चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ जुलै २०२१

Date : 28 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात प्रवास करणाऱ्या नागरिकांवर ‘हा’ देश घालणार तीन वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा :
  • करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून महत्वाची पावलं उचलली जात असून काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षांसाठी प्रवासाची बंदी घालण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

  • परराष्ट मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचं उल्लंघन केलं आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच ही परवानगी देण्यात आली होती.

  • “जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सौदी अरेबियाने ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

  • सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त. इथोपिया, भारत. इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. “नागरिकांना ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेलं नाही किंवा क्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे”.

‘लोटिस्मा’ संग्रहालयातील साहित्यठेव्याला जलसमाधी :
  • चिपळूणच्या साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र, या आघाताने खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी या प्रकल्पाचे प्रवर्तक आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

  • ‘लोटिस्मा’ या लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या या वाचनालयातर्फे २०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाच्या संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता. त्यानंतर विविध पातळ्यांवर सतत पाठपुरावा करत गेल्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.

  • या संदर्भात ‘लोकसत्ता’ला माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी चिपळुणात जुलै २००५ रोजी महापूर आला होता. त्या वेळची धोक्याची पातळी आधारभूत मानून सुरक्षित अंतरावर वाचनालयाच्या आवारात संग्रहालय साकारले. पण यंदाच्या महापुराने तो अंदाज चुकीचा ठरवल्याने येथील जुने दस्तावेज आणि वस्तूंचा मोठा ठेवा पुराच्या पाण्यात बुडाला किंवा वाहून गेला.

  • कोकणातील लोकांचे संदर्भ असलेले झाशीच्या राणीच्या काळापूर्वीही सुमारे शंभर वर्षे जुने (१७५०-६०) जमाखर्चाचे कागद, १८५५ साली छापलेले पुस्तक, एकेकाळी चिपळूण हे बंदर होते, असा पुरावा देणारे पत्ते असलेली पोस्ट कार्ड, व्हिक्टोरिया राणीच्या काळापासूनचे (१९ वे शतक) निरनिराळ्या संस्थानांचे बॉन्ड पेपर, दुर्मीळ हस्तलिखिते, सुमारे ५० फूट लांबीची जन्मपत्रिका इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे.

अमेरिकेतील लस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा घालावा लागणार मास्क; आरोग्य प्रशासनाचे निर्देश :
  • अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. करोना विषाणूंमध्ये सतत बदल होत असल्याने आणि डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

  • रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (Centers for Disease Control and Prevention) संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

  • “संसर्गाचं प्रमाण जास्त तसंच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत आहे,” असं त्यांनी सांगितलं. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील दक्षिण भागात संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील लसीकरण झालेल्या भागांमध्ये संक्रमणाचा मध्यम स्तरावर आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचे यश :
  • नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धे’त भारताला १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदके  मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताला ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थिनीने रौप्य पदक मिळवले आहे.

  • पुण्याचा १८ वर्षीय अनिष कुलकर्णी गेली ५ वर्षे गणित ऑलिम्पियाडची तयारी करत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम ६ विजेते आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातात. यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी अनीशला मिळाली. त्याने रौप्य पदक पटकावले.

  • पुण्याचीच १६ वर्षीय अनन्या रानडे हिने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्य पदक पटकावले तर ‘युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड’ स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई के ली आहे. २०२१च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा बंगळूरुचा प्रांजल श्रीवास्तव याने २०१८ मध्ये रौप्य पदक व २०१९ मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. या स्पर्धेत आतापर्यंत २ सुवर्ण पदके मिळवणारा प्रांजल हा पहिला भारतीय विद्यार्थी ठरला आहे.

  • नवी दिल्लीचा रोहन गोयल, गाझियाबादचा सुचिर कौस्तव यांनी कांस्य पदके  मिळवली आहेत. डॉ. एस. मुरलीधरन, साहील म्हसकर, प्रा. एस. आर. कृष्णन, अनंत मुदगल यांनी भारतीय समूहाला मार्गदर्शन केले. अन्शुल सिवच, धिरेन भारद्वाज, नमन सिंग यांनी जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये रौप्य पदक मिळवले आहे तर स्वराज नंदी याने कांस्य पदक पटकावले आहे.

उत्तराखंडमध्ये १ ऑगस्टपासून शाळेची घंटा वाजणार; ६ वी ते १२ वीपर्यंत वर्ग सुरु करण्याची परवानगी :
  • करोनामुळे शिक्षणक्षेत्राचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. देशात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. तसेच अंतर्गत मूल्यांकनावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी शाळा कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. आता देशातील अनेक राज्यात शाळा सुरु करण्यासाठी पावलं उचलली जात आहे. आता उत्तराखंड सरकारने निर्णय घेत १ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

  • सहावी ते बारावीच्या वर्ग सुरु करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. १ जुलैपासून राज्यातील सर्व शाळा ऑनलाइन सुरु करण्याचे आदेश सरकारने दिले होते. शाळांना ३० जूनपर्यंतची उन्हाळी सुट्टी होती. दुसरीकडे उत्तराखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशन २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.

  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलं आहे. यूपीएससी, एनडीए, सीडीएसची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर :
  • कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केल्याची माहिती दिली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०१ कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात जून-ऑक्टोबर २०२० मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला होता. पुराचे पाणी शेतात आल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून जून-ऑक्टोबर २०२० मध्ये आलेल्या पूरासाठी महाराष्ट्राला ७०१ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.

  • गेल्या वर्षी मराठवाडा विशेषत: उस्मानाबाद आणि परभणी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व बागायती पिकांच्या प्रश्नावर सरकारने लोकसभेत उत्तर दिले आहे. जून-ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफकडे आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने निवेदन सादर केले होते.

२८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.