गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘परीक्षानाटय़ा’चा पहिला अंक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपला असून ‘परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही,’ असे न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. युवासेनेसह देशभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला. त्यानुसार विद्यापीठांना आता अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत.
मात्र परीक्षा घेण्यासाठी आयोगाने दिलेली ३० सप्टेंबरची मुदत बंधनकारक राहणार नाही. आता आयोगाच्या परवानगीने विद्यापीठे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करू शकतील. आवश्यक प्रक्रिया, तयारी यांची पूर्तता होऊन प्रत्यक्ष परीक्षा ऑक्टोबरअखेपर्यंत होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : करोनाच्या आपत्तीचे कारण देत अंतिम वर्षांची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाऊ शकत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांना परीक्षा घ्यावी लागेल, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.
मात्र, एखाद्या राज्याला परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार असून त्या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाशी (यूजीसी) स्वतंत्रपणे चर्चा करावी आणि परीक्षेसाठी नव्या तारखा निश्चित कराव्यात, असा आदेश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने दिला.
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने शनिवारी रंगणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला तब्बल १४ पुरस्कार विजेते अनुपस्थित राहणार आहेत. खेलरत्न पुरस्कार विजेता रोहित शर्मा तसेच अर्जुन पुरस्कार विजेता इशांत शर्मा इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीत आहेत. तसेच कुस्तीपटू विनेश फोगटसह अन्य तीन जण करोनाग्रस्त आढळले आहेत.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पुरुषोत्तम राय यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) निश्चित केलेल्या नऊ ठिकाणी विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनातून आभासी पद्धतीने पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी ७४ खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी १४ जण गैरहजर राहतील, असे ‘साइ’ने स्पष्ट केले.
महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि पॅरा-अॅथलिट मरियप्पन थांगवेलू बेंगळूरुहून आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा पुण्याहून या सोहळ्यात सामील होतील. ‘देशाबाहेर असणाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यांना पुरस्कार नंतर दिले जातील. पुरस्कार विजेत्यांपैकी तिघांना करोनाची बाधा झाल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत,’ असे ‘साइ’कडून सांगण्यात आले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंडीगड, सोनपत, बेंगळूरु, पुणे, हैदराबाद आणि भोपाळ या ठिकाणी येणाऱ्या पुरस्कार विजेत्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.
हॉलिवूडचा सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. ते ४३ वर्षांचे होते. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होते. अखेर याच कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बोसमन हे मार्वल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर’मधून विशेष लोकप्रिय झाले होते.
बॉसमॅन यांनी लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्यांच्या सोबत होते. बोसमन हे कोलोन कॅन्सरने त्रस्त होते. “ते खरंच एक लढवैय्ये होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. या चित्रपटांवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती”, असं बोसमन यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, बोसमन यांनी ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटात सम्राट टी चाला ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. तसंच त्यांनी ‘42’,‘Get on Up’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
ह्य़ूस्टन : अमेरिकेतील टेक्सासच्या बेलर कॉलेजऑफ मेडिसीन (बीसीएम) या संस्थेने करोनावरील लशीसाठी भारतातील बायोलॉजिकल ई लिमिटेड म्हणजे बीई कंपनीशी करार केला आहे.
बीसीएम कंपनीच्या मते बीई कंपनीशी कोविड १९ प्रायोगिक लस निर्मितीचा करार करण्यात आला आहे. बीई कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. आविष्करण तंत्रज्ञानावर आधारित ही लस असून त्याचे व्यावसायिक उत्पादन बीई कंपनी करू शकेल, असा विश्वास टेक्सासच्या बीसीएमने व्यक्त केला आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेचे प्रा. पीटर होटेझ यांनी सांगितले की, दक्षिण आशियाच्या जास्त लोकसंख्या घनता असलेल्या शहरी भागात करोनाचा धोका आहे. या बाबत ह्य़ूस्टन येथील महावाणिज्यदूत असीम महाजन यांनी वेबिनारचे आयोजन केले होते.
होटेझ व त्यांच्या चमूने करोनावर लस तयार केली असून गरीब देशांना लस मिळणार नाही, या काळजीतून त्यांनी भारतीय कंपनीशी करार केला आहे. सध्या त्या लशीवर भारतात चाचण्या चालू असून पुढील वर्षी ती बाजारात येईल. बीई (बायो-ई) होल्डिंग कंपनीचे संचालक नरेंद्र देव मंटेना यांनी सांगितले की, जर लस यशस्वी झाली तर आम्ही वर्षांला कोटय़वधी डोस उपलब्ध करू.
नवी दिल्ली : दारिद्रय़ निर्मूलनाच्या योजनांमध्ये जनधन योजना परिणामकारक व परिवर्तनशील ठरली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
देशात जनधन योजना सुरू झाल्याच्या घटनेला आता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने मोदी यांनी म्हटले आहे की, दारिद्रय़ निर्मूलनात जनधन योजना पायाभूत ठरली आहे.
भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर सरकारने जनधनच्या रूपाने पहिलीच मोठी योजना आखली होती. त्यात गरीब लोकांना बँक खाती उघडून देऊन बँकिंग व्यवस्थेची दारे खुली करण्यात आली.
मोदी यांनी म्हटले आहे की, याच दिवशी सहा वर्षांपूर्वी ही योजना सुरूकरण्यात आली, ज्या लोकांना बँकिग व्यवस्थेचा लाभ मिळत नव्हता, त्यांना तो मिळावा हा त्यामागचा हेतू होता. या योजनेमुळे अनेक कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल बनले आहे. यात ग्रामीण भागातील जास्त लाभार्थी आहेत. त्यातही महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जनधन योजनेच्या यशासाठी अविश्रांतपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आपण आभारी आहोत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.