राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष राहिलेल्या आणि नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांविरोधात एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने या कायद्यांविरोधात आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी अकाली दलाने केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध प्रादेशिक पक्षांसोबत राष्ट्रीय आघाडी करण्याची घोषणा केली.
अकाली दलाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार प्रा. प्रेमसिंग चंदूमाजरा म्हणाले, “नुकतेच मंजूर झालेले तीन कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर सुरु असलेलं आंदोलन टिकून रहावं यासाठी शिरोमणी अकाली दल प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी तयार करणार आहे. राष्ट्रीय आघाडीसाठी देशभरातील पक्षांना आमंत्रित करण्यात येणार असून याद्वारे मोठी चळवळ उभी राहिल.” पंजाबमध्ये सोमवारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ते एका कार्यक्रमात बोलत होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतल्याने अकाली दलाचं अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अभिनंदन करीत पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार या नेत्यांचा समावेश आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी एकच व्यासपीठ तयार करायला हवं असंही प्रा. चंदूमाजरा यांनी म्हटलं आहे.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६-२०१७ या काळात फक्त७५० अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरल्याचे उघड झाले आहे. त्यावेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. व्हाइट हाऊसमध्ये त्यांचे पहिले वर्ष यात पूर्ण झाले होते.
माध्यमांच्या बातम्यांनुसार ते व त्यांच्या कंपन्यांनी २०१७ मध्ये भारतात १,४५,४०० अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरला आहे. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २०१६ मध्ये रिंगणात उतरले व निवडून आले. त्यांचा डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावरचा विजय हा आश्चर्यकारक मानला जात होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या वर्षी निवडणूक जिंकली त्या वर्षांत केवळ ७५० डॉलर्सचा कर भरला असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांतील प्राप्तिकर नोंदी यात तपासण्यात आल्या. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील झंझावाती चर्चा मंगळवारपासून डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्या समवेत सुरू होत असतानाच ट्रम्प यांनी प्राप्तिकर बुडवल्याची गोष्ट सामोरी आली आहे. त्याआधीच्या पंधरा वर्षांपैकी दहा वर्षांत ट्रम्प यांनी एक पैसाही प्राप्तिकर भरलेला नाही. आपल्याला तोटाच झाला असे त्यांनी दाखवले होते.
न्यूयॉर्क टाइम्सला ट्रम्प यांची २०१८, २०१९ मधील आर्थिक माहिती मिळालेली नाही, पण त्या आधी ट्रम्प यांनी वीस वर्षांत अनेक कंपन्या उभ्या केल्या व त्यात तोटा दाखवला आहे. व्हाइट हाऊसमधील पहिल्या दोन वर्षांत त्यांचा परदेशातील महसूल ७३ दशलक्ष डॉलर्स होता. त्यातील बराचसा स्कॉटलंड व आर्यलडमधील गोल्फ मालमत्तेशी संबंधित होता. फिलिपिन्स ३ दशलक्ष डॉलर्स व भारत २.३ दशलक्ष डॉलर्स, तुर्कस्थान १० लाख डॉलर्स असा त्यांचा महसूल होता. २०१७ मध्ये त्यांनी अमेरिकेत ७५० डॉलर्स कर भरला. पनामात १५,५९८ डॉलर्स, भारतात १,४५,४०० डॉलर्स, फिलिपिन्स १,५६,८२४ डॉलर्स या प्रमाणे करभरणा त्यांनी केला आहे.
राफेलसारखी लढाऊ विमाने तसेच, अन्य संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
राफेल करारानुसार दासाँ कंपनीने तंत्रज्ञान हस्तांतरण करणे अपेक्षित असले तरी त्याबाबत कंपनीने कोणतीही अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, असा ठपका ‘कॅग’ने ठेवला होता. याच करारांतर्गत एकूण करारमूल्याच्या ५० टक्के रक्कम भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवण्याचेही बंधन आहे. त्याचीही पूर्तता करण्यात आलेली नाही.
‘ऑफसेट’ची अट फारशी यशस्वी होत नसल्याने ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणामुळे युद्धसामग्रीचे तंत्रज्ञान मिळवण्यापेक्षा सुसज्ज युद्धसामग्री खरेदी केली जाऊ शकेल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज युद्धसामग्री मिळवण्यावर भर असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे कळवण्यात आले आहे.
याबरोबर प्रवेश प्रमाणपत्राशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, परीक्षेस येतांना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचा फोटो व इतर मजकूर स्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकीत प्रत सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे इत्यादी सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.