चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 मार्च 2023

Date : 28 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
४ सुवर्णपदक तर १ चमचमती गोल्डन ट्रॉफी, भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे! इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात
  • महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय मुलींनी घरच्या भूमीवर नेत्रदीपक कामगिरी करत चार सुवर्णपदके जिंकली.
  • नीतू घंघासने ४५-४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकून सुरुवात केली. त्याच्यानंतर स्वीटी बुराने ७५-८१ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या दिवशी, निखत झरीनने ४८-५० किलो गटात सुवर्ण जिंकून देशाला तिसरे पदक मिळवून दिले आणि स्पर्धा संपण्यापूर्वी लव्हलिना बोरगोहेनने ७०-७५ किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले. .
  • भारताने १७ वर्षांनंतर महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आहेत.
  • भारताची राजधानी दिल्ली येथे ही स्पर्धा होत असून मायदेशात मुलींनी चार सुवर्णपदके जिंकून सर्वांना अभिमान वाटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुवर्णपदक जिंकणाऱ्या बॉक्सर्सचे अभिनंदन केले.
दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदा गैरप्रकारांमध्ये घट; बारावीच्या परीक्षेत 260, तर दहावीच्या परीक्षेत 113 गैरप्रकारांची नोंद
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत २०२०च्या तुलनेत यंदा गैरप्रकार घटल्याचे निदर्शनास आले. यंदा बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • करोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या होत्या. यंदा त्या सर्व सवलती रद्द करून करोना काळापूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक आणि पोलीस बंदोबस्त, भरारी पथकांच्या भेटी, सहायक परीरक्षकाकडून प्रश्नपत्रिकांची वाहतूक करताना जीपीएस ट्रॅकिंग आणि चित्रीकरण, जनजागृती आदी उपाययोजनांचा त्यात समावेश होता.
  • राज्य मंडळाने जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणांचा उपयोग करूनही काही गैरप्रकार झाले. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात पसरवणे, कॉपीसाठी साहाय्य करणे, धमकी देणे, खंडणी अशा प्रकरणांचा त्यात समावेश होता. राज्य मंडळाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार करोना प्रादुर्भावापूर्वी २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ५८० आणि बारावीच्या परीक्षेत ९९६ गैरप्रकारांची नोंद झाली होती. तर यंदा दहावीच्या परीक्षेत ११३ आणि बारावीच्या परीक्षेत २६० गैरप्रकारांची नोंद झाली. त्यामुळे २०२० च्या तुलनेत यंदाच्या परीक्षेत गैरप्रकारांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.
  • कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे २०२० च्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार घटल्याचे दिसून येते. अकरा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केल्याने काही प्रमाणात गैरप्रकारांना चाप बसली. पुढील वर्षी अधिक चांगल्या पद्धतीने कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
जर्मनीत संपामुळे रेल्वे, विमाने, सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प
  • जर्मनीत विविध कामगार संघटनांनी पगारवाढीसाठी सोमवारी एक दिवसाचा संप केल्याने जर्मनीतील बहुतांश भागातील रेल्वेसेवा, विमाने व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. वाढत्या महागाईचा विचार करून पगारवाढ देण्याची या संघटनांची मागणी आहे. या दशकातील जर्मनीतील हा सर्वात मोठा संप ठरला आहे.
  • जर्मनीतील बंदरे आणि जलमार्ग व्यवस्थेतील कामगार संपात सहभागी झाल्यामुळे रेल्वे आणि जहाजांद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक कर्मचारी स्वत:च्या वाहतूक व्यवस्थेने कामावर गेले. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातून काम करण्याचा पर्याय निवडला. किमान १०.५ टक्के वेतनवाढीची कामगार संघटनांची मागणी आहे. त्यांना संबंधित व्यवस्थापनांनी दोन वर्षांचा पाच टक्के वेतनावाढीचा प्रस्ताव दिला आहे. तसेच एक वेतन एकरकमी देण्याचाही प्रस्ताव दिला आहे.
  • मात्र कामगार संघटनांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. गेल्या वर्षी इतर क्षेत्रांतील कामगारांनाही वाढलेल्या महागाईचा फटका बसला आहे, असे ‘सिव्हिल सव्‍‌र्हिस फेडरेशन’चे उलरिच सिल्बरबाख यांनी सांगितले. ते म्हणाले, की आमच्या वास्तविक वेतनात घट झाली आहे व त्याचे संतुलन करणे आवश्यक आहे.
  • महानगरातील आमच्या संघटनांच्या काही काही सदस्यांना भाडे भरण्यासाठी शासकीय मदतीसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. सिल्बरबाख म्हणाले, वाटाघाटीच्या पुढच्या फेरीत व्यवस्थापनांकडून वेतनवाढीचे प्रमाण वाढवण्याचा प्रस्ताव येईल, अशी आशा वाटते. अन्यथा कामगार संघटनांना बेमुदत संपाचा विचार करावा लागेल.
वंदे भारत ट्रेन आता ‘स्वर्गा’पर्यंत धावणार, आयफेल टॉवरपेक्षा उंच पूल तयार
  • पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे काश्मीरला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. बऱ्याचदा प्रवासात कधी हवामान तर कधी अतिरेकी अडसर ठरतात. परंतु भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरच्या प्रवासात आता कोणताही अडथळा येणार नाही हा पराक्रम करून दाखवला आहे.
  • वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, जगातील सर्वात उंच रेल्वे पूलदेखील जवळजवळ तयार असल्याचं सांगितलं आहे.
  • काश्मीर हे पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणूनही ओळखले जाते. तिथे खराब हवामानामुळे बऱ्याचदा रस्ते आणि हवाई मार्ग बंद होतात, त्यामुळे अनेक वेळा देशाच्या इतर भागांशी काश्मीरचा संपर्क तुटतो.
  • भारतीय रेल्वे आता हे आव्हान पेलण्यासाठी जम्मू ते श्रीनगर हा रेल्वे मार्ग तयार करीत आहे, जेणेकरून अवघ्या काही तासांत तुम्ही जम्मूहून काश्मीरमध्ये पोहोचू शकाल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यानंतर वंदे भारत ट्रेनही जम्मू ते श्रीनगर अशी धावणार आहे.
महाराष्ट्रातील मनरेगा कामगारांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने विविध राज्यांसाठी मजुरीचे दर वाढवले
  • मनरेगा कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत मजुरीच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
  • मनरेगा कायदा २००५ च्या कलम ६(१) अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत मजुरांच्या वेतनात ७ रुपयांपासून २६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून, १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. वाढलेल्या मजुरीच्या दराचा फायदा हा महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनाही होणार आहे. या वाढीनंतर हरियाणामध्ये सर्वाधिक दैनंदिन मजुरी ३५७ रुपये प्रति दिवस असेल आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सर्वात कमी २२१ रुपये प्रति दिवस असेल.
  • राजस्थानमध्ये मजुरीत सर्वाधिक वाढ - केंद्र अधिसूचनेद्वारे त्यांच्या लाभार्थ्यांसाठी वेतन दर निश्चित करू शकते. मागील वर्षीच्या दरांच्या तुलनेत मजुरीत सर्वाधिक टक्के वाढ राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानसाठी सुधारित वेतन २५५ रुपये प्रतिदिन निश्चित करण्यात आले आहे, जे २०२२-२३ मध्ये २३१ रुपये होते.
  • बिहार आणि झारखंडमध्ये जवळपास ८ टक्क्यांची वाढ - बिहार आणि झारखंडमध्ये या योजनेंतर्गत मजुरांच्या वेतनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी या दोन राज्यांमध्ये दैनंदिन मजुरी २१० रुपये होती, ती आता २२८ रुपये झाली आहे.
  • छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सर्वात कमी वेतन - छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी दैनंदिन वेतन २२१ रुपये आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये दोन्ही राज्यांतील मजुरांची दैनंदिन मजुरी २०४ रुपये होती. कर्नाटक, गोवा, मेघालय आणि मणिपूर ही राज्ये आहेत ज्यांनी सर्वात कमी टक्केवारी वाढ नोंदवली आहे.
आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिलेले असते, माहीत आहे का? खूपच प्रेरणादायी आहे अर्थ
  • आयपीएलचा १६ वा हंगाम ३१ मार्च पासून सुरु होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पहिल्या सीझनची ट्रॉफी सोडली तर आयपीएल ट्रॉफी तेव्हापासून आजतागायत एकाच स्वरुपाची आहे. ही ट्रॉफी जगातील सर्व मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या ट्रॉफींइतकीच खास आहे. तसेच आज आम्ही या ट्रॉफीवर काय लिहिलं असतं, ते सांगणार आहोत, जे सहसा या ट्रॉफीच्या ब्राइटनेसमुळे चाहत्यांना नीट वाचता येत नाही.
  • ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे - आयपीएल ट्रॉफीचा रंग सोनेरी आहे, तरी ती कोणत्या धातूची आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ही ट्रॉफी खूप महागडी आहे हे निश्चित. या ट्रॉफीची सर्वात मनोरंजक आणि खास गोष्ट म्हणजे त्यावर लिहिलेले काही शब्द आहेत. हा संस्कृतमध्ये लिहिलेला एक श्लोक आहे, जो थेट या स्पर्धेशी आणि या स्पर्धेच्या उद्देशाशी संबंधित आहे.
  • प्रतिभा आणि संधी यांचा संगम - या सुवर्ण आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहिले आहे, ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिही’. याचा अर्थ जिथे प्रतिभेला संधी मिळते. त्याच वेळी, आतापर्यंत ही विजेतेपदे जिंकलेल्या सर्व संघांची नावे देखील ट्रॉफीच्या खाली नमूद केली आहेत.
  • हे आयपीएलचे ब्रीदवाक्यही आहे. साहजिकच, आयपीएलने गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटच्या प्रतिभावन खेळाडूंना येथे येण्याची आणि त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे, सर्वच क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पोहोचत नाहीत, परंतु आयपीएलमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याचा मार्ग मिळाला. त्याद्वारे राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी देखील निर्माण होत आहेत.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 मार्च 2022

 

पोलिसांच्या रजांमध्ये वाढ; कामाचा ताण विचारात घेऊन निर्णय :
  • राज्यभरातील पोलिसांना वर्षभरात १२ किरकोळ रजा मिळत होत्या. पोलिसांना मिळणाऱ्या किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून पोलिसांना आता २० किरकोळ रजा मिळणार आहेत.

  • कायदा सुव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच मोर्चा, आंदोलने, राजकीय नेत्यांचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे.

  • पोलिसांवर पडणाऱ्या कामाचा ताण विचारात घेऊन पोलिसांच्या हक्काच्या रजा वाढविल्या पाहिजेत, असा प्रस्ताव गृहविभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. पोलिसांना यापूर्वी १२ किरकोळ रजा मिळत होत्या. किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून नवीन नियमानुसार पोलिसांना वर्षभरात २० किरकोळ रजा मिळणार आहेत.

  • ज्या पोलीस कर्मचाऱ्याची दुसऱ्या दिवशी रजा आहे किंवा साप्ताहिक सुट्टी आहे. अशा कर्मचाऱ्यांना रजेच्या आदल्या दिवशी रात्रपाळीच्या कर्तव्यावर बोलावू नये, अशा सूचना गृहविभागाकडून देण्यात आल्या आहेत. किरकोळ रजांमध्ये वाढ केल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

‘एमआरसॅम’च्या लष्करी आवृत्तीची यशस्वी चाचणी :
  • जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआरसॅम) लष्करी आवृत्तीची भारताने शनिवारी ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून यशस्वी चाचणी केली.

  • दीर्घ पल्ल्याचे निकष पूर्ण करून सकाळी १० वाजता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली, असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सांगितले.  

  • ‘एमआरसॅम- आर्मी मिसाईल सिस्टिम फ्लाइटची बालासोर येथील चाचणी तळावरून चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राने अतिशय वेगाने मार्गक्रमण करून लांब अंतरावरील हवेतील एक लक्ष्य टिपले. थेट मारा करून या क्षेपणास्त्राने लक्ष्य नष्ट केले’, असे डीआरडीओने ट्विटरवर सांगितले.

“जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…;” एलोन मस्क यांचं वक्तव्य चर्चेत :
  • टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण त्यांच्या मते ते जगातले सर्वात श्रीमंत नाहीत. एलोन मस्क स्वतःला नाही, तर दुसऱ्या एका व्यक्तीला जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती मानतात. मस्क यांच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ही माहिती दिली.

  • मस्क यांना त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल विचारण्यात आले, त्यावर उत्तर देत ते म्हणाले की, “मला वाटते की पुतिन माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत.” एलोन मस्क यांची एकूण संपत्ती सुमारे २६० अब्ज डॉलर्स आहे. तर, पुतिन यांच्या संपत्तीचे रहस्य कायम आहे. त्यांची संपत्ती किती आहे, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

  • अधिकृत नोंदीनुसार त्यांना वर्षाला फक्त १४०,००० डॉलर पगार मिळतो. एवढेच नाही तर पुतिन यांच्याकडे काळ्या समुद्रावर १.४ बिलियन डॉलर किमतीचा राजवाडा आणि ४ बिलियन डॉलर किमतीचे मोनॅको अपार्टमेंट देखील आहे. त्यांचा ८०० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट, एक ट्रेलर आणि तीन कार आहेत.

  • रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबाबत मस्क यांना विचारले असता मस्क म्हणाले की, पुतिन यांना थांबवायला हवं. यापूर्वी अनेकदा मस्क यांनी जाहीरपणे युक्रेनचं समर्थन केलंय.

बॅडमिंटनपटू जयरामची निवृत्ती :
  • भारताच्या अजय जयरामने रविवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर करताना दोन दशकांच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.

  • ३४ वर्षीय जयरामने समाजमाध्यमांवर निवृत्तीची घोषणा करताना म्हटले की, ‘‘मी आज जो काही आहे, त्याचे श्रेय बॅडमिंटनला जाते. या खेळाने माझ्या जीवनाला आकार दिला, मला शिकवले, घडवले आणि मोठी स्वप्ने दिली.’’ याचप्रमाणे आता ‘एमबीए’ करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

  • ‘‘सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट होत असतो. मी माझ्या दोन दशकांच्या कारकीर्दीचा निरोप घेताना अतिशय भावनिक झालो आहे,’’ असे जयरामने म्हटले. जयरामने डच खुली बॅडमिंटन स्पर्धा दोनदा जिंकली होती, तर २०१५मध्ये कोरिया खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते.

आज, उद्या भारत बंद ; बँक सेवांवरही परिणामाची शक्यता :
  • कामगार संघटनांनी आज, सोमवारी आणि उद्या मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बँक कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याने सलग दोन दिवस बँकिंग सेवा अंशत: ठप्प होण्याची शक्यता आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संघटनांनी संपाची हाक दिली आहे, तर बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

  • केंद्र सरकारच्या कामगार-कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर परिणाम करणाऱ्या धोरणांविरोधात सोमवारी आणि मंगळवारी  कामगार संघटनांच्या महासंघाने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्याला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बँक कर्मचारीही संपात उतरल्यास बँकिंग क्षेत्राला त्याचा फटका बसू शकतो.  

  • संपामुळे बँकिंग सेवांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, असे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियासह (एसबीआय) अनेक सरकारी बँकांनी म्हटले आहे. व्यवस्थापनाने संपाच्या दिवशी शाखा आणि कार्यालयांमधील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली असली तरी, संपामुळे  कामकाजावर मर्यादित परिणामाची शक्यता ‘एसबीआय’ने व्यक्त केली आहे.

  • कामगार संघटनांच्या २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत देशव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला होता. ‘‘केंद्रातील भाजप सरकारची धोरणे कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि देशविरोधी असून त्यांचा निषेध करण्यासाठी सलग दोन दिवस भारत बंद करण्यात येईल’’, असे कामगार संघटनांनी सांगितले होते. सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या केंद्राचे धोरण आणि बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक २०२१चा निषेध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनाही ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहेत.

चीनमध्ये करोनाचा उद्रेक होऊ लागल्यानंतर आणखी एक मोठी घडामोड :
  • चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा कहर केला असून अनेक शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. सोमवारी चीनला आपलं सर्वात मोठं शहर असणाऱ्या शांघाईमधील अनेक भागांमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. एकीकडे चीनकडून करोनाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असताना दुसरीकडे याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरुन टीका केली जात आहे. AP ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे.

  • लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराला दोन भागात विभाजणाऱ्या Huangpu River मधील पश्चिम भागात पाच दिवसांचा लॉकडाउन केला जाणार आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे.

  • याआधीच चीनमध्ये २.५ कोटींहून जास्त लोकांना लॉकडाउनध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना करोनासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत. शांघाईमधील डिस्ने थीम पार्क याआधी बंद करण्यात आलेल्या व्यवसायांपैकी एक आहे.

२८ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.