अनेक प्रमुख खेळांत भारताकडून निराशाजनक कामगिरी होत असताना रोलर स्केटिंग या देशात अनोळखी असलेल्या क्रीडा प्रकारात सोमवारी भारताला अनपेक्षित यश मिळाले. भारताच्या स्पीड स्केटर्सनी दोन कांस्यपदकांची कमाई केली.पुरुष आणि महिलांच्या तीन हजार मीटर सांघिक रिले प्रकारात भारताने ही पदके मिळवली. कार्तिका जगदीश्वरन, हिरल साधू आणि आरथी कस्तुरी राज यांनी भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. त्यानंतर आनंद कुमार वेलकुमार, सिद्धांत कांबळे, विक्रम इंगळे यांनी चार मिनिटे १०.१२८ सेकंद अशी वेळ देत दुसरे कांस्यपदक मिळवले.
रोलर स्केटिंगचा २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून समावेश झाला. त्या पहिल्या स्पर्धेत अनुप कुमार यामा एकेरीच्या फ्री-स्केटिंग प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर अवनी पांचाळसह दुहेरीतही कांस्यपदकाची कमाई केली होती. पण, त्यानंतर भारतीय पदकापासून वंचितच राहिले होते.महिला संघाने सर्वप्रथम कांस्यपदक मिळवताना चार मिनिटे ३४.८६१ सेकंद अशी वेळ दिली. या पदकाने आमच्यासाठी संधींचे अनेक दरवाजे उघडले जातील. भारतात अजूनही या खेळाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अर्थात, हा ऑलिम्पिक खेळ नसल्याचा फटकाही बसतो, अशी भावना आरथीने व्यक्त केली.
पुरुष संघाने पात्रता फेरीत चार मिनिटे १५.१२६ सेकंद अशी वेळ दिली होती. अंतिम फेरीत भारतीय त्रिकुटाने आपली कामगिरी उंचावत कांस्यपदकापर्यंत मजल मारली.
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुईझ यांची निवड
विरोधी पक्षांचे उमेदवार मोहम्मद मुईझ हे मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्यांना ५३ टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. ही निवडणूक म्हणजे एकप्रकारे हिंद महासागरातील या द्वीपकल्प राष्ट्रावर कोणत्या प्रादेशिक सत्तेचे वर्चस्व राहील- भारत की चीन- या मुद्दय़ावरील सार्वमत ठरली होती.
सध्याचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना ४६ टक्के मते मिळाली असून, मुईझ हे १८ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले असल्याचे वृत्त ‘मिहारू न्यूज’ने दिले. ‘आजच्या निकालाने आम्हाला देशाचे भवितव्य निर्माण करण्याची संधी आणि मालदीवचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याची ताकद मिळाली आहे. आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची वेळ आली आहे’, असे मुईझ यांनी विजयानंतर केलेल्या वक्तव्यात सांगितले. सोलिह यांनी माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना तुरुंगातून बाहेर काढून नजरकैदेत ठेवावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
२०१८ साली निवडून आलेले सोलिह यांनी भारताला देशात अर्निबध वावर करण्याची मोकळीक दिल्याचा आरोप मुईझ यांनी केला होता. मुईझ यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे चीनधार्जिणा मानला जातो. मालदीवमध्ये भारतीय लष्कराची उपस्थिती ही केवळ दोन सरकारांमधील करारानुसार जहाजबांधणीची गोदी बांधण्याकरिता होती आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा भंग होणार नाही असे सोलिह यांनी वारंवार सांगितले होते. याउलट, आपण ही निवडणूक जिंकल्यास भारतीय फौजांना मालदीवमधून हटवू आणि मोठय़ा प्रमाणात भारताला अनुकूल असलेल्या देशाच्या व्यापार संबंधांचे संतुलन साधू, असे आश्वासन मुईझ यांनी दिले होते.
चंद्रावर सूर्यास्त! Chandrayaan-3 विषयी मोठी अपडेट, ‘विक्रम’-‘प्रज्ञान’ला जाग आली का? मोहिमेचं पुढे काय होणार?
चंद्राच्या पृष्टभागावर सूर्यास्त होताच, भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचा ऐतिहासिक लँडिंग पॉईंट ‘शिवशक्ती’ येथे पुन्हा अंधार झाला आहे. यापुढील १४ दिवस चंद्रावर मिट्ट काळोख असणार आहे. यापूर्वी जेव्हा चंद्रावर सूर्यास्त झाला होता तेव्हा विक्रम व प्रज्ञानला स्लीप मोड वर टाकण्यात आले होते. ३० सप्टेंबरला सूर्योदय होताच चांद्रयान ३ च्या दोन्ही शिलेदारांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न झाला पण याला यश आले नाही. आता पुन्हा एकदा चंद्रावर काळोख होणार असताना विक्रम व प्रज्ञान पुन्हा सुरु होण्याच्या आशा सुद्धा मावळल्या आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-3 मोहिमेने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ यशस्वीरित्या उतरवले होते. अशाप्रकारे दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला होता. यानंतर केंद्र सरकारने चांद्रयानाच्या लँडिंगच्या पॉईंटला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव देण्यात आले होते. हा पॉईंट चंद्राच्या उत्तर ध्रुवापासून अंदाजे ४,२०० किलोमीटर अंतरावर, मॅंझिनस सी आणि सिम्पेलियस एन क्रेटर्सच्या मध्ये वसलेला आहे. या मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ हे नाव देण्यात आले.
लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर नियोजित दोन आठवड्यांचे संशोधन कार्य राबवताना काही महत्त्वपूर्ण प्रयोग केले आणि त्यातून मौल्यवान डेटा गोळा केला. चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE) नावाच्या ऑनबोर्ड पेलोडचे ऑपरेशन राबवून विक्रम लॅण्डरने प्रथमच चंद्राच्या मातीचे तापमान वेगवेगळ्या स्तरावर मोजले.
चंद्रावर सूर्यास्त झाल्यावर तापमान अत्यंत थंड झाले होते. यामध्ये विक्रम व प्रज्ञानचे पार्ट्स सुद्धा थंड पडले होते. आता विक्रम व प्रज्ञानचे काम थांबले असले तरी चांद्रयान-3 द्वारे गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण आणि अभ्यास सुरू राहील असे इस्रोतर्फे सांगण्यात आले आहे.
करोना लसी संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेलची घोषणा; करिको व वेसमन यांची नावं जाहीर!
जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान असणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली असून पहिलं नोबेल पारितोषिक वैद्यक क्षेत्रासाठी जाहीर झालं आहे. करोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ज्ञ कॅटलिन करिको व ड्र्यु वेसमन यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्विडनच्या कॅरिलोन्स्का संस्थेच्या नोबेल परिषदेकडून करिको व ड्र्यु वेसमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षीच्या नोबेल पुरस्करांची घोषणा होण्यास वैद्यकशास्त्रातील पुरस्काराने सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत विज्ञान, साहित्य, अर्थशास्त्र व शांततेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे. १९०१ साली हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
या वर्षी सर अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये एका समारंभात स्विडनच्या राजाच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.
लेझर बीम’मुळे पुण्यात १५ जणांच्या डोळ्यांना इजा, पुण्यातील विविध रुग्णालयांत नोंद; कायमस्वरुपी दृष्टी जाण्याचा धोका
गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेझर बीममुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची सुमारे १५ प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील काही गंभीर असून, संबंधितांची दृष्टी कायमस्वरूपी जाण्याचा धोका आहे, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली.
यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक गणेश मंडळांनी रथावर लेझर बीमचा वापर केला होता. त्याच्या प्रखर झोतामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक तरुण मागील काही दिवसांत नेत्रविकार तज्ज्ञांकडे येत आहेत. पुण्यातील नेत्र रुग्णालयांमध्ये अशा सुमारे १५ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांपैकी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात चार रुग्णांची नोंद झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात दोन, डॉ. दूधभाते नेत्रालयात दोन, तर शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची नोंद झाली आहे.
लेझर बीममुळे डोळ्यांना त्रास झालेले तरुण प्रामुख्याने २० ते २५ वयोगटातील आहेत. मिरवणुकीत लेझर बीमच्या जवळ असलेल्या तरुणांना प्रामुख्याने त्रास झाला आहे. लेझर बीम डोळ्यावर पडल्यानंतर अचानक कमी दिसू लागते. यामुळे कामस्वरूपी डोळ्याला इजा होण्याचा धोका आहे. – डॉ. अंजली कुलकर्णी, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक
लेझर बीम हा तीव्र प्रकाशझोत असतो. तो डोळ्यावर पडल्यानंतर डोळ्यांवर ताण येऊन बाहुली आकुंचन पावते आणि डोकेदुखी सुरू होते. अपस्माराचे झटके येण्याचा त्रास असलेल्या रुग्णांना अशा प्रकारच्या प्रखर प्रकाशझोतांमुळे हा त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. लेझर बीममुळे डोळ्यावर होणारा परिणाम तपासण्याची आवश्यकता आहे.
भारत-अमेरिका संबंध चंद्रयानाप्रमाणे सर्वोच्च स्तरावरच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा विश्वास
काँग्रेसने राजस्थानात सुरू केलेल्या कल्याणकारी योजना बंद करू नयेत, असे आपल्याला सांगून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आधीच पराभव मान्य केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भाजप यापैकी कोणत्याही योजना बंद करणार नाही अशी हमी त्यांनी दिली.
भाजपच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कुणालाही पुढे केले जाणार नाही असे स्पष्ट संकेत चित्तोडगड येथील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी दिले. भाजप विधानसभेची निवडणूक पक्षाच्या ‘कमळ’ या चिन्हावर लढवेल असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल आदी नेते या वेळी हजर होते.
भाजप राज्यात सत्तेवर आल्यास, काँग्रेस सरकारच्या योजना बंद केल्या जाणार नाहीत अशी हमी मोदी यांनी द्यावी, अशी मागणी गहलोत यांनी अलीकडेच केली होती.काँग्रेस सरकारची उलटगणती सुरू झाल्याचे गहलोत यांना माहीत आहे, असे मोदी म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - स्केटिंगमध्ये महाराष्ट्राला सांघिक सुवर्ण :
महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी स्केटिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले. तसेच नौकानयन, कुस्ती, तिहेरी उडी, स्केटिंग, जलतरण या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी महाराष्ट्राला रौप्यपदकाची कमाई करून दिली. जिम्नॅस्टिक आणि कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कांस्यपदके मिळविली.
स्केटिंग स्पर्धेचा अखेरचा दिवस महाराष्ट्र संघासाठी सोनेरी ठरला. विक्रम इंगळे, सिद्धांत कांबळे, सुरुद सुर्वे व आर्य जुवेकर यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या पुरुष रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. आर्य जुवेकरने १००० मीटर स्केटिंग शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
महाराष्ट्राला नौकानयनात विपुल घाटे आणि ओंकार म्हस्के यांनी रौप्यपदक मिळवून दिले. त्यांनी पुरुषांच्या गटातील कॉक्सलेस दुहेरी प्रकारात दोन हजार मीटरचे अंतर सहा मिनिटे ४२ सेकंदांत पूर्ण केले. आशिया पदक विजेती मृण्मयी साळगावकरने महिलांच्या एकेरी स्कलमध्ये अंतिम फेरी गाठली.
जलतरणातील १०० मीटर फ्री-स्टाइल रिले शर्यतीत महाराष्ट्राने रौप्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या संघात पलक जोशी, अनुष्का पाटील, दिवा पंजाबी, अवंतिका चव्हाण यांचा समावेश होता. इशिता रेवाळेने ४१.८० गुणांसह आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये कांस्यपदक मिळवले. पूर्वा सावंतने तिहेरी उडीत १२.७६ मीटर उडी मारताना कांस्यपदक जिंकले. बास्केटबॉल आणि खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली. बॅडिमटनमध्ये उपांत्य फेरीत महाराष्ट्राला तेलंगणाकडून हार पत्करावी लागली.
देशात ‘५जी’ सेवा सुरू; संपूर्ण स्वदेशी प्रणालीचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण :
देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘५जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे. विशेष म्हणजे ही ‘५जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली. भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘५जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. ‘‘या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘‘आज १३० कोटी भारतीयांना ५जीच्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. यामुळे अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे मोदी म्हणाले.
‘५जी’ प्रणालीचा वापर करून पंतप्रधानांनी युरोपमध्ये गाडी चालवली. गाडी स्वीडनमध्ये होती, तर तिचे नियंत्रण ‘आयएमसी’मधील एरिक्सन कंपनीच्या मंडपात होते. पंतप्रधानांनी तिथे बसून हजारो किलोमीटरवर असलेली गाडी चालवली. यानिमित्ताने ‘५जी’ प्रणालीच्या वेगाची चाचणी घेतली गेली.
उद्योगजगताकडून स्वागत - ‘५जी’ सेवेच्या रूपाने आपण सर्वसमावेशक डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया ‘सीआयआय’चे अध्यक्ष संजीव बजाज यांनी व्यक्त केली. तर अतिवेगवान इंटरनेट शिक्षण, आरोग्य आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे आहे, असे ‘असोचेम’चे महासचिव दीपक सूद म्हणाले. ‘फिक्की’चे अध्यक्ष संजीव मेहता यांनी, ‘‘आता देशात व्यवसाय करणे आणि जगणे सोपे होणार आहे,’’ अस सांगितले
मोबाइलमध्ये कधी?
‘भारती-एअरटेल’ने मुंबई, दिल्ली, बंगळूरु आणि वाराणसीसह आठ शहरांमध्ये लगेच सेवा सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले.
आघाडीच्या रिलायन्स ‘जिओ’ने चार महानगरांमध्ये याच महिन्यात सेवा सुरू होईल, असे जाहीर केले. ‘व्होडाफोन-आयडिया’ने मात्र अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.
‘जिओ’ने डिसेंबर २०२३ पर्यंत, तर ‘एअरटेल’ने मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देश ‘५जी’च्या जाळय़ात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले.
भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश :
भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील केवळ एका शहराचा समावेश आहे. या शहराचं नाव आहे नवी मुंबई. या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीत इंदोर सलग सहाव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत आहे. सुरतनेही स्वच्छ शहर म्हणून दुसरा क्रमांक पटकावण्यात हॅटट्रिक केली आहे. राष्ट्रपती द्रौपती मूर्मू यांनी २०२२ ची ही स्वच्छ शहरांची यादी शनिवारी (१ ऑक्टोबर) जाहीर केली.
देशाची राजधानी आणि सत्तेचं केंद्र असलेल्या दिल्लीची या यादीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील वर्षी या यादीत पाचव्या क्रमांकावर असणारं दिल्ली शहर यंदा म्हणजे २०२२ मध्ये नवव्या स्थानावर घसरलं आहे. २०२० मध्ये दिल्लीचा क्रमांक या यादीत आठवा होता.
स्वच्छ शहरांच्या यादीत दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. एक यादी एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची आहे, तर दुसरी यादी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांची आहे. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ एकाच शहराचा समावेश असला, तरी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - ऐश्वर्या मिश्राची विक्रमासह सुवर्णकमाई :
महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. स्केटिंगमध्ये श्रद्धा गायकवाडने, तर टेनिसमध्ये पुरुष संघाने सोनेरी यश मिळविले.
अॅथलेटिक्समध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐश्वर्याने ५२.६२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. यासह ऐश्वर्याने बीनामोलचा (५२.७१सेकंद) अकरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. महाराष्ट्राच्या डांयड्रा व्हॅलेदारेसने (११.६२ सेकंद) महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव (१६ मिनिटे ३९.९७ सेकंद) पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची मानकरी ठरली.
स्केट बोर्ड प्रकारात श्रद्धा गायकवाडने सुवर्णपदक मिळविले. उर्मिला पाबळे, शुभम सुराणाने रौप्यपदक पटकावले. निखिल शेलाटकरने कांस्यपदक जिंकले. आर्टिस्टिक कपल डान्स प्रकारात महाराष्ट्राच्या यशस्वी शाह व इलुरी कृ्ष्णा साई राहुल या जोडीने सुवर्णपदक मिळविले. खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आगेकूच कायम राखली.
टेनिसमध्ये महिला रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. तलवारबाजीत अजिंक्य दुधारे आणि गिरीश जकाते यांना कांस्यपदके मिळाली. कुस्तीत समीर पाटीलने ग्रीको-रोमनच्या ७७ किलो वजनी गटात एकमेव कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राला सायकिलगमधील पहिले पदक मयुरी लुटेने मिळवून दिले. महाराष्ट्र महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघाने २६३.६० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. श्रद्धा तळेकर, इशिता रेवाळे, सिद्धी हत्तेकर, मानसी देशमुख, सारिका अत्तरदे आणि सलोनी दादरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.