चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ ऑक्टोबर २०२०

Date : 28 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्रान्समध्ये पाकिस्तानी राजदूत नसतानाही इम्रान यांनी मांडला परत बोलवण्याचा प्रस्ताव :
  • फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गेल्या आठवड्यात प्रेषित पैगंबराची व्यंगचित्रांच्या विषयावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अनेक इस्लामिक देशांमध्ये फ्रान्सचा विरोध करण्यासाठी मोर्चांचे आयोजन केलं जात आहे. 

  • इराण, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, पाकिस्तान, बांग्लादेश, संयुक्त अरब अमिराती,  इराक, तुर्कस्थान, गाझा पट्टी भागाबरोबरच मध्यपूर्वेतील देशांनीही फ्रान्सचा विरोध केला आहे. इराणच्या कोम या शहरातील धर्मगुरूंच्या संघटनेने सोमवारी मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून इस्लामी देशांनी फ्रान्सवर आर्थिक व राजकीय निर्बंध लागू करावेत असे म्हटले आहे.

  • प्रेषित पैगंबराची व्यंगचित्रांवरुन सुरु झालेल्या या वादामध्ये पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारनेही उडी घेतली आहे. मात्र या विषयासंदर्भात पाकिस्तानने केलेल्या एका वक्तव्यावरुन त्यांचेच हसे झाले आहे. देशाचे पंतप्रधान असणाऱ्या इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये फ्रान्समधील पाकिस्तानच्या राजदुताला परत बोलावून घेण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र मागील तीन महिन्यांपासून फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नाहीय.

  • फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमधील पाकिस्तानी राजदूत असणाऱ्या मोइन-उल-हक यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाली असून त्यांना राजदूत म्हणून चीनमध्ये पाठवण्यात आलं आहे. यावरुनच आता इम्रान खान यांनी मांडलेल्या प्रस्तावामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, करोना संकटात निवडणूक घेणारं पहिलं राज्य :
  • बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी मतदान होणार असून १०६६ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे.

  • सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात चुरस आहे. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी संयुक्त जनला दल ३७ तर भाजपा २९ जागा लढत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाने ४२ ठिकाणी उमेदवार उभे केले असून त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस २० ठिकाणी लढत आहे.

  • पहिल्या टप्प्यात २.१४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १.१ कोटी महिला आणि ५९९ तृतीयपंथी आहेत. दरम्यान करोना संकटात इतकी मोठी निवडणूक घेणारं बिहार पहिलं राज्य ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये जवळपास ७.२९ कोटी मतदार आहेत.

अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब :
  • अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी रात्रीच त्यांचा शपथविधी लगोलग उरकण्यात आला.

  • तत्पूर्वी रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला एक आठवडा उरला असताना ही निवड झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान जास्त असून त्यात काही वाद झाले  व ते प्रकरण न्यायालयात गेल्यास आपल्याला अनुकूलता राहावी यासाठी ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या मर्जीतील बॅरेट यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी लावल्याचा आरोप  होत आहे.

  • सिनेटमध्ये बॅरेट यांच्या नावावर ५२ विरुद्ध ४८ मतांनी शिक्कामोर्तब झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची एकजूटही बॅरेट यांची नियुक्ती रोखू शकली नाही कारण रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत आहे.

  • बॅरेट या ४८ वर्षांंच्या धार्मिक पुराणमतवादी न्यायाधीश आहेत.  त्यांना न्या. क्लॅरेन्स थॉमस यांनी व्हाइट हाऊसमध्ये साउथ लॉनवर न्यायाधीशपदाची शपथ दिली. यावेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. हा माझा मोठा सन्मान असून तो मी नम्रतापूर्वक स्वीकारते, असे बॅरेट यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर :
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या अनेक सहकाऱ्यांची नावं आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.

  • केंद्र सरकारने मागील वर्षीय यूएपीए कायद्यात बदल केला होता. ज्यानुसार आता भारतात कोणत्याही व्यक्तीस दहशतवादी म्हणून घोषित केले जाऊ शकते. या अगोदर केवळ संघटनेलाच दहशतवदी संघटना म्हणून घोषित करता येत होतं.

  • केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंगळवारी यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी व दहशतवादाबद्दलच्या शून्य सहिष्णुता धोरणाबाबत कटिबद्धता दर्शवत , सरकारने यूपीए अधिनियम १९६७ च्या तरतुदींनुसार आणखी १८ जणांना दहशवतवादी म्हणून घोषित केलं आहे.

  • हे आहेत १८ दहशतवादी - १. साजिद मीर (लष्कर ए तोयबा), २. युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), ३.अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), ४. शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) ५. फरहातुल्लाह गोरी ६.अब्दुल रऊफ असगर ७. इब्राहीम अतहर ८. युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ १०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) ११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) १२. जफर हुसैन भट्ट १३. रियाज इस्माइल १४. मोहम्मद इकबाल १५. छोटा शकील १६. मोहम्मद अनीस १७. टाइगर मेमन १८. जावेद चिकना

लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा :
  • लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

  • देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरु करण्यात आला. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू अनेक गोष्टींना संमती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. भारतातील करोना रुग्णांच्या एकूण संख्येत वाढ झाली असली तरीही करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

  • एवढंच नाही तर अॅक्टिव्ह केसेसच्या संख्येतही घट झाली आहे. असं असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊनच जिम, रेस्तराँ, हॉटेेल्स हे सगळं उघडण्यास केंद्र सरकारने संमती दिली आहे. अशात करोना कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच असेल आणि ३० नोव्हेंबरपर्यंत तो असेल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

  • गृह मंत्रालयाने आज (२७ ऑक्टोबर) पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत ३० सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.