चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ मे २०२०

Date : 29 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्थलांतरित मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करा, प्रवास भाडं घेऊ नका -सर्वोच्च न्यायालय :
  • सध्या देशात चर्चेत असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. स्थलांतरित मजुरांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये प्रचंड गोंधळ असून, त्यांच्याकडून प्रवासाचे भाडे घेऊ नये. राज्यांनी ती व्यवस्था करावी. त्याचबरोबर रेल्वेनं या प्रवाशांच्या जेवण व पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना दिले आहे.

  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन जाहीर केला. त्यानंतर रोजगार बंद झाल्यानं देशातील विविध शहरात काम करणाऱ्या मजुरांनी आपापल्या घराचा रस्ता धरला. लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्यानं मजुरांनी पायी प्रवास सुरू केला.

  • औरंगाबाद-जालना दरम्यानच्या रेल्वे मार्गावर मालवाहु गाडीनं १६ मजुरांना चिरडलं. त्यानंतर हा प्रश्न अधिक गंभीर झाला. देशातील विविध भागात मजुरांचा घरी जाण्याआधीच मृत्यू झाला. या प्रकरणात लक्ष घालत सर्वोच्च न्यायालयानं स्यू मोटू याचिका दाखल करुन घेतली होती.

चीनची हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी :
  • अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता चीनने हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली आहे. हॉँगकॉँगमध्ये गेल्या काही दिवसांपासून या विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. अमेरिकेचा इशारा आणि आंदोलन याकडे लक्ष न देता चीनने विधेयकाला मंजुरी दिली आहे.

  • चीन सरकारने मंजूर केलेले विधेयक हे हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर आणि लोकशाही मूल्यांवर घाला घालणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र गुरुवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसने या विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकाला २८७८ जणांनी समर्थन दिले, एका सदस्याने विरोध केला तर सहा सदस्य या वेळी गैरहजर होते.

  • पुढील काही दिवसांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कायद्या अंतर्गत स्थानिकांचा हाँगकाँगमध्येच खटला चालविण्यात येणार आहे.

भारत चीन सीमा वाद : मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प :
  • गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणावर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु भारताकडून तो प्रस्ताव नाकारण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुनर्रुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी चांगल्या मूडमध्ये नसल्याचं वक्तव्य केलं. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

  • “भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची १.४ अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचं लष्करही ताकदवान आहे.

  • भारत या संपूर्ण प्रकारावरून बिलकुल खुश नाही, तसंच चीनदेखील नाही. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून त्यांचा मूड बिलकुल ठीक नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

१ जूनपासून लॉकडाउनचा पाचवा टप्पा - अमित शाह यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा : 
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश मिळालं नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवायचा की नाही यासंबंधी लवकरच केंद्र सरकार घोषणा करणं अपेक्षित आहे. पण त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लॉकडाउनसंबंधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

  • पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणी केली होती. २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. सुरुवातीला हा लॉकडाउन ३ मे आणि त्यानंतर १७ मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाउनचा चौथा टप्पाही ३१ मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

फेसबुकपाठोपाठ गुगलही भारतीय टेलिकॉम क्षेत्रात घेणार उडी - ‘या’ कंपनीत करणार गुंतवणूक :
  • काही दिवसांपूर्वी फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आणखी काही कंपन्यांनीदेखील जिओमध्ये गुंतवणूक केली होती. आता गुगलनंदेखील भारतातील टेलिकॉम क्षेत्रात सर दाखवला आहे. एजीआरच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया या कंपनीत गुगल गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • गुगल ही कंपनी व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीचा काही हिस्सा विकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं फायनॅन्शिअल टाईमधील अहवालाच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. गुगल व्होडाफोन आयडिया या कंपनीतील ५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.

  • युनायटेड किंगडममधील व्होडाफोन आणि आदित्या बिर्ला यांच्या जॉइंट व्हेन्चर व्होडाफोन आयडिया या कंपनीतील ५ टक्के हिस्सा गुगल खरेदी करण्याची शक्यता असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट ही जिओमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं निरनिराळ्या अहवालातून समोर आलं आहे.

२९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.