चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 29, 2021 | Category : Current Affairs


जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा - भारताचा अर्मेनियावर विजय :
 • भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या फेरीत अर्मेनियाला २.५-१.५ असे नमवून ‘फिडे’ जागतिक सांघिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत दुसऱ्या विजयाची नोंद केली.

 • अ-गटात समावेश असलेल्या भारताने पहिल्या फेरीत अझरबैजानशी २-२ अशी बरोबरी साधली, तर दुसऱ्या फेरीत स्पेनला २.५-१.५ असे हरवले. तिसऱ्या फेरीतील विजयामुळे भारताने ७ गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे, तर रशियाने ११ गुणांसह आघाडी टिकवली. रशियाने अझरबैजानचा ३.५-०.५ असा पराभव केला. स्पेनने फ्रान्सचे आव्हान २.५-१.५ असे मोडित काढले.

 • अर्मेनियाविरुद्धच्या सामन्यात तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण विजय नोंदवले. तानियाने ४० चालींत अ‍ॅना एम. सर्गसियानला नमवले, तर भक्तीने सुसाना गॅबोयानचा ३० चालींत पराभव केला.

 • द्रोणावल्ली हरिकाने एलिना डॅनिएलियनशी बरोबरी साधली. परंतु पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये दिमाखदार विजय मिळवणाऱ्या आर. वैशालीने लिलिट मॅकशियानकडून पराभव पत्करला.

MPSC Result: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम :
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

 • १३ जुलै २०१९ ते १५ जुलै २०१९ या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. एकूण ४२० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळ्या २६ पदांचा यामध्ये समावेश होता.

 • या परिक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे. ज्यात साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला असून मानसी पाटील ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे.

 • रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे

राज्यात १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदार नोंदणी मोहीम :
 • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिला आहे.

 • भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत निवडणूक आयुक्त मदान यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला.

 • मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सल्लागार दिलीप शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत.

 • आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरुस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा, असे मदान यांनी सांगितले.

‘डिजिटल बारामती ॲम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकर्पण :
 • सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरिकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न असून, या मध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.

 • येथील सह्याद्री अतिथीगृहात बारामती नगरपरिषद, आयसीआयसीआय फाऊंडेशन, रेव्हमॅक्स टेलिकॉम, उन्नती डिजीटल या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, आयसीआयसीआय फौंडेशनचे विनीत रुंगटा, कौस्तुभ बुटाला उपस्थित होते.

 • उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ”माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवून आणली. त्यांनी त्या काळात दाखविलेली दूरदृष्टी, आज देशाला उपयुक्त ठरत आहे. देशातील आजची मोबाईल क्रांती, डिजिटल क्रांती राजीव गांधींनी रचलेल्या संगणक क्रांतीच्या पायावर उभी आहे. ज्या लोकांनी संगणकाला विरोध केला ते आता सत्तेत आहेत आणि डिजीटलायजेशन बाबत बोलत आहेत. संगणकामुळे बेरोजगारी वाढेल असं म्हणत विरोध केला गेला मात्र, उलट यामुळे रोजगार वाढला.

आशियातल्या सर्वात लांब बोगद्याची नितीन गडकरींनी केली पाहणी; उद्घाटनाची तारीख जाहीर करत म्हणाले :
 • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जम्मू -काश्मीरमधील आशियातील सर्वात लांब झोजिला बोगद्याचा आढावा घेतला.या बोगद्यामुळे लेह ते श्रीनगर हे अंतर तीन तासांनी कमी होणार आहे. झोजिला बोगदा ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी अंतर्गत बांधला जात आहे, हा आशियातील सर्वात लांब बोगदा असणार आहे.

 • केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जोजिला बोगद्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, आम्हाला आशा आहे की ते २३ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि पंतप्रधान २६ जानेवारीला त्याचे उद्घाटन करतील. मोदी सरकार आल्यावर जम्मू -काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग १,६९५ किलोमीटर लांबीचा होता, पण आता तो २,६६४ किलोमीटरचा झाला आहे.

 • नितीन गडकरी म्हणाले की, हा बोगदा बनवण्यासाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. झेड मोर्चा आणि नीलग्रह आणि झोजिलासह सुमारे दहा हजार कोटींचा प्रकल्प आहे. नितीन गडकरी म्हणाले की, शिमला ते रोहतांग मार्गे लेह, झोजिला, सोनमार्ग ते श्रीनगर या मोठ्या बोगद्याचे काम सुरू आहे. वर्षातील सहा महिने सर्व काही थांबते. अशा स्थितीत येत्या काही दिवसांमध्ये शिमला ते श्रीनगरपर्यंत दळणवळण शक्य होईल.

 • नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सुंदर करण्यासाठी दोन्ही बाजूला फुलांची रोपे असावीत. लोकांना वाटले पाहिजे की ते फुलांच्या व्हॅलीमध्ये येत आहेत.

२९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)