चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 जुलै 2023

Date : 28 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना जाहीर झाला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या १९ व्या वर्धापनदिनी न्या. लळीत यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी एका पत्रकार परिषदेत केली. सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी न्या. लळीत हे ठरले आहेत. येत्या १ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुंबई विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  • अन्य पुरस्कार : १) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार – एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर २) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार – प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर, प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर ३) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ) – डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल, डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल. ४) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय) – प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर, प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर, ५) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार – डॉ. अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
टाटांच्या आयपीओची एवढी चर्चा का?
  • आपल्या दैनंदिन आयुष्यात मीठपासून दागिन्यांपर्यंत सगळीकडे दिसणारा ब्रँड म्हणजे टाटा. सामाजिक क्षेत्र असो किंवा शिक्षण- टाटा समूह समाजातल्या विविध स्तरांमध्ये, क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. भारताला जगाच्या नकाशावर मोठे नाव कमवून देणारा हा समूह !! अगदी विनोदाने बोलावयाचे झाले तर बोली भाषेत आपल्याला एखादी वस्तू घेणे परवडत नसेल तर आपण म्हणतो ना की आम्ही काही टाटा, बिर्ला नाही कि सहज घेऊ शकू!!
  • तर आजमितीला या समूहाच्या शेअर बाजारात नोंदणी झालेल्या सुमारे २९ कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या मिळून रु.२,३०,०००कोटी इतके महाप्रचंड मार्केट कॅपिटलायझेशन आहे. यावरून एकूण समूहाची व्याप्ती किती अवाढव्य आहे हे आपल्यासारखे सामान्यजन कल्पनाच करू शकतात, पण हेच आकडे आपल्या देशाची सकारात्मक बाजू बघायला देखील प्रेरित करतात. भारत म्हणजे गरीब देश, अडाणी देश अशी आपल्या देशाबद्दल असणारी प्रतिमा पुसण्यामध्ये जे अग्रणी आहेत त्यातील हा एक उद्योग समूह!! गेल्या काही वर्षांमध्ये टाटा समूहाने गुंतवणूकदारांना अक्षरशः भरभरून परतावा दिला, साहजिकच टाटाचा कोणताही आयपीओ बाजारात येणार म्हणल्यावर गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडणार हे निश्चित!! तर असाच टाटांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा घालणारी एक घटना होऊ घातली आहे ती म्हणजे त्यांची अजून एक कंपनी शेअर बाजारात प्रवेश करत आहे ती म्हणजे “टाटा टेक्नॉलॉजीज लि.”
  • सुमारे १९ वर्षांपूर्वी २००४ मध्ये शेअरबाजारात टाटांनी टीसीएसचा आयपीओ आणला त्यानंतर आता बाजाराला प्रतीक्षा आहे ती त्यांची ३३ वर्ष जुनी कंपनी म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या नोंदणी होण्याची, कंपनीने नुकताच मार्चमध्ये सेबीकडे आयपीओ संबंधित अर्ज(DRHP) दाखल केला व त्याला हिरवा कंदील देखील मिळाला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहेत ती म्हणजे तो कधी बाजारात येतो आणि किती किंमत-पट्टा कंपनी निश्चित करते, साधारणतः पुढील १-२ महिन्यात तो यावा अशी एक अटकळ आहे कारण सध्या शेअर बाजारात तेजीची घौडदौड चालू आहे. अशावेळीच तो आणणे योग्य ठरेल असे वाटते.
शालेय शिक्षणात सत्रान्त पद्धतीला शिक्षण तज्ज्ञांचा विरोध का?
  • भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सत्रान्त पद्धती लागू केल्याचे परिणाम सकारात्मक नसतानाही ही पद्धत इयत्ता नववी ते बारावीपर्यंत लागू करण्याचा निर्णय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याद्वारे घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया कच्चा राहण्याची भीती असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सत्रान्त पद्धती कुठे लागू आहे?

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१५ मध्ये देशातील विद्यापीठांत सत्रान्त पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या देशातील ४०० विद्यापीठांमध्ये ही पद्धत आणि श्रेयांक पद्धत लागू आहे. प्रायोगिक तत्त्वावर विद्यापीठांनी सुरुवातीला व्यावसायिक अभ्यासक्रमांना ही पद्धत लागू केली होती. त्यानंतर आता पदवी आणि पदव्युत्तर अशा सर्वच अभ्यासक्रमाच्या परीक्षा या सत्रान्त पद्धतीनुसार होतात.

शाळांबाबत आता निर्णय का घेण्यात आला?

  • इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सत्रान्त पद्धत लागू करण्याचा निर्णय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क- एनसीएफद्वारे (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा) घेण्यात आला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत १५० पर्यायी विषयांची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपले विषय निवडायचे आहेत, तर वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. नववी, दहावीसाठी आठ शाखांमधील किमान तीन समूहांतील चार विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. प्रत्येक विषयाचे चार-चार पेपर असतील. विद्यार्थ्यांना १५० विषयांच्या पर्यायांतून आपले विषय निवडायचे आहेत. आतापर्यंत अकरावी व बारावीस्तरावर विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील विषय राहत होते. मात्र, आता वेगळी पद्धती अस्तित्वात येणार आहे. संगीत, क्रीडा, क्राफ्ट व व्होकेशनल एज्युकेशन या विषयांचा दर्जा गणित, विज्ञान, मानव्य शाखा विषय, भाषा, सामाजिक शास्त्र यांच्या बरोबरीनेच गणला जाणार आहे.

कशी असेल नवीन शिक्षण पद्धत?

  • इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सत्रान्त पद्धतीने दिले जाईल. वर्षभरात शिक्षण मंडळाची परीक्षा देण्याच्या दोन संधी देण्यात येतील. इयत्ता नववी, दहावी, बारावीमध्ये सुमारे १६-१६ पेपर्स द्यावे लागतील. याचा अर्थ एका वर्षात कमीत कमी आठ विषयांचे पेपर द्यावे लागतील. इयत्ता नववीचा निकाल हा दहावीच्या अंतिम निकालाशी जोडलेला असेल. तसेच अकरावीमध्ये मिळालेले गुण बारावीच्या निकालाशी जोडून त्यावर आधारित गुणपत्रिका मिळेल.
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : पोर्तुगाल संघाचा विजय
  • खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पोर्तुगालने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत व्हिएतनामवर २-० असा विजय साकारला. या पराभवानंतर व्हिएतनामचा बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग अजून आव्हानात्मक झाला आहे.पोर्तुगालने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.
  • सामन्याच्या सातव्या मिनिटाला टेल्मा एनकार्नाकोने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर फ्रान्सिस्का नाझारेथने (२१व्या मि.) गोल झळकावत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलमध्ये टेल्माने साहाय्य केले.तर, नेदरलँड्स व अमेरिका यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
RSS करणार नव्या सुधारणा! प्रशिक्षणाचा वेळ कमी करणार, दंडुक्याऐवजी आता निवडणार यष्टीचा पर्याय?
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीपासून सुरु होणाऱ्या शतक महोत्सवी वर्षाच्या तयारीला लागला आहे. अशात काळाबरोबर जात असताना संघाने आपल्या प्रशिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ शिक्षा वर्गाची वेळ कमी करणे. दंडुका म्हणजेच संघ स्वयंसेवकाच्या हाती असलेली बांबूच्या काठीचं स्वरुप बदलणं या सगळ्यावर चर्चा सुरु आहे. बांबूची काठी किंवा दंडुका हा संघ गणवेशाचा भाग नाही तरीही दंड ही संघाची ओळख बनला आहे. १३ ते १५ जुलै दरम्यान उटी या ठिकाणी झालेल्या बैठकीत या सगळ्या नव्या सुधारणांवर चर्चा झाली आहे असंही समजतं आहे.

स्वयंसेवकांच्या हाती असलेल्या काठीचं स्वरुप बदलणार?

  • चर्चा अशीही आहे की दंडुका म्हणजे संघ स्वयंसेवकांच्या हाती असणारी काठी याचं स्वरुपही बदललं जाईल. सध्याच्या घडीला या काठीची उंची ५.३ फूट अशी आहे. ती बदलून तीन फूट केली जाणार आहे आणि त्याला आता यष्टी असं म्हटलं जाईल याबाबत संघाची चर्चा झाल्याचंही समजतं आहे.या बैठकीत तीन फुट उंचीची यष्टी दाखवण्यात आली. आता कदाचित संघ स्वयंसेवकांच्या हाती ही यष्टी दिसू शकते. मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही

संघाचं प्रशिक्षण शिबीर किती वेळाचं असतं?

  • सध्याच्या घडीला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी संघाचं प्रशिक्षण शिबीर हे २०-२० दिवसांचं असतं. त्यानंतर तिसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण नागपूरमध्ये होतं. हे प्रशिक्षण २५ दिवस चालतं. सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षीचं प्रशिक्षण शिबीर १५ दिवस तर द्वितीय आणि तृतीय वर्षाचं प्रशिक्षण शिबीर २० दिवसांचं करण्यावर बैठकीत चर्चा झाली आहे.
  • पहिल्या वर्षीच्या होणाऱ्या प्रशिक्षणाला संघ शिक्षा वर्ग असं म्हटलं जाईल. तर इतर दोन वर्षांच्या प्रशिक्षणाला कार्यकर्ता विकास शिबीर असं म्हटलं जाईल असंही सूत्रांनी दिलं जाईल. उटी मध्ये झालेल्या बैठकीत दंडुका म्हणजेच स्वयंसेवकांच्या हाती असलेल्या काठीची उंची कमी करण्यावर बरीच चर्चा झाली असंही कळतं आहे. दंडुका हा गणवेशाचा भाग नाही. मात्र दंडुका घेऊन गणवेशातच यायचं आहे असं सांगण्यात येतं. त्यामुळे दंड हा स्वयंसेवकांबरोबर दिसणारा अविभाज्य घटक झाला आहे. या बैठकीत तीन फुट उंचीची यष्टी दाखवण्यात आली. आता कदाचित संघ स्वयंसेवकांच्या हाती ही यष्टी दिसू शकते. मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

 

बुद्धिबळ  ऑलिम्पियाड स्पर्धा - भारताच्या कामगिरीकडे लक्ष! ; आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाडला प्रारंभ :
  • चेन्नईत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी बुद्धिबळातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीत खुल्या आणि महिला विभागांत भारताचे प्रत्येकी तीन संघ पदकाच्या ईर्षेने सज्ज झाले आहेत.

  • पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यंदा ऑलिम्पियाडमध्ये खेळणार नसून, प्रेरकाच्या भूमिकेत असेल. तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या अमेरिका, मॅग्नस कार्लसनच्या नेतृत्वाखालील नॉर्वे व अझरबैजानचे प्रमुख आव्हान भारतापुढे असेल.

  • भारताच्या ‘अ’ संघाला दुसरे मानांकन मिळाले असून, या संघात लयीत असलेला पी. हरिकृष्ण, उदयोन्मुख अर्जुन इरिगसी, माजी सुवर्णपदक विजेत्या संघाचा कर्णधार विदित गुजराथी, अनुभवी के. शशिकिरण आणि एसएल नारायणन यांचा समावेश आहे.

  • ११वे मानांकन मिळालेला भारताचा ‘ब’ संघ आर. बी. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आश्चर्याचा धक्का देऊ शकतो, असा अंदाज आहे. या संघात डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन, रौनक साधवानी आणि बी. अधिबन यांचा समावेश आहे. या संघात बलाढय़ संघांना नमवण्याची क्षमता आहे, असे प्रशिक्षक रमेश यांनी सांगितले. विश्वविजेत्या कार्लसनने भारतीय खेळाडूंशी चर्चा केली आणि या संघाकडून पदकाची अपेक्षा करता येईल, असे आवर्जून नमूद केले. भारताच्या ‘क’ संघाला १७वे मानांकन लाभले असून, अनुभवी आणि युवा खेळाडूंचा यात योग्य समतोल साधला आहे. सूर्यशेखर गांगुलीवर या संघाची मदार आहे.

  • महिलांमध्ये अनुभवी कोनेरू हम्पी, डी. हरिका, आर. वैशली आणि भक्ती कुलकर्णी यांच्या बळावर अग्रमानांकित भारतीय ‘अ’ संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. या संघाला अनुक्रमे दोन ते चापर्यंतची मानांकने मिळालेल्या युक्रेन, जॉर्जिया आणि कझाकस्तानकडून कडवी लढत मिळू शकते. भारताचे अन्य दोन महिला संघसुद्धा आश्चर्यकारक कामगिरी बजावू शकतात.

  • ऑलिम्पियाडमधील खुल्या गटात विक्रमी १८८ आणि महिला गटात १६२ संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारताला प्रत्येक गटात दोन संघ खेळवण्याची मुभा होती. याचप्रमाणे सहभागी संघांचा आकडा विषम झाल्यामुळे आणखी एकेक संघ खेळवायची संधी मिळाली.

शेतकऱ्यांना वीजदरात सवलतीसाठी ३५८ कोटी ; ४२ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालासही मंजुरी :
  • उच्चदाब उपसा सिंचन योजना आणि लघुदाब उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीदजरात सवलत देण्यासाठी ३५८ कोटी रुपये महावितरणला देण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि वीजहानी कमी करण्यासाठी प्रीपेड वीजमीटर बसवणे, नवीन उपकेंद्र-रोहित्रे बसवणे आदींच्या महावितरणच्या ३९ हजार कोटी रुपयांच्या तर बेस्टच्या ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली. 

  • राज्यातील कृषीपंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अति उच्चदाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून २०२१ पासून  वीजदरात १ रुपया १६ पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये २५ रुपये प्रति केव्हीए ही सवलत कायम ठेवण्यासाठी ३५१ कोटी ५७ लाख रुपये महावितरण कंपनीस अनुदान म्हणून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांना १ रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर आणि स्थिर आकारामध्ये १५ रुपये प्रति महिना सवलत जून २०२१ पासून नव्याने देण्यात येईल. यापोटी महावितरण कंपनीस ७ कोटी ४० लाख रुपये शासनामार्फत देण्यात येईल.राज्यातील विद्युत वितरण प्रणाली मोठय़ा प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

  • या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या ३९ हजार ६०२ कोटी व बेस्टच्या ३ हजार ४६१ कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली. या योजनेनुसार २०२४-२५ पर्यंत एकूण तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी १२ ते १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या यांची कामे करण्यात येतील.  राज्यातील ग्राहकांसाठी प्रीपेड-स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. याचा सुमारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांनाही मीटर बसविण्यात येईल. केवळ मीटर बसवण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

औरंगाबादचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याचा वाद उच्च न्यायालयात, १ ऑगस्टला होणार सुनावणी :

  • औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

  • दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर घडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. पण त्यानंतर १६ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यावरून एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी आंदोलनं देखील केली आहेत. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  • औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयात काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन जणांनी वैयक्तिक पद्धतीने याचिका दाखल केली आहे. २००१ मध्ये औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडला होता, असं संबंधितांनी याचिकेत म्हटलं आहे.

आरोग्य सेवेतील महिलांवर वेतनाबाबत जगभरातच अन्याय :
  • आरोग्य क्षेत्रातील महिलांवर वेतन श्रेणीच्या बाबतीत जगभरातच अन्याय होत असल्याचे वास्तव आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे समोर आले आहे. दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालानुसार इतर आर्थिक क्षेत्रांच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात महिला आणि पुरुष यांच्या वेतनातील तफावत अधिक असून आरोग्य क्षेत्रातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत २४ टक्के कमी वेतन मिळत असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. वय, शिक्षण, कामाचे तास, कौशल्य अशा अनेक बाबतीत पुरुषांएवढेच योगदान देणाऱ्या महिलांनाही वेतन मात्र पुरुषांच्या तुलनेत कमीच मिळत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

  • जागतिक स्तरावर आरोग्य सेवांमध्ये सुमारे ६७ टक्के महिला कार्यरत आहेत. या क्षेत्रातील वेतन श्रेणी या इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत कमी असून, सहसा ज्या क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, त्या क्षेत्रांतील वेतन श्रेणीही इतर क्षेत्रांच्या तुलनेत कमी असतात या निष्कर्षाशी सुसंगत चित्र जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

  • करोना काळात आरोग्य क्षेत्रातील महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने धोका पत्करून वैद्यकीय सेवेत योगदान दिल्यानंतरही महिला आणि पुरुषांसाठी समान वेतन श्रेणी नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. जगातील सर्व देशांमध्ये आरोग्य क्षेत्रातील महिला आणि पुरुष यांच्या वेतन श्रेणींमध्ये तफावत आहे. ती कमी किंवा अधिक असणे हा फरक आहे, मात्र महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेतन मिळत असल्याचे उदाहरण नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना स्पष्ट करते.

दशकभरात भारतात एक हजारपेक्षा अधिक वाघांचा मृत्यू ; मध्य प्रदेशात सर्वाधिक नोंद :
  • २०१२ पासून भारतात तब्बल एक हजार ५९ वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये ‘वाघांचे राज्य’ म्हणून ख्याती असलेल्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे.

  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) माहितीनुसार यंदा ७५ वाघांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी २०१२ ते २०२२ या कालावधीतील सर्वाधिक १२७ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२० मध्ये १०६, २०१९ मध्ये ९६,  २०१८ मध्ये १०१, २०१७ मध्ये ११७, २०१६ मध्ये १२१, २०१५ मध्ये ८२, २०१४ मध्ये ७८, २०१३ मध्ये ६८ आणि २०१२ मध्ये ८८ वाघांचा मृत्यू झाला.

  • सहा व्याघ्र प्रकल्प असलेल्या मध्य प्रदेशात सर्वाधिक २७० वाघांचा या कालावधीत मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रात १८३, कर्नाटक १५०, उत्तराखंड ९६, आसाम ७२, तमिळनाडू ६६, उत्तर प्रदेश ५६ आणि केरळ ५५ मृत्यूंची नोंद आहे.

  • राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात अनुक्रमे २५, १७, १३, ११ आणि ११ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे.

‘मी काय करतो माहितीये का?’, पाच वर्षाच्या मुलीने दिलेलं उत्तर ऐकून मोदींनाही आवरेना हसू, फोटो चर्चेत :
  • भाजपा खासदार अनिल फिरोजिया आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी नरेंद्र मोदी आणि चिमुरडीमध्ये झालेला संवाद ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अनिल फिरोजिया भाजपाचे मध्य प्रदेशातील उज्जैनमधील खासदार असून आपल्या कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीसाठी संसदेत पोहोचले होते. सोशल मीडियावर त्यांनी भेटीचे फोटो शेअर केल आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल फिरोजिया यांची मुलगी अहानाला ‘मी कोण आहे माहिती आहे का?’ असं विचारलं असता तिने उत्तर दिलं की “हो, मला माहिती आहे की तुम्ही मोदीजी आहात. तुम्ही रोज टीव्हीवर दिसता”.

  • यानंतर नरेंद्र मोदींनी तिला ‘मी काय काम करतो माहिती आहे का?’ असं विचारलं. यावर अहानाने “तुम्ही लोकसभेत नोकरी करता” असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकताच पंतप्रधान मोदींसहित उपस्थितांना हसू आवरत नव्हतं. नरेंद्र मोदींनी मुलीला जाण्याआधी चॉकलेटही दिलं. याआधीही नरेंद्र मोदी अनेकदा लहान मुलांसोबत संभाषण करताना दिसले आहेत.

  • भाजपा खासदार अनिल फिरोजिया काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींनी दिलेलं आव्हान स्वीकारत वजन कमी केल्याने चर्चेत होते. सोशल मीडियावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचे फोटो शेअऱ केले आहेत.

28 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.