चालू घडामोडी आणि दिनविशेष - 28 फेब्रुवारी 2024

Date : 28 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय
 • एलेना नॉर्मन यांनी हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. एलेना नॉर्मन गेल्या १३ वर्षांपासून हॉकी इंडियाच्या सीईओ होत्या. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलेना नॉर्मन यांच्या कार्यकाळात भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी नवीन उंची गाठली. या काळात भारतीय हॉक संघाने सर्वोत्तम जागतिक क्रमवारी गाठली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपले कौशल्य दाखवले. भारतीय पुरुष संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय महिला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.

एलेना नॉर्मनचा कार्यकाळ कसा होता?

 • भारतीय हॉकी फेडरेशनने, एलेना नॉर्मनच्या नेतृत्वाखाली, २०१८ आणि २०२३ मध्ये पुरुष हॉकी विश्वचषकाचे सलग दोन आवृत्त्या आयोजित केल्या. याशिवाय २०१६ आणि २०२१ मध्ये दोन ज्युनियर पुरुष विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हॉकी इंडिया लीगच्या पाच आवृत्त्यांचे यशस्वी आयोजन केले.
 • एलेना नॉर्मनच्या कार्यकाळात, हॉकी इंडियाने एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५ आणि २०१७ मध्ये एफआयएच वर्ल्ड लीग फायनल, २०१९ आणि २०२४ मध्ये एफआयएच ऑलिम्पिक पात्रता तसेच एफआयएच हॉकी प्रो लीग देशांतर्गत खेळांसह अनेक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन केले.

काय म्हणाले हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की?

 • त्याचवेळी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी एलेना नॉर्मन यांच्या राजीनाम्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की मी एलेनाचा वेळ आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करू इच्छितो. केवळ हॉकी इंडियाचा अध्यक्ष या नात्यानेच नाही, तर एक माजी खेळाडू आणि उत्कट हॉकी प्रेमी या नात्याने, गेल्या १२-१३ वर्षांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मी औपचारिकपणे स्वीकार करू इच्छितो आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी
 • नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. शिपाई पदाच्या परीक्षेची उद्घोषणा नगर रचना विभागाने यापूर्वीच त्यांच्या संकेतस्थळावर केली होती. अर्ज सादर करतेवेळी सहायक पुरविण्याची मागणी केलेल्या दिव्यांग उमेदवारांना विभागातर्फे परीक्षा केंद्रावर सहायक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. ही परीक्षा झाली असून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
 • नगर रचना मुल्यनिर्धारण विभागाअंतर्गत पुणे, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती विभागात शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरती करण्यासाठी टाटा कंन्स्लटंन्सी सर्व्हिस या कंपनीने ऑनलाईन परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी घेतली. या परिक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांनी २६ फेब्रुवारीनंतर कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 • गुणवत्ता यादी, पात्र उमेदवारांची यादी व याबाबतीत सर्व सूचना विभागीय कार्यालयाच्या व नगर रचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याचे नगर रचना विभागाचे प्र. सहसंचालक यांनी कळविले आहे. यामुळे उमेदवारांनी वेळेत कागदपत्रांची पडताळणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
‘गगनयाना’तून अवकाशातील भरारीपूर्वी पृथ्वीवर कसून तयारी
 • भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेद्वारे अवकाशात जाणाऱ्या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्ण आणि विंग कमांडक शुभांशु शुक्ला अशी या चौघांची नावे आहेत. गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अवकाश उड्डाण मोहिमेंतर्गत या चौघांचे कठोर प्रशिक्षण सध्या सुरू आहे.
 • थुंबा येथे विक्रम साराभाई अवकाश केंद्रात पंतप्रधान मोदींनी या चौघांना पहिल्यांदा देशासमोर आणले आणि त्यांना मानाचे अंतराळवीर बॅज लावले. या चौघांचा उल्लेख पंतप्रधानांनी ‘चार शक्ती’ असा केला. ते म्हणाले की हे चौघे जण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा अंतराळात नेणाऱ्या चार शक्ती आहेत. ४० वर्षांनंतर कोणी भारतीय अंतराळात जाणार आहे, पण यावेळी वेळही आपली आहे, उलटगणतीही आपली आहे आणि अवकाशयानही आपले आहे.
 • या कार्यक्रमावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनरई विजयन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि इस्राोचे अध्यक्ष एस. सोमनाथ उपस्थित होते.
 • मोदी पुढे म्हणाले की, गगनयानात वापरलेली बहुतांश उपकरणे भारतात तयार झाली आहेत, हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. योगायोगाने, भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी तयारी करत आहे आणि तेव्हाच भारताचे गगनयानही आपल्या अंतराळ क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. या अमृतकाळात भारतीय अंतराळवीर भारतीय रॉकेटमधून चंद्रभूमीवर पाय उतरवेल. भारत अवकाशक्षेत्रात नवे जागतिक व्यावसायिक हब होण्याच्या दृष्टीने प्रगती करत आहे. २०३५पर्यंत देशाकडे स्वत:चे अवकाश स्थानक असेल.
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
 • आगामी काही महिन्यांत आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आंध्र प्रदेशच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेत आलो तर पात्र गरीब कुटुंबाना दर महिन्याला ५ हजार रुपये मदत म्हणून दिले जातील, असं खरगे म्हणाले. ते सोमवारी अनंतपूर येथे एका सभेत बोलत होते. खरगे म्हणाले, ही केवळ घोषणा किंवा आश्वासन नाही तर गॅरंटी आहे.
 • यावेळी बोलताना खरगे यांनी भाजपावर टीका केली आणि मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच खरगेंनी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. या योजनेला ‘इंदिराम्मा युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर हे ५ हजार रुपये वर्ग केले जातील.
 • खरगे यांनी अनंतपूरमधील जनसभेला संबोधित करताना मतदारांना आश्वासन दिलं की, आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही कडापामधील दुगाराजपट्टनम बंदराचा विकास करू तसेच एक पोलाद कारखाना सुरू करू. राज्याचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आम्ही रायलसीमा आणि उत्तर आंध्र प्रदेश भागासाठी विशेष अनुदान देऊ.
 • दरम्यान, खरगे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून काँग्रेसच्या आश्वासनांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की, आमची गॅरंटी (हमी) ही मोदींच्या गॅरंटीसारखी नाही. काँग्रेस पक्ष जी काही आश्वासनं देतो ती आश्वासनं पूर्ण केली जातातच.
भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी पोहचणार? इस्रोचे अध्यक्ष स्पष्टच म्हणाले “त्यासाठी सातत्याने…”
 • चंद्रयान ३ च्या यशानंतर आता गगनयान मोहीमेची चर्चा सुरु झाली आहे. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोचे नाणे जागतिक पटलावर खणखणीत वाजले आहे. गेल्या काही वर्षात इस्रोने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचे दगड गाठले आहेत. विविध कृत्रिम उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित करण्याचा धडाकाही इस्रोने सुरुच ठेवला आहे. तेव्हा आता पुढे कोणती मोहीम, कधी, केव्हा अशी चर्चा सुरु आहे.
 • सध्या इस्रोने गगनयान मोहीमेकडे लक्ष केंद्रीय केलं आहे. या मोहीमेच्या माध्यमातून स्बबळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवला जाणार आहे. असं करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही हे अजुनतरी शक्य झालेलं नाही.मात्र गगनयान मोहीमेची चर्चा सुरु असतांनाच भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी उतरणार असा प्रश्न इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना विचारण्यात आला असता त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
 • “अवकाशात गुरुत्वाकर्षण शुन्य असते.त्याबाबत विविध तंत्रज्ञान विकसित केले जात आहे ज्याचा गगनयान मोहिमेत वापर केला जाणार आहे.मात्र त्यापलिकडे चंद्रापर्यंत समानव पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान विकसित करावं लागणार आहे. चंद्रावर समानव पोहचणे हा एक अपघात नसेल तर त्यासाठी सातत्याने चंद्रावर मोहिमा आखाव्या लागतील, त्यानंतर हे प्रत्यक्षात येईल. हे सर्व खूप खार्चिकही असेल. तेव्हा सातत्य ठेवत आपल्याला हवं ते साध्य करता येईल, २०२४० पर्यंत चंद्रावर समानव उतरता येईल. जगभरातील अनेक देश हे चंद्राच्या बाबतीत जास्त लक्ष देत आहेत. विशेषत अमेरिका, चीनसारखे देश का लक्ष देत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.”
 • सोमनाथ पुढे म्हणाले की २०२८ पर्यंत भारताचे अवकाश स्थानक अवकाशात प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा प्रयत्न असेल. पुर्ण क्षमेतेचे अवकाश स्थानक हे २०३५ पर्यंत पुर्ण झालेलं असेल ज्यामध्ये अंतराळवीर दिर्घकाळ वास्तव्य करेल. यासाठी अवकाशात दिर्घकाळ वावर करण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष दिले जाईल. एवढंच नाही तर शुक्र ग्रहावरील मोहिम, चंद्रयान ३ मोहीमेप्रमाणे मंगळ ग्रहावर लँडर मोहिमेचा विचार सुरु असल्याचं इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं.
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा – मोदी
 • भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असताना वस्त्रोद्योग क्षेत्र भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केला. सरकार या क्षेत्राला सर्वतोपरी पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. नवी दिल्ली येथे ‘भारत टेक्स-२०२४’चे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदी बोलत होते.
 • मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या उभारणीत वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान आणखी वाढवण्यासाठी सरकार मोठय़ा प्रमाणावर काम करत आहे. ‘भारत टेक्स’ हा भारतात आयोजित सर्वात मोठय़ा जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र विकसित भारताचे गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला या चार महत्त्वाच्या स्तंभांशी संबंधित आहे. २०१४ मध्ये भारताच्या वस्त्रोद्योगाचे मूल्यांकन सात लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते. तर आता ते १२ लाख कोटींच्याही पुढे गेले आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वस्त्र उत्पादकांमध्ये दहापैकी सात महिला आहेत. सरकारने सादर केलेला ‘कस्तुरी कॉटन’ जागतिक स्तरावर भारताचे ‘ब्रँड मूल्य’ निर्माण करण्यासाठी मोठे पाऊल ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भारत टेक्स-२०२४’ची वैशिष्टय़े

 • ‘भारत टेक्स-२०२४’ देशातील दोन सर्वात मोठी प्रदर्शन केंद्रे असलेल्या भारत मंडपम आणि यशोभूमी येथे होत आहे. विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार तसेच धोरणकर्ते आणि जागतिक कंपन्यांचे सीईओ, साडेतीन हजारांहून अधिक प्रदर्शनातील सहभागी, १०० हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक ग्राहक आणि ४० हजारांहून अधिक व्यावसायिक अभ्यागत त्यात सहभागी झाले आहेत.

 

मेग लॅनिंगने पाँटिंग-धोनीला मागे टाकत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली कर्णधार

 • मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२३ चा चॅम्पियन बनला. केपटाऊनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. बेथ मुनीच्या (५३ चेंडूत नाबाद ७४ धावा) शानदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १५६/६ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. त्याचबरोबर मेग लॅनिंगने एक मोठा विक्रम केला आहे.
 • लॅनिंगने ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडला आहे. लॅनिंग ही सर्वात मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकणारी कर्णधार बनली आहे. लॅनिंगने आतापर्यंत ५ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने चार टी-२० विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर पाँटिंगने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला चार आयसीसी ट्रॉफी मिळवून दिल्या. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन एकदिवसीय विश्वचषक आणि दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याचबरोबर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत
 • ऑस्ट्रेलियाची विजेतेपदाची चौथी हॅटट्रिक - चॅम्पियन बनताच ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये महिला टी-20 विश्वचषक जिंकला. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या. सलग तीन ट्रॉफी जिंकणारी ती पहिली कर्णधार आहे. महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची विजेतेपदाची ही दुसरी हॅटट्रिक आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१०, २०१२ आणि २०१४ महिला टी-२० विश्वचषक जिंकले होते.

नवी स्टाईल, दमदार बॅटरी अन् मोठ्या ड्रायविंग रेंजसह देशात आल्या ‘या’ दोन इलेक्ट्रिक टू-व्हीलर

 • बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅटफॉर्म Yulu ने, Bajaj Auto च्या भागीदारीत, आज २७ फेब्रुवारी रोजी भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर (e2Ws) Miracle GR आणि DeX GR in India लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक वाहने युलूचे एकूण आर्थिक मेट्रिक्स सुधारण्यासाठी उच्च कार्यक्षमतेची ऑफर देतात.
 • Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे समर्थित आणि केवळ Bajaj Auto द्वारे उत्पादित, Miracle GR आणि DeX GR हे जगासाठी भारतात बनवलेले आहेत आणि चेतक तंत्रज्ञान (बजाज ऑटोची १०० टक्के मालकीची उपकंपनी) द्वारे आणले जात आहेत.
 • बजाज, ज्याची आधीच युलूमध्ये भागीदारी आहे, ते चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात विकत घेते. बजाज ऑटोने युलूच्या दुसऱ्या पिढीतील ई-स्कूटर्स आणि अंशतः उत्पादित घटकांना स्थानिकीकरण आणि अपग्रेड करण्यात मदत केली.
 • कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नवीन थर्ड-जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहेत आणि OTA सपोर्ट देतील. युलू म्हणाले की, या नवीन ई-बाईक ट्रॅक करण्यायोग्य आहेत आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी सुलभ चालना देतात. ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत सुमारे १ लाख इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीचे कंपनीचे लक्ष्य आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

“देशाला इतिहासात अडकवू नका”, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

 • परकीय आक्रमकांनी बदललेली ऐतिहासिक स्थळांची मूळ नावे देण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ‘‘देशाच्या इतिहासातील गोष्टी वर्तमानावर आणि भावी पिढय़ांवर थोपवता येणार नाहीत. देश इतिहासात अडकून पडता कामा नये,’’ असे बजावत न्यायालयाने याचिकाकर्ते आणि भाजपनेते अश्विनी उपाध्याय यांची कानउघाडणी केली.
 • पुरातन स्थळांच्या नामांतरासाठी आयोग नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करणारी याचिका उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना ‘परकीय आक्रमकांची’ नावे देण्यात आली असून त्यामुळे या स्थळांचे हिंदूंसाठी असलेले धार्मिक महत्त्व नष्ट झाले, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली.
 • ‘‘भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि परकीय सत्तांनी राज्यही केले. हे सत्य नाकारता येणार नाही,’’ असे सांगताना ‘‘तुम्हाला हा मुद्दा जिवंत ठेवून देशातील वातावरण तापवायचे आहे.
 • देशाचा भूतकाळ उकरून तो सध्याच्या पिढीसमोर मांडायचा आहे. मात्र, आम्हाला असे मुद्दे जिवंत करून देशाच्या सौहार्दाला धक्का बसवायचा नाही,’’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. अशा गोष्टींपेक्षाही महत्त्वाच्या अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. त्यांचा विचार करून आपण मागे जाण्यापेक्षा पुढे जायला हवे, असेही न्यायालय म्हणाले.
 • सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा नूर पाहून उपाध्याय यांनी आपली याचिका मागे घेण्याची तयारीही दर्शवली. मात्र, खंडपीठाने त्यांना नकार देत ‘‘आम्हीच आता ही निकालात काढतो’’ असे सुनावले. ‘‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि न्यायपालिका हा धर्मनिरपेक्ष मंच आहे. आपल्या राज्यघटनेने ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द स्वीकारला असल्याने तिचे रक्षक म्हणून आम्ही कर्तव्याचे तंतोतंत पालन करू,’’ असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांला सुनावले. 

अग्निपथ योजना राष्ट्रहिताची; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

 • अग्निपथ योजना राष्ट्रहिताची आहे आणि त्यामुळे संरक्षण दले अधिक सुसज्ज होतील असे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही योजना उचलून धरली आहे. न्या. सतीश चंद्र मिश्रा आणि न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने सोमवारी झालेल्या सुनावणीत या योजनेविरोधातील याचिका फेटाळल्या.
 • या योजनेमध्ये हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही विशिष्ट जाहिरातीअंतर्गत संरक्षण दलांमध्ये भरती प्रक्रियेच्या विरोधातील याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या. तसेच अशा उमेदवारांना सैन्यात नोकरी मागण्याचा अधिकार नाही असे कठोर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
 • त्यापूर्वी, सरकारने दिलेल्या वयोमर्यादेमधील दोन वर्षांच्या सवलतीचा १० लाखांपेक्षा अधिक इच्छुक तरुणांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी आणि केंद्र सरकारचे वकील हरीष वैद्यनाथन यांनी दिली. अग्निपथ योजना हा संरक्षण भरतीमधील सर्वात मोठय़ा धोरणात्मक बदलांपैकी एक आहे आणि त्यामुळे संरक्षण दलांमध्ये भरतीच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे असा दावा त्यांनी केला.
 • गेल्या वर्षी १४ जूनला केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, वय वर्षे साडेसतरा ते एकवीस या दरम्यानच्या वयोगटातील तरुणांना भरतीसाठी अर्ज करता येतील. त्यांना चार वर्षांचा कालावधी मिळेल. या योजनेअंतर्गत भरती झालेल्यांपैकी २५ टक्के जणांना पुढे नियमित सेवेमध्ये दाखल करून घेतले जाईल. ही योजना जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात अनेक राज्यांमध्ये निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने अर्ज करण्याची वयोमर्यादा वाढवून २३ वर्षे केली.

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मिळाले कोटी रुपये, जाणून घ्या कोणता पुरस्कार कोणाला मिळाला?

 • ऑस्ट्रेलिया संघाने महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत रविवारी सहाव्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर सलग सात वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसलेला ऑस्ट्रेलियन संघ सहा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत, जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला विजेतेपद जिंकल्यानंतर किती बक्षीस रक्कम मिळाली ते पाहूया? अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला विजेतेपदाचा मुकुट देण्यात आला आणि कोणत्या खेळाडूला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले?
 • आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२३ ची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. या स्पर्धेत एकूण रु. २०.२८कोटी (US$24.5 दशलक्ष) पणाला लागले होते, जे संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे दिले जाणार होते. अशा परिस्थितीत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ८.२७ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला ४.१३ कोटी रुपये मिळाले.
 • उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला १.७३ कोटी रुपये दिले गेले. ग्रुप टप्पा पार करू न शकलेले संघही रिकाम्या हाताने घरी परतले नाहीत. २४.८३ लाख रुपयांव्यतिरिक्त, सर्व संघांना गट सामने जिंकण्यासाठी प्रति सामना १४.४८ लाख रुपये मिळाले आहेत. त्यानुसार, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह परतला आहे.

 

राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार - उदय सामंत :
 • मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात रत्नागिरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग, कोकण मराठी साहित्य परिषदेची (कोमसाप) मालगुंड शाखा आणि कवी केशवसुत स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 • सामंत म्हणाले की, मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वानी या भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. ही भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, तसेच जगाच्या पाठीवर पोचवण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल.

 • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असाही विश्वासमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.

 • कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत :
 • रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात केली.

 • या पार्श्वभूमीवर युक्रेनचे उपपंतप्रधान आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मिकायलो फेडोरोव्ह यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. यामुळे युक्रेनचा जगाशी संपर्क तोडण्याचा रशियाचा हेतू अपूर्ण राहणार आहे.

 • एलोन मस्क यांनी स्वतः युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केल्याची माहिती दिली. युक्रेनच्या मंत्र्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर १० तासात एलोन मस्क यांनी युक्रेनमध्ये ही सेवा सुरू झाल्याचं कळवलं.

पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना रिल्स बनवण्याचं केलं आवाहन; विदेशी व्हायरल जोडीचं कौतुक करत म्हणाले :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातमध्ये लोकप्रिय टांझानियन भावंडांची जोडी किली पॉल आणि त्यांची बहीण नीमा यांचा उल्लेख केला आणि भारतीयांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित केले. राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या प्रसिद्ध जोडीच्या सर्जनशीलतेचे आणि भारतीय संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले.

 • या टांझानियन जोडीने आपल्या भारतीय गाण्यांवरील व्हिडिओंनी देशातील अनेकांची मने जिंकली आहेत. किली आणि नीमा यांनी प्रजासत्ताक दिनी भारतीय राष्ट्रगीत गायले आणि लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, असेही मोदींनी नमूद केले. भारतातील वैविध्यपूर्ण भाषा लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधानांनी भारतीयांना, विशेषत: मुलांनी किली आणि नीमा यांच्याकडून बोध घेण्याचे आणि लिप-सिंक व्हिडिओ बनवण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, यामुळे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा अर्थ पुन्हा स्पष्ट होण्यास मदत होईल.

 • काही वर्षांपूर्वी १५० हून अधिक देशांतील परदेशी नागरिकांनी त्यांच्या सांस्कृतिक पोशाखात ‘वैष्णव जन तो’ गाऊन गांधी जयंती कशी साजरी केली होती, याची आठवणही मोदींनी केली. सोशल मीडियावर किली-नीमाच्या चाहत्यांना पंतप्रधानांनी या प्रतिभावान जोडीची कबुली दिल्याचे पाहून आनंद झाला. तथापि, काहींनी लिप-सिंक केलेले व्हिडिओ बनवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या कल्पनेवर टीका केली.

जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…” :
 • रशिया युक्रेनवर करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठं कार्गो विमान नष्ट झालं नाही. युक्रेनमध्ये तयार करण्यात आलेलं अंटोंनोव्ह-२२५ मिर्या असं या जगातील सर्वात मोठ्या कार्गो विमानाचं नाव होतं. हे विमान किव्हजवळच्या होस्तोमील विमानतळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये नष्ट झालंय. युक्रेनमधील सरकारी हत्या निर्मिती कंपनी असणाऱ्या युक्रोबोरोनप्रोम या कंपनीने रविवारी यासंदर्भातील माहिती दिलीय.

 • “रशियन हल्लेखोरांनी युक्रेन हवाई क्षेत्रातील महत्वाचं आणि विशेष असं एएन-२२५ मिर्या विमान नष्ट केलंय. किव्हजवळच्या होस्टोमील एअरफिल्डवर हा सारा प्रकार घडलाय,” असं कंपनीने म्हटलंय. इतकच नाही तर विमान नष्ट झालं असलं तरी पुन्हा आम्ही ते निर्माण करु असा विश्वासही कंपनीने व्यक्त केलाय. “आम्ही पुन्हा या विमानाची बांधणी करु. आम्ही आमचं सशक्त, मुक्त आणि स्वतंत्र युक्रेनचं स्वप्न पूर्ण करु,” असंही कंपनीने म्हटलं आहे.

 • या विमानाच्या दुरुस्तीसाठी तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च होईल असा अंदाज आहे. तसेच हे विमान दुरुस्त करण्यासाठी बराच वेळही लागणार आहे.

विश्लेषण : बंगाल विधानसभा अधिवेशन पहाटे २ वाजता! काय आहे यामागील कारण :
 • पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनगड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उभयतांमध्ये अगदी नळावरच्या भांडणाप्रमाणे भांड्याला भांडे लागलेले असते.

 • राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले. त्यावर कुरघोडी म्हणून राज्यपालांनी सारे आदेश ट्वीटच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यावरून वाद झाला. साधी टंकलेखनीय चूक, पण त्याचाही राज्यपालांनी किती मुद्दा ताणून धरला. शेवटी ममता बॅनर्जी यांना एक पाऊल मागे घ्यावे लागलेच.

 • काय आहे वाद - पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्च रोजी बोलाविण्याची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली. आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अधिवेशनासाठी पत्र दिले होते. पण घटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन शिफारस करायची असते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधत शिफारस पुन्हा सरकारकडे पाठविली.

 • कारण आधी पत्र मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयाशिवाय शिफारस पत्र पाठविणे हा ममता बॅनर्जी यांचा अगोचरपणाच म्हणावा लागेल. राज्यपालांनी नकार दिल्याने ममता यांच्या मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला. राज्यपालांना शिफारस पत्र पाठविले. हे शिफारस पत्र पाठविताना एक साधी चूक झाली. पण ही चूकच पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल विरुद्ध तृणमूल काँग्रेस सरकारमधील वाद वाढण्यास कारणीभूत ठरली.

 • पत्रात ७ मार्चला दोन वाजता (दोन ए. एम. असा उल्लेख करण्यात आला. तो वास्तविक २ पी. एम., असा हवा होता) अधिवेशन बोलवावे ही शिफारस होती. दोन ए. एम. म्हणजे पहाटे दोन वाजता. तशी ही मामुली चूक. टंकलेखनाकडून झालेली. वास्तविक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येणे अपेक्षित होते. पण त्यांच्या नजरेतून ती चूक सुटली.

रशियाची आर्थिक नाकेबंदी ; ‘स्विफ्ट’ प्रणालीतून बँका हद्दपार, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचा महत्त्वाचा निर्णय :
 • युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले. या कठोर निर्बंधांमागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हेतू आहे.

 • अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि कॅनडाने रशियावरील आर्थिक निर्बंधांना मान्यता दिल्यानंतर काही रशियन बँकांना ‘स्विफ्ट’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रशियाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असलेली ‘तेल आणि वायू निर्यात’ ‘स्विफ्ट’वर अवलंबून आहे. त्यामुळे या निर्बंधांचा रशियाला मोठा फटका बसेल, असा अंदाज आहे.

 • ‘स्विफ्ट’ ही जगातील मुख्य बँकिंग संदेश सेवा आहे. भारतासह २००हून अधिक देशांमधील सुमारे ११ हजार बँका आणि वित्तसंस्थांना ती सेवा पुरवते. ही प्रणाली जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदेशवहनात केंद्रस्थानी असल्याने रशियाला गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागेल, असे सांगण्यात येते.

 • रशियन सैन्याचे युक्रेनवर हवाई हल्ले सुरू असताना मित्रराष्ट्रांनी शनिवारी कठोर आर्थिक निर्बंधांचा निर्णय घेतला. त्यानुसार रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या काही मालमत्ताही गोठवल्या जाणार आहेत. त्यामुळे परदेशातील राखीव अर्थसाठे मिळवण्याच्या रशियाच्या क्षमतेवर अंकुश येईल. मित्रराष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांचा प्रभाव कमी करण्यासाठी रशिया युद्धासाठी पैसा वापरणे थांबवेल, असा या निर्बंधांमागील हेतू आहे.

“सर्व मराठी बंधू भगिनींना…”, पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व मराठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून तमिळ, तर जगातील सर्वात बोलल्या जाणाऱ्या भाषेंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदीचाही गौरव केलाय. यावेळी त्यांनी मातृभाषा आईप्रमाणे आपलं जीवन घडवते असं मत व्यक्त केलं.

 • पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. यातील तज्ज्ञ लोक मातृभाषा शब्द कोठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत अधिक माहिती देऊ शकतात.

 • जशी आपली आई आपलं आयुष्य घडवते, तशीच मातृभाषा आपलं जीवन घडवते. भारतात जगातील सर्वात जुनी भाषा असलेली तमिळ भाषा आहे. २०१९ मध्ये हिंदी जगातील सर्वाधित बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती.”

 • “सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” “आजच्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस देखील आहे. ‘सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. “स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी देखील काही लोक मानसिक द्वंदात आहेत. त्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोशाख, आपली खाद्यसंस्कृती याबाबत संकोच वाटतो. खरंतर जगात असं कोठेही दिसत नाही,” असंही मोदींनी नमूद केलं.

 • “काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाचं एक जन आंदोलन सुरू” नरेंद्र मोदी म्हणाले, “पुन्हा एकदा लोकांनी मिळून काही तरी अद्भुत काम करण्याचं ठरवलं आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाचं एक जन आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत श्रीनगरचे तलावांची साफ-सफाई आणि त्यांचं जुनं वैभव पुन्हा आणण्याचे अनोखे प्रयत्न होत आहेत.

‘या’ दोन संघांत खेळवली जाणार ओपनिंग मॅच; वानखेडेवर रंगणार झुंज :
 • आयपीएल २०२२ (IPL 2022) २६ मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, १० संघांच्या या स्पर्धेचा सलामीचा सामना मागील हंगामातील दोन अंतिम फेरीतील संघांमध्ये खेळवला जाईल. म्हणजेच गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या मोसमातील उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. आयपीएल २०२१च्या विजेतेपदाच्या सामन्यात, महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला.

 • या मोसमात एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील स्टेडियमवर ५५ सामने, तर पुण्यात १५ सामने खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, वांद्रे येथील कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम संघांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

 • सामन्याचे ठिकाण, प्रशिक्षण स्थळ आणि सांघिक हॉटेलमधील अंतर लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी बीसीसीआयसोबत बैठक झाल्याचे सांगितले.

विंडीजचे माजी क्रिकेटपटू सोनी रामाधीन यांचे निधन :
 • वेस्ट इंडिजचे माजी फिरकीपटू सोनी रामाधीन यांचे रविवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्रिनिदाद येथे १९२९ साली जन्मलेल्या रामाधीन यांनी दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ४३ कसोटी सामन्यांत १५८ मोहरे टिपले.

 • ऑफ-स्पिनर रामाधीन आणि डावखुरे फिरकीपटू अ‍ॅल्फ व्हॅलंटाइन या फिरकी जोडीने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. या जोडीने १९५० साली पहिल्यांदा एकत्रित खेळताना इंग्लंडमध्ये ५९ गडी बाद केले होते. विंडीजच्या संघात त्यावेळी फ्रँक वॉरेल, एव्हर्टन विक्स आणि क्लाइड वॉलकॉट या उत्कृष्ट त्रिकुटाचा समावेश होता. मात्र, रामाधीन (२६ बळी) आणि व्हॅलंटाइन (३३ बळी) यांच्या कामगिरीमुळे विंडीजने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिकाविजय मिळवला. विंडीजने ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली होती.

 • रामाधीन यांनी ८ जून १९५० रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विंडीजचे प्रतिनिधित्व करणारे ते भारतीय वंशाचे पहिले खेळाडू ठरले. त्यांनी या सामन्याच्या दोन्ही डावांत दोन-दोन बळी घेतले. त्यांनी अखेरचा सामना १९६०-६१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम आजही रामाधीन (७७४) यांच्या नावे आहे.

२८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.