चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ जुलै २०२०

Date : 28 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरकारतर्फे पीएम केअर्स निधीचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन :
  • ‘पीएम केअर्स फंड’ हा कोविड-१९ महासाथीशी लढा देण्याकरता ऐच्छिक योगदान स्वीकारण्यासाठीचा सार्वजनिक न्यास असल्याचे सांगून केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्याचे जोरदार समर्थन केले. याच वेळी, राष्ट्रीय आपदा प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपदा प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) यांच्यासाठी करण्यात अर्थसंकल्पात आलेल्या तरतुदीला हात लावण्यात येत नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

  • कोविड-१९ महासाथीसाठी पीएम केअर्स निधीत जमा करण्यात आलेली संपूर्ण रक्कम राष्ट्रीय आपदा प्रतिसाद निधीत (एनडीआरएफ) वळवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ (सीपीआयएल) या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. यात केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वरील वक्तव्य केले. न्या. अशोक भूषण, एस.के. कौल व एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने या याचिकेवर आदेश राखून ठेवला आहे.

  • सध्या कोविड-१९ महासाथीमुळे निर्माण झालेल्या कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्याच्या आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने २८ मार्चला ‘प्राइम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टंस अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स’ (पीएम केअर्स) निधीचा स्थापना केली होती.

आनंदची पराभवाची मालिका सुरूच :
  • माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरूच आहे. आनंदला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

  • रशियाच्या इयान नेपोमनियाची याने आनंदवर ३-२ अशा फरकाने मात केली. आनंदने सहाव्या फेरीच्या लढतीत पहिल्या डावात बरोबरी साधून चांगली सुरुवात केली.

  • आनंदने ५३ चालींपर्यंत झुंज देत नेपोमनियाचीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण नेपोमनियाचीने दुसरा डाव ३४ चालीत जिंकत आघाडी घेतली. तिसऱ्या डावात बरोबरी झाली. पण चौथा डाव ४२ चालींत जिंकत पाच वेळच्या जगज्जेत्या आनंदने तोडीस तोड उत्तर दिले. टायब्रेकरमध्ये नेपोमनियाचीने ४१ चालींत विजय मिळवला.

यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी पुढच्या सोमवारी :
  • यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देण्यात आलं होतं. यासंदर्भातल्या याचिकांवरची सुनावणी पुढच्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यूजीसीला या संदर्भात उत्तर देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही सुनावणी पुढील सोमवारपर्यंत टळली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. युवासेनेनेही या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

  • काय आहे प्रकरण : देशात करोना संकट उद्भवलेलं असतानाच विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय ऐरणीवर आला आहे. अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानं ६ जुलै रोजी नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.

  • सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचं या नव्या सूचनांमध्ये म्हटलं आहे. या नव्या सूचना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका केंद्र शासित प्रदेशासह १३ राज्यातील विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. यात महाराष्ट्रातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली युवा सेनेनंही युजीसीच्या आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र ती आता पुढील सोमवारपर्यंत टळली आहे.

क्रिकेटपटूंच्या जोडीदाराच्या दुबई सफरीस ‘आयपीएल’ संघ अनुत्सुक :
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरत प्रमाणित कार्यप्रणाली सादर करणार असली तरी संघांसाठी काही प्रश्न डोकेदुखी ठरत आहेत. क्रिकेटपटूंच्या जोडीदाराच्या दुबई सफरीस ‘आयपीएल’ संघ अनुत्सुक असल्याची माहिती मिळत आहे.

  • काही संघांनी अमिरातीमधील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी स्वत:चे पथक पाठवले आहे. खेळाडूंसोबत त्यांच्या जोडीदारांना अथवा कुटुंबियांना ठेवण्यास काही संघ नाखूश आहेत. जैव-सुरक्षा वातावरणात ठरावीक वेळेत खेळाडूंना जोडीदारांना अथवा कुटुंंबियांना भेटण्यास परवानगी देण्यात यावी, असे काहींचे म्हणणे आहे. तर जवळच्या व्यक्तींना दोन महिने कुठेही जाऊ न देता हॉटेलमध्येच ठेवण्यात यावे, असे काहींनी सुचवले आहे.

  • मात्र बहुतांशी क्रिकेटपटूंची मुले ही ३ ते ५ वयोगटातील असल्यामुळे त्यांना दोन महिने हॉटेलमध्ये कसे बंदिस्त ठेवता येईल, याकडेही काहींनी लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर खेळाडूंची ने-आण करण्यासाठीचे स्थानिक बसचालक तसेच सुरक्षा अधिकारी यांबाबतही काही फ्रँचायझींना बीसीसीआयकडून स्पष्टीकरण हवे आहे.

२८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.