चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ जून २०२२

Date : 3 June, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फिनालिसिमा चषक फुटबॉल - इटलीला नमवत अर्जेटिनाला जेतेपद :
  • कर्णधार लिओनेल मेसी आणि आघाडीपटू लौटारो मार्टिनेझ यांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर अर्जेटिना फुटबॉल संघाने इटलीवर ३-० अशी मात करत पहिल्या फिनालिसिमा चषकाचे विजेतेपद पटकावले.

  • कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेते आणि युरो चषकाचे विजेते यांच्यात यंदा पहिल्यांदाच फिनालिसिमा चषकासाठी सामना खेळवण्यात आला. वेम्बली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २८व्या मिनिटाला मेसीच्या पासवर मार्टिनेझने गोल करत अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली.

  • मग मार्टिनेझच्या साहाय्याने अँजेल डीमारियाने गोल झळकावल्याने मध्यंतराला अर्जेटिनाकडे २-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात मेसीच्या पासवर पाव्लो डिबालाने गोल केल्यामुळे अर्जेटिनाने हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला.

शेरिल सँडबर्ग यांचा राजीनाम्याचा निर्णय :
  • फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’च्या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकारी शेरिल सँडबर्ग यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्टार्टअप’च्या स्वरूपातील या व्यवसायाचे डिजिटल जाहिरातीच्या साम्राज्यात रूपांतर करण्याचे श्रेय सँडबर्ग यांना असून, त्याच्या अनेक चुकीच्या निर्णयांचा दोषही त्यांनी स्वत:कडे घेतला होता.

  •  ‘फेसबुक’ या बडय़ा समाजमाध्यमात सँडबर्ग यांनी मुख्य परिचालन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून १४ वर्षे काम पाहिले. फेसबुकला सार्वजनिक स्वरूप आले त्याच्या चार वर्षे आधी, म्हणजे २००८ साली गूगलमधून त्या येथे आल्या होत्या.

  • ‘२००८ मध्ये मी हे काम स्वीकारले, तेव्हा पाच वर्षे मी या भूमिकेत राहीन अशी मी आशा केली होती. आता १४ वर्षांनंतर माझ्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची माझी वेळ आहे’, असे सँडबर्ग यांनी बुधवारी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - स्वप्निलला रौप्यपदक :
  • भारताच्या स्वप्निल कुसळेने बाकू (अझरबैजान) येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. हे भारताचे या स्पर्धेतील दुसरे पदक होते. सुवर्णपदकाच्या लढतीत २६ वर्षीय स्वप्निलला युक्रेनच्या सेरहिय कुलिशकडून १०-१६ असा पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या कुशिलला स्वप्निलने चांगली झुंज दिली. मात्र मोक्याच्या क्षणी तो सर्वोत्तम खेळ करू शकला नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या स्वप्निलचे हे ‘आयएसएसएस’ विश्वचषक स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक ठरले.

  •  पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात स्वप्निलने दर्जेदार कामगिरी केली. पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानासह त्याने अंतिम फेरीचा टप्पा गाठला. त्यानंतर गुरुवारी आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत तो पुन्हा दुसऱ्या स्थानी राहिला. कुलिशने ४११ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तसेच स्वप्निल ४०९.१ गुणांसह दुसरे स्थान मिळवत सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरला. फिनलंडच्या अलेक्सी लेप्पाने ४०७.८ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • सुवर्णपदकाच्या लढतीत स्वप्निलचा झुंजार खेळ अपुरा पडला. कुलिशने अखेरच्या पाचपैकी चार फेऱ्यांमध्ये १०.५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले. याउलट स्वप्निलला केवळ एकदा १०.५ गुणांचा टप्पा ओलांडता आला आणि दोन वेळा त्याला १० हूनही कमी गुण मिळवता आले. स्वप्निलच्या रौप्यकमाईमुळे भारताने या स्पर्धेच्या पदकतालिकेत संयुक्तरीत्या सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा - आनंदचा सलग दुसरा विजय; दुसऱ्या फेरीत टोपालोव्हवर मात :
  • भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू ठेवताना पारंपरिक (क्लासिकल) विभागातील दुसऱ्या फेरीत बल्गेरियाच्या व्हेसेलिन टोपालोव्हवर मात केली. या कामगिरीसह त्याने जागतिक क्रमवारीतही अव्वल दहा खेळाडूंमध्ये पुनरागमन करताना नवव्या स्थानी झेप घेतली.

  • ५२ वर्षीय आनंदने पहिल्या फेरीत मॅक्सिम वाशिये-लॅग्रेव्हला पराभूत केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री उशिराने झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत त्याने टोपालोव्हचा ३६ चालींमध्ये पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे दोन फेऱ्यांअंती सहा गुणांसह आनंद गुणतालिकेत अग्रस्थानावर आहे.

  • गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या वेस्ली सोने दुसऱ्या फेरीत विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू आणि पाच वेळा विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. ३८ चालींअंती नियमित लढत बरोबरीत सुटल्यानंतर अर्मागेडन डावात वेस्लीने सरशी साधली. पारंपरिक विभागात नियमित लढत बरोबरीत संपल्यास ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी अर्मागेडन डावाचा अवलंब केला जातो.  

सरकारी धोरणाबद्दल लातूरमध्ये संमिश्र प्रतिक्रिया ; बारावी, सीईटीच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांचा विचार :
  • सरकारच्या धोरणलकव्यामुळे सर्वच क्षेत्रांत समस्यांचा गुंता वाढतोच आहे. महाआघाडी सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बारावीच्या गुणांनाही समान महत्त्व देण्याचा निर्णय घेतला असून यापुढील शैक्षणिक वर्षांपासून व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावी आणि सीईटीच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांचा विचार करण्यात येणार आहे. या निर्णयाबद्दल लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पूर्वी बारावीच्या परीक्षेचे गुण हाच एकमेव निकष होता. शहरी व ग्रामीण भागात परीक्षा केंद्रावर तफावत राहते व ग्रामीण भागात कॉपीचे प्रमाण वाढत असल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश देताना बारावीच्या परीक्षेच्या गुणांच्या ऐवजी एखादी गुणवत्तापूर्ण परीक्षा असावी असा विचार करून सीईटी परीक्षेचा उपाय समोर आला. त्या वेळी अनेक ठिकाणी शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात शैक्षणिक क्षेत्रात प्रतिक्रिया उमटल्या. अगदी शासनाच्या निर्णयाविरोधात मोर्चेही काढण्यात आले. सीईटीच्या तयारीसाठी शहरी भागात शिकवण्या उपलब्ध आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी या बाबतीत मागे पडतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

  • लातूर जिल्ह्यात त्या वेळी राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय, अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयात, महाविद्यालयाने सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेतले व त्यांची तयारी करून घेतली. त्यानंतर जो निकाल आला, बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी लातूर जिल्ह्याचे असत, सीईटी परीक्षेतही हेच विद्यार्थी पुन्हा चमकले. त्यानंतर विविध परीक्षा आल्या.

  • जेईई, एआय ईईई या परीक्षांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षाही आली. या बाबतीतही उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या व बारावीच्या गुणांसाठी केवळ ५० टक्केची अट ठेवण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीच्या गुणांना काहीही किंमत राहिली नाही. अन्य परीक्षेचे गुण हे ग्राह्य धरले जातात. राज्यातील अनेक महाविद्यालयांत विद्यार्थी केवळ नावाला प्रवेश घेत असत. महाविद्यालयात ते जातच नसत, खासगी शिकवणी करून विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असत.

पुढील वर्षांपर्यंत देशातील सर्व रेल्वे ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण; राज्यमंत्री दानवे यांची माहिती :
  • डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील सर्व रेल्वे ब्रॉडगेज मार्गावर विद्युत इंजिनाच्या गाडय़ा धावतील, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या मार्गावर धावणारी डिझेलची इंजिने बंद झाल्यामुळे खर्चात बचत तर होईलच आणि पर्यावरणाचे नुकसानही टळेल, असे दानवे यांनी म्हटले आहे.

  • नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी म्हटले आहे, की अगदी कालपर्यंत जम्मू-काश्मीर आणि देशाच्या ईशान्य भागात बहुतांश रेल्वे सेवा पोहोचली नव्हती.

  • मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गासाठी ३५ हजार कोटी रुपये उपलब्ध करवून दिले. या खडतर कामामुळे उधमपूरचा नागरिक थेट कन्याकुमारीशी जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्यांना जोडणारा ‘कॅपिटल कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

  • जवळपास एक लाख कोटींचे अर्थसाह्य यासाठी उपलब्ध करवून देण्यात आलेले आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पंजाब ते जेएनपीटी मुंबई तसेच कोलकातादरम्यान ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ आकारास येत आहे. फक्त मालवाहतुकीच्या सेवेसाठी हा मार्ग असेल.

  • ‘किसान रेल्वे’च्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेल्या जानेवारीपर्यंत मध्य रेल्वेने ‘किसान रेल्वे’च्या ९०० फेऱ्यांच्या माध्यमातून तीन लाख टनांपेक्षा अधिक नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वेगाडय़ातील तसेच स्थानकांवरील स्वच्छतेकडे लक्ष देऊन बायोटॉयलेट सुरू करण्यात आले आहे.

०३ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.