चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ जानेवारी २०२१

Date : 29 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राम मंदिराच्या उभारणीस विलंब :
  • अयोध्येत राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्या दूर करण्यासाठी देशभरातील ‘आयआयटी’ तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. या प्राथमिक विलंबामुळे राम मंदिर उभारणीचे काम २०२४ अखेरीपर्यंत किंवा २०२५मध्ये पूर्णत्वास जाण्याची चिन्हे असून ते वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

  • अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या ५ ऑगस्टला झाले. मंदिराचा पाया बांधण्यासाठी मृदा चाचणी आणि खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सुमारे २०० फूट खोदकाम करून खांब बसविण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होते. मंदिरासाठी सुमारे १२०० खांब बसवण्यात येणार आहेत. मंदिराचे वजन आणि भूकंप किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिराचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि ते एक हजार वर्षे टिकावे, असे नियोजन करून मजबूत पायाउभारणी करण्यात येत आहे.

  • पायाच्या खांबांना सुमारे ७०० टन वजन पेलावे लागेल, हे गृहीत धरून तेवढे वजन खांबावर ठेवले असता तो दोन सेंटिमीटरऐवजी चार सेंटिमीटर खोल गेला. शरयू तीरी मंदिर उभारणी होत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे तेथील मुरूम थोडा मऊ आहे.

  • त्यामुळे मुंबई, रुरकी, गुवाहाटी, मद्रास या आयआयटी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (रुरकी), नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (हैदराबाद) अशा दहा नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. त्यांनी पाया उभारणीत तांत्रिक दृष्टीने काही बदल सुचविले असून आता चुनखडी, कठीण दगड आणि सिमेंट काँक्रीट अशा तीन घटकांचा वापर करून पाया भक्कम करण्यात येणार आहे, अशी माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुपकुमार झा यांनी दिली.

सर्व आव्हानांचा सामना करण्यास भारत सक्षम - मोदी :
  • करोनाशी लढा असू द्या अथवा सीमेवरील संघर्षांची स्थिती असू द्या, आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलण्यासाठी सक्षम असल्याचे भारताने गेल्या वर्षी दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

  • एक देश आणि एकदिलाने आम्ही गेल्या वर्षी आव्हानांचा मुकाबला केला. करोनाच्या फैलावामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम आपल्याला दूर करावयाचे आहेत, असेही मोदी म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या वर्षी भारताने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अनेक पावले उचलण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले.

  • करोनावरील संरक्षण लस असू द्या की भारताला आव्हान देणाऱ्या शक्तींचा क्षेपणास्त्रांनी केलेला विनाश असू द्या, भारत सर्व आघाडय़ांवर सक्षम आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत लशीच्या क्षेत्रात जर आत्मनिर्भर आहे तर तो तितक्याच जोमाने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

  • भारताची सशस्त्र दले सर्वार्थाने सक्षम होण्यासाठी सर्व पावले उचलण्यात आली आहेत, आता देशाकडे उत्तम युद्धयंत्रणा आहे. भारत हा लवकरच संरक्षणविषयक सामग्रीच्या उत्पादन करणारा मोठा देश म्हणून प्रसिद्ध होईल, असेही मोदी म्हणाले.

भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा :
  • भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे त्याची रूपरेषा मांडली. दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत, असेही जयशंकर म्हणाले.

  • पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घडामोडींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले. चीनच्या भूमिकेतील बदल आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यामागील कारणे याबाबत चीनने भारताकडे अद्याप विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही, असे जयशंकर यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले. गेल्या ५ मेपासून दोन्ही देशांचे सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

  • सीमा व्यवस्थापनाबाबत जे सर्व करार झाले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखणे, सीमेवर शांतता राखणे हा सर्व प्रकारच्या संबंधांचा आधार असावा, आदी तत्त्वांचा जयशंकर यांनी मांडलेल्या आठ व्यापक तत्त्वांमध्ये समावेश आहे.

  • त्याचप्रमाणे एकमेकांबद्दल आदर, संवेदना आणि हित या गोष्टींचे दोन्ही देशांनी पालन केले पाहिजे आणि याच तीन गोष्टी संबंध सुधारण्यास मदत करतील. उदयास येणाऱ्या शक्ती म्हणून प्रत्येकाच्या आकांक्षा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. चायना स्टडीजच्या १३ व्या अखिल भारतीय परिषदेत जयशंकर बोलत होते.

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थिगिती वाढवली; डीजीसीएचा निर्णय :
  • भारतातून परदेशात जाणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे, डीजीसीएने याची घोषणा केली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत ही उड्डाणं बंद असतील असं डीजीसीएनं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

  • डीजीसीएनं म्हटलं की, “काही निवडक मार्गांवरच विशेष कारणासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्यामार्फत परवानगी दिली जाऊ शकते. ताज्या निर्णायाचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक आणि त्यांच्यासाठी मंजूर उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर २८ फेब्रुवारीपर्यंत स्थिगिती देण्यात आली आहे.”

  • भारतात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय उड्डाणं करोना महामारीमुळं २३ मार्चपासून बंद आहेत. मात्र, मे महिन्यांत ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत विशेष विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जुलैपासून काही निवडक देशांसोबत एअर बबल करारानुसार उड्डाण केली जात आहेत.

महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात :
  • महिलांची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान भारतात रंगणार असल्याची माहिती गुरुवारी आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) दिली.

  • गेल्या वर्षी ही स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवण्यात आली होती. यंदा त्यात १२ संघांचा समावेश करण्यात आला आहे. तीन गटांत संघांची विभागणी करण्यात आली असून १८ दिवस २५ सामने खेळवण्यात येणार आहेत.

  • आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेद्वारे आशियातील पाच संघांना २०२३च्या ‘फिफा’ महिला विश्वचषक स्पर्धेत थेट पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे.

२९ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.