चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 जून 2023

Date : 28 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
27 वर्षांनी पुण्यात होणार एवढे विश्वचषक सामने
  • ICC Men’s World Cup 2023 एकदिवसीय विश्वचषक  क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम वेळापत्रकाची प्रतीक्षा मंगळवारी अखेर संपली.  विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यास अवघे तीन महिने बाकी असताना हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील उद्घाटनाचा आणि समारोपाचा सामना अहमदाबादला मिळाला असून, कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहराला पाच सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. तब्बल 27 वर्षांनी पुण्यात विश्वचषक सामन्याचे आयोजन होणार आहे. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर होणार आहेत.
  • मुंबईत एका खास सोहळ्यात दुपारी 12 वाजता विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अहमदाबाद, दिल्ली, मंबई, कोलकता या प्रमुख क्रिकेट शहरांच्या बरोबरीने पुण्याला विश्वचषक स्पर्धेत स्थान  मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात यापूर्वीही झाले असले, तरी एकाच वेळेस इतक्या सामन्यांचे यजमानपद पुणे शहराला प्रथमच मिळाले आहे.
  • यापूर्वी, १९९६ मध्ये पुण्यात विश्वचषक स्पर्धेचा अखेरचा सामना खेळविण्यात आला होता. पुण्यातील तेव्हाच्या नेहरु स्टेडियमवर २९ फेब्रुवारी १९९६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनया या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सामना स्पर्धेतील सर्वात सनसनाटी सामना ठरला होता. केनयाने या सामन्यात विंडीजवर विजय मिळवून क्रिकेट विश्वाला चकित केले होते.
  • या वेळी आता पुणे शहराला यजमान भारतासह, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या सर्वच प्रमुख संघांच्या सामन्याचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. पुण्यातील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी भारत वि. बांगलादेश असा होईल. त्यानंतर पात्रता फेरीतील दुसरा संघ वि. अफगाणिस्तान (३० ऑक्टोबर), न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका (१ नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (१२ नोव्हेंबर) असे  पुण्यातील अन्य सामने होणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामन्याने साखळी फेरीची सांगता होणार आहे.
हुश्श! अखेर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू; वेळापत्रक, थांबे आणि तिकीट दर जाणून घ्या!
  • देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. देशभरात सध्या १८ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून मंगळवारी आणखीन पाच वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यामुळे देशभरात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या आता २३ झाली आहे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचाही (Madgao to CSMT Vande Bharat Express) समावेश आहे. मुंबई-गोवा या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने कोकणात कमी वेळात पोहोण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसंच, गोव्यासारख्या पर्यटन ठिकाणीही वेळेत आणि आरामशीर पोहोचता येणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ जून) राणी कमलापती (भोपाळ) ते इंदौर, भोपाळ ते जबलपूर, रांची ते पाटणा, धारवाड ते बंगळूरु आणि मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत ही वेगवान असल्याने या एक्स्प्रेसची मागणी वाढली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर वंदे भारतचीही या मार्गावरून १६ मे रोजी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले होते. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई-गोवा प्रवास करण्यासाठी कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे.
  • चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे. देशातील सर्वात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली होती. तर सध्या राज्यात चार वंदे भारत धावत असून पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव धावणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर २ जून रोजी या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मात्र, त्याचदिवशी ओडिशात तिहेरी रेल्वे अपघात घडल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अखेर, आज या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून आजपासून मुंबई-गोवा या कोकण रेल्वे मार्गावरून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
सातारा भूषण पुरस्कार हा आजपर्यंत मिळालेला सर्वोच्च पुरस्कार - डॉ. प्रमोद चौधरी
  • रा. ना. गोडबोले ट्रस्ट तर्फे प्रदान केलेला सातारा भूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान असल्याचे उदगार प्राज इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा व जगभरात इथेनॉल मॅन म्हणून प्रसिध्द असलेले डॉ. प्रमोद चौधरी यांनी काढले.रा. ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्‍ट व सातारकर नागरिकांच्या वतीने प्रतिवर्षी आपल्‍या उत्तुंग कर्तुत्‍वाने सातारा जिल्‍ह्याचे नांव उज्‍ज्‍वल करणार्‍या व्‍यक्‍तीला सातारा भूषण पुरस्‍काराने गौरवले जाते. २०२२ सालचा हा पुरस्‍कार प्रसिध्‍द प्राज इंडस्‍ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रदान करण्‍यात आला. यावेळी डॉ. चौधरी बोलत होते. पुरस्कार विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर यांचे शुभहस्ते व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली, ट्रस्टचे विश्वस्त अरूण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले, अशोक गोडबोले यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. रु. ३०,०००/- व सन्‍मानचिन्‍ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • यावेळी बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले की, हा सन्मान माझा नसून आज पर्यंतच्या माझ्या वाटचालीत मला सहकार्य करणाऱ्या सर्व स्टाफचा आहे. बायोफ्युएल निर्मिती बरोबरच येत्या काळात कचऱ्यापासून इंधन निर्मिती, फॉसिल्स इंधन निर्मिती व संपुर्ण जगाला प्लॅस्टीक कचऱ्यापासून सुटका करणाऱ्या बायो प्लॅस्टीक निर्मितीचा संकल्प केला असून सातारा भूषण सारख्या पुरस्कारांनी मला काम करण्याचे अधिक बळ मला मिळेल.आजपर्यंत अनेक मान सन्मान पुरस्कार मला मिळाले आहेत. पण आपल्याच मातीत आपल्या माणसांनी केलेला सन्मान हा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. प्रमोद चौधरी यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःची रक्कम वाढ करून सदरची रक्कम ही पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला मदत म्हणून देत असल्याचे जाहिर केले.
  • यावेळी बोलताना रामराजे निंबाळकर म्हणाले की, जगात अनेक उद्योजक पैसा मिळवण्याच्या उद्देशाने काम करीत असतात पण डॉ. प्रमोद चौधरी हे एक उत्कृष्ठ उद्योजक असून उत्कृष्ठ शास्त्रज्ञ व उत्कृष्ठ नागरिक आहेत. व्यवसायात काम करताना आपले काम समाजाला उपयोगी कसे होईल याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे डॉ. चौधरी आहेत. संपुर्ण जगाला बायोफ्युएल च्या माध्यमातून उपकारक ठरणाऱ्या पर्यावरण रक्षक व संवर्धन करणार्‍या डॉ. चौधरी यांचे कार्य असेच बहरत राहो अशा शुभेच्छा दिल्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, डॉ. प्रमोद चौधरी यांच्या शोधामुळे साखर इंडस्ट्री, एव्हीएशन इंडस्ट्री , पर्यावरण व फ्युएल इंडस्ट्रीजला मोलाची मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गोडबोले ट्रस्टच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
  • यावेळी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टच्या वतीन अरूण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले व अशोक गोडबोले यांनी केला. गोडबोले ट्रस्टची माहिती डॉ. अच्युत गोडबोले यांनी विशद केली. सूत्रसंचलन व आभार प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त उदयन गोडबोले , डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, प्रा. पुरूषोत्तम शेठ, प्रकाश गवळी, प्रकाश बडेकर, कराडचे बाळासाहेब कुलकर्णी, फलटण ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. अविनाश लेले, श्रीराम नानल, विजय मांडके, बाबुराव शिंदे व अनेक मान्यवर उपस्थीत होते.
गुंतागुंतीच्या मेंदूशस्त्रक्रियेने आफ्रिकेतील महिलेला नवजीवन
  • आफ्रिकेतील मालावी देशातील महिलेवर पुण्यात अतिशय गुंतागुंतीची मेंदूशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. मेंदू आणि मणक्याचे सर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी सह्याद्री रुग्णालयात ही ‘न्यूरोव्हॅस्क्युलर सर्जरी’ आणि ‘मायक्रो व्हॅस्क्युलर डीकम्प्रेशन’ (एमव्हीडी) यांची एकत्रित शस्त्रक्रिया केली. ही महिला उपचारानंतर बरी होऊन आता मायदेशी परतली आहे.
  • मालावीतील ही महिला उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात आली होती. तिला एकाच वेळेला ‘ट्रायजेमिनल’ आणि ‘ग्लॉसोफॅरिंजिअल’ न्यूराल्जियाची असह्य वेदना होती. त्याशिवाय तिच्या लहान मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचा जटिल गुंता असलेली मोठ्या आकाराची व उच्च दाबाचा रक्तप्रवाह असलेली गाठही होती. ही अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीची समस्या होती.
  • डॉ. जयदेव पंचवाघ व त्यांच्या पथकाने या महिलेवर यशस्वी उपचार केले. प्रथम डॉ. आनंद अलूरकर यांनी रक्तवाहिनीच्या या गुंत्यावर अँजिओग्राफीद्वारे एम्बोलायझेशन केले. नंतर डॉ. पंचवाघ यांनी आठ तासांच्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने ही गाठ काढून टाकली. याचबरोबर ‘ट्रायजेमिनल’ व ‘ग्लॉसोफॅरिजिअल’ न्यूराल्जियाची शस्त्रक्रियाही त्याच वेळी केली. गंभीर आणि दुहेरी मज्जातंतू वेदनांपासून ही महिला आता पूर्णपणे मुक्त झाली आहे. ती आता मायदेशी परतली आहे.
  • याबाबत डॉ. पंचवाघ म्हणाले, की ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ म्हणजे चेहरा, हिरडी, नाकपुडी किंवा कपाळामध्ये येणारी असह्य वेदना असते. याला ‘सुईसाइड डिसिज’ असेही म्हणतात. माणूस अनुभवू शकणारी सर्वांत वाईट वेदना, असे भीषण वर्णन केला जाणारा हा विकार आहे. यातच या महिलेला ‘ग्लोसोफॅरिंजियल न्यूराल्जिया’ म्हणजे घसा, जीभ, कानामध्ये येणाऱ्या असह्य वेदना हा आणखी एक गंभीर विकार होता. अशा प्रकारे, दुहेरी मज्जातंतू वेदनेने ग्रस्त असलेल्या या महिलेवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.
देशाला आज मिळाली ५ वंदे भारत ट्रेनची भेट, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
  • देशवासीयांना आज म्हणजेच २७ जून रोजी एकत्र पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. याच अनुषंगाने पीएम मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी या पाचही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. राणी कमलापती स्थानकावरून पंतप्रधान मोदींनी पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून, राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस व्यतिरिक्त उर्वरित चार गाड्यांना पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवलाय. एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह देशात एकूण २३ वंदे भारत गाड्या असतील.
  • मध्य प्रदेशला यावेळी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. याशिवाय गोवा, बिहार आणि झारखंडला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. कर्नाटकला दुसऱ्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मडगाव-मुंबई वंदे भारत दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव येथे थांबेल. आज चालवल्या जाणार्‍या आणखी वंदे भारत ट्रेनच्या मार्गाबद्दल जाणून घेऊ यात.
  • बंगळुरू-हुबळी-धारवाड वंदे भारत - बंगळुरू, हुबळी आणि धारवाडला जोडणाऱ्या वंदे भारतसह कर्नाटकमध्ये दोन सेमी हायस्पीड गाड्या सुरू होतील. ही ट्रेन दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये चालवली जाईल. यशवंतपूर, दावणगेरे आणि हुबळी स्थानकावर थांबणे अपेक्षित आहे. तसेच हुबळी आणि धारवाड दरम्यानचा ट्रेनने प्रवास वेळ ७ तासांवरून सुमारे ५ तासांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे.
  • पाटणा-रांची वंदे भारत एक्सप्रेस - पाटणा आणि रांचीला जोडणारी ट्रेन म्हणून बिहारला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. या ट्रेनला गया, कोडरमा, हजारीबाग रोड, पारसनाथ आणि बोकारो स्टील सिटी येथे थांबा मिळणे अपेक्षित आहे. ही ट्रेन सुमारे ४१० किमी अंतर कापणार आहे.
  • भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेन - भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस ही मध्य प्रदेश आणि भोपाळ येथून धावणारी दुसरी ट्रेन असेल. ही ट्रेन राज्यातील अनेक शहरांना जोडणार आहे. मात्र, ट्रेनच्या थांब्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
  • भोपाळ-जबलपूर वंदे भारत - भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस ही मध्य प्रदेशातील तिसरी अर्ध हायस्पीड ट्रेन असेल. तसेच भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून धावणारी ही तिसरी ट्रेन असेल.
गेट सेट गो! वर्ल्डकप२०२३चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला
  • आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आज संपली आहे. टूर्नामेंट सुरू होण्याच्या अगदी १०० दिवस आधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबईत सकाळी ११.३० वाजता बीसीसीआयने एक पत्रकार परिषद घेत विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निमंत्रणानुसार हा कार्यक्रम मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे संपन्न झाला. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे.
  • अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची रूपरेषा देणारा मसुदा वेळापत्रक जूनमध्ये देशांना पाठवला होता. मात्र, या मसुद्यावर पाकिस्तानने खोडा घातला होता. मसुद्यानुसार, सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडचा उपविजेता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर, अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.

उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत

  • विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
  • वानखेडे स्टेडियमवर २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी श्रीलंकेचा पराभव केला होता. तसे, १९८७च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना ईडन गार्डनने आयोजित केला होता जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

 

भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचे मोदींचे आवाहन :
  • भारताची हवामानाबाबतची बांधिलकी त्याच्या कामगिरीवरून अधोरेखित होते. भारतासारखा मोठा देश जेव्हा अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो, तेव्हा इतर विकसनशील देशांनाही प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ उदयास येत असून जी -७ देशांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

  • जर्मनीत आयोजित केलेल्या ‘जी-७ परिषदे’च्या निमित्ताने मोदी यांनी हवामान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत भारत करीत असलेल्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कॉल्झ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रॅम्फोसा यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. जी -७ परिषदेतील ‘उत्तम भविष्यातील गुंतवणूक: हवामान, ऊर्जा, आरोग्य’ या विषयावरील सत्रात मोदींनी भारताच्या आजपर्यंतच्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

  • भारताने अ-जीवाश्म स्त्रोतांमार्फत ४० टक्के ऊर्जा-क्षमतेचे लक्ष्य नऊ वर्षे आधीच गाठल्याचे मोदी यांनी सांगितले. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य भारताने पाचमहिने आधीच गाठले. पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा जगातील पहिला विमानतळ भारतात आहे, असेही मोदी यांनी म्हणाले. भारतासारखा देश अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो तेव्हा त्याच्याकडून विकसनशील देशांना प्रेरणा मिळते. म्हणून जी -७ मधील श्रीमंत देश भारताला याबाबतीत पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.

देशात अंतराळ प्रक्षेपण क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले :
  • राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (इन-स्पेस) अंतरिक्ष क्षेत्रात प्रक्षेपणासाठी खासगी उद्योगांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला हे दालन खुले झाले आहे. भारतातील खासगी उद्योगांना अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन, त्यांना अधिकृत मान्यता आणि त्यांच्यावर नियंत्रण व देखरेखीसाठी ‘इन-स्पेस’ ही स्वायत्त संस्था स्थापण्यात आहे.

  • ‘इन-स्पेस’ने सोमवारी एका निवेदनाद्वारे सांगितले, की हैदराबादच्या ‘ध्रुव स्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि बंगळुरूच्या ‘दिगंतर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांना अंतराळ प्रक्षेपणास मंजुरी दिली. ‘ध्रुव स्पेस’च्या ‘ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर’ व ‘दिगंतर रिसर्च’च्या ‘रोबस्ट इंटिग्रेटिंग प्रोटॉन फ्लुएन्स मीटर’ (रोबी) या दोन उपकरणांना (‘पेलोड’) प्रक्षेपणास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांना ‘पीएसएलवी-सी५३’ च्या ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मोडय़ूल’द्वारे (पीओईएम) ३० जूनला प्रक्षेपित केले जाणार आहे.

  • ‘इन-स्पेस’चे अध्यक्ष पवनकुमार गोयंका म्हणाले, ‘‘इन-स्पेसद्वारे पहिल्या दोन प्रक्षेपणांना मान्यता मिळणे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  भारतातील खासगी क्षेत्राद्वारे अंतराळ प्रक्षेपणाचे नवे युग सुरू होणार आहे.  ‘ध्रुव स्पेस’ व ‘दिगंतर रिसर्च’ हे अंतराळ तंत्रज्ञान नवउद्योग (स्टार्टअप) आहे.  ‘पीएसएलव्ही-सी५३’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) ५५ वी मोहीम आहे. ३० जूनला हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी सहाला प्रक्षेपित केले जाणार आहे.’’

अग्निपथ योजना- हवाई दल भरतीला तरुणांचा मोठा प्रतिसाद, तीन दिवसात ५६ हजार पेक्षा अधिक अर्ज दाखल :
  • केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. देशभरातील तरुण आक्रमक झाले असून रसत्यावर उतरत निर्देशने करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय हवाई दल विभागाने या योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तरुणांचा या भरतीला मोठा प्रतिसाद असून केवळ ३ दिवसांमध्ये ५६ हजारापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

  • अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलाकडून २४ जून २०२२ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार हवाई दलात नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन हवाई दलाकडून करण्यात आले आहे.

  • चार वर्षांसाठी अग्निविरांची भरती - अग्निपथ योजनेअंतर्गत १७ ते २१ वर्षाच्या तरुणांना चार वर्षाच्या सेवेसाठी भारतीय लष्करात दाखल केले जाईल. चार वर्षानंतर २५ टक्के अग्निविरांना नियमित सेवेत दाखल केले जाणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर बाहेर पडणाऱ्या अग्निविरांना केंद्रीय सशस्त्र दल तसंच आसाम रायफल्समध्ये प्राथमिकता दिली जाणार आहे. भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी राज्य पोलीस दलात प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट केलं आहे. तसेच द्योजकांनीदेखील अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.

Ray Ban च्या मालकांचं निधन; इटलीतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते दुसऱ्या स्थानी :
  • इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि गॉगल निर्मिती क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे लिओनार्डो डेल वेचिओ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. डेल वेचिओ अनाथालयात वाढले. पैशांच्या चणचणीमुळे त्यांना किशोर वयापासूनच काम करावे लागले होते. मात्र पुढे त्यांनी आपले चातूर्य आणि कौशल्याच्या जोरावर इटलीमध्ये गॉगल निर्मिती क्षेत्रात स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. गॉगल्समधील जगप्रसिद्ध ब्रँड रे बॅन हे त्यांच्याच मालकीचे आहे. ते इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

  • डेल वेचिओ यांचा जन्म २२ मे १९३५ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. आई-वडील नसल्यामुळे त्यांनी आपले बालपण अनाथालयात घालवले. तसेच किशोरवयातच त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मात्र पुढे १९६१ साली त्यांनी Luxottica नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला ते गॉगल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सुटे भाग विकायचे.

  • मात्र पुढे दशकभरानंतर त्यांनी Luxottica या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून स्वत: गॉगल्स निर्मिती करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांच्या कंपनीचे उत्पादन फक्त इटलीपर्यंत सीमित होते. मात्र हळूहळू त्यांनी संपूर्ण युरोपातील बाजारपेठा काबीज केल्या. पुढे त्यांनी फॅशन डिझायनिंग ब्रँड अरमानीसह अनेकांशी भागिदारी केली. तसेच पुढे त्यांनी रे बॅन, पर्सोल, आणि ओक्ले अशा ब्रँड्सवर मालकी मिळवली. पुढे Luxottica या कंपनीने लेन्सक्राफ्ट, सनग्लास हट अशा कंपन्यांना खरेदी केले. परिणामी Luxottica कंपनीचा संपर्क थेट ग्राहकांशी होऊ लागला.

  • दरम्यान, डेल वेचिओ यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून इटलीमधील उद्योग क्षेत्रातील बादशाह हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

28 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.