ आणि गौरवशाली २८ वर्षांच्या कारकिर्दीत १४ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये अम्पायर म्हणून जबाबदारी पार पाडली. १९८६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिजच्या मालिकेत इम्रान खान यांनी पिलू रिपोर्टर यांना भारतीय अम्पायर व्ही के रामास्वामी यांच्याबरोबर अम्पायरिंग करण्यासाठी निमंत्रित केलं होतं.
  • ९० च्या दशकात जगातील तटस्थ पंचांची जोडी म्हणून पिलू रिपोर्टर आणि व्ही के रामास्वामी यांच्याकडे पाहिलं जात होतं. पिलू रिपोर्टर यांनी १९९२ च्या विश्वचषकातही अम्पायरिंग केलं होतं.
  • अम्पायरिंग करण्यापूर्वी पिलू रिपोर्टर हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरीला होते. त्यावेळी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने नवीन अम्पायरची जागा भरण्यासाठी एक जाहिरात दिली. त्यावेळेस ते चाचणीत अयशस्वी झाले. पण काही काळानंतर, ते स्थानिक सामन्यांमध्ये अम्पायरिंग करताना दिसले. अखेरीस, त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये अम्पायर म्हणून नियुक्त करण्यात आले आणि पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली.

 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे; ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच :
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) ला खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला आहे. ८५ वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांचा पराभव केला. पूर्व बंगालचा माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी ३३ -१ अशा फरकाने विजय नोंदवत भुतिया यांचा पराभव केला.

कोण आहेत कल्याण चौबे

  • कल्याण चौबे हे भाजपाचे नेते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे हे भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघासाठी कधीही खेळले नाहीत. मात्र, काही वेळा ते भारतीय फुटबॉल संघाचा भाग होते. ते मोहन बागान आणि पूर्व बंगाल टीममध्ये गोलरक्षक म्हणून खेळले होते. विशेष म्हणजे भुतिया आणि चौबे हे दोघेही एकेकाळी पूर्व बंगाल संघात खेळाडू होते.

  • दरम्यान, कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी राजस्थान फुटबॉल असोसिएशनच्या मानवेंद्र सिंग यांचा २९-५ अशा फरकाने पराभव केला. तर अरुणाचल प्रदेशच्या किप्पा अजय यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गोपालकृष्ण कोसाराजूचा ३२-१ अशा फरकाने पराभव केला.

‘विक्रांत’ युद्धनौकेचे राष्ट्रार्पण; छत्रपती शिवाजी महाराज नौदलाच्या नव्या ध्वजाचे प्रेरणास्थान - मोदी :
  • संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरणाद्वारे राष्ट्रार्पण करण्यात आले. यामुळे अशा युद्धनौका निर्मितीची क्षमता असलेल्या मोजक्या राष्ट्रांत भारताचा समावेश झाला आहे. ‘‘विक्रांत हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील अतुलनीय ‘अमृत’ आहे,’’ अशा शब्दांत मोदी यांनी या युद्धनौकेचे वर्णन केले.

  • या निमित्ताने मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या नव्या चिन्हांकित नौदल ध्वजाचे अनावरणही केले. ‘‘देशाने आज गुलामीचे प्रतीक असलेल्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझे झुगारले आहे,’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. कोचीच्या ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’मध्ये (सीएसएल) हा सोहळा झाला. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी नौदलाची पूर्वीची युद्धनौका ‘विक्रांत’ हिचे नाव या नव्या युद्धनौकेस देण्यात आले आहे.

  • ‘आयएनएस विक्रांत’ला छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करीत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, ‘‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. इतिहास बदलण्याचे काम आज झाले असून, भारताने गुलामीच्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझेच झुगारून दिले आहे. आजपासून भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला आहे. जुन्या ध्वजावर आतापर्यंत गुलामगिरीचे चिन्ह होते. पण आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा ध्वज समुद्रावर आणि आकाशात डौलाने फडकणार आहे.’’ नवे नौदल चिन्ह समृद्ध भारतीय सागरी वारशानुसार बनवण्यात येणार असल्याची घोषणा नौदलाने यापूर्वीच केली होती.

  • नव्या युद्धनौकेच्या वैशिष्टय़ांबाबत मोदी म्हणाले, की हे पाण्यावर तरंगणारे जणू एक शहर आणि हवाईतळ आहे. ‘आयएनएस विक्रांत’वर निर्माण होणाऱ्या विजेमुळे सुमारे पाच हजार घरांची गरज भागू शकेल. विक्रांत नौदल ताफ्यात सामील झाल्याने स्वदेशी विमानवाहू युद्धनौकांच्या निर्मितीची क्षमता असलेल्या अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्ससारख्या देशांच्या निवडक गटांत भारताचा समावेश झाला.

अभिमानास्पद! नौदलाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण :
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. पण आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आल्याचं सांगितलं.

  • कसा आहे नौदलाचा नवा ध्वज : नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.

  • छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.

पलायनानंतर गोटाबाय राजपक्षे मायदेशी परतले, कोलंबो विमानतळावर पक्षातील नेत्यांकडून स्वागत :
  • श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे शुक्रवारी सात आठवड्यांनंतर मायदेशी परतले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकन जनतेने थेट राष्ट्रपती भवनात उग्र आंदोलन केल्यानंतर गोटाबाय यांनी कुटुंबासह थायलंडला पलायन केले होते. कोलंबो विमानतळावर दाखल होताच पक्षातील नेत्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. देशातील खराब आर्थिक स्थितीसाठी राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे.

  • गोटाबाय राजपक्षे यांनी १३ जुलैला पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह पलायन केले होते. श्रीलंकन हवाई दलाच्या विमानातून त्यांनी देश सोडला होता. देश सोडण्याआधीपासूनच राजपक्षे यांच्या राजीनाम्याची जनतेकडून मागणी होत होती. थायलंडला जाण्याआधी राजपक्षे यांनी सिंगापूरला आश्रय घेतला होता. सिंगापुरात आपले राजकीय उत्तराधिकारी रनिल विक्रमसिंघे यांची भेट घेत त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडींनंतर ७३ वर्षीय राजपक्षे बँकॉकमधून सिंगापूर हवाई मार्गे एका व्यावसायिक विमानातून मायदेशी परतले आहेत.

  • देश सोडल्यापासून ५२ दिवस थायलँडमधील एका हॉटेलमध्ये राजपक्षे राहत होते. अनेक दिवसांपासून मायदेशी परतण्यासाठी ते आग्रही होते. रनिल विक्रमसिंघे यांनी एकेकाळच्या राजकीय दृष्ट्या शक्तीशाली असलेल्या राजपक्षे कुटुंबीयांना संरक्षण दिल्याचा आरोप श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजपक्षे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. श्रीलंकेतील प्रसिद्ध वृत्त संपादक लसंथा विक्रममाटुंगे यांच्या हत्येच्या कथित आरोपानंतर राजपक्षे यांना या प्रकरणी अटक व्हावी, यासाठी पत्रकारांचा दबाव वाढला आहे.  “राजपक्षे यांच्या मायदेशी परतण्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना लवकरच शिक्षा होईल”, असे ‘श्रीलंका यंग जर्नलिस्ट असोसिएशन’चे प्रवक्ते थारिंदू जयावर्धाना यांनी म्हटले आहे.

03 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.