चालू घडामोडी आणि दिनविशेष - 29 ऑगस्ट 2023

Date : 29 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या
  • महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेची घोषणा केली. नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी या एक्स्प्रेसवेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल, असे सांगितले जात आहे. या एक्स्प्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत, पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे.
  • या एक्सप्रेसवेमुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील ३ शक्तीपीठे, २ ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे जोडली जातील. यामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे १० तासांनी कमी होईल. सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेपेक्षा जास्त असेल.
  • समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ आधीच कमी झाला आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग ११ जिल्ह्यांतून धावणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विकासाला चालना मिळणार आहे. ९ मार्च २०२३ रोजी नागपूरला गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्गशी जोडणाऱ्या या द्रुतगती मार्गाची घोषणा करण्यात आली होती.

असा आहे मार्ग

  • लांबी ७६० किलोमीटर
  • सहा पदरी द्रुतगती मार्ग
  • प्रकल्पाची अंदाजित किंमत ७५ हजार कोटी रुपये
  • समाविष्ट जिल्हे ११ – यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा)
  • प्रवासाचा कालावधी – नागपूर ते गोवा दरम्यान 8 तास. प्रवासाचा वेळ १३ तासांनी कमी होणार.
  • मालकी – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
  • कधी पूर्ण होणार – तारीख निश्चित्त नसली तरी हा एक्सप्रेसवे २०२८ किंवा २०२९ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
शनिवारी सूर्याकडे प्रयाण! ‘आदित्य- एल१’चे २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपण; सौरअभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम
  • ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ची (इस्रो) पहिली सौरमोहीम सुरू होणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१’ या यानाचे प्रक्षेपण शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता होणार असल्याचे ‘इस्रो’ने सोमवारी जाहीर केले.
  • सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘एल-१’ या बिंदूभोवती परिभ्रमण करून हे यान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा म्हणजे कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी यानामध्ये सात विविध उपकरणे बसविण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम या मोहिमेतून केले जाणार आहे. सूर्याचा पृष्ठभाग ६००० अंश सेंटीग्रेडवर असताना कोरोनाचे तापमान सुमारे एक दशलक्ष अंशापर्यंत कसे पोहोचते, याबाबतची माहिती मिळविण्याचे कामही होणार आहे.

‘एल-१’ म्हणजे काय?

  • अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. सूर्य आणि पृथ्वीशी संबंधित असलेला एल-१ हा बिंदू आहे.

पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग

  • ‘आदित्य एल-१’ ही मोहीम संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. देशभरातील विविध संस्थांनी तयार केलेली उपकरणे यानावर बसविण्यात आली आहेत. पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेने तयार केलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (एसयूआयटी) पेलोड विकसित केला आहे. याखेरीज बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयआयए) संस्थेने विकसित केलेला ‘व्हिजिबल एमिशन लाइन करोनाग्राफ’ (व्हीईएलसी) हे उपकरणही यानावर असेल.
अर्थव्यवस्था प्रगतिपथावर: मोदी,बेरोजगार मेळाव्यात ५१ हजार जणांना नियुक्तीपत्रे
  • देशाची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असून त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या मोठय़ा संधी निर्माण झाल्या आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोजगार मेळाव्यात बोलताना केला. या मेळाव्यात ५१ हजारांपेक्षा जास्त तरुणांना नोकरीच्या नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. मात्र, पंतप्रधान मोदी यांचा रोजगार मेळावा म्हणजे निव्वळ नौटंकी आहे अशी टीका काँग्रेसने केली.
  • रोजगार मेळाव्यात दूरदृश्य पद्धतीने भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, वाहनउद्योग, औषधनिर्माण, पर्यटन आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्रांची झपाटय़ाने वाढ अपेक्षित आहे आणि त्यामध्ये तरुणांना रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. देशभरातील ४५ ठिकाणी केंद्रीय निमलष्करी दले, अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि दिल्ली पोलीस यांच्यासाठी या नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
  • यावेळी मोदी म्हणाले की, भारत हा सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला आहे आणि या दशकामध्ये आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ, तसेच सामान्य व्यक्तीला त्याचे लाभ मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील उत्पादन वाढले आहे, रोजगार वाढले आहेत आणि कुटुंबाचे उत्पन्न वाढले आहे असे ते म्हणाले.
  • दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना निवडणूक वर्षांची धग जाणवू लागली आहे आणि त्यांना स्वत:ची प्रतिमा जपायची आहे, त्यामुळे ते रोजगार मेळावे आयोजित करत आहेत अशी टीका काँग्रेसने केली. हे मेळावे म्हणजे पोकळ बनवेगिरी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांच्यात फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, ब्रिक्स शिखर परिषदेसह जागतिक मुद्द्यांबाबत चर्चा केली.
  • पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे जी-२० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी असमर्थता व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह हे जी-२० शिखर परिषदेत रशियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच, भारताच्या जी-२० अध्यक्षतेला सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले आहेत.
  • यंदाचे जी-२० अध्यक्षपद भारताकडे आले आहे. इंडोनेशियाकडून १ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी-२० चे अध्यक्षपद स्विकारलं होतं. दरम्यान, ९ आणि १० सप्टेंबरला नवी दिल्ली जी-२० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेला जागतिक नेते हजर राहणार आहेत.
आदित्य एल-१ च्या लाँचिंगची तारीख-वेळ ठरली, थेट प्रक्षेपण पाहता येणार, इस्रोची खास व्यवस्था
  • चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आता सौरमोहीम हाती घेतली आहे. इस्रो आपलं यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. आदित्य एल १ असं या सौर मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. हे अवकाशयान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, इस्रोने या अवकाशयानाच्या लाँचिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
  • यू. आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर पोहोचवण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. सकाळी ११.५० वाजता हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावेल.
  • राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना आदित्य एल-१ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नागरिकांना याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागेल. SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे. ISRO ने द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
Aditya L1 : सूर्याच्या किती जवळ जाणार ‘इस्रो’चं अवकाशयान? सौरमोहिमेद्वारे भारत कोणतं संशोधन करणार?
  • चांद्रयान-३ च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक मोहीम हाती घेतली आहे. इस्रो आता सूर्यावर स्वारी करणार आहे. म्हणजेच इस्रो आपलं यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इस्रो त्यांचं सन मिशन लाँच करू शकते. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला ‘आदित्य एल-१’ असं नाव देण्यात आलं आहे. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे. इस्रोचं हे अवकाशयान पुढच्या महिन्यात इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयातून सूर्याच्या दिशेने पाठवलं जाईल.
  • इस्रो ‘एल १’ च्या अभ्यासासाठी अवकाशयान पाठवणार आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजे आदित्य एल-१ यान तब्बल १५ लाख किलोमीटर दूर जाणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचं हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवून सूर्याच्या भोवतालाची परिस्थिती आणि इतर संशोधन केलं जाईल. आवरणाचा, म्हणजेच कोरोनाचा (सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरच्या भागाला करोना म्हणतात) अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणे बसवण्यात आली आहेत. यासाठी अवकाशयानाबरोबर ७ वेगवेगळे पेलोड पाठवले जातील.
  • बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनोग्राफ पेलोडच्या विकासात महत्त्वाचं काम केलं आहे. तर सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप हे या मोहिमेसाठी महत्त्वाचं साधन आहे. यासाठी पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने पुढाकार घेतला आहे.
  • यू. आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर दाखल झाला आहे. २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा - यामागुची, अ‍ॅक्सेलसेनला जेतेपद :
  • जपानच्या अकाने यामागुचीने रविवारी जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद राखले. तसेच पुरुष विभागात डेन्मार्कचा व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन विजेता ठरला.

  • महिला एकेरीच्या अंतिम लढतीत यामागुचीने चीनच्या शेन युफेईचा प्रतिकार २१-१२, १०-२१, २१-१४ असा मोडून काढला. यामागुचीने कारकीर्दीत दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपद पटकावले. तिने गेल्या वर्षी पहिले विजेतेपद मिळविले होते. चीनला मात्र २०११ सालापासून विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित अ‍ॅक्सेलसेनने अंतिम लढतीत थायलंडच्या कुनलावत वितिदसार्नचा २१-५, २१-१६ असा पराभव केला.

  • यंदाच्या हंगामात अ‍ॅक्सेलसेनने कमालीचे सातत्य राखले असून, तो केवळ एकच लढत हरला आहे. या हंगामातील त्याचे हे सहावे विजेतेपद ठरले. अ‍ॅक्सेलसेनने गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते, तर २०१७ मध्ये तो जागतिक विजेता ठरला होता.

‘एआयएफएफ’ निवडणुकीसाठी सर्व २० सदस्यांचे अर्ज वैध :
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीसाठी रविवारी अर्ज छाननीच्या मुदतीनंतर सर्व २० सदस्यांचे अर्ज वैध ठरले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार या महत्त्वाच्या तीनही जागांसाठी प्रत्येकी दोन अर्ज असून, कार्यकारी समिती सदस्यांच्या १४ जागांसाठी तेवढेच म्हणजे १४ अर्ज आले आहेत. महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक एकतर्फी होण्याचीच शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.

  • अर्ज छाननीच्या मुदतीनंतर सर्व सदस्यांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमेश सिन्हा यांनी दिली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदारपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज असून, समिती सदस्यांसाठी चौदाच अर्ज आले आहेत. तसेच संघटनेच्या कार्यकारिणीमधील सहा माजी खेळाडूंची (चार पुरुष आणि दोन महिला) स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात येईल. त्यांना मतदानाचा अधिकार असेल. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत माघार घेऊ शकतात.

  • अध्यक्षपदासाठी बायच्युंग भुतिया आणि कल्याण चौबे हे माजी खेळाडू शर्यतीत आहेत. उपाध्यक्षपदासाठी मानवेंद्र सिंग आणि कर्नाटकाचे एन. ए. हॅरिस यांच्यात लढत अपेक्षित आहे. खजिनदारपदासाठी गोपाळकृष्ण कोसाराजू आणि अरुणाचल प्रदेशाचे किपा अजय यांचे अर्ज आहेत.

राज्यातील पोलिसांना दिवाळीत पदोन्नती ; उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचा समावेश :
  • गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना येत्या दिवाळीत पदोन्नती मिळणार आहे. यामध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

  • गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली. यापैकी जवळपास ७०० ते ७५० पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे.

  • महिन्याभरात संवर्ग मागवण्यात येणार असून दिवाळीत पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्याचा मानस शिंदे-फडणवीस सरकारचा आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या पोलीस आस्थापना विभागाला सूचना करण्यात आली आहे.

  • नव्या सरकारने पोलीस विभागासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा  धडाका लावला असून त्यामध्ये पदोन्नतीचा विषय निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

  • यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्यांना मुहूर्त निघाला असून लवकरच त्यावरही निर्णय होणार आहे.

अमेरिकेच्या युद्धनौकांचा तैवानच्या सामुद्रधुनीतून प्रवास :
  • अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्या चीनने तीव्र आक्षेप घेतलेल्या तैवान भेटीनंतर प्रथमच अमेरिकेने आणखी एक वादग्रस्त पाऊल रविवारी उचलले. अमेरिकन नौदलाच्या दोन युद्धनौकांनी तैवानच्या सामुद्रधुनीत प्रवेश करून तेथून प्रवास केला.

  • पलोसी यांच्या दौऱ्यानंतर चीनने तैवानला इशारा देण्यासाठी तैवानभोवती आक्रमक लष्करी सराव केला होता. त्यानंतर या भागात अमेरिकन नौदलाच्या सातव्या आरमारातर्फे तैवान सामुद्रधुनीतून ‘यूएसएस अँटिटॅम’ आणि ‘यूएसएस चान्सलर्सव्हिले’ या युद्धनौकांनी प्रवास केला.

  • या युद्धनौकांनी या भागातील कोणत्याही राष्ट्राच्या सागरी हद्दीचे उल्लंघन न करता प्रवास केला. हा नियमित वावर असल्याचा खुलासाही निवेदनाद्वारे करण्यात आला.

पाणीबचत, कुपोषण निर्मूलनात देशवासीयांनी सहभागी व्हावे ; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे आवाहन :
  • ‘‘केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या पाणीबचत व कुपोषण निर्मूलन मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन देशवासीयांनी या मोहिमा यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे केले. ‘इंटरनेट’च्या विस्तारामुळे दुर्गम भागात, विशेषत: ईशान्येतील राज्यांत विकासाची नवी पहाट आल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • मोदी यांचा ‘मन की बात’ हा आकाशवाणीवरील मासिक संवादसत्राचा ९२ वा भाग रविवारी प्रसारित झाला. याद्वारे आपले विचार मांडताना मोदी यांनी म्हणाले, की स्वच्छता, लसीकरण मोहिमेत देशाने सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले. त्याच प्रमाणे अगदी अलिकडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबवलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत भारतीयांच्या देशभक्तीचे दर्शन जगाला झाले. या वेळी मोदींनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज’ मालिकेचा उल्लेख करून सांगितले, की स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या परंतु देशवासीयांना माहिती नसलेल्या खऱ्या नायक-नायिकांची माहिती आपल्या मुलांना होण्यासाठी त्यांना ही मालिका जरूर दाखवा.

  • पाणी हे माणसाचे परम मित्र आणि जीवन देणारे असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की पाण्यामुळेच अन्न-धान्य उत्पादन होते. त्यामुळे सर्वहित साधले जाते. अमृत सरोवरांसह पाणीबचतीसाठी सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत मोदींनी सांगितले, की सध्या अमृत सरोवराची निर्मिती जनतेची चळवळ झाली आहे. या मोहिमेत जलाशयांचा कायाकल्प केला जात आहे.

  • माझे सर्व भारतीयांना आणि विशेषत: युवकांना आवाहन आहे, की अमृत सरोवर अभियानात त्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन, पाणीबचतीसाठी आणि पाणीसंचयासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ द्यावे. ही मोहीम यशस्वी करावी. कारण आगामी पिढय़ांसाठी हे नितांत गरजेचे आहे. कुपोषण निर्मूलनासाठी देशात विविध मोहिमा सुरू आहेत. आगामी पोषण महिन्यांतर्गत कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांत सर्व देशवासीयांनी आपले सक्रिय योगदान द्यावे.

वीर सावरकर सेल्युलर जेलमधून बुलबुल पक्ष्याच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे – शालेय पुस्तकातील अतिशयोक्तीवरून वाद :
  • कर्नाटकातील शिवमोगा येथे मागील आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतल्याने, दोन गटांत संघर्ष झाला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याला कारण म्हणजे कर्नाटकातील शालेय पाठ्यपुस्तकातील वीर सावरकरांबद्दलचा एक धडा आहे.

  • “वीर सावरकर सेल्युलर जेलमध्ये जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हा ते बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे.” असे शालेय पाठ्यपुस्तकातील परिच्छेदात नमूद असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या पाठ्यपुस्तकातील अतिशयोक्तीची चर्चा आता सोशल मीडियावर देखील चांगलीच सुरू झाली आहे. यामुळे राज्यात पाठ्यपुस्तक पुनरावृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तर, शिक्षण विभागाने इयत्ता आठवी साठीच्या या पाठ्यपुस्तकातील हा धडा बदलला आहे. रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती, या समितीने हा धडा कानडी भाषेच्या पाठ्य पुस्तकात समाविष्ट केला होता. नंतर ही समिती बरखास्त करण्यात आली होती.

  • ‘ब्लड ग्रुप’ या मागील धड्याच्या जागी के.के.गट्टी यांच्या ‘कलावानू गेद्दावरू’ या धड्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. वीर सावरकरांना जिथे ठेवण्यात आले होते त्या अंदमान सेल्युलर तुरुंगास लेखकाने दिलेल्या भेटीच्या प्रवास वर्णनाचा हा धडा आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “सेल्युलर तुरुंगात सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, परंतु त्यांच्या या कोठडीत एक बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकर त्याच्या पंखांवर बसून दररोज मायदेशी यायचे. ही कोठडी पूर्णपणे बंद होती, तरी देखील बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकारंना मातृभूमीचे दर्शन घडवायचा.”

29 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.