चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ जून २०२१

Date : 28 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्पर्धा परीक्षेतील उमेदवाराला द्यावी लागणार नाही मुलाखत; ‘या’ राज्याने घेतला निर्णय :
  • आंध्र प्रदेश सरकारने गट -१ सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेमध्ये सरकार पारदर्शकता आणू इच्छित आहे. यासाठीच काळजीपूर्वक तपासणी करून एपीपीएससी परीक्षांची मुलाखत प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. शनिवारी आंध्र प्रदेशचे प्रधान सचिव आदित्यनाथ दास यांनी ही माहिती दिली.

  • यापूर्वी, राज्य सरकारने २०१९ मध्ये गट -१ वगळता विविध पदांसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी आणि उपायुक्त या पदांचा समावेश होता. एपीपीएससीने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत गट -१, गट -२ आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसह सर्व भरती परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा प्रस्ताव दिला होता.

  • त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता, सरकारने आदेश जारी केल्यावनंतर गट -१च्या पदांसह आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांची मुलाखत पद्धत रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांना संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता वाटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

शासकीय नोकरभरती, बढत्यांसाठी संप :
  • राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष प्रकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाने आता संपाचे हत्यार उपसण्याचे ठरवले आहे.

  • शासकीय सेवेतील अडिच लाख रिक्त पदे भरणे, रखडलेल्या पदोन्नती मार्गी लावणे, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करणे इत्यादी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुलैमध्ये लाक्षणिक संप करण्याचा निर्णय महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

  • राज्य शासनाच्या सेवेतील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत विविध प्रश्नांवर झालेली चर्चा तसेच, घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती महासंघाचे संस्थापक नेते ग.दि. कु लथे व अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिली.

  • राज्य सरकार अधिकाऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे, तातडीच्या व जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य करण्यास दिरंगाई के ली जात आहे, त्याबद्दल कार्यकारिणीच्या बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘इग्नू’चा ज्योतिष अभ्यासक्रम मागे घेण्याची अंनिसची मागणी :
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदाच्या वर्षांपासून सुरू केलेला ज्योतिष विषयावरील अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे.

  • ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात  आणि खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणे आवश्यक आहे.

  • २००१ साली अटलबिहारी वाजपेयी शासनाने देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेतला होता. तो मोठय़ा प्रमाणात विरोध झाल्यावर मागे घेण्यात आला होता. डॉ.जयंत नारळीकर यांच्यापासून अनेक ज्येष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता.

  • ज्येष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या ५० दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही.वेन्कटरामन यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे, याची देखील आठवण या निमित्ताने करून देण्यात आली आहे.

नेट-सेट पीएचडी पात्रताधारकांसाठी उच्च तंत्रशिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा :
  • करोनाच्या काळात थांबलेली 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी वर्गा सोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

  • उच्चस्तरीय समितीच्या वतीने एकून ४,०७४ प्राध्यापकांच्या जागांच्या भरतीला मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १,६७४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 2020 या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहित धरुन 700 पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 2020 या वर्षापर्यंत प्राध्यापकांची किती पदे रिक्त आहेत याबाबतच दोन महिन्यात सर्वेक्षण करुन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ वर किरेन रिजिजू यांची विशेष प्रतिक्रिया :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरूवातीलाच आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्यादृष्टीने आपले विचार मांडले. तसेच, भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. तर, पंतप्रधान मोदींच्या आजच्या मन की बात कार्यक्रमावर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • “आज पंतप्रधानांची ‘मन की बात’ हृदयस्पर्शी होती. कारण, पहिल्यांदाच भारताला असे पंतप्रधान लाभले आहेत, जे खेळाडूंना वैयक्तिकरित्या पाठिंबा देताय आणि खेळाडूंच्या उत्तम आरोग्याबाबतची प्रत्येक माहिती घेत आहेत. अशा प्रकारच्या प्रोत्साहनाची यापूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती.” असं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

  • “आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये केवळ प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी होण्यासाठी जात नाही आहोत, तर तिथं विजयी होण्यासाठी जात आहोत. मी ऑलिम्पिकमधील पदाकांबाबत नक्की अंदाज व्यक्त करू शकत नाही. आम्हाला खात्री आहे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये आम्ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम राहू.” असं देखील किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे.

तिसरी लाट डिसेंबरमध्ये :
  • कोविड १९ विषाणूची तिसरी लाट यावर्षी डिसेंबपर्यंत लांबणीवर पडू शकते, असे मत आयसीएमआरने एका अहवालात व्यक्त केले आहे, अशी माहिती केंद्राच्या कोविड १९ नियंत्रण गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे.

  • ते म्हणाले की, करोनाला  रोखण्यासाठी आपल्याकडे सहा ते आठ महिन्यांचा कालावधी आहे. त्याचा फायदा घेऊन देशातील प्रत्येकाचे लसीकरण करण्याची गरज आहे. येत्या काही काळात दिवसाला १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा इरादा आहे. डेल्टा प्लस हा कोविड १९ चा नवा उपप्रकार असून त्याच्याबाबत चिंता आहे पण त्याचा संबंध तिसऱ्या लाटेशी जोडता येणार नाही.

  • विषाणूच्या उपप्रकारांमुळे नव्या लाटा येऊ शकतात. त्याची शक्यता नाकारता येत नाही असे उलटे विधानही त्यांनीच केले आहे.  ते म्हणाले की, नवीन उपप्रकार किंवा उत्परिवर्तने याच्याशी लाटांचा संबंध असतो. डेल्टा प्लस हा नवीन उपप्रकार आहे पण त्यामुळेच तिसरी लाट येईल असे म्हणता येणार नाही कारण कुठलीही लाट येणे हे दोन तीन घटकांवर अवलंबून असते.

  • डेल्टा प्लस विषाणूमुळे तिसरी लाट येऊ शकते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. कारण या विषाणू उपप्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. पण तिसरी लाट टाळता येऊ शकते. ज्या देशांमध्ये लोकसंख्येच्या वीस टक्के लसीकरण झालेले आहे तेथे तिसरी लाट आलेली नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

२८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.