अमेरिकी लोकांना करोना काळात येत असलेल्या अनेक अडचणी पाहून ९०० अब्ज डॉलर्सच्या मदतीचा समावेश असलेले २.३ लाख कोटी डॉलर्सचे खर्च विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यावर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर स्वाक्षरी केली, अन्यथा अमेरिकेवर आर्थिक टाळेबंदीची नामुष्की येण्याचा धोका होता. कारण अनेक सेवांवरचा खर्च सरकारने मंजूर करणे गरजेचे असते अन्यथा त्या ठप्प होऊ शकतात.
ट्रम्प यांनी सुरुवातीला या विधेयकास मंजुरी देण्यास नकार दिला होता. यातील तरतुदी अपुऱ्या असून हे विधेयक ‘अपमानास्पद’ आहे असे सांगून ते मंजूर करण्यास ट्रम्प यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली होती. ट्रम्प हे २० जानेवारीला व्हाइट हाऊस सोडणार असून त्यांनी अखेर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर हे विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव होता.
ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे, की बेरोजगार लोकांना आर्थिक लाभ मिळावेत तसेच भाडय़ासाठी मदत मिळावी यासाठी आपण हे विधेयक मंजूर करीत आहोत. आमचे हवाई सेवेतील कर्मचारी परत कामावर येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लस वितरणासाठी निधी लागणार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारी एक दिलासादायक बातमी दिली. करोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी डोस सर्वात आधी भारतात दिले जातील.
पुनावाला म्हणाले, “आमच्याजवळ कोविशिल्डचे चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करु.”
२०२१ च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.
नव्या वर्षाचे स्वागत करा, करोनाची नाही असं सांगत महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी अशा दोन दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जाहीर केली आहे. २०२१ हे वर्ष सुरु होण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आता ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसंदर्भातल काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो घरीच रहावे. दिवसा संचारबंदी नसली तरीही नववर्षाच्या स्वागतासाठी शक्यतो बाहेर पडू नये. घरीच साधेपणाने नव वर्षाचे स्वागत करावे
३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यांवर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क आणि सॅनेटायझर्सचा वापर करणं अनिवार्य मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये गर्दी न करता आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याला चॅम्पियन्स चेस टूर एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या दिवशी एक पराभव आणि तीन बरोबरीमुळे १०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शनिवारी पहिल्या दिवशी हरिकृष्णने चारही डाव बरोबरीत सोडवले होते. मात्र पाचव्या डावात अनिश गिरीविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर हरिकृष्णने अलेक्झांडर ग्रिशूक, हिकारू नाकामुरा तसेच इयान नेपोमनियाचीविरुद्ध बरोबरी पत्करली. हरिकृष्णचे ३.५ गुण झाले असून बाद फेरीत प्रवेश मिळवण्याकरिता त्याला अव्वल आठ जणांमध्ये स्थान मिळवावे लागेल.
टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंना सोमवारी राज्य सरकारद्वारे प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. राज्यातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
या खेळाडूंमध्ये नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे तसेच पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. वर्षां येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘खेळाडू हे राज्याचे वैभव आहेत. टोक्यो ऑलिम्पिकसाठी राज्यातील पाच खेळाडू पात्र ठरले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवावी लागतात, त्यासाठी कठोर परिश्रमासह एकाग्रता महत्त्वाची असते. राज्यातील हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून राज्यासह देशाची मान उंचावतील, अशी आशा आहे.’’
नेमबाज राही सरनोबत हिने सांगितले की, ‘‘आम्ही सर्व खेळाडू पदक जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत. सरकारच्या पाठिंब्यामुळे आम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यशस्वी होऊन राज्याचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करू.’’
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.