चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ जानेवारी 2023

Date : 28 January, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ४ तरुणांचा लंडनमध्ये सत्कार

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावशाली काम करणाऱ्या देशातील प्रतिभावान ७५ युवकांचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला. ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियनच्या माध्यमातून हा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रविण निकम यांच्यासह महाराष्ट्रातील चार तरुणांचा समावेश आहे. काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त लंडन येथे हा सन्मान करण्यात आला. प्रवीण निकम, चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव अशी या चार तरुणांची नावे आहेत.

पुरस्कारासाठी ७५ युवकांची निवड

  • शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी संधीचे मार्गदर्शन, ५३ देशांच्या समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम आदींची दखल ब्रिटिश काऊंसील व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन यांनी घेतली. भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस.वाय. कुरेशी, ब्रिटिश काऊंसील शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या भारतातील ७५ युवकांची निवड पुरस्कारासाठी केली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला यांचाही समावेश

  • या सर्व ७५ युवकांना लंडन येथे सन्मानित करण्यात आले. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ७५ वर्षांत ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचा वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

टीकेमुळे विचलित न होता लक्ष्य गाठा! ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला

  • समृद्ध लोकशाहीसाठी टीका ही पूर्वअट असते. पण, टीका कोण करतो, यावर ती स्वीकारायची की नाही, हे ठरवावे लागते. आपल्या व्यक्तीने टीका केली तर तिला पौष्टिक खाद्य माना. सातत्याने टीका करणाऱ्यांचा उद्देश भलताच असू शकतो. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार करण्याचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.
  • ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी मोदींनी दोन तास संवाद साधला. लोकांच्या नकारात्मक टिप्पणींना कसे प्रत्युत्तर द्यायचे, या प्रश्नावर, मोदी म्हणाले की, संसदेमध्ये सत्ताधारी खासदार अभ्यासपूर्वक बोलत असतो. पण, विरोधक खोचक मुद्दे काढतात. मग, खासदार त्या मुद्दय़ांमध्ये अडकून पडतो आणि भरकटत जातो. टीका मौल्यवान असते, ती उपयुक्तही ठरते. पण, विरोधकांच्या आरोपांची पर्वा करू नका. विरोधकांमुळे विचलित न होता लक्ष्य गाठा, असा सल्ला मोदींनी दिला.
  • अपेक्षांचे ओझे बाळगू नका - आई-वडील, मित्र आणि लोकांच्या अपेक्षांचे ओझे बाळगू नका, त्यांच्या दबावामुळे दबून जाऊ नका, एकाग्र होऊन अभ्यास करा. मग, परीक्षाच नव्हे तर, आयुष्यातील कुठल्याही संकटावर मात करू शकाल. तुमच्याबद्दल बाळगलेली अपेक्षा ही ताकद समजा, असे मोदी म्हणाले. हाच मुद्दा मोदींनी उदाहरणासह स्पष्ट केला. ते म्हणाले, आम्ही राजकारणी सातत्याने निवडणूक लढवत असतो. २०० जागा जिंकल्या तर, ३०० जागा जिंकण्याचा दबाव असतो. आम्ही पराभूत होऊच नये, अशी मतदारांची अपेक्षा असते. त्यांच्या अपेक्षांना आम्हाला सामोरे जावे लागते.. क्रिकेटच्या मैदानात प्रचंड गर्दीकडून चौकार-षटकाराची मागणी होत असताना कसलेला फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसार खेळत नाही, लक्ष केंद्रित करून खेळतो!
  • काबाडकष्ट की, चातुर्याने मेहनत - बाटलीत दगड टाकून पाणी पिणाऱ्या कावळय़ाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. पाण्यासाठी कावळय़ाने कष्ट केलेच पण, चातुर्यही दाखवले. चातुर्याने मेहनत घेतली तर यश मिळते. केवळ काबाडकष्ट करून काहीही साध्य होत नाही, असे सांगत मोदींनी ‘स्मार्टली हार्डवर्क’चे महत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले.
  • सामान्यांमध्येही असामान्यत्व - बहुतांश लोक सामान्य असतात, पण, अशा लोकांनी असामान्य गोष्टी केल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे सांगत मोदी म्हणाले, जगभरातील अर्थतज्ज्ञांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल नकारात्मक चित्र उभे केले होते. भारत हा सामान्य देश आहे. मोदींना काही कळत नाही, असे आरोप होत होते. पण, आता हेच तज्ज्ञ भारताच्या अर्थव्यवस्थेला आशेचा किरण मानत आहेत.

अदाणींच्या शेअर्सची घसरण सुरूच, शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचं नुकसान

  • हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या संशोधन अहवालामुळे अदाणी उद्योग समुहाची बाजारात घसरण सुरूच आहे. या अहवालात गौतम अदाणी आणि त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचे परिणाम आता बाजारात दिसू लागले आहेत. कंपनीने शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. आज दुपारपर्यंत अदाणी समुहाच्या बाजार भांडवलात १८.५ टक्क्यांची घसरण झाली. मंगळवारपासून आतापर्यंत अदाणी समुहाने ४.२ लाख कोटी रुपयांची घट नोंदवली आहे.
  • अदाणी समुहामधील ९ पैकी ४ कंपन्यांचे स्टॉक शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत लोअर सर्किटपर्यंत घसरले. दुपारी 3 वाजता अदाणी ट्रान्समिशन, अदाणी आणि अदाणी टोटल गॅसचे शेअर्स प्रत्येकी २० टक्क्यांनी घसरले, तर अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स अनुक्रमे १९.९ टक्के आणि १९.३ टक्क्यांनी घसरले. यासह अदाणी पोर्ट्स (-१७.७ टक्के), अंबुजा सिमेंट्स (-१७.३ टक्के) आणि एसीसी (-१४.३ टक्के) देखील दिवसभरात वेगाने घसरले. अदाणी पॉवर आणि अदाणी विल्मारचे शेअर्सही लोअर सर्किटमध्ये पोहोचले होते. हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले होते.
  • अदाणी समूह हिंडेनबर्गविरोधात कायदेशी कारवाईसाठी प्रयत्नशील - “आम्ही हिंडेनबर्ग संशोधनाविरूद्ध दंडात्मक कारवाईसाठी यूएस आणि भारतीय कायद्यांनुसार संबंधित तरतुदींची माहिती घेत आहोत, अशी माहिती जतिन जलुंधवाला यांनी दिले. जलुंधवाला अदाणी समूह प्रमुख (लीगल) आहेत.
  • हिंडेनबर्गकडून प्रत्युत्तर - अदाणी समुहाकडून उत्तर मिळाल्यानंतर यावर हिंडेनबर्गकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने याबाबत म्हटलं आहे की, ते त्यांच्या अहवालावर ठाम आहेत. हिंडेनबर्गने म्हटलंय की, या अहवालाविरोधात जर कुठल्याही प्रकारची कायदेशी कारवाई झाली तर ती चुकीची ठरेल. हिंडेनबर्गने आक्रमक पवित्रा घेत म्हटलंय की, अदाणी समूह या अहवालाबाबत जर खरंच गंभीर असेल तर त्यांनी अमेरिकेतही खटला दाखल केला पाहिजे, कारण आम्ही इथेच काम करतो. आमच्याकडे त्यांच्याविरोधात कागदपत्रांची मोठी यादी आहे.

आजच अपडेट करा नाहीतर…; सरकारने दिला अलर्ट

  • मायक्रोसॉफ्ट ही एक मोठी टेक कंपनी आहे. सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्या नोकरकपात करत आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचा देखील समावेश आहे. या मायक्रोसॉफ्ट कंपनीला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने मायक्रोसॉफ्ट ब्राऊझरबाबत एक अलर्ट जरी केला आहे. CERT-IN ही नागरिकांना कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल किंवा देशातील संभाव्य सायबर हल्ला किंवा सायबर बग बद्दल अलर्ट देत असते. CERT-IN ने Microsoft Edge वेब ब्राउझरमधील एक प्रमुख बग काढून टाकला आहे. मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरबाबत CERT-IN द्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • मायकोरसॉफ्टला देण्यात आलेला इशारा सीईआरटी-इनच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट इज मध्ये एक बग असल्याचे या आर्टमध्ये सांगण्यात आले आहे. ज्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात व सर्व सिस्टीमची सिक्युरिटी तोडून सिस्टीम हॅक करू शकतात. सीईआरटी-इनने असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरचे व्हर्जन 109.0.1518.61 या बगने प्रभावित झाले आहे.
  • बग पासून सिस्टीम कशी वाचवावी ?
    CERT-IN ने आपल्या अहवालात असे म्हंटले आहे की, अशा त्रुटी टाळण्यासाठी तुम्ही तुमचे मायक्रोसॉफ्ट इज त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे. कंपनीने या ब्राऊझरची नवीन सिरीज लाँच केली आहे. ब्राउझर अपडेट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ब्राउझर ओपन करा आणि उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन एजवर क्लिक करा. हे केले की तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसले. अपडेट केल्यावर ब्राउझर पुन्हा सुरु करण्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

शाळा प्रवेशासाठी ‘आधार’सक्ती; बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

  • बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोटय़वधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचे प्रकार उजेडात आल्यानंतर आता यापुढे शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही आधारसक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला.
  • दरम्यान, कोणत्याही शासकीय योजना-उपक्रमासाठी आधारसक्ती करता येत नसतानाही शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी केलेली आधारसक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बनावट विद्यार्थी पटसंख्या दाखवून सरकारी अनुदान पदरात पाडून घेणाऱ्या शाळांवर अकुंश आणण्यासाठी तसेच शाळा प्रवेशामध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांवरच आता प्रवेश देखरेख समितीची जबादारी सोपविण्यात आली आहे. तसेच ही समिती यापुढे शाळेतील प्रवेश प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवील.
  • बोगस पटसंख्या शोधण्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी,  केंद्र प्रमुख यांनी वर्षांतून दोन वेळा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची पटपडताळणी करावी. या पडताळणीत काही विसंगती आढळल्यास त्यांनी एक महिन्यात सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी करताना सबंधित शैक्षणिक संस्थेची आवश्यक नोंदवही आणि कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ जानेवारी २०२२
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली; ८६ विद्यार्थ्यांच्या याचिकेवरील न्यायालयाच्या आदेशामुळे आयोगाचा निर्णय :

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याने २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

या संदर्भात अंतिम न्यायनिर्णय येईपर्यंत परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पत्रक शेअर केलं आहे. या पत्रकात आयोगाने म्हटलं आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालिकेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या ८६ उमेदवारांना दिनांक २९, ३० जानेवारी २०२२ रोजी आयोजित परीक्षेसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देऊन नियोजित दिनांकास परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने आयोगाकडून या ८६ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तातडीने करण्यात आली होती.

“कोणत्याही परीक्षेकरता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेत आयोगाच्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपुस्तिकांची छपाई करण्यात येते. यामध्ये ऐनवेळी कोणत्याही कारणामुळे प्रवेश द्यायच्या उमेदवारांच्या संख्येत अल्प प्रमाणात होणारी संभाव्य वाढ विचारात घेतली जाते. या परीक्षेच्या अनुषंगाने राज्यातल्या विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे.

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने भारावून गेले सत्या नाडेला; म्हणाले, हा मोठा सन्मान, भविष्यातही भारतीयांना :

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़. त्यात अनेक उद्योजकांचाही समावेश असल्याचं दिसत आहे. मात्र या यादीमध्ये दोन नावांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही नाव म्हणजे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई. या दोघांनाही पद्मभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील या दोन्ही दिग्गजांची नावं यंदाच्या १७ पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहे. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त करताना सर्व भारतीयांचे आभार मानलेत.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणं आणि एवढ्या विशेष लोकांच्या यादीत आपला समावेश असणं हा फार मोठा सन्मान आहे. मी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय नागरिकांचा आभारी आहे. तंत्रज्ञानाच्या वापर करुन भविष्यातही भारतीयांना अधिक यश मिळावं यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे,” असं सत्या नाडेला यांनी म्हटलंय.

‘टाटा एअरलाइन्स’ ते एअर इंडियाते टाटा समूह - ६९ वर्षांचा प्रवास :

६९ वर्षांनंतर, एअर इंडिया ही कंपनी गुरुवारी त्याच्या संस्थापक पित्याकडे, टाटा समूहाकडे परत आली. मिठापासून सॉफ्टवेअपर्यंतच्या व्यवसायात असलेल्या या समूहाने या विमान कंपनीचा ताबा घेतल्यामुळे, करदात्यांच्या पैशांवर इतकी वर्षे तरंगत ठेवण्यात आलेली ही तोटय़ातील कंपनी विकण्याची अनेक वर्षे सुरू असलेले व अपयशी ठरलेले प्रयत्न संपुष्टात आले आहेत.

 टाटा समूहाचे संस्थापक जेआरडी टाटा यांनी देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी म्हणून सर्वप्रथम १९३२ साली या कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळच्या अविभाजित, ब्रिटिशशासित भारतातील कराची आणि मुंबई या शहरांदरम्यान ही कंपनी टपालाची वाहतूक करत होती. या कंपनीचे नंतर राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

दोन दशकांहून अधिक काळानंतर आणि तीन प्रयत्नांनंतर अखेर सरकारला ही तोटय़ात असलेली कंपनी विकण्यात यश आले आहे.

 जहांगीर रतनजी दादाभाई (जेआरडी) टाटा यांनी १९३२ साली ही कंपनी स्थापन करून तिचे नाव टाटा एअरलाइन्स असे ठेवले. १९४६ साली टाटा सन्सच्या हवाई वाहतूक विभागाचेचे नामकरण ‘एअर इंडिया’ असे करण्यात आले व १९४८ साली युरोपला जाणाऱ्या विमानांसह ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ सुरू करण्यात आली.

राजधानी अंशतः निर्बंधमुक्त; चित्रपटगृह, रेस्तराँ उघडणार, दिल्ली सरकारचा निर्णय :

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने विकेंडला असलेली संचारबंदी हटवली असून सम-विषम तारखेला दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय मात्र कायम आहे. यासोबतच आणखी काही दिवस काही निर्बंध लागू राहतील.

दिल्ली सरकारने आज याबद्दलची घोषणा केली. त्यानुसार आता रेस्तराँ, चित्रपटगृह आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभासाठी आता २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था अजूनही बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) कायम राहणार आहे.

राजधानी दिल्लीतल्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

माजी ऑलिम्पिक हॉकी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन :

१९६४च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे संघनायक चरणजीत सिंह यांचे गुरुवारी उना (हिमाचल प्रदेश) येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजारपण आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

१९६०च्या ऑलिम्पिकमध्ये चरणजीत यांनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु दुखापतीमुळे त्यांना अंतिम सामन्याला मुकावे लागले आणि पाकिस्तानकडून भारताने ०-१ असा निसटता पराभव पत्करला. मग १९६४मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला १-० असे नमवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते.

१९६२च्या आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्येही त्यांचा समावेश होता. हॉकीमधून निवृत्तीनंतर ते हिमाचल प्रदेश विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात संचालक म्हणून कार्यरत होते.

रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची ‘बीसीसीआय’ची योजना :

देशातील करोनाची साथ वेगाने वाढल्यामुळे लांबणीवर पडलेली प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची योजना आखली जात आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.

देशातील ३८ प्रथम श्रेणी संघांचा समावेश असलेली रणजी स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

 

‘बीसीसीआय’ची २७ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला (आयपीएल) प्रारंभ करण्याची योजना आहे. त्यामुळे रणजी स्पर्धा एकाच टप्प्यात खेळवणे कठीण आहे. त्यामुळे अनेक राज्य संघटनांच्या विनंतीवरून स्पर्धेच्या आराखड्यासाठी ‘बीसीसीआय’ने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते.

‘‘रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध पर्यायांचा आम्ही आढावा घेत आहोत. पुढील महिन्यात पहिला टप्पा आणि ‘आयपीएल’नंतर दुसरा टप्पा खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे धुमाळ यांनी सांगितले. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत पहिला टप्पा आणि जून-जुलैमध्ये दुसरा टप्पा घेण्याबाबत ‘बीसीसीआय’ आग्रही आहे.

२८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.