भारतीय वंशाच्या कॅनडाच्या नेत्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिता आनंद यांना मंगळवारी कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर आनंद यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष महिनाभरापूर्वी सरकारमध्ये आला आहे. दीर्घकाळ पंतप्रधानपदी राहणाऱ्या ट्रूडो यांच्या पक्षाला मात्र बहुमत मिळू शकलेले नाही.
नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच ट्रूडो संरक्षणासह काही मंत्रालयांमध्ये फेरबदल करतील अशी शक्यता होती. दरम्यान, ५४ वर्षीय अनिता आनंद यांनी भारतीय वंशाचे संरक्षण मंत्री हरजित सज्जन यांची जागा घेतली आहे.
कॅनडाच्या लष्करातील लैंगिक शोषणाची प्रकरणे योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल हरजित सज्जन यांच्यावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर त्यांच्याकडून संरक्षण मंत्रीपद काढून घेण्यात आलं असून त्यांना आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे मंत्री करण्यात आलं आहे, असं वृत्त कॅनेडियन वृत्तपत्र नॅशनल पोस्टने दिलंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार २२ जानेवारी २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान गट ब च्या मुख्य परीक्षा होणार असून एमपीएससीने वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट – , मुख्य परीक्षा-२०२०- संयुक्त पेपर २२ जानेवारी २०२२ (शनिवार) होणार आहे. तर पोलीस उप निरीक्षक- पेपर दोन २९ जानेवारीला होईल.
सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ५ फेब्रूवारीला पेपर होणार आहे. तसेच राज्य कर निरीक्षक पेपर दोन १२ फेब्रूवारीला होणार आहे. एमपीएससीनं तीन महिने आधी या मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
पाच हजार किलोमीटपर्यंतच्या टप्प्यातील लक्ष्ये अचूक टिपण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. यामुळे देशाच्या लष्करी सामर्थ्यांत मोठी भर पडली आहे.
ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सायंकाळी ७.५० च्या सुमारास ही चाचणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही किमान विश्वासार्ह प्रतिबंधाच्या भारतच्या धोरणाला अनुसरून असून, त्यामुळे ‘नो फर्स्ट यूज’बाबत असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे,’ असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमेवरील तिढा रेंगाळलेला असतानाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी होण्यास महत्त्व आहे.
भारताला ऑलिम्पिकमध्ये दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया यांच्यासह ११ क्रीडापटूंची देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेन, हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि कसोटी क्रिकेट कर्णधार मिताली राज यांच्या नावांचीही निवड समितीने शिफारस केली आहे. सुनील छेत्री हा या पुरस्कारासाठी निवड झालेला पहिला फुटबॉलपटू आहे. सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गतवर्षी पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार प्रदान केला होता, तर २०१६मध्ये चौघांची पुरस्कारासाठी निवड झाली होती. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धामधील पदकविजेत्यांचा सन्मान करता यावा म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड प्रक्रिया लांबणीवर टाकली होती. हॉकी प्रशिक्षक संदीप सांगवान तसेच अॅथलेटिक्स प्रशिक्षक राधाकृष्ण नायर आणि टी. पी. ऑसेफ यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व गलथान नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून सरकारच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले.
आरोग्य विभागाच्या वर्ग ३ च्या परीक्षा होत्या. परंतु, बहुतांशी ठिकाणी वेळेवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नाहीत. एका पदाच्या प्रश्नपत्रिका दुसऱ्या पदासाठी असासुध्दा मोठा गोंधळ होता. त्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले, असा आरोप या संतप्त आंदोलनकर्त्यांनी केला.
आरोग्य विभागातील परीक्षांतील गोंधळास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुध्द कठोर कारवाई करावी, पोलीस भरतीत पूर्ववत प्रथम मैदानी व नंतर लेखी परीक्षा घ्याव्यात, सरळ सेवेच्या सर्व परीक्षा लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द कराव्यात, सर्व स्पर्धा परीक्षांचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर करावे, निश्चित अभ्यासक्रम ठरवून द्यावा, यासह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे, अॅड. अमोल गिराम, आकाश लोहट, शिवाजी शेळके, दैवत लाटे यांच्यासह अन्य आंदोलनकर्ते उपस्थित होते.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.