चालू घडामोडी आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2023

Date : 29 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या सीयूईटी- पीजी परीक्षेची नोंदणी सुरू… जाणून घ्या सविस्तर…
  • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (सीयूईटी-पीजी) ही परीक्षा ११ ते २८ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
  • सीयूईटी-पीजी परीक्षेच्या नोंदणीबाबतची माहिती एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे सोयीचे होण्यासाठी सीयूईटी-पीजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
  • एनटीएने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २४ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर २५ जानेवारीपर्यंत शुल्क भरता येणार आहे. ७ मार्च रोजी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता, शुल्क आणि अन्य माहिती https://nta.ac.in/, https://pgcuet.samarth.ac.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जानेवारीपर्यंत तलाठी भरतीचा निकाल लागणार! आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; १६ हजार जणांचे आक्षेप
  • बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार अशी शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.
  • तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती.
  • संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली.
टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार; जानेवारीमध्ये घोषणा होणार
  • जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला अखेर भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे होणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दरवर्षी गांधीनगरमध्ये हे जागतिक स्तरावरील समिट आयोजित करण्यात येत असते. यंदा याचे दहावे वर्ष आहे. गुजरातमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार टेस्ला कंपनीचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील चर्चा अखेरच्या टप्प्यात आली असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे स्वतः यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी बातमी अहमदाबाद मिररने दिली आहे.
  • टेस्ला कंपनीची आयात शुल्क कपात करण्याची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेक्सासमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्लाने २०२२ साली भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी अमेरिकेचा दौरा केला असताना टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले होते. मध्यंतरी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेतील टेस्लाच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सने आपल्या बातमीत दिली आहे.
  • गुजरात समाचार आणि इतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सानंद जिल्ह्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी टेस्ला कंपनीने रस दाखविला आहे. हा तोच जिल्हा आहे, जिथे टाटा मोटर्सचा वाहन उत्पादन प्रकल्प होणार होता. याशिवाय मारुती सुझुकी आणि एमजी मोटर यासारख्या बड्या कंपन्यांचेही वाहन उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये आहेत. आता टेस्लाचा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आल्यास गुजरात वाहन उत्पादनाचे मोठे हब ठरू शकते.
अयोध्येतील रेल्वे स्थानकानंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, टर्मिनल इमारतीला श्रीराम मंदिराचं रुप
  • रेल्वे स्थानकानंतर अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात आले आहे. अयोध्या विमानतळाचे ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे नामकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ३० डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देणार असून त्यादरम्यान ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
  • याशिवाय अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ते नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. जेथे ते राज्यातील १५,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
  • अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास आणि वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचा भाजपाचा दावा आहे. हे लक्षात घेऊन शहरात नवीन विमानतळ, पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचे उद्घाटन करण्यात येत आहे. अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, जे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांच्या सुशोभीकरणासाठी आणि सुधारण्यास हातभार लावतील.

अयोध्येची विमानतळाची वैशिष्ट्ये काय?

  • निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा १,४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग अयोध्येतील आगामी श्री राम मंदिराची मंदिर वास्तुकला दर्शवतो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी भित्तीचित्रे सजलेली आहेत.
भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची कतारमधील मृत्यूदंडाची शिक्षा रद्द, भारत सरकारच्या प्रयत्नांना यश!
  • कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, ही शिक्षा आता रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
  • कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबरला हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताने याची गांभीर्याने दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या बचावासाठी कायदेशीर उपाय सुरू केले होते. शिक्षेला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारतर्फे गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. या अपिलाचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशाही भारताकडून व्यक्त करण्यात आली.

हे भारतीय माजी नौसैनिक कोण? ते कतारमध्ये काय करीत होते?

  • कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते. रॉयल ओमान एअर फोर्समधून निवृत्त झालेले वैमानिक व ओमानी नागरिक खमिस अल अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. या आठ भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांचं रशिया भेटीचं निमंत्रण
  • भारतात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. आपल्या मित्रांना सगळं यश मिळेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध जसे होते तसेच अबाधित राहतील असंही पुतिन यांनी म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना रशिया भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकी दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांनी रशिया दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. पुतिन यांनी हेदेखील म्हटलं आहे की युक्रेन बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला वारंवार सल्ले दिले. तसंच काय परिस्थिती आहे ते त्यांनी फोनवरुन जाणून घेतलं. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न कसा सोडवायचा या प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत हे मला ठाऊक आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
  • जगभरात काही उलटसुलट गोष्टी चालल्या आहेत. अनेक गोष्टींमुळे परिस्थिती काहीशी बिकट आहे याची मला कल्पना आहे. तरीही आशियातला सच्चा दोस्त असलेल्या भारताशी आमचे संबंध चांगले आहेत आणि यापुढेही चांगले राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी रशिया दौऱ्याचं निमंत्रण देतो आहे. जर ते रशियात आले तर आम्हा सगळ्यांनाच आनंद होईल असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुतिन म्हणाले की भारतात पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. आमचे मित्र नरेंद्र मोदी यांना मोठं यश मिळेल अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. तसंच दोन्ही देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंडय़ा कर्णधार :
  • श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाला कर्णधार करण्यात आले असून, एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. निवड समितीने मंगळवारी जाहीर केलेल्या भारतीय संघात ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला उपकर्णधार करण्यात आले आहे. पुण्याच्या ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना संघात स्थान मिळाले असून, गोलंदाजीत शिवम मावी, मुकेश कुमार, उमरान मलिक या नव्या चेहऱ्यांना पसंती मिळाली.

  • यष्टिरक्षक ऋषभ पंतला ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० साठी इशान किशन, तर एकदिवसीय मालिकेसाठी लोकेश राहुल आणि इशान किशन यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाला उपकर्णधार करण्यात आले आहे. शुभमन गिलला दोन्ही संघांत स्थान मिळाले आहे.

  • एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या प्रमुख गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. अर्शदीप सिंग दोन्ही संघांत आहे. फिरकी गोलंदाजीसाठी ट्वेन्टी-२० मालिकेत वॉशिंग्टन सुंदर, युजर्वेद्र चहल, अक्षर पटेल यांना दोन्ही संघांत स्थान मिळाले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी यामध्ये कुलदीप यादवचे नाव जोडण्यात आले. विजय हजारे करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करण्याची पावती ऋतुराजला मिळाली. या स्पर्धेत ऋतुराजने सलग सात चेंडूंवर षटकार लगावले होते. या स्पर्धेत त्याने चार शतकांची नोंद आहे.

कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, करोना नियमांचेही करावे लागणार पालन! :
  • मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, करोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. बुधवारी (२८ डिसेंबर) याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

  • या निर्णयानुसार शाळा तसेच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक नियम पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पब्स, विमातळ, उपहारगृहे या ठिकाणीदेखील मास्क वापरणे तसेच इतर प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. कलबुर्गी विमानतळ प्रशासनाने याआधीच मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे आदेश दिलेला आहे.

  • संभाव्य करोना लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी असावी यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटक सरकारने एक बैठक घेतली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री के सुधाकर होते. सोबतच या बैठकीला महसूलमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आर अशोका हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मास्क वारणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला.

  • या निर्णयाबाबत महसूलमंत्री आर अशोका यांनी अधिक माहिती दिली आहे. “चीनमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आपल्या सल्लागार कक्षाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचा सल्ला दिलेला आहे. खबरदारी म्हणून करोनाची लक्षणं असलेल्यांवर उपचार करण्यासाठी बंगळुरू येथे दोन समर्पित रुग्णालये असतील,” असे अशोका यांनी सांगितले.

Twitter पुन्हा ठप्प; जगभरातील कोट्यवधी युजर्स त्रस्त :
  • जगभरात पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग सर्विस ट्विटर ठप्प झाल्याचे समोर येत आहे. आज(गुरुवार) सकाळपासून ट्विटर सेवा खंडीत असल्याचे युजर्सना जाणवत आहे.

  • कोट्वधी युजर्सना लॉगिन करताना अडचणी जाणवत आहेत. आयडी लॉगिन केल्यानंतरही ट्विटर नेहमीप्रमाणे सुरू होत नसल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांकडून येत आहेत.

  • भारतातही लाखो ट्विटर वापरकर्त्यांना आज सकाळी लॉगइन करताना अडचण येत आहे. वापरकर्त्यांनी सांगितले की, लॉगइन असलेले अकाउंट आपोआप बंद झाले, त्यानंतर जेव्हा पुन्हा लॉगइन करण्याचा प्रयत्न केला तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकूनही ते लॉगिन होत नाही.

  • ट्विटर अॅप्लिकेशनवरही सुरू होत नाही आणि कॉम्प्युटरवरही सुरू होत नाही. आज सकाळी ७ वाजेपासून लाखो युजर्सना ही अडचण येत आहे. आयडी लॉगइन केल्यानंतर ‘Something went wrong, but don’t fret — it’s not your fault. Let’s try again.” असा मेसेज येत आहे आणि रिफ्रेश करण्यास सांगतिलं जात आहे. त्यानंतरही अकाउंट सुरू होत नाही.

परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना चीनकडून पारपत्र :
  • पुढील महिन्यात चांद्र नववर्षांच्या सुट्टीसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या चिनी नागरिकांची संभाव्य मोठी संख्या लक्षात घेऊन चीन पर्यटनासाठी पारपत्र वितरित करण्यास सुरुवात करणार आहे. सुमारे तीन वर्षांपासून करोना प्रतिबंधासाठी चीनने घातलेले निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. पारपत्रासाठी ८ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

  • जगातली सर्वात कठोर करोना प्रतिबंधक नियंत्रणे शिथिल करण्याच्या चीनच्या निर्णयात या नव्या निर्णयाची भर पडली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या सरकारने चीनमधील वाढत्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी हे निर्णय घेतल्याचे मानले जाते. चीनमधील ‘शून्य कोविड’ (झिरो कोविड) धोरणामुळे लाखो नागरिक घरात अडकून पडले. या विलगीकरणामुळे चीनमध्ये करोनाचा संसर्गदर जरी जागतिक पातळीच्या तुलनेत कमी राहिली तरी चीनच्या सर्वसामान्य जनतेची या धोरणांमुळे कुचंबणा झाली. आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम झाल्याने त्यांच्यात व्यापक प्रमाणात असंतोष व निराशा निर्माण झाली. 

  •  चीनच्या या नव्या निर्णयामुळे २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चीनच्या चांद्र नववर्षांच्या काळात देशात मोठय़ा प्रमाणात पर्यटन हंगाम असतो. या काळात आशिया व युरोपमधील महसूल व कमाईच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु चीनमध्ये करोना संसर्ग वाढल्याने ते करोनाचे संक्रमण पसरवण्याचाही धोका तितकाच आहे.

  • खबरदारीचा व प्रतिबंधक उपाय म्हणून जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि तैवानने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचण्या सक्तीच्या केल्या आहेत. २०२० च्या सुरुवातीला करोना महासाथीच्या प्रारंभी चीनने विदेशी नागरिकांना ‘व्हिसा’ व आपल्या नागरिकांना पारपत्र देणे थांबवले होते.

“धीरुभाई अंबानी माझं प्रेरणास्थान”, गौतम अदानींनी केला खुलासा, म्हणाले “एक नम्र व्यक्ती…” :
  • आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी असणारे उद्योगपती गौतम अदानी हे देशातील अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहेत. मात्र गौतम अदानींचं प्रेरणास्थान कोण आहे? याचं उत्तर त्यांनी स्वत: दिलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी यांनी याचा खुलासा केला असून धीरुभाई अंबानींकडून आपण फार प्रेरित झालो असल्याचं सांगितलं आहे.

  • “देशातील करोडो उद्योजकांसाठी धीरुभाई अंबानी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी एक नम्र व्यक्ती कोणत्याही पाठिंबा किंवा संसाधानांशिवाय तसंच सर्व अडचणींवर मात करत कशाप्रकारे एक जागतिक दर्जाच्या व्यवसायाची स्थापन करु शकतो आणि मोठा वारसा मागे सोडू शकतो हे दाखवून दिलं आहे,” असं गौतम अदानी म्हणाले आहे.

  • “पहिल्या पिढीचे उद्योजक आणि फार नम्रपणे सुरुवात करणाऱ्या धीरुभाई अंबानींकडून मी खूप प्रेरित आहे,” असं गौतम अदानींनी सांगितलं आहे. गौतम अदानी यांनी यावेळी इतर अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं.

  • गौतम अदानी यांची संपत्ती २०२२ मध्ये दुप्पट झाली असून, त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • इतकी श्रीमंती तसंच श्रीमंतांच्या यादीत भारतात पहिल्या आणि जगात तिसऱ्या स्थानावर आहोत याबद्दल काय वाटतं असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मीडियाने उगाच हे सर्व वाढवून सांगितलं आहे. मी पहिल्या पिढीचा उद्योजक आहे, ज्याने शून्यापासून सुरुवात केली होती. मला आव्हानांचा सामना करायला आवडतं. आव्हान जितकं मोठं असेल, तितका मी जास्त आनंदी असतो. माझ्यासाठी, लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची संधी आणि तसंच देशाच्या उभारणीत योगदान देणे हे काही संपत्ती क्रमवारीत किंवा इतर कोणत्याही मूल्यमापन सूचीमध्ये असण्यापेक्षा खूप समाधानकारक आणि महत्त्वाचं आहे”.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ डिसेंबर २०२१

 

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा - भरतकोटीने पराव्यानला रोखले :
  • भारताचा ग्रँडमास्टर हर्षां भरतकोटीने ‘फिडे’ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेला रशियाचा ग्रँडमास्टर डेव्हिड पराव्यानला बरोबरीत रोखले.

  • खुल्या गटातील सहाव्या फेरीत २१ वर्षीय भरतकोटी आणि पराव्यान यांच्यातील लढत ४२ चालींनंतर बरोबरीत सुटली. त्याआधी भरतकोटीने रौफ मामेदोव्ह, व्लादिस्लाव्ह कोव्हालेव्ह आणि व्होल्दोमेर यांच्यावर विजयांची नोंद केली होती. तसेच त्याने सर्गे मोवेसीनला बरोबरीत रोखले होते.

  • भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरथीला मात्र पराभव पत्करावा लागला. त्याला अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने पराभूत केले, तर निहाल सरिनवर अलेक्सी ड्रीव्हने मात केली.

MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; नव्या तारखेची अद्याप घोषणा नाही :
  • येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

  • आयोगाने जारी केलेल्या निवेदनामध्ये परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांचं नियोजन पुन्हा एकदा बिघडलं आहे.

  • राज्य लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी २८ डिसेंबर रोजी यासंदर्भातलं परिपत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे.

  • “राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे”, असं या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शासकीय भरतीमध्ये सामाजिक समांतर आरक्षणासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना :
  • राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच आरक्षण ठरविण्यासाठी भरती संदर्भातील अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (मंगळवार) विधानसभेत सांगितले. शासकीय नोकरभरतीमध्ये आरक्षणबाबतचा तारांकित प्रश्न आमदार दीपक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

  • मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सामाजिक आणि समांतर आरक्षण संबंधित निर्णयाचे एकत्रीकरण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑगस्ट २०२१ रोजी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटामध्ये सुमंत भांगे, मनिषा कदम, गीता कुलकर्णी, सु. मो. महाजन आणि टि. वा. करपते यांचा समावेश आहे.

  • तसेच, सामाजिक आणि समांतर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णयात सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा कसे हे अभ्यासगट तपासणार आहे. या अभ्यासगटामार्फत सर्व माहिती एकत्रित करुन याबाबत पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. अभ्यासगटाची पहिली बैठक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली असून अभ्यासगटामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असेही भरणे यांनी यावेळी सांगितले.

“भारतीय विमानं आणि विमानतळांवर भारतीय संगीत वाजवा”; नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचं कंपन्यांना आवाहन :
  • भारतातील संगीत “सामाजिक-धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग” म्हणून सुरू झाले, असे सांगून नागरी उड्डाण मंत्रालयाने भारतीय सांस्कृतिक संशोधन परिषदेच्या (ICCR) विनंतीचा हवाला देत भारतीय विमान कंपन्या आणि विमानतळ चालकांना पत्र लिहून विमान आणि विमानतळ परिसरात भारतीय संगीत वाजवण्याचे आवाहन केले आहे.

  • “जगभरातील बहुतेक एअरलाइन्सद्वारे वाजवले जाणारे संगीत हे एअरलाइन ज्या देशाशी संबंधित आहे त्या देशाचे वैशिष्ट्यपूर्ण संगीत आहे. उदाहरणार्थ, अमेरिकन एअरलाइन्समधील जॅझ किंवा ऑस्ट्रियन एअरलाइन्समधील मोझार्ट आणि मध्य पूर्वेकडील एअरलाइनमधील अरब संगीत वाजवले जाते. परंतु, भारतीय विमान कंपन्या उड्डाणात क्वचितच भारतीय संगीत वाजवतात.

  • आपल्या संगीताला समृद्ध वारसा आणि संस्कृती आहे आणि प्रत्येक भारतीयाला याचा खरोखर अभिमान असायला हवा, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव उषा पाध्ये यांनी एअरलाइन्स आणि विमानतळ चालकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

संतप्त खासदारांची संसदेतच हाणामारी; जॉर्डनमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :
  • जॉर्डनच्या संसदेचं कालचं सत्र चांगलंच गाजलं. त्याचं कारण म्हणजे या सत्रादरम्यान खासदारांमध्ये चक्क हाणामारी झाली. जेव्हा अध्यक्षांनी एका खासदाराला बाहेर जाण्यास सांगितलं, तेव्हा त्यावरूनच शाब्दिक चकमक सुरू झाली आणि नंतर त्याचं पर्यावसान हाणामारीत झाल्याचं उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे.

  • स्थानिक माध्यमांच्या लाइव्ह फुटेजमध्ये अनेक खासदार एकमेकांना ठोसा मारताना दिसले तर काही मिनिटे चाललेल्या गोंधळाच्या दृश्यांमध्ये इतरांनी आरडाओरडा केल्याने एक खासदार जमिनीवर पडला. घटनेतील प्रस्तावित दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या अधिवेशनादरम्यान अनुचित टिप्पणीबद्दल सदस्याने माफी मागण्यास नकार दिल्याने सुरू झालेल्या या हाणामारीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

  • “शाब्दिक बाचाबाचीने सुरू झालेला हा गोंधळ अनेक लोकप्रतिनिधींच्या हाणामारीत बदलला. हे वर्तन आमच्या लोकांना अस्वीकार्य आहे आणि आमच्या देशाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवते,” असे संसदेचे सदस्य खलील अतियेह यांनी सांगितले, जे या अधिवेशनाचे साक्षीदार होते. रॉयटर्स माध्यमसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

२९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.