चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ मे २०२१

Date : 29 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बारावीच्या परीक्षेबाबत ३१ मे रोजी सुनावणी :
  • करोना संसर्गामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सर्वोच्च न्यायालय ३१ मे रोजी सुनावणी करणार आहे.

  • न्या. ए.एम खान व न्या. दिनेश माहेश्वरी यांच्यापुढे याचिकेची सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर याचिकाकत्र्या ममता शर्मा यांनी त्यांच्या याचिकेची प्रत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला दिली आहे की नाही याची विचारणा न्यायालयाने केली. त्यावर शर्मा यांनी म्हटले आहे, की आपण संबंधितांना याचिकेची प्रत उपलब्ध करणार आहोत. नंतर न्यायालयाने ही सुनावणी ३१ मे रोजी करण्याचे म्हटले आहे. सीबीएसइ व कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या दोन संस्थांसह केंद्राला याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

  • सुनावणीवेळी माहेश्वरी यांनी सांगितले, की सीबीएसइ या मुद्द्यावर १ जून रोजी निर्णय घेणार आहे. कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या संस्थेच्या वकिलांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालय याचिकेवर सुनावणी करणार असून उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करू नये. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले, की त्यांनी स्वत:हून या प्रश्नाची दखल घ्यावी.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी ३० जूनपर्यंत वाढवली :
  • देशातील करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए)कडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता ३० जूनपर्यंत भारतामधून व भारतासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी ३० जूनपर्यंत वाढण्यात आली आहे.

  • आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूनक व कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. तर, ३० जूननंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही देशासोबतच्या मालवाहतूक व कुरिअर सेवेवर बंदी घालण्यात आलेली नाही, सुरक्षा नियम व कोविड नियमांचे पालन करत कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • डीजीसीआयने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदी घातलेली असली तरी, वंदे भारत मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. याशिवाय एअर बबल करारानुसार प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे.

‘पदव्युत्तर वैद्यकीय’च्या परीक्षा १६ ऑगस्टपासून :
  • कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून घेण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

  • उन्हाळी सत्र २०२१ मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेसंदर्भात विद्यापीठाचे प्रती कुलपती अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यापूर्वी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची ही लेखी परीक्षा २४ जूनपासून होणार होती. मात्र करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे ही परीक्षा कधी होणार याविषयी  विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती.

  • आता करोनाचे सर्व नियमांचे पालन करत या अभ्यासक्रमाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा १६ ऑगस्टपासून घेण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ‘ई-पास’ प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहे.

१३८ व्या जयंती निमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या’ बायोपिकची घोषणा :
  • भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारं व्यक्तीमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. खरं तर स्वातंत्र्य लढात सावकरांच्या असलेल्या योगदानावर आजवर अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सावरकरांचे देशात जितके समर्थक आहेत तितकेच टीकाकार.

  • अशातच सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केलीय. या सिनेमातून सावरकरांबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा संदीप या सिनेमातून करणार आहेत.

  • संदीप सिंह यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय. 

  • पुढे संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते.  मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ” असं संदीप सिंह म्हणाले आहेत.

‘आयपीएल’चा निर्णय आज :
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिरातीत १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यानच्या तीन आठवडय़ांत खेळवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शनिवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दूरचित्रसंवादाद्वारे शनिवारी होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या विशेष सर्वसाधारण सभेत ‘आयपीएल’सह आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगाम आणि रणजीपटूंची नुकसानभरपाई या विषयांवर चर्चा होणार आहे.

  • ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली शनिवारी मुंबईतून या बैठकीचे नेतृत्व करील. ‘आयपीएल’चे अमिरातीमधील अबू धाबी, दुबई आणि शारजा या शहरांत आयोजन करता येईल. १८ किंवा २० सप्टेंबरला स्पध्रेला प्रारंभ करून १० ऑक्टोबरला ती संपवण्याची योजना आहे. चार बाद फेरीच्या सामन्यांशिवाय १० दुहेरी आणि सात एकेरी सामने प्रत्येक दिवशी आयोजित करण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

  • करोनाच्या पाश्र्वभूमीवर रणजी हंगाम रद्द झाल्यामुळे ‘बीसीसीआय’ने जवळपास ७०० स्थानिक क्रिकेटपटूंना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय जानेवारीत घेतला होता. परंतु या वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले नव्हते. फक्त ७३ बिगरआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडे ‘आयपीएल’चा करार आहे. क्रिकेटपटूंचा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण :
  • देशात आत्तापर्यंत तीन टक्के लसीकरण झाले असले तरी, करोना प्रतिबंधक लशींच्या २१६ कोटी मात्रा डिसेंबरपर्यंत दिल्या जातील, म्हणजेच १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी दिली.

  • मोदी सरकारकडे लसीकरणाचे धोरण नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांना उत्तर देताना जावडेकर म्हणाले, ‘‘लसीकरणाची खरोखरच चिंता असेल तर, काँग्रेसप्रणीत राज्यांमध्ये काय चालले आहे ते बघा. १८ ते ४४ वयोगटासाठी केंद्राने लसमात्रांचा दिलेला कोटादेखील या राज्यांनी उचललेला नाही.’’

  • लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा वापर केला जात आहे. शिवाय, झायडस कॅडिला कंपनीची लस, नोव्हाव्हॅक्स, स्पुटनिक, जनोव्हा या लशी उपलब्ध होतील. परदेशी  लशीही देशात मिळू शकतील. एकूण २१६ कोटी लशींचे उत्पादन केले जाणार असल्याने २०२१ संपण्यापूर्वी संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे जावडेकर म्हणाले.

२९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.